अजमल कसाबचं काय केलं?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 25 November, 2011 - 12:02

अजमल कसाबचं काय केलं?

आज (२६.११.२०११) मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला तीन वर्षं पूर्ण झाली (म्हणजे हल्ला ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवसाला कारण तो हल्ला तीन दिवस चालु होता). दोन वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा या हल्ल्याला एक वर्षं पूर्ण व्हायला काही दिवस बाकी होते तेव्हा मी मुंबईत दुचाकीवरून रात्रीचा फेरफटका मारायचं ठरवलं. कडक पोलीस बंदोबस्त असेल असा माझा समज होता. रात्री बेरात्री भटकतोय म्हंटल्यावर पोलीस मला हटकतील असं वाटलं आणि त्यामुळे पोलीसांना माझा उद्देश समजावा या करिता व त्यांनाही त्यांच्या कामात त्रास होऊ नये या विचाराने आणि माझ्याकडून सहकार्य व्हावे या हेतूने मुंबई पोलीस आयुक्तांना उद्देशून एक पत्र (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...) टंकलिखीत केले. ठिकठिकाणी असा पोलीस बंदोबस्त असेल व प्रत्येक वेळी मला त्या कर्मचार्‍यांना देण्यास सोयीचे होईल म्हणून या पत्राच्या दहा प्रती सोबत बाळगल्या होत्या.

माझ्या घरातून (निगडी, पुणे येथून) मी सायंकाळी ठीक सहा वाजता निघालो. दादर येथे रात्री साडेनऊ वाजता पोचलो. एका उपाहारगृहात जेवण करून तेथून रात्री सव्वा दहा वाजता बाहेर पडलो. मरीन ड्राईव्ह येथे रात्री पावणे अकरा वाजता दुचाकी वाहनतळावर लावून काही काळ पायी भटकंती केली. त्यानंतर पुन्हा दुचाकीवरून शहराच्या विविध भागांमध्ये चकरा मारल्या. या संपूर्ण कालावधीत मला कुठेही पोलीसांनी हटकले नाही. मुख्य म्हणजे पोलीस बंदोबस्तावर असलेले मला कुठे दिसलेच नाहीत. मरीन ड्राईव्ह येथे एका बाकड्यावर दोन पोलीस गप्पा मारीत बसले होते. इतरही काही ठिकाणी पोलीस खुर्च्यांवर आरामात बसले होते. त्यांना बंदोबस्तावर असलेले असे काही म्हणता येणार नाही. मध्यरात्र उलटून गेल्यावर परगावच्या क्रमांकाची दुचाकी घेऊन (शिवाय माझ्या डोक्यावर ज्यातून चेहरा दिसणे शक्य नाही असे काळ्या काचेचे हेल्मेट होते) रस्त्यावर फिरणार्‍या मला त्यांनी थांबवून हटकायला हवे होते. तसे त्यांनी केले नाही, उलट मीच काही पोलिसांना रस्त्याची माहिती विचारली असता त्यांच्या आरामात मी व्यत्यय आणला असा उद्वेग त्यांच्या चेहर्‍यावर दिसला. त्यामुळे माझ्याकडील पत्राची एकही प्रत मला प्रत्यक्षात कुठेही पोलिसांना देण्याचा प्रसंग आलाच नाही व सर्वच्या सर्व प्रती अजूनही माझ्यापाशीच आहेत.

पोलिसांनंतर ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे असे समजले जाते त्या खासगी सुरक्षा रक्षकांचा अनुभवही फारसा आशादायक नव्हता. ज्या ट्रायडेंट हॉटेल वर हल्ला झाला तिथे अतिशय कडक बंदोबस्त होता, पण सुरक्षेचे निमित्त करून त्यांनी हॉटेलच्या जवळील पदपथावर बांबू लावून अतिक्रमण केले होते व सरळ सरळ हा पदपथही खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने स्वत:च्या ताब्यात घेतला होता. याच भागात असणार्‍या इतर इमारतींमध्ये जिने व इतर मोकळ्या जागांमध्ये विजेचे दिवे चालु होते पण व्यक्तींचा वावर नव्हता. इमारतींना एकाहून अधिक फाटक होते, पण सेवेवरील सर्व सुरक्षा रक्षक एकाच फाटकापाशी जमून पत्ते खेळत होते तर काहीजण तेथे शेजारीच पथारी टाकून झोपले होते. म्हणजे दुसर्‍या फाटकातून कोणी इमारतीत प्रवेश केला तरी या रक्षकांना त्याचा काहीच पत्ता लागणार नव्हता. शहरातील बहुतेक इमारतींबाबत अशीच परिस्थिती होती.

