गंगासागर

Submitted by आरती on 28 November, 2011 - 09:57

Staten Island कडे जाणारी ती नारंगी रंगाची फेरी, आपल्या पोटात १५०० पेक्षा अधिक जीवांचे ओझे वागवून, काहीश्या अवघडलेल्या अवस्थेत पलीकडच्या किनाऱ्याकडे सरकताना, हडसनचा शहराच्या पसाऱ्यात घुसमटलेला प्रवाह, जणू या दिव्यातून पार पडण्याची शक्ती मिळावी म्हणून तिला गोंजारताना, जेंव्हा जेंव्हा मला माझ्या खिडकीतून दिसतो तेंव्हा तेंव्हा मला आठवण येते हुगळीच्या विस्तीर्ण पात्रात स्वताला झोकून देणाऱ्या 'त्या' फेरीची, जी विश्वासाने आणि निर्धास्त मानाने जणू आपल्या मातेच्या कुशीत झेपावत असते.

"ती फेरी" आठवण्याचे कारण, त्या अनुभवा नंतर काही दिवसातच घेतलेला हा अनुभव हे असले, तरी, दुसरे अजून एक साम्य नजरेआड करून चालणारच नाही. Staten Island कडे जाणारी फेरी, 'हडसनच्या' त्या वळणावर दिसते जे तिने खास अटलांटिककडे जाण्यासाठी घेतले आहे. आणि Sagar Island कडे जाणारी ती फेरी पण 'हुगळीच्या' त्या प्रवाहाला कापत जाते जो बंगालच्या उपसागरात मिसळून जाण्यासाठी शब्दशः घोड्याच्या नालेच्या आकारात वळून (संपूर्ण यु टर्न) आता प्रवासाच्या अंतिम टप्यात आहे. [टिप : घाबरुनये, भारत -अमेरिका अशी मुक्तपिठीय तुलना लिहिण्याचा मानस अजिबातच नाही Happy ]

Sagar Island, गंगा जिथे बंगालच्या उपसागराला मिळते ते संगमाचे ठिकाण, जे गंगासागर नावाने एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हुगळी, म्हणजेच गंगा नदी. गंगेच्या मुर्शिदाबादपासून निघालेल्या प्रवाहाला पश्चिम बंगाल मधे हुगळी या नावाने संबोधले जाते. पश्चिम बंगालच्या दक्षिणेस हे पवित्र संगमाचे ठिकाण आहे, जिथे लाखो भाविक आणि पर्यटक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने आणि कुतूहलाने जातात.

कोलकात्याला जायचे ठरले तेंव्हा आवर्जून भेट देण्याची ठिकाणे या यादीत, सगळ्यात वरती होते सुंदरबन - Tiger of Bengal, सिक्कीम, दार्जीलिंग, गुवाहाटी मार्गे काझीरंगा, शांतीनिकेतन. आणि शहराच्या जवळपासचे पण अत्यंत महत्वाचे असे वेरुलमठ, दखीनेश्वर, सुभाष बाबू, विवेकानंदांचे निवास स्थान, ईडन गार्डन. बाकी गेल्यावर बघू / ठरवू मधे भूतान, बांगलादेश-ढाका हे पण होते. लहानपणच्या भूगोलाच्या पुस्तकापर्यंत मागे घेऊन जाणारी, बंगालचा उपसागर, त्यात होणारी वादळे, यातले काय काय अनुभवायला मिळते आहे, याची उत्सुकता पण होतीच. पण गंगासागर हे नाव, पहिल्या-शेवटच्या, कुठल्याच क्रमांकावर माझ्या यादीत नव्हते.

असेच एकदा अचानक माझ्या एका पूर्वाश्रमीच्या बॉसचा (आता मैत्रीण) फोन आला. बोलता बोलता ती म्हणाली, "तू कोलकात्याला असे पर्यंत मी एकदा नक्की येऊन जाईन, आईला बरेच दिवसांपासून गंगासागरला जायचे आहे, तिची ती इच्छा तरी पूर्ण होईल". गंगासागर इतके जवळ आहे ? मला प्रश्न पडला. मुळातच समुद्र कोलकाता शहरापासून बराच म्हणजे "जवळपास" १५० किलोमीटर इतका लांब आहे, असे ऐकले होते. लगेच गुगलचा सहारा घेतला, अंतर तपासले. संक्रांतीचा मुहूर्त साधून आपणही जानेवारीत चक्कर मारावी असे ठरवून टाकले. गंगा-सागर संगमावरचा "कुंभमेळा" अनुभवण्याची कल्पना मला अगदी मजेदार वाटत होती.

गंगेचा प्रवाह जिथे बंगालच्या उपसागरास मिळतो त्या ठिकाणाला धार्मिक महत्व आहे. गंगा सागराचा हा संगम "पवित्र संगम" म्हणून प्रसिद्ध पावला आहे. बंगाली पौष महिन्यातला हा शेवटचा दिवस, म्हणजेच मकर संक्रांत, या दिवशी सूर्य मकरवृत्तातून भ्रमण करतो म्हणून त्या दिवसाला विशेष महत्व आहे. त्या दिवशी देशभरातून, शेजारी देशातून साधू-संत, तपस्वी, धार्मिक गुरु, श्रद्धाळू लोक आणि पर्यटक असे सगळेच इथे गर्दी करतात. संगमाच्या ठिकाणाला अगदी मेळ्याचे स्वरूप प्राप्त होते. हा मेळा एकच दिवसाचा असतो. त्या दिवशी माणसांनी फुलून गेलेला सागर किनारा दुसऱ्या दिवशी मात्र पूर्ण रिकामा असतो. राज्य सरकार आणि स्थानीक प्रशासनातर्फे देशभरातून येणाऱ्या पर्यटक / भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, जेवण याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो. उन / वारा आणि बंगालचा बेभरवशी पाऊस हे सगळे लक्षात घेता, थोडीफार आसर्‍याची पण सोय केली जाते. परंतु येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड असल्याने व्यवस्थेवर ताण येऊन बरेचदा ती कोलमडतेच असे ऐकले. पण भारत देशाचे '" एकात्मता गीत ", मिले सूर मेरा तुम्हारा "याची देही याची डोळा" प्रत्यक्ष अनुभवायचे असल्यास हे स्थान, हा दिवस चुकवू नये, हे मात्र खरे.

