ब्लु फिल्म.

Submitted by A M I T on 29 November, 2011 - 00:43

(वैधानिक इशारा : हा लेख वाचण्यासाठी वाचकाचे शारीरीक आणि मानसिक वय १८ वर्षे पुर्ण असणे
आवश्यक आहे. Proud )

"साला, जेव्हा मला नोकरी लागेल ना, तेव्हा आपण पिझ्झा ऑर्डर करायचा." पक्या आपल्या हातातील भेळेचा शेवटचा बकाणा तोंडात भरत भेळ संपवत म्हणाला.

"नायतर काय? किती दिवस नुसतीच भेळ चापायची..!" एव्हाना गोपाळनेही आपली भेळ संपवली होती.

पक्या आणि गोपाळला भेळेचा प्रश्न 'भेळ'सावत होता.

पक्या आणि गोपाळ आपापली भेळ संपवून जेव्हा मोठ्ठ्या आशेने आणि जीभेनेसुद्धा वश्या नि माझ्याकडे पाहत होते, तेव्हा वश्याने केविलवाण्या चेहर्‍याने एकवार माझ्याकडे पाहीले. आम्ही दोघांनी आमच्यांत स्पर्धा लागल्यासारखी भेळ क्षणात संपवली. हो... नाहीतर ती भेळ एव्हाना पक्या आणि गोपाळच्या भरल्या पोटात सुखनैव नांदली असती.

पक्या आणि गोपाळने नुसताच आवंढा गिळलेला आम्ही पाहीला आणि आम्ही दोघांनी सुखाने ढेकर दिला.

"कुठल्यातरी पाणी उपसणार्‍या पंपाची जाहीरात आहे." मी हातातील भेळेच्या कागदावरील जाहीरात पाहत म्हणालो.

हा आमचा नेहमीचाच छंद.. म्हणजे भेळ संपली की भेळेचा कागद वाचायचा.

"मला गुटख्याची जाहीरात आहे. काय तर म्हणे... खोली पुडी.... खुश्बु उडी..!" इति वश्याच्या भेळेचा कागद.

"टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हेल्स." कागद पाहून गोपाळने त्याचा गोळा करून कुठेतरी दूर भिरकावला.

"तुझ्या कागदात काये रे पक्या?" मी पक्याला खोचकपणे म्हणालो.

मागच्या वेळी पक्याच्या कागदात "डॉगफुड"ची जाहीरात होती.

पक्याने हळूहळू कागदाची सुरळी उघडली आणि त्यात त्याने जे काय पाहीले, त्याने त्याच्या डोळ्यांची बुब्बुळे प्रसरण पावली.

"काये रे?" वश्या.

"फुग्याची जाहीरात आहे." पक्या कागदावरील नजर न हटवता बोलला.

"फुग्गा..!!" मला हसू आवरेना.

गोपाळने पक्याच्या हातातील कागद जवळजवळ हिसकावून घेतला. त्यावर 'निरोधाची' जाहीरात होती. माझ्या कल्पनेचा फुगा फुटला होता.

काही वेळ कुणीच काही बोलेना.

पक्याचं मन आता चादरीत काय काय गोंधळ घालीत असेल? याचाच विचार करण्यात आम्ही तिघेही मश्गुल झालो.

"माझ्या परमप्रिय मित्रांनो, खुप दिवस तुम्हांला सांगेन म्हणत होतो... तो दिन आज आला आहे. मागे माझ्या मावसभावाने गुपचूप मला दोन ब्लु फिल्मच्या सीड्या दिल्या आहेत." पक्या आमची तंद्री भंग करीत म्हणाला.

सीडीचं अनेकवचन 'सीड्या'च होतं, हे त्याने "जर विडीचं अनेकवचन 'विड्या' होऊ शकतं, तर सीडीचं अनेकवचन 'सीड्या' का होऊ शकत नाही?" असा प्रश्न विचारून पटवून दिलं होतं.

"ब्लु फिल्म?" हे म्हणताना वश्याचा चेहरा काळा - 'निळा' पडला. त्याच्या चेहर्‍यावर नुकताच खुन केलेल्या अपराध्याचे भाव होते.

"हम्म.." पक्याने नुसताच हुंकार भरून दुजोरा दिला.