अशा प्रकारे सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षात आल्यावर मी माझ्या या भेटीतील इतर निरीक्षणांवर आधारित दुसर्‍याच विषयावर एक लेख (http://at-least-i-think-so.blogspot.com/2010/12/blog-post_02.html) लिहून तो ब्लॉग वर प्रसिद्ध केला. अर्थात या भेटीदरम्यान जाणवलेली व विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मुंबईतील टॅक्सीचालक हेच रात्रीच्या मुंबईचे खरे पहारेकरी. बहूतेक ठिकाणी हे टॅक्सीचालक अतिशय सतर्क असलेले आढळले. त्यांनी मला एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जायचे याबद्दल माझ्या विनंतीवरून मार्गदर्शन तर केलेच पण त्याशिवाय मी कोठून आलो आहे व असा का भटकत आहे हेदेखील जाणून घेण्यात त्यांनी रस दाखविला (जे खरे तर पोलिसांकडून अपेक्षित होते). अर्थात या रात्री भेटलेल्या टॅक्सीचालकांमध्ये मराठी भाषिक अभावानेच आढळले, बहुतांश परप्रांतीय च होते.

असो. तर यावर्षी पुन्हा मुंबई भटकंती करून फारसे काही नवीन बघावयास मिळेल असे वाटले नाही. त्याऐवजी दुसर्‍या एका महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन करून ते प्रकाशित करावे असे मी ठरविले. हा दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थातच त्या दहशतवादी हल्ल्यातील दहा हल्लेखोरांपैकी पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब. मी गेली तीन वर्षे आणि आजही कित्येकांच्या चर्चेत ऐकतोय, वाचतोय, पाहतोय तो एकच प्रश्न म्हणजे अजमल कसाबचं काय करणार?

मला वाटतं त्याचं काय करणार ह्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अजमल कसाबचं काय केलंत? होय गेली दोन वर्षे ताब्यात असणार्‍या या इसमाचं पोलिसांनी नेमकं काय केलं? काय करता येऊ शकलं असतं? किंवा खरं तर काय केलं जाणं अपेक्षित होतं? आता त्याला फाशी द्या अशी लोकभावना आहे पण गेल्या दोन वर्षांतील घडामोडींवर दृष्टीक्षेप टाकल्यास असं लक्षात येईल की त्याला फाशी देण्याची प्रक्रिया आपणच आपल्या हातांनी अतिशय अवघड करून टाकलीय. जेव्हा ह्या मोहिमेत त्याचे इतर साथीदार जागच्या जागीच ठार मारण्यात आले आणि हा एकटा जिवंतपणे पोलिसांच्या ताब्यात आला त्यावेळेपासून ते आजतागायत उचलण्यात आलेली पावले पाहता या सगळ्या प्रकरणाचा शेवट कसाबच्याच पथ्यावर पडणारा आहे.