नंतर अचानकच माझी अमेरिका वारी ठरली, त्यात ती ठरल्यापेक्षा लांबली आणि परत कोलकात्याला पोहोचायलाच फेब्रुवारी उजाडला. कुंभमेळा तर संपला. आणि कामाचा ढीग उपसता-उपसता फेब्रुवारी पण संपला. मार्च मधे माझी आई आणि आत्या माझ्याकडे कोलकात्याला आल्या होत्या. त्यांच्या यादीमध्ये मात्र गंगासागर एक नंबरवर होते. मी जेंव्हा ऑफिसमधे आमच्या जाण्याबद्दल सांगितले तेंव्हा आलेल्या प्रतिक्रिया साधारण अशा होत्या,
१. उधर क्या है देखनेको, मत जाओ.
२. मेला तो खतम हो गया, अब गंगा नहाके कुछ फायदा नही.
३. आर यु क्रेझी, व्हाय उ वॉन्ट टु गो देअर.
४. मॅम आप अकेले लेडीज मत जाओ. मी म्हंटले, "माझी आई आहे ना बरोबर, अकेले कुठे". हा मॉजी भी तो लेडीज हि है. (बर-बर)

कोलकाता शहरापासून गंगासागर साधारणपणे १३० किलोमीटर अंतरावर आहे. कोलकाता - काकद्वीप / नामखाना - हरवूड - काचुबेरीया (बेटावरचे छोटे गाव) - मेला (मेळ्याचे ठिकाण) - सागर किनारा, असा हा एकूण सगळा प्रवास. कोलकाता शहरातून स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस नामखान्यापर्यंत जातात, तसेच सिआल्दा स्टेशनवरून थेट काकद्वीप बंदरापर्यंत जाणाऱ्या ट्रेन पण आहेत. बाकी तिथे पोहोचल्यावर थोडे इकडे तिकडे जाण्या-येण्यासाठी सायकल रिक्षा असतातच. खाजगी वाहन घेऊन पण तुम्ही जाऊ शकता. तुमची खाजगी गाडी असेल तर ती पलीकडच्या किनाऱ्याला नेण्याची सोय आहे, पण ती फेरी दिवसातून एकदाच असते असे ऐकले. ऑफिस मधल्या लोकांनी मात्र पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्यास ठाम विरोध केला आणि सूर्यास्ताच्या आत कोलकाता शहरात परत पोहोचलेच पाहिजे अशी सूचना पण केली. एकतर तिथे राहण्याची फारशी काही सोय नाही, असे ऐकले. पश्चिम बंगाल टुरिझमचे एक गेस्ट हाउस आहे म्हणे. पण त्याची पण कीर्ती फार चांगली नाही. एकदा जानेवारीतला कुंभमेळा संपला की तिथे फारशी वर्दळपण नसते आणि बाकी पश्चिम बंगालच्या परंपरेला साजेसे इतर धोकेपण आहेतच. एकजणाने स्वतः ओळखीची गाडी, खात्रीचा ड्रायव्हर शोधून आमची जाण्याची सगळी व्यवस्था केली आणि आम्ही ठरल्यावेळी, म्हणजे भल्या पहाटे निघालो. कारण दिवसा उजेडी सहीसलामत परत यायचे होते.

रस्त्याने जेवणासाठी एकही चांगले हॉटेल नाही, कोलकाता शहर सोडल्यावर पिण्याचे चांगले पाणी पण मिळणार नाही, अशा अनेक बारीक-सारीक सूचना आधीच मिळाल्या होत्या, त्यामुळे आम्ही जय्यत तयारीत होतो. आणि मिळालेली सगळीच माहिती तंतोतंत जुळणारी आहे याची प्रचीतीपण आम्हाला येत होती. "कोलकाता ते गंगासागर" हा एकूणच प्रवास अनोखा आहे, रम्य आहे. रस्त्याने लागणारी छोटी-छोटी गावं बघत, नकळत त्या नारळी-पोफळींची, घरांची आपल्या कोकणाशी तुलना करत, सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत घेत रस्ता कसा संपला कळालेच नाही. संगमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चार वेळा चार वाहने बदलावी लागतात. आम्ही एक इंडिका घेऊन निघालो होतो. आधी सगळी माहिती घेतलेलीच होती. त्याप्रमाणे, चालत्या गाडीतच नाश्ता उरकून, बरोबर ९.३० वाजता नामखाना गाठले. ड्रायव्हर गाडी पार्क करेपर्यंत बंदर कुठे आहे याचा शोध घ्यावा म्हणून मी चार पावले पुढे गेले तर फळ विकणाऱ्या एका माणसाने बंगालीत मला बरेच काही सांगितले. मी त्याला, "बंगाली नही समझते, हिंदीमें बोलिये" असे सांगायचा प्रयत्न केला, पण इतके दिवसांच्या अनुभवा प्रमाणेच या माणसानेपण हातवारे करून पुन्हा एकदा बंगालीतच लांबलचक काहीतरी सांगितले. इतक्यात आमचा ड्रायव्हर आला. आणि इथून फेरी जात नाही कारण पाणी लांब गेलेले आहे, भारतीच्या वेळा बघून परत या किंवा काकद्वीपला जा, असा त्या संभाषणाचा उलगडा झाला. काकद्वीप ला जायचे म्हणजे ३० किमी मागे आणि परत मुख्य रस्त्यापासून हरवूड बंदरापर्यंतचे अंतर वेगळेच. म्हणजे वेळेचे गणित बिघडणार. त्या काळजीपोटी समोर दिसणारा नामखान्याचा हिरवागच्च बाजार आम्ही महतप्रयासाने टाळला. कोलकात्याला असे भरगच्च बाजार बरेच ठिकाणी दिसतात. भरपूर ताजा भाजीपाला, फळफळावळ सगळे अगदी ओसंडून वाहत असते. एक सुस्कारा टाकून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. काकद्विपला आणि पुढे हरवूडला पोहोचलो तर पार्किंग ठेकेदाराने "लवकर पळा फेरीची वेळ झाली आहे" असे जवळ जवळ दरडावलेच. आम्ही तिघी लगबगीने, त्याने ज्या दिशेला हात केला होता त्या दिशेला निघालो. इथून पुढचा प्रवास 'अकेले लेडीज'चा आहे हे लक्षात आल्यावाचून रहिले नाही. Happy बरेच गल्ली बोळ पार करत, खुणेनेच 'फेरी' 'फेरी' असे विचारात तिकीट खिडकीशी पोहोचलो. तिथे उसळलेली गर्दी बघून मात्र आमचा अकेलेपणा कुठल्या कुठे पळून गेला. अचानक इतकी माणसे कुठून उगवली कळेचना. माझे असे खूपवेळा झाले कोलकात्याच्या वास्तव्यात. लोकांनी खूप घाबरवून टाकायचे, मीपण थोडी धाकधूक मनात ठेऊन निघायचे आणि मग आनंदाने हुश्श म्हणायचे.