"नावं काय आहेत त्या फिल्मची?" गोपाळच्या डोळ्यांत ५७ चातकांची उत्सुकता.

गोपाळचा तो प्रश्न आणि माझी अवस्था गोपाळहून निराळी नव्हती.

"जवानी का फौलाद..."

"आणि?" उत्सुकता शिगेला.

"जिस्म का बारूद." पक्याने जणू बारूद अंगावर फेकल्यासारखी आमची अवस्था झाली.

"गेली कित्येक दिवस त्या फिल्म पाहण्याची इच्छा माझ्या मनात तशीच पडून राहीलेली आहे. साला, संधीच मिळाली नाही कधी." पक्याची हतबलता आम्ही समजू शकत होतो.

"आणि तशी संधी आयती चालून आलेली असेल तर..." आम्हां तिघांच्या माना गोपाळकडे वळल्या.

"म्हणजे?" तीघांचा कोरस.

"म्हणजे येत्या शनिवारी माझे आई-बाबा कुणा नातेवाईकाच्या लग्नानिमीत्त गावाकडे प्रस्थान करणार आहेत. याहून उत्तम संधी का असू शकते?" गोपाळने संधीचा विग्रह केला.

"दॅट्स ग्रेट." असं म्हणून हर्षातिरेकाने पक्याने गोपाळला मिठी मारली. गोपाळने लागलीच पक्याला दूर केलं.

मागे कधीतरी असचं हर्षातिरेकाने पक्याने गोपाळला मिठी मारून त्याचा मुकापण घेतला होता.
तेव्हा माझ्या "पक्या कंट्रोल...!! तो गोपाळ आहे... शिल्पा शेट्टी नव्हे." या विधानावर कॉमेडी सर्कसमध्ये कोण ती अर्चना जितक्या मोठ्ठ्याने हसली नसेल, त्याच्या दुप्पट मोठ्ठ्याने आम्ही सारे हसलो होतो.
त्यादिवशीच्या झाडून सगळ्याच वर्तमानपत्रांत 'शिल्पाचे गाल कुणा फिरंग्याच्या ओठांचे शिकार झाल्याची' बातमी झळकली होती.

"मग ठरलं तर... शनिवारी रात्री आपण चौघे माझ्या घरी फिल्म पाहण्यासाठी जमणार आहोत." गोपाळने शनिवारचा कार्यक्रम नक्की करून आजच्या सभेची सांगता केली.

*

गोपाळचे आई-वडील शनिवारी त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गावाला जाणार आहेत आणि त्यांच्या शेजारील व्यक्तीचा अपघाती मृत्यु झाल्याने गोपाळला एकट्याला झोपायची भिती वाटते, म्हणून त्याच्या सोबतीला आपण जाणार आहोत, अशी थाप आपापल्या घरी मारून आम्ही तिघेही गोपाळच्या घरी जमलो.

तिघांनी एकच थाप मारणे गरजेचे होते. अन्यथा पुढे कधी आमच्या या थापेचं भांड फुटलं असतं तर, ढोलकीच्या गालावर पडते तसली खरीखुरी थाप आमच्यापण गालावर पडण्याचा संभव अधिक होता.

इतरांच्या आईवडीलांना इतकीशी थाप पचली, पण मला मात्र शेजारील व्यक्तीचा मृत्यु कसा झाला? याचीपण थाप मारावी लागली.

मी मारलेली ती थाप अशी होती..

अपघाती मृत्यू होऊन स्वर्गवासी झालेल्या त्या काल्पनिक व्यक्तीला सिगारेटचं भयानक व्यसन होतं. एके दिवशी चौथ्या मजल्याच्या गॅलरीत उभं राहून तो सिगारेटचे झुरके घेत होता. सिगारेट संपलं म्हणून त्यानं सिगारेटचं थोटूक खाली फेकून दिलं आणि नेहमीप्रमाणे ते विझवायला एक पाय खाली टाकला आणि .... त्याचं ते पाऊल थेट स्वर्गात पडलं, असं त्याची बायको ह्याला - त्याला सांगत सुटलीय.
इतक्या लांबीचं पाऊल टाकणारा पुराणकाळातील वामनानंतर हा दूसरा अवतारी इसम असावा.
उलट शेजार्‍यांच्या म्हणण्यानुसार त्या नवरा-बायकोत विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून नियमित वाद होत. बायकोनेच त्याला गॅलरीतून ढकलून देवून त्याचा काटा की काय म्हणतात? तो काढला असावा. आता यातलं खरं-खोटं सर्वात वरच्या गच्चीत बसलेला ईश्वरच जाणे.