कसा तो पाहा :-

सर्वप्रथम ताब्यात आलेल्या कसाबवर खटला चालवायचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्याला वकील निवडण्याची संधी देण्यात आली. त्याला ते जमले नाही म्हणून आपल्या तर्फेच त्याच्याकरिता वकीलाची सोय केली गेली (त्यातही दोन वेळा बदल करण्यात आला). आपल्याला असे दाखवायचे होते की आपण कसाबची बाजू पूर्णपणे न्यायाने आणि त्याला ती मांडण्याची सर्वप्रकारे संधी देऊन मगच निर्णय घेणार आहोत (हे सारे आपण कुणाला दाखविणार आहोत? अंकल सॅमला?). जेव्हा हा निर्णय घेतला गेला तेव्हाच कसाबला आपण एक फार मोठा मार्ग उपलब्ध करून दिला तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयांपर्यंतची विविध पातळ्यांवरील न्यायालये आणि त्यात त्याला बाजू मांडण्याची संधी आणि त्याउप्परही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्याची खास सवलत. ह्या सगळ्या प्रक्रियांना लागणारा विलंब लक्षात घेता कसाबला सहज दहा ते पंधरा वर्षांचा अवधी आपण बहाल केला हे आपल्यापैकी कुणाच्याच कसे लक्षात आले नाही. कारण यापैकी प्रत्येक पातळीवर जरी त्याच्या विरोधात निर्णय झाला तरीही वरच्या पातळीपर्यंत दाद मागण्याचा अधिकार आपणच त्याला देऊ केलाय. तो आता आपण नाकारला तर मग त्याला सुरूवातीलाच न्यायालयात सादर करण्याच्या निर्णयालाच अर्थ राहत नाही. म्हणजे आता आपण या मार्गावरून हटू शकत नाही. उलट तो प्रत्येक वेळी काही ना काही तांत्रिक मुद्दे (जसे की त्याची गैरसोय होतेय, त्याचा वकीलावर, आरोग्य तपासणी अधिकार्‍यांवर विश्वास नाही वगैर, वगैरे) उपस्थित करून वेळेचा प्रचंड अपव्यय करून आधीच वेळखाऊ असलेली प्रक्रिया अधिकच लांबवू शकतो. त्याशिवाय या कालावधीत तो आजारपणाने, किंवा इतर कुठल्याही कारणाने पोलिसांच्या कैदेतच मृत्यू पावता कामा नये. याकरिता त्याला उत्कृष्ट प्रकारचे अन्न व सर्वप्रकारच्या वैद्यकीय सोयीसुविध पुरविण्याची जबाबदारीही आपोआपच आपल्या शिरावर येऊन पडलीय. त्याच्या विरोधात जनमतही प्रचंड असल्याने त्याला घातपात होण्याची शक्यता गृहीत धरून त्या दर्जाचे संरक्षण पूरविणे हेही मोठे जिकीरीचे व खर्चाचे काम आहेच.

एवढा लांबलचक व वळणा वळणांचा मार्ग निवडून आपण त्याच्यावर महत्त्वाचा आरोप काय ठेवला तर देशाविरुद्ध युद्ध पुकारणे. या एका वाक्याने तो नायकपदावर विराजमान झाला. याचे प्रमुख कारण म्हणजे चोरी, खून, बलात्कार हे सारे जगाच्या पाठीवर सगळीकडे निसंशय अपराधच ठरतात म्हणजे कायद्याच्या दृष्टीनेही आणि नैतिकतेच्या दृष्टीनेही. याउलट युद्ध हे ज्या देशाविरोधात लढले जाते त्या देशाच्या कायद्याचा तो भंग होत असला तरी जो देश युद्ध पुकारतो तो त्याला कायदेशीर रीत्या अपराध समजत नाहीच शिवाय नैतिकतेच्या दृष्टीने पाहता तो तर एक पराक्रमाचाच भाग असतो. शिवाय आपण त्याला युद्ध पुकारण्यावरून पकडले असे म्हणत असू तर तो युद्धकैदी झाला आणि मग तो सैन्याच्या ताब्यात जायला हवा आणि सैन्यानेच त्याचा फैसला करायला हवा. असे केल्यास मग तो युद्धकैद्यांच्या दर्जाचा मानून त्याची पाकिस्तानबरोबर आपल्या युद्धकैद्यांच्या बदल्यात देवाणघेवाण करावी लागेल आणि असे केले गेले तर जनमत प्रक्षुब्ध होऊन सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

आता तो देशाविरुद्ध युद्ध पुकारतोय म्हंटल्यावर सैन्याच्या ताब्यात असायला हवा पण आहे मात्र पोलिसांच्या ताब्यात कारण त्याला पोलिसांनी पकडलेय, सैन्याने नाही. (आता इथून पुढचा विचार करता दिसतील त्या आपल्या व्यवस्थेतील त्रुटी) पोलिसांनी पकडले कारण तो शहरात नागरिकांवर शस्त्रांच्या साