ओठात वेदनेचा..

Submitted by प्राजु on 28 November, 2011 - 18:38

ओठात वेदनेचा आहे सदैव प्याला,
ठावूक चव सुखाची, आहे इथे कुणाला!

निघतात पोपडे अन होतात भग्न भिंती
वासे तुटून जाता, लिंपू किती घराला?

तुकडेच काळजाचे हासून वेचते मी
माझी व्यथा पुराणी, सांगू कुणा कशाला?

येथे रवी बुडो वा, तारू बुडो मनाचे
काठावरी तरी ना दंगा कधीच झाला!!

सांभाळण्यात नाती, जातो दिवस थकूनी
तरिही सदा उपेक्षा, घेते पुन्हा उशाला!

दाटून मेघ येती, बेबंद ना बरसती!
कोंडून राहण्याची सक्तीच आसवाला!

दु:खासवे सुखाने, मी विश्व मांडलेले
घालून कोण गेला, त्याच्यावरीच घाला?

हसतात सर्व 'प्राजू' तूही हसून घे ना
चिंता तुझ्या मनाची पडली कुठे जगाला!

-प्राजु

गुलमोहर: 

ओठात वेदनेचा आहे सदैव प्याला

कोंडून राहण्याची सक्तीच आसवाला!

चिंता तुझ्या मनाची पडली कुठे जगाला!

वगैरे सुटे मिसरे आवडले. Happy

येथे रवी बुडो वा, तारू बुडो मनाचे
काठावरी तरी ना दंगा कधीच झाला!!

सांभाळण्यात नाती, जातो दिवस थकूनी
तरिही सदा उपेक्षा, घेते पुन्हा उशाला!
वाह!!!

तरिही सदा उपेक्षा, घेते पुन्हा उशाला! - अजून टोकदार झाला असता असं वाटलं...
शुभेच्छा! Happy

सांभाळण्यात नाती, जातो दिवस थकूनी
तरिही सदा उपेक्षा, घेते पुन्हा उशाला!

हसतात सर्व 'प्राजू' तूही हसून घे ना
चिंता तुझ्या मनाची पडली कुठे जगाला!

गझल मस्तच आहे... वरचे दोन शेर एकदम खास Happy

सगळीच आवडली,

पण विशेष आवडलेल्या ओळी >>

दाटून मेघ येती, बेबंद ना बरसती!
कोंडून राहण्याची सक्तीच आसवाला!

मनापासून आभार..!

या गझलेतल्या..

येथे रवी बुडो वा, तारू बुडो मनाचे
काठावरी तरी ना दंगा कधीच झाला!!

हा शेर.. मीनाकुमारी यांच्या गझलेतल्या एका शेराचा अनुवाद आहे. यामध्ये तो बसला त्यामुळे तो घातला आहे त्यात.

हा शेर.. मीनाकुमारी यांच्या गझलेतल्या एका शेराचा अनुवाद आहे. यामध्ये तो बसला त्यामुळे तो घातला आहे त्यात.>>>>>
प्राजु.. गझल तर आवडलीच पण तुमचा प्रांजळपणा खुप भावला.. Happy