तिकीट खिडकीच्या शेजारी अजून एक खिडकी होती. तिथे माश्यांसाठी खाद्य विक्री चालू होती. ती बाई मला मोठ्यामोठ्याने सांगू लागली, रंगीत मासे येतात, सोनेरी मासे येतात, मोठे मोठे मासे येतात, खाण घ्याच. बंगाली लोक थोडं मोठ्याने बोलतात (माझा अनुभव), त्यामुळे एकदम दडपून जायला होते. १० रुपयाचे मुठभर मुरमुरे आणि चार चणे घेऊन सोनेरी मासे बघायला निघालो. फेरी यायला अजून थोडा अवकाश होता. वेस्ट बेंगॉल सरफेस ट्रान्सपोर्ट कोर्पोरेशनतर्फे हि फेरी चालवली जाते. [ती पलीकडची माश्याची खिडकी कोणते कोर्पोरेशन चालवते ते काही कळाले नाही]. २५ ते ३० मिनिटांच्या या प्रवासाचे ६ ते १० रुपये असे सिझनप्रमाणे तिकीट असते.

(फेरी आणि गंगेचे पात्र)
bot gangeche patra.jpg

समोर गंगेचे प्रचंड पात्र पसरलेले होते. पलीकडचा किनारा टाचा उंच करून बघावा लागत होता. पण तिकडून इकडे येणारी फेरी मात्र नजरेस पडली. ज्या पद्धतीने माणसे आत कोंबली होती, ती बघता आईसाठी जागा मिळवायला झगडावे लागणार हे स्पष्ट होते. प्रखर उन, घामाचे आणि टोपलीतल्या माश्यांचे वास असे सगळेच सहन करत पुढे पुढे घुसायचा आम्ही प्रयत्न करत होतो. अलीकडच्या किनाऱ्यावरचा भरगच्च चिखल आणि त्यात खेळणारी लहान लहान मुले बघून मात्र मजा वाटली. चिखल कसला, दलदलच होती ती. अंगात एकही कपडा नसलेली ती मुले, डोक्यापासून पायापर्यंत चिखलाने माखलेली होती, संपूर्ण शरीरावर लेप लावल्यासारखे. अजून काय शिल्लक होते म्हणून एकमेकांना चिखल फेकून मारत होती, खाली पाडत होती, उठत होती, परत पडत होती. एकदम मजेत होती काट्टी. "इतक्या घाणीत खेळतात, यांना कसे काहीच होत नाही, नाहीतर आपली मुले, इतके जपतो तरी आहेच हे इन्फेक्शन, ते इन्फेक्शन" एकच विचार माझ्या आणि आईच्या मनात आल्यावाचून राहिला नाही. Happy

फेरीच्या रांगेत उभे असतानाच आईच्या, एका काकुंशी गप्पा झाल्या. तुम्ही कुठून आले, आम्ही कुठून आलो, कोलकात्याला कोण असत, इ.इ.इ. पुढे पूर्ण प्रवास काकूंच्या साथीनेच झाला, हे ओघानेच आले. फेरी आली, फेरीत चढलो, आई पुरती एक जागा मिळवली, तर एका बुरखेवालीने नवऱ्याला खुण केली, तो आला आणि दादागिरी करून मी पकडलेल्या जागेवर बसला सुद्धा. मी "भाईसाब" वगैरे म्हणायचा प्रयत्न केला पण तो इतके जोरात बोलला की आई म्हणाली "जाऊदे सोड". एका गुजराती कुटुंबाने त्यांच्या तरुण मुलाला उठायला सांगून आईला जागा दिली. मी आणि आत्या हातात मुरमुरे घेऊन सोनेरी माश्यांकडे डोळे लावून फेरीच्या कठड्याला अगदी रेलून उभ्या राहिलो. सोनेरी सोडाच, कुठल्याही रंगाचा एकही मासा आम्हाला संपूर्ण प्रवासात दिसला नाही. मुरमुरे मात्र मी गंगेच्या पात्रात सोडून दिले, आलेच कधी 'कोर्पोरेशन' चे मासे तर खातील, या आशेने.

(गंगेचे प्रचंड पात्र)
Gangeche Patra.JPG

फेरी गंगेच्या पात्राच्या मधोमध आल्यावर अनेक लोकांनी भक्ती भावाने गंगेची, फुला-नारळाने पूजा केली. "गंगामैय्या" चा जयघोष झाला. गंगेचे ते रूप, ती भव्यता आम्ही डोळे भरून बघत होतो. शेकडो लोकं, माश्यांच्या टोपल्या, फळांच्या-भाजीच्या परड्या, बाजारात विकण्यासाठी गृहपयोगी सामानांच्या गोण्या, एखाद दुसरी मोटार सायकल आणि अजून बरेच काही लादलेली ती फेरी अनेक दिवसात तेल-पाणी नमिळाल्याने जशी दिसेल / जशी चालेल अगदी तशीच वागत होती.

फेरीचा प्रवास संपतो तेंव्हा, ३४ किमी लांब आणि १४ किमी रुंद अशा बेटावर, सागरव्दिप, तुम्ही उतरता. खूप पूर्वी हे संपूर्ण बेटं सुंदरबनचाच एक भाग होते. इंग्रजांनी तिथली झाडे / जंगल कापून तिथे वस्ती वसवली. त्यामुळे अजून जरी कागदोपत्री तो सुंदरबनचा भाग दिसतो तरी तिथे वाघ अजिबातच फिरकत नाहीत. बेटावर जी काही छोटी छोटी गाव आहेत ती सगळी, मुख्य रस्त्याला लागुनच आहेत. वस्ती अतिशय तुरळक आहे. पण प्रवास मोठा सुंदर आहे. एकूणच पश्चिम बंगालला सृष्टीसौंदर्याचे (नव्हे सौंदर्याचेच) वरदान लाभलेले आहे. भरपूर झाडी, फळ-फुलांचे ताटवे, सतत वाहणारा वारा प्रवास अजूनच सुखकर करतो.