रामगोपाल वर्मा ने म्हणे या वास्तूला नुकतीच भेट दिली. सध्या तो 'पुढचं पाऊल' नावाचा मराठी भुतपट काढण्याच्या विचारात आहे म्हणे.

माझ्या आई-वडीलांच्या चर्चेला वाचा फोडण्यास ही थाप पुरेशी होती. नवराच कसा वाईट? बायकोच कशी खलनायिका? या चर्चेच्या मुळ इंजिनासोबत शेजारी कित्ती खरं बोलतात? आणि कित्ती टवाळक्या करतात? रामगोपाल वर्माच्या चित्रपटातील भुतं प्रेक्षकांना घाबरवण्यात कितपत यशस्वी होतात? हे चर्चांचे आणखी दोन डब्बे आपसुकच जोडले गेले.

तासाभरापुर्वीच गोपाळचे आई-बाबा गावाला जाण्यासाठी निघून गेले होते. गोपाळने दाराला आतून कडी घातली. पक्याने पॅन्टमध्ये अडकवलेल्या पोटाजवळील सीड्या गोपाळकडे दिल्या. गोपाळने टिव्ही आणि सीडी प्लेअर ऑन केला. सीडी प्लेअरमध्ये 'जिस्म का बारूद' भरून आम्ही चौघे टिव्हीसमोरील बेडवर आडवे झालो.
फिल्म सुरू झाली होती. टिव्हीस्क्रीनवर फिल्मची नामावली दिसत होती.

"च्यायला ही नावं पळव रे." पक्या करवादला. त्याला जरादेखील धीर धरवत नव्हता.

सीडी प्लेअरचं रिमोट माझ्या हाती होतं. मी फॉरवर्डचं बटन दाबू लागलो. पण फिल्म काही पळायचं नाव घेईना. मी सीडी प्लेअरच्या अगदी समोर जाऊन बटन दाबले तरी परीणाम शुन्य.

"श्या..! काय भंगार रिमोट आहे..!" मी वैतागून बोललो.

"अरे त्याची बॅटरी संपलीय." इतका वेळ माझी रिमोट चालवण्याची धडपड गम्मतीने पाहत बसलेला गोपाळ बोलला.

"लेका, मग आधी नाही का सांगायचं..!" रिमोटची बॅटरी संपली तशी आता माझी सहनशीलताही संपली.

"गेल्या दोन दिवसांपासून मी माझ्या बाबांना बॅटरी आणायला सांगतोय. पण ते बॅटरी आणायचंच विसरून जातात. कुठली गोष्ट त्यांच्या लक्षात राहील तर शपथ..! माझे बाबा म्हणजे ना एक नंबरचे.... एक नंबरचे.... भुलक्कड..!!" ऐनवेळी मराठीतील 'विसरभोळे' हा शब्द आठवला नाही म्हणून गोपाळने मराठी वाक्यात हिंदी शब्द घुसडला. कैकवेळा तो अशी हरकत करीत असे.

"अरे टिव्हीचा रिमोट बिघडून तर महीना झाला. तो नवीन आणा, म्हणून गेला महीनाभर त्यांचे मागे लागलोय." गोपाळने चॅनेल बदलत आपल्या घरातला एपिसोड सादर केला.

"तुझी आई कशी काय 'झेलत' असेल हे सगळं?" इतका वेळ गप्प बसलेल्या वश्याला वाचा फुटली.

कधी कधी तो क्रिकेटमधली 'क्रियापदे' वापरतो.

"अरे उलट तिला यात आनंद वाटतो. म्हणजे जेव्हा कधी आई-बाबांचं भांडण होतं, तेव्हा ती मुद्दामहून कुठल्या कुठल्या जुन्या गोष्टी उकरून काढते आणि गम्मत म्हणजे तिला त्यातलं सगळचं सविस्तर आठवत असतं... म्हणजे, भांडताना ती मध्येच म्हणते, अहो तेव्हा नाही का? तुमच्या मागे कुत्रा लागला होता तो..! मला तर वाटतं, लहानपणी तिला समजायला लागल्यापासूनच्या सगळ्या घटना तिला वेळ, तारखेसहीत लख्ख स्मरत असाव्यात." गोपाळच्या वडीलांच्या मागे कुत्रा लागल्याच्या कल्पनेनेच आम्हां तिघांना प्रचंड हसू आलं.

"मला तर तुझ्या वडीलांची काळजी वाटतेय, गोपाळ." मी काळजीयुक्त अभिनय करत म्हणालो.

"का रे?" गोपाळचा सुरही काळजीचाच होता.

"नाही म्हणजे.. एखादे वेळी तुझे बाबा श्वास घ्यायचेच विसरले तर..." मी एवढं म्हटल्याबरोबर हास्यांचे बांध फुटले.

माझ्या या अगदीच टाकाऊ म्हणा वा इयत्ता तिसरीतला म्हणा..! अशा विनोदामुळेच मी या चौकडीत टिकून असावा, असा माझा आपला समज आहे.

"ए, फिल्म बघा रे." हसता हसता पक्या एकदम गंभीर झाला.

नामावली संपून फिल्म सुरू झाली होती. आम्ही सारे विलक्षण आवडीने फिल्म पाहू लागलो.

आमच्यात त्यातल्या त्यात सभ्य म्हणावा, असा वश्या मोठ्ठा 'आ' वासून फिल्मचा आनंद घेत होता की 'गिळत होता?' त्याच्या तोंडातून लाळ टपकायची तेवढी बाकी होती.

पक्या आणि गोपाळच्या पापण्या शेवटच्या कधी मिटल्या होत्या? हे सांगणं कठीण होऊन बसलं होतं.
एव्हाना प्रत्येकाने आपापले उजवे पाय आपापल्या डाव्या पायांत गुंतवून टाकले होते.

इतक्यात वश्या उठून उभा राहीला.
"काय रे काय झालं?" पक्याने फिल्मवरील नजर न हटवता विचारले.

"जरा हलकं होऊन येतो. टॉयलेट कुठे आहे?" शेवटचा प्रश्न अर्थात गोपाळला होता.

"इथून बाहेर गेलास की उजवीकडे शेवटाला या मजल्याचं कॉमन टॉयलेट आहे." गोपाळने वश्याला मलमुत्रनि:सारण केंद्राचा पत्ता सांगितला.
हे सांगताना तो ट्राफीक हवालदारासारखं दिशा दाखवण्यासाठी हवेत आपला हात फिरवीत होता. त्याचा हात सारखा- सारखा पक्याच्या डोळ्यांपुढे नाचत होता. एका क्षणी तर त्याच्या हाताचा स्पर्श पक्याच्या गालांना पण झाला. पक्याला एकदम 'थ्रीडी' फिल्म पाहत असल्याचा फील आला.

वश्या कडी काढून बाहेर गेला आणि टॉयलेटच्या वाटेला लागला.

"पक्या जरा कडी घाल रे दाराला." गोपाळने पक्याला 'जोखमीचं' काम सांगितलं.

काहीसा त्रागा करतच पक्याने दाराला कडी घातली आणि येवून बेडवर पसरला.
थोड्याच क्षणात दारावर टकटक झाली. पक्या मोठ्ठा सुस्कारा टाकत बेडवरून उठला. कडी खोलून त्याने वश्याला आत घेतले आणि पुन्हा कडी घालून तो बेडवर पसरला.

आता फिल्म बर्‍यापैकी रंगात येऊ लागली होती, हे सार्‍यांच्या गुप्त हालचालींवरून कळत होते.

इतक्यात वश्या पुन्हा उठून उभा राहीला. पक्याने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला.

"जरा हलकं होऊन येतो." वश्याच्या तोंडातून कसेबसे शब्द फुटले.

"अरे साल्या किती हलका होतोएस? जास्त हलका होऊ नकोस, नाहीतर तुझ्या घरी पंखा लावायचेपण वांधे होतील." पक्यासहीत आम्हा तिघांत एकच हशा पिकला.

