नवीन पुरस्कारांची घोषणा ...

Submitted by Kiran.. on 28 November, 2011 - 10:12

मित्रांनो,

आज २८नोव्हेंबर २०११ या ऐतिहासिक दिनी समस्त वाचकांसाठी नवीन पुरस्कारांची घोषणा करताना मला अतीव आनंद होत आहे. या पुरस्कारांसाठी निरनिराळ्या संकेतस्थळावर नियमित लिहीणा-या व्यक्तींचा विचार करण्यात येणार आहे. लोकशाहीवर विश्वास असल्याने सर्वांच्याच सहभागातून या पुरस्कारांना अंतिम रूप देण्यात येणार आहे. आपल्या अवलोकनार्थ या पुरस्कारांची माहिती (कि महती ) थोडक्यात देण्यात येत आहे..

१. सहस्त्रबुद्धी पुरस्कार

- भारतात अनेक मंदबुद्धी लोक राहतात हे सिद्ध करणारे लोक या पुरस्कारास पात्र राहतील
अर्हता - जादूच्या आरशासारखे २४ X ७ अपडॅटेड गूगल अर्थ वापरता येणे.. या वापराने

अ. ओसामा बिन लादेन मेलाच नाही, तो अमूक एक ठिकाणी जिवंत आहे असं ठणकावून सांगता येणे ,
ब. इशरत जहां मर्डर केस घडताना गूगल अर्थ वर पाहीलेले आहे या विश्वासाने न्यायालयास सल्ले देणे
क. स्विस बँकेतल्या काळ्या पैशाची खाती ज्यांच्या नावे आहेत त्यांची नावे विकिलिक्सच्या आधी जाहीर करणे.. इ. इ.

२. शतबुद्धी पुरस्कार

- आतापर्यंत इतरांनी केलेलं सर्व वाया गेलं हे सिद्ध करू शकणारे लोक या पुरस्कारास पात्र राहतील

अर्हता - यांच्याकडे गूगल अर्थ नसेल तरीच चालू शकते. पण कुठल्याही समस्येवर चुटकीसारखे उपाय सुचवण्याची क्षमता.

उदा. - ( काही नमुने)

अ. राईट टू रिकॉल - या उपायाने लग्न झालेल्या व्यक्तीस आपल्या पदावरून माघारी बोलवण्याची सुविधा असावी
ब. कच-याच्या कंटेनरभोवती कचरा होऊ नये म्हणून जमीन खोदून तिथे कच-याचा कंटेनर ठेवावा. (उपसूचना : कंटेनर उचलून नेल्यावर त्या खड्ड्यात कुणी पडले तर जबाबदार नाही )
क. गरिबी हटाव योजना - ३२ रू पेक्षा जास्त कमाई असणा-यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणणे,
ड. देशास महासत्ता बनवणे - एका रात्रीत रेल्वेचा थर्डक्लासचा डबा रद्द करणे
इ. भारतामधे कामाचा वेग वाढवण्यासाठी - रेल्वेमधे तत्काळ सुविधा चालू करणे
ई. देशात उधळपट्टीवर होणार खर्च रोखण्यासाठी - सिनेमातल्या कमी कपड्यातल्या दृश्यांना कात्री न लावणे, बिग बॉसमधे काटकसर स्पेशालिस्ट अभिनेत्रीस परदेशातून पाचारण करणे..
उ. स्वच्छतेचं महत्व वाढीस लागावं यासाठी - बिपाशा बसू या स्वच्छताप्रिय अभिनेत्रीस जाहीरातबाजी करण्यास सांगणे इ. इ.

३. बुद्धीवंत पुरस्कार

गूगल अर्थ नसणारे. उपाय न सुचणारे पण अग्रलेख, वर्तमानपत्रातले लेख, आयबीएन लोकमत पाहून तज्ञ झालेले लोक या पुरस्कारास पात्र राहतील.

अर्हता - कुठल्याही एखाद्या विषयावर लंबुळक्या चेह-याने ( काल वाचलेल्या ताज्या लेखातली ) मला असं वाटतं कि असं म्हणत चार दोन वाक्ये ठोकून देणे..

उदा.

देशात वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आपणास काय वाटते या प्रश्नावर उत्तर देताना.. मला प्रामाणिकपणे मत विचाराल तर ..( अरे लब्बाडा ) आपल्यापासूनच आपल्याला सुरूवात करावी लागेल. ( प्रश्न विचारणारी निवेदिका सुंदर असेल तर थोडं थांबून पॉज घ्यावा आणि तिला महत्व देत नाही असं दाखवत बगळ्यासारखं ध्यान लावत पुढे बोलावं ) . मला वाटतं भ्रष्टाचार प्रत्येकाला जमत नाही हीच खरी शोकांतिका आहे. वपुंनी म्हटलेचि आहे. पापभीरू म्हणजे काय - ज्याला संधी मिळत नाही तो पापभीरू !! याच न्यायाने ज्याला संधी मिळत नाही तो भ्रष्टाचाराविरोधी. तेव्हा हे युद्ध संधी मिळालेले आणि संधी न मिळालेले यांच्यातील आहे.

इत्यादी इत्यादी

मंदबुद्धी -

वरीलपैकी काहीच न जमणारे लोक या पुरस्कारास पात्र राहतील.

उदा. : वादग्रस्त प्रकरणात स्वतः पाहील्याशिवाय मत देता न येणे , स्वतः तपास केलेला नसल्यास खूनी कोण हे सांगता न येणे , कायदा हातात घेता न येणे, संकेतस्थळावर देखील तलवार चालवता न येणे, कथा लिहीताना त्या कल्पनाविलासातसुद्धा सुंदर सुंदर ललना नायकावर लट्टू न होणे, स्वप्नात देखील किराणामालाची यादी दिसणे इ. इ.

पुरस्कारांच्या स्वरूपावर कुणाची काही मते आक्षेप असतील तर ते नक्की कळवावेत. त्याप्रमाणे समितीस योग्य ते बदल करणे सोयीचे जाईल
( विसू. - बदल करण्यासाठी दबाव आणू नये तसेच उपोषणास बसू नये )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा Lol जबरदस्त.
यासाठी निवड समिती जाहीर करावी म्हणजे आमच्या बुद्धीनुसार अर्ज करता येतील. Happy