तर काचुबेरीयाहून मेळ्याच्या ठिकाणी जायला तुम्हाला सार्वजनिक वाहन मिळते. जे १० रुपये प्रत्येकी घेऊन तुम्हाला मेळ्याच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर सोडते. जी गाडी पूर्ण भरली आहे असे आमच्या डोळ्याला दिसत असताना, "या गाडीत जागा आहे तुम्ही बसा", असे गाडीचा चालक आम्हा ८ जणांकडे बघून म्हणाला तेंव्हाच स्वतंत्र गाडीने जावे असे आम्ही ठरवले. आम्ही तिघी आणि फेरीत भेटलेल्या काकुंचे ५ जणांचे कुटुंब असे ८ जण मिळून एक सुमो ठरवली. ३० किमीच्या या प्रवासासाठी, सुमो सारख्या गाड्या इथे ७०० ते ८०० रुपये भाड्याने मिळतात. मेल्यापर्यंत जाऊन, पूजापाठ करून, बंदरावर परत आणून सोडणे, असे तो व्यवहार असतो. आमच्या बरोबरचे कुटुंब खास राजस्थानहून आले होते. त्या पाचपैकी एक पुरुष आणि बाकी ४ बायका होत्या. १ आजी (सासू), २ एकमेकिंच्या सौतन (काकांच्या बायका), १ त्यांची जाऊ. गाडी सुरु झाल्या बरोबर त्या चौघींनी मस्त मारवाडी / हिंदी अशी मजेदार गाणी म्हणायला सुरुवात केली. कोरसमधे आम्हाला पण सामिल करून घेतले. मेळ्याच्या ठिकाणाला पोहोचेपर्यंत त्यांच्याशी आमची गट्टीच झाली. गाडीतून उतरलो तर परत एकदा गाडीवाले भोवती घोंगावू लागले. पण आता हि गाडी म्हणजे, सायकलला मागे जोडलेले हातगाडीचे फळकुट. त्यावर आपण बसायचे आणि समुद्र किनाऱ्याला जायचे. काकांनी पुन्हा एकदा बाह्या सरसावल्या आणि १०० रुपयात २ गाड्या वरून, ३० रुपयात २ गाड्या जाऊन-येऊन असे ठरले. आम्ही ८ जण २ गाड्यांवर मावलो खरे, पण एक माणूस चार माणसांचे ओझे घेऊन सायकल ओढणार या विचारानेच खाली उतरावेसे वाटले.

(सायकल गाडी, किनार्‍याकडे जाणारा रस्ता)
Kinaryakade.jpg

समुद्र किनार्‍याला लागुनच कपिलमुनींचे मंदिर आहे. सागराची आणि गंगेची प्रतीकात्मक मूर्ती बनवून त्यांचे पण मंदिर बांधलेले आहे. दरवर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी लाखो भाविक इथे येतात ते, या दिवशी गंगा-सागराच्या संगमावर आंघोळ केली तर सगळी पापं धुतली जातात, या श्रद्धेपोटी. पहाटे ४.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळातच स्नान करणे आवश्यक आहे, म्हणजेच सूर्यदेवांच्या साक्षीने. थोडक्यात दिवसा उजेडी. पापं तर धुवून निघतातच शिवाय गंगा स्नानाचे पुण्यही लाभते ते वेगळेच. [ "१००% मोक्ष मिळतोच आणि स्वर्गाचे दर नक्की उघडते" असे तिथे भेटलेले अभिषेकाचे कंत्राटदार सांगत होते.] गंगा स्नानाइतकेच कपिल मुनींच्या मंदिरात जाऊन पूजा करण्यालाहि महत्व आहे.

(कपिलमुनींचे मंदिर)
kapil muninche mandir.JPG

पुराणकथेनुसार, कपिलमुनी हा विष्णूचाच एक अवतार आहे. कर्दममुनींच्या इच्छेनुसार विष्णूने त्यांच्या पोटी जन्म घेतला. असे सांगितले जाते की विष्णूने कर्दम मुनिना सांसारिक आयुष्याचा मार्ग अवलंबण्यास सांगितले, त्यावेळी त्यांनी विष्णूला हि अट घातली, जी विष्णूने मान्य केली. अधिरथाने गंगा धरतीवर आणली ती इथेच गंगासागर संगमाच्या ठिकाणी. त्याची पण एक अख्यायिका सांगितली जाते. सत्य युगात 'सागर' नावाचा राजा होता. अयोध्येच्या या राजाने अश्वमेध यज्ञाचा घाट घातला होता. त्याचा यज्ञाचा अश्व, देवाधिदेव इंद्राने, कपिल मुनींच्या आश्रमा जवळच पाताळात लपवून ठेवला होता. राजाचे ६०,००० पुत्र अश्वाच्या शोधात आश्रमापर्यंत येऊन पोहोचले, त्यांना घोडा सापडला. घोडा कपिलमुनींनी लपवला या धारणेने त्यांनी तिथे उच्छाद मांडला, ज्यामुळे कपिलमुनींच्या तपश्चर्येत / ध्यान साधनेत व्यत्यय आला. क्रोधीत झालेल्या मुनींनी ध्यानातून बाहेर येत राजपुत्रांवर आपली नजर टाकताच, सर्व ६०,००० राजपुत्रांची जागेवरच राख झाली आणि कपिलमुनींच्या शापवाणीनुसार त्यांना नरकात स्थान मिळाले. सागर राजाला जेंव्हा हि हकीकत समजली तेंव्हा त्याने कपिलमुनिंचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला. शेवटी राजाच्या तिसऱ्या पिढीला यात यश आले. राजाचा नातू, भगीरथाने, कपिलमुनींच्या आज्ञेनुसार विष्णूपत्नीस 'गंगेच्या' रुपात धरतीवर आणले आणि तिच्या पावन स्पर्शाने राजपुत्र शापमुक्त झाले. तो दिवस होता मकर संक्रांत. तर असे हे संक्रांतीचे महात्म्य. भगीरथाने शंकराच्या मदतीने गंगा धरतीवर आणली, असे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे.

ऐकण्यात आले की लोकांमध्ये अशी पण एक श्रद्धा आहे, कुमारिकांनी जर मकर संक्रातीच्या दिवशी संगमावर गंगेत डुबकी मारली तर त्यांना 'देखणा' नवरा मिळतो आणि कुमारांना देखणी बायको. [ आजकाल असेही ऐकू येते की, मार्चमधे गंगासागाराचे दर्शन घेतले तर 'मायबोलीकर' नवरा मिळतो. Happy ]

सूर्याचे मकार्वृत्तात भ्रमण, सूर्याचे सुरु होणारे उत्तरायण, (पूर्वी ) पवित्र असेलेले गंगाजळ, संगमाच्या ठिकाणी निर्माण होणारे प्रवाह, या आणि अशा काही गोष्टी मिळून काहीतरी वैज्ञानिक महत्व नक्कीच असणार आहे, जे आता काळाच्या पडद्याआड गेले आहे.

हि प्रथा नक्की कोणी सुरु केली, मंदिर कोणी बांधले या सगळ्या गोष्टी अजूनही गूढ वाटाव्या इतक्या अंधारातच आहेत. गंगासागर स्नानाचा उल्लेख महाभारतात पण सापडतो असे ऐकले. कोणी संत महात्म्याने भीष्माला संगमाचे आणि त्या ठिकाणाचे पावित्र्य आणि महत्व समजावून सांगितल्याचा संदर्भ सापडतो.

१८३७ मधे प्रकाशित झालेल्या एका वर्तमानपत्रात या मंदिराचा उल्लेख आहे. त्यावेळी असे म्हंटले आहे की हे मंदिर १४०० वर्षे जुने आहे. गुरु रामानंद नावाच्या कुणा तपस्व्याने ई.पु. १४३७ मधे तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आता तिथे दिसते ते रंगीबेरंगी मंदिर १९७० साली बांधले गेले, पूर्वीचे कच्चे काम पाडून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. पूर्वीचे मंदिर आणि कपिलमुनींचा आश्रम समुद्राने आपल्या पोटात घेऊन टाकला, असे पण लोकं सांगतात. एकूणच गंगासागरबद्दल अनेक कथा / प्रथा / आख्यायिका ऐकायला मिळतात.

पूर्वी गंगासागरला जाणे हे एक मोठेच दिव्य होते. रस्त्यात अनेक संकटांचा सामना करत बोटीने अनेक दिवस प्रवास करावालागे. सुंदरबनचे अरण्य आणि जंगली श्वापादांबरोबरच प्रचंड संख्येने असणारा जलचरांचा वावर, पाण्याचा धोकादायक प्रवाह, लहरी निसर्ग, घनदाट झाडी असे सगळेच प्रतिकूल घटक प्रवासाच्या मार्गात होते. शहरीकरणाने "पुण्याचा" मार्ग सुलभ केला असे म्हणायला हवे.

(चंदेरी वाळु [फोटोत माझी आई], शांत-निवांत किनारा)
kinara walu.jpg

किनाऱ्यावर पोहोचलो. चंदेरी म्हणावी अशी वाळू आहे. अगदी मखमलच. ओंजळभर हातात घेऊन उगीचच खाली सोडली. पाण्यात गुडघे बुडतील इतके आत पर्यंत गेले. नजर मात्र समोरच्या दृश्यावरून हलत नव्हती. कुठे गंगा संपते-कुठे सागर झेपावतो, डोळे शोधत होते. मधे एक पुसटशी रेघ दिसली खरी. पाण्याचा रंगहि वेगळा आहे. अलीकडचा हिरवट आहे, पलीकडचा काळपट आहे. अलीकडचे पाणी शांत वाटते, पलीकडचे पाणी खळखळते आहे. किनारा शांत - स्वच्छ - निवांत आहे. गंगेचे पाणी डोळ्याला लावले, कपाळाला लावले. तिच्या भव्यतेपुढे नतमस्तक न झालो तरच नवल. गंगेची पूजा करण्यासाठी फुले-नारळ घेतले होतेच. दोन्ही पाण्यात सोडले.

(गंगासागर)
Gangasagar.JPG

हिमालयाच्या कुशीत, गंगोत्रीला जन्म घेतलेली गंगा, मोठ-मोठ्या पर्वत रंगांचे अडथळे पार करत, ऋषिकेश-हरिद्वार मार्गे, काशी - प्रयाग असा प्रवास करून आवश्यक ती वळणे घेत, वाटेत भेटलेल्या कडू-गोड सगळ्यांनाच आपल्या पोटात सामावून, थेट पश्चिम बंगालच्या दक्षिण टोकास बंगालच्या उपसागरापर्यंत येते तेंव्हाही खळखळता आनंद भरभरून देते. तिची भव्यता डोळे दिपवून टाकते. "याच वृत्ती आयुष्याच्या प्रवासात मलाही साथ करुदेत" अशी प्रार्थना करून माघारी वळाले.

(जय काली कलकत्तेवाली(?), मंदिरातील महादेव)
dev.jpg

राजस्थानी कुटुंबाने स्नान, अभिषेक सगळे अगदी यथासांग केले. आम्ही स्नान करणार नसल्याने डोक्यावर-अंगावर गंगाजल शिंपडावे असे त्यांनी सुचवले. घटकाभर सगळेच भटजींनी दिलेली चटई अंथरून शांतपणे लाटांचे आवाज ऐकत बसलो. तहान लागली म्हणून सगळ्यांसाठी शहाळी घेतली तर अचानकच तिथली सगळी कुत्री माझ्या मागे लागली. पाणी पिऊन झाल्यावर खाली जी मलई उरते ती त्यांना द्यावी असा त्या भुंकण्याचा अर्थ. कुत्र्याला नारळाची मलई आवडते हे नव्यानेच कळाले. बाकी धार्मिक स्थळावर भेटतात तशी, गंगेतला नारळ पळवून परत तोच विकणारी, सुटे पैसे जाताना देतो असे म्हणून दुकानातूनच गायब होणारी मंडळी इथे पण भेटलीच. कपिल मुनींच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतले. निराळ्याच मूर्ती आहेत त्या. तसेही राज्य बदलले की मूर्तींच्या रंगरुपात फरक पडतोच. या तर अतिप्राचीन पण आहेत.