"वश्या लेका, नक्की हलका व्हायलाच जातोएस ना? की टॉयलेटमध्ये सोलो परफॉर्मन्स..!!" माझ्या या वाक्यावर तर पक्या नि गोपाळ अंगाला चित्रविचित्र आळोखे-पिळोखे देत बेड गदागदा हलवत हसू लागले.

अपमानित वश्या हलका होण्यासाठी जड पावलं टाकीत बाहेर गेला.

एकंदर मघाच्या क्रिया पुन्हा तशाच घडल्या. म्हणजे वश्याचं बाहेर जाणं, पक्याचं दाराला आतून कडी घालणं, वश्याने दारावर टकटक करणं, पक्याने कडी खोलून वश्याला आत घेणं इ. इ.

काही मिनिटे फिल्म पुढे सरकली असेल तोच....

वश्या पुन्हा उठला. आता मात्र पक्या भयंकर म्हणजे भयंकर वैतागला. वश्याचा 'हलक'टपणा वाढतच चालला होता.

फिल्म सेकंदभरदेखील नजरेआड होणं, पक्यासाठी परवडणारं नव्हतं. यावेळी त्याने कडी न घालवण्याचा निर्णय घेतला.

हलका प्रकरणामुळे फिल्म संपवल्यावर पक्या वश्याच्या पार्श्वभागावर हलक्या लाथांचा वर्षाव करून वश्याची वास'लाथ' नक्कीच लावणार, हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नव्हती.

वश्या दार नुसताच बंद करून बाहेर गेला.

फिल्ममधील दृश्य भलतीच प्रेक्षणीय होत चालली होती.

काही वेळ गेला असेल नसेल... तोच खाडकन दार उघडले गेले. आमच्या माना वश्याला पाहण्यासाठी गर्रकन दाराच्या दिशेने वळाल्या.

पण दारात वश्या नसून साक्षात गोपाळचे आई-बाबा बॅगांसहीत उभे असलेले पाहून आमच्या तोंडचे पाणीच पळाले.

ते आश्चर्यमिश्रीत रागाने टिव्हीवर सुरू असलेली फिल्म आणि आमच्याकडे आळीपाळीने पाहत होते.
गोपाळच्या आईने तर आपल्या हातातील बॅग टाकून त्याच हाताने पदर घेवून स्वतःच्या तोंडात कोंबला. आता वश्यापण येऊन त्यांच्या मागे उभा राहीला होता.

मी चतुराईने झटकन सीडी प्लेअर बंद करण्यासाठी हातातील रिमोटवर बटन शोधू लागलो. नंतर माझ्या लक्षात आलं की, त्यातली बॅटरीच संपलीय.

फिल्म अजून सुरूच होती.

ऐनवेळी काय करावं ते कुणालाच काही सुचेना.

अखेर गोपाळने घारीच्या चपळाईने टिव्ही आणि सीडी प्लेअरच्या वायरींवर झडप घेऊन सॉकेटमधून त्यांच्या पीनाच उपटून टाकल्या, तेव्हा कुठे टिव्हीवरील दृश्य नाहीशी झाली. बटन बंद करूनही सारं बंद झालं असतं, हे नंतर सुचलं.

झाल्या प्रकाराने आम्ही भलतेच खजिल झालो होतो. आता आम्हां तिघांचे केविलवाणे चेहरे त्या बंद टिव्हीच्या काचेत दिसत होते.

गोपाळचे बाबा गाडीचं रिझर्वेशन तिकीट घरीच विसरले होते.

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

Rofl

असेच आमच्या शाळेतल्या २ पोरींन्ना असला पिक्चर पाहताना त्यांच्च्या घरच्यांन्नी पकडले होते ....

नंतर माझ्या लक्षात आलं की, त्यातली बॅटरीच संपलीय.

फिल्म अजून सुरूच होती. >>>>>> हे जाम भारी होतं Proud आणि 'आईबाबा दारावर तरी टिव्ही सुरुच' असा विचार करुन हसुन हसुन गडबडा लोळन.

आम्ही पण पाहिले आहे पण कधी पकडलो गेलो नाही..... पुन्हा ते दिवस आठवले..... अजुन फुलवता आले असते हे विनोदी लेखन.