(दुर्गामाता, गंगामाई)
Ganga - durga_0.jpg

दुपारचा दीडच वाजत होता. परतीचा प्रवास सुरु केला. परत एकदा सायकलगाडी-सुमो-बोट-ईंडीका. राजस्थानी कुटुंबाचा कोलकात्याचा फोन नंबर घेऊन त्यांचा निरोप घेतला. रस्त्यात एक मोठ्ठे झाड बघून सावलीत गाडी थांबवली. ड्रायव्हरने आणि आम्ही जेवण केले. येताना ज्याची फक्त झलक बघून वेडावल्यासारखे झाले होते ते डायमंड हार्बर जाताना बघायचा विचार होताच.

कोलकात्य पासून ५० किमी अंतरावर डायमंड हार्बर नावाचे बंदर आहे. रुपनारायणी आणि हळदी अशा दोन नद्या अगदी शेवटच्या टप्प्यात गंगेला येऊन मिळतात. रुपनारायण मिळाल्यानंतर आणि हळदी मिळायच्या आधी, मधे हे बंदराचे ठिकाण आहे. रुपनारायण नदीचे पाणी मिळाल्यामुळे गंगेचे पात्र अधिकच रुंद होते, आणि तेंव्हाच गंगा दक्षिणेकडे वळते. त्यामुळे एक वेगळेच दृश्य तिथे बघायला मिळते. अगदी समुद्र वाटावा इतके रुंद आणि प्रचंड पाणी घेऊन जाणारे गंगेचे पात्र आपल्या अवाढव्य आकारासाहित संपूर्ण यु टर्न घेते ते दृश्य बघताना नक्की कसे वाटते हे शब्दात मांडणे माझ्या कुवती बाहेर आहे. 'यु' आकाराचा बेस तेव्हडा रस्त्याला लागून आहे. आणि तेव्हडेच दर्शन गंगामाई आपल्याला गंगासागरकडे जाताना देते. 'हाजीपुर' नावाच्या गावी, समुद्रमार्गे व्यापार या हेतूने पोर्तुगीजांनी हे बंदर बांधले असे सांगितले जाते. याचे 'डायमंड हार्बर' हे नामकरण मात्र इंग्रजांनी केले. त्याचे व्यापारातले महत्व आणि त्या जागेचे सौंदर्य असे दोन्हीला शोभणारे म्हणून 'डायमंड'. पण इस्ट इंडिया कंपनीने कोलकात्यामध्ये आपला जम बसवण्या आधी, भारतातला व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने हे बंदर बांधले असे पण वाचले. पाण्याची खोली, गंगेच्या पत्राची रुंदी आणि समुद्रापासून तसे जवळ पण तरीही सुरक्षित अंतरावर, अश्या सगळ्याच गोष्टी जहाजांना ये-जा करण्यास अगदी पुरक आहेत म्हणुन ही जागा निवडली गेली असावी. पश्चिमबंगाल टुरिझमने आता हे ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून डेव्हलप केले आहे. तिथेच चिंगरीखाली नावाचा एक किल्ला पण आहे. आता फक्त अवशेषच आहेत. हे सगळे बघावे, जमल्यास सनसेट हि तिथेच बघावा आणि पुढे जावे. असा मनातल्या मनात प्लॅन तयार केला. आपण अगदी वेळेत आहोत, त्यामुळे डायमंड हार्बर आरामात होईल असे ड्रायव्हर कडून आश्वासन घेऊन पुढे निघालो. आणि पश्चिमबंगालचा खास असा तो थरार, ते नाट्य रस्त्यात आमची वाट बघत थांबले होते.

(हेच ते ठिकाण)
Prawasatale photo.jpg

अगदी मसालेदार चित्रपटात शोभावा असा तो प्रसंग. पण प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ कधी आपल्यावर येईल असे स्वप्नात पण वाटले नव्हते. गाडीत आम्ही तिघीजणी, ड्रायव्हर तसा पोरगेलाच, त्यातही शेजारी राज्यातला. त्याने आम्हाला धीर द्यायचा तर आम्हीच त्याला धीर देत होतो. त्याचेही बरोबर होते, त्याने अशा घटना असंख्यवेळा अनुभवल्या असतील आणि त्याचा गंभीरपणा समजावा इतका आमचा अनुभव नव्हता. पण जसे जसे बाहेरचे वातावरण बदलत चालले तसे तसे गाडीतले टेंशन पण वाढत चालले. माझी आई एकदम धीराची आहे आणि तशीच मीपण :). आत्या मात्र खूपच घाबरली होती आणि तिच्या जोडीला ड्रायव्हर.

मी, आई, आत्या, आम्ही तिघी खिडकीतून बाहेर बघत-बघत गप्पा मारत होतो, रस्त्याने भरपूर झाडी, फुललेली शेतं, मधे गाव लागले तर शाळेची मुले, विचित्रच दिसणारी वाहनं, पाण्याला निघालेल्या बायका, असे बरेच काही. प्रदेश वेगळा असल्याने सगळेच बघण्यासारखे वाटत होते. सूर्य पण परतीच्या मार्गावर होता, त्यामुळे माना टाकलेली एका शेतातली सूर्यफुले त्या नारंगी छटेत खूप सुंदर दिसत होती. मी काच खाली घेऊन एक फोटो घ्यावा या विचारातच होते, तर समोरून एक बस अचानकच थांबून वळायचा प्रयत्न करते आहे असे दिसले. ड्रायव्हरने बस कशीबशी रस्त्याच्या थोडी बाहेर काढून वळवली आणि उलट दिशेने जायला लागला. मागोमाग जोरजोरात आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला आणि बराच मोठा माणसांचा जमाव, हातात, काठ्या, चाकू, सुरे, कोयते असे काय काय घेऊन आमच्या दिशेने पळत येताना दिसला. आमच्या ड्रायव्हरने ताबडतोप काच बंद करण्याचा आदेश दिला, जी मी फोटो काढण्यासाठी उघडली होती, आणि तिकडे बघू पण नका अशी सूचना केली. माणसांचा जमाव आरडा-ओरडा करत आमची गाडी पार करून पुढे गेला, मागून ४-५ मोटार सायकली प्रचंड वेगाने गेल्या आणि थोडे पुढे गेलेल्या बसला आडव्या थांबल्या. बस ड्रायव्हर, बस थांबवून उतरला आणि धूम पळत सुटला. काही लोकं ड्रायव्हरच्या मागे धावले, उरलेल्यांनी लाठ्या-काठ्या-दांडकी-दगड जे सापडेल त्याने बसच्या काचा फोडायला सुरुवात केली. जोरजोरात बसचा पत्रा ठोकायला लागले. आतली सगळी लोकं घाबरून खाली उतरली, आणि आली त्या दिशेने चालत-चालत निमूट परत निघाली. तर त्यांना तसे करू न देता जिथून बस वळवली होती तिथे जाऊन थांबायला सांगितले गेले. इतर अनेक गाड्यांप्रमाणे आमची कार पण समोरचा रस्ता बंद असल्याने जागेवरच थांबली आहे, हे एव्हाना माझ्या लक्षात आले. काय झाले म्हणून ड्रायव्हरला विचारले तर "हे नेहमीचेच आहे, रास्ता रोक दिया है", असे उत्तर मिळाले. शेजार राष्ट्रातून घुसखोरी करून भारतात आलेल्या, एका ठराविक समाजाची ती वस्ती म्हणजे एक छोटे गावच आहे. जे मुख्य रस्त्याला लागून असल्याने, येणाऱ्या जाणार्‍यांना हा त्रास नेहमीचाच आहे, अशी माहिती मिळाली. औरंगजेबाने हिंदू तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी 'जिझिया' कर लावला होता, त्यात गंगासागर पण होते. प्रश्न पडला, हे तरी दुसरे काय आहे.

पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रायव्हरला पकडून आणले होते. लाथा-बुक्क्यांनी तुडवत तुडवत त्याला लोकं घेऊन गेले, ते सगळे दिसेनासे झाले. मग मी गाडीतून खाली उतरले. ड्रायव्हरपण उतरून मागच्या पुढच्या गाडीवाल्यांशी बोलू लागला. गाड्यांची रांग इतकी मोठी होती की, रस्ता कुठे अडवला आहे ते ठिकाण दिसतच नव्हते. जमावातले काही लोकं दहशत दाखवण्यासाठी इकडून तिकडे, तिकडून इकडे चकरा मारत होते. मी, अर्थातच परत काचबंद गाडीत. आमच्या शेजारच्या गाडीत लहान मुल होते. मुलाच्या वडिलांनी, "माझ मुल आजारी आहे, दवाखान्यात घेऊन चाललो आहे, आम्हाला कृपाकरून जाऊ द्या" अशी विनंती केली. "चूप बैठ - चूप बैठ" असे काहीतरी उत्तरादाखल ओरडण्यात आले. ओरडणाऱ्याचे वय जास्तीत जास्त १८ असावे. १० वर्षांपासून ४०-५० पर्यंत विविध वयोगटातील लोकं त्या जमावात होती. भीती बाजूलाच, इतकी कोवळी ती मुलं, त्यांचा उद्दामपणा, भलत्या मार्गाने होणारा त्यांचा प्रवास हे सगळे बघूनच अंगावर सर्रकन काटा आला. थोड्या वेळाने अजून एक गट आला, त्यातला एक वयस्कर इसम गाड्यांकडे बघतबघत चालला होता. मुलाच्या वडिलांनी पुन्हा काच खाली करून तोच प्रश्न विचारला. उत्तर आले "कोई कही नही जायेगा".

बर्‍याच वेळाने आमचा ड्रायव्हर आला. तर घडले असे होते. कुठल्याश्या गुन्ह्याखाली या गावातल्या एका मुलाला अटक झाली होती. बातमी कळताच यांनी रास्तारोको केले. जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी कोणीतरी पोलिसांना कळवले. जवळच्या चौकीवरून पोलीस आले. "रस्ता मोकळा करा" सांगायला लागले तर गावकऱ्यांनी पोलिसांना बेदम मारले. दुसऱ्यादिवशी कमांडो पाठवून गावातील 'त्या' लोकांना अटक केली गेली. त्यांच्यापैकी ज्यांनी ज्यांनी पोलिसांवर हात उगारला, त्यांना कस्टडी आणि मग पोलिसी खाक्या मिळाला. हि बातमी यांना गावात कळाली. म्हणून यांनी आज पुन्हा रास्ता रोको केले होते. पोलीस येऊन 'रस्ता सोडा, मोठा जाम झाला आहे, तुमची माणसं लगेच सोडतो' असे म्हणाले. त्यावर, "माणसे सोडा, लगेच रस्ता सोडते" असे सांगितले गेले. माणसे घेऊन जीप आली. पुन्हा विनवणी केली गेली. पण "ज्या पोलिसाने आमच्या माणसाच्या अंगाला हात लावला, त्याला आमच्या ताब्यात द्या तरच आम्ही सगळ्यांना सुखरूप सोडतो" अशी नवी मागणी करण्यात आली. हे सगळ नाटक सकाळी ११ वाजल्यापासून चालले होते म्हणे. आम्ही पहाटेच गेल्यामुळे जाताना तरी सुटलो होतो. ड्रायव्हरला मारण्याचे कारण, त्याने यांचा आदेश झुगारुन वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला.

जमावातला तो वयस्कर इसम त्याची फेरी पूर्ण करून परत जाताना शेजारच्या गाडीशी थांबला आणि "बच्चा कहा है दिखाव" असे म्हणाला. यांनी मुल दाखवले. तो म्हणाला "पुछ के आता हु". थोडे बरे वाटले. येताना त्याच्या निम्म्यावयाच्या एका मुलाला घेऊन आला, त्याच्या हातात मोठा चाकू/सुरा होता. तो ओरडतच आला, किसका बच्चा बिमार है, गाडीपाशी येऊन म्हणाला, डॉक्टर का कागज दिखाओ. तो तर नव्हताच. त्यामुळे 'नही जा सकते' असे म्हणून तो निघून गेला.

पश्चिम बंगाल हे पूर्वेकडचे राज्य असल्याने सूर्यास्त तसा लवकर होतो. एव्हाना पूर्ण अंधार पडला होता. त्यामुळे वातावरण अजूनच 'भयाण' वाटत होते. वेळ जाता जात नव्हता. शेवटी दीड-दोन तासाने कमांडोज च्या गाड्या आल्या आणि आमची (सगळ्यांचीच) सुटका झाली. 'डायमंड हार्बर' राहिले ते राहिलेच.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मधे झाला प्रकार सांगितला तेंव्हा "बस इतनाही, आप इतनेमेही डर गयी" अशी प्रतिक्रिया ऐकून मात्र त्यांच्या सहनशक्तीला आणि कम्युनिस्ट राजवटीला मी सलाम केला.

भरगच्च आणि तितकाच सुंदर निसर्ग, वेगळ्या वाटेवरचा वेगळाच प्रवास, महानदीचे समुद्रात विलीनीकरण याची डोळा बघावे, यासाठीच होता सारा अट्टाहास. तो मात्र सुफळ संपुर्ण झाला Happy

"सब तीरथ बार बार, गंगासागर एक बार"

[माझा पुराणकथांचा फारसा अभ्यास नाही, एखादा संदर्भ चुकीचा आढळल्यास जाणकारांनी निदर्शनास आणून द्यावे हि विनंती]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

SAGALECH SABHYA NASTAAT.... Happy SAGALECH DH CHAA MA KARNARE AAHET... Happy

BAAKI LEKH SUNDER AAHE....AGADI PHOTO SAKAT...

मस्तच झालंय गं आरती वर्णन. माझं अजून जाणं झालंच नाहीये सागरद्वीपला (हे अस्सल बंगाली नाव!). संक्रांतीच्या मेळ्यात जाणं जमेल असं वाटत नाही, पण एरवी १-२ दिवसांसाठी जायची फार इच्छा आहे. तिथे PWD चा बंगला आहे रहायला. तुझ्या लेखामुळे धूळ खात पडलेला बेत परत एकदा आठवला.

रच्याकने, त्या नदीचं नाव रूपनारायण आहे (रूपनारायणी नाही). किती सुंदर नावं आहेत बंगालमधे नद्यांची.. पद्मा, मेघना, कालिंदी, मयूराक्षी, रूपनारायण, पियाली, कंसावती, शिलावती, इ. नाहीतर आपल्याकडे.. मुळा, मुठा, घोड, कुकडी, इ.इ. (कृष्णा, तापी जरा बरी आहेत त्यातल्या त्यात.)

त्या सायकल हातगाडीला व्हॅनरिक्षा म्हणतात तिकडे, आत खेडेगावांमधे हिडण्याचं जवळजवळ एकमेव साधन. आपल्या एस्टीच्या लाल डब्ब्याचं महत्व असं बाहेरच्या राज्यांत फार जाणवतं.

<< मार्चमधे गंगासागाराचे दर्शन घेतले तर 'मायबोलीकर' नवरा मिळतो.>> हे मस्तच Proud 'मायबोलीकर' बायको मिळायचे चान्सेस काय आहेत? (इथल्या विवाहेच्छूक मुलांच्या वतीने एक प्रश्न :डोमा:)

वरदा, बदल केला आहे गं. मी तुला इमेल मधे लिहिता लिहिता राहीले, वाचून बघ आणि काही बदल असेलतर सांग Happy
किती सुंदर नावं आहेत बंगाल >> बंगाली भाषाच गोड आणि सुंदर आहे ना.

माझा एक प्रश्ण, मला नकाशात दिसते की गंगेचे मुख्य डिस्ट्रिबयुटरी पात्र (पद्मा नदी) बांगलादेशमध्ये समुद्राला मिळतात. तर मग हे प्रचंड पात्र तुम्ही पाहिलेत ते कुठले? ते जर एवढे प्रचंड असेल तर पद्मा केवढी मोठी असेल?

प्रवास वर्णन उत्तम.

मिळाला गंगा सागरचा मॅप

http://en.wikipedia.org/wiki/File:Nayachar_Map.jpg

छान झालाय लेख. कुठून कुठे कसे जायचे ह्यावर अजून डिटेल्स हवे होते. वर दिलेली माहिती वाचून तिथे जाणार्‍यांना काही फायदा होइल असे वाटत नाही.

ते रस्ता रोको प्रकरण मला माहिती नव्हतं.

शिर्षक कशाला बदलले ? ते आधीचं चांगलं होतं की.

सिंडरेला,
कोलकाता - काकद्वीप / नामखाना - हरवूड - काचुबेरीया (बेटावरचे छोटे गाव) - मेला (मेळ्याचे ठिकाण) - सागर किनारा, असा हा एकूण सगळा प्रवास. कोलकाता शहरातून स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस नामखान्यापर्यंत जातात, तसेच सिआल्दा स्टेशनवरून थेट काकद्वीप बंदरापर्यंत जाणाऱ्या ट्रेन पण आहेत. >>
यावरुन प्रवास कसा आहे ते लक्षात येते की. यापेक्षा अजुन लिहिले असते तर ते प्रवास वर्णन न राहता, माहिती पुस्तीका झाली असती Happy

मिळाला गंगा सागरचा मॅप >> प्रश्नाचे उत्तर मिळाले असे समजु की मी द्यायचे आहे Happy
पद्मा केवढी मोठी असेल? >> बघायलाच हवा तो संगम पण.

खूप छान वर्णन व फोटो. मला अश्या मॉब मध्ये वगैरे अडकले कि जाम भीती वाटते. मी अजून कलकत्ता देखील पाहिले नाहीये. एकदा जायचे आहे झालमुडी/पुचका आणि रसगुल्ले, संदेश खायला. आमचे एक कलीग आहेत बंगाली त्यांनी सांगितले कि पूजा सीझन मध्ये घरच्या पूजा, तसेच पूजा चे ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व सांगणार्या तसेच, खानदानी घरातील पूजा समजावून सांगणार्‍या खास टूर्स आयोजित केल्या जातात. अश्या एखाद्या टूरला पण जायचे आहे. नद्यांची नावे खरेच किती सुरेख आहेत.

अमा, तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण. मिठाई, फुचका, झालमुडी, घोटीगरम सगळं खायला घालते Happy मस्त हिंडा, साड्यांचं शॉपिंग करा. चिल्ल माडि!

चिनूक्स्, आडो, अमा, अनघा, निलिमा आणि सिंडरेला
खुप खुप धन्यवाद Happy

अमा, वेस्टबंगाल टुरिझम च्या पण बर्‍याच प्लॅन्ड टुर्स आहेत. मी एक केली आहे त्यांच्याबरोबर. चांगली रिलाय्बल आहे. बाकी शॉपिंगची आवड असणार्‍यांना कोलकाता पर्वणी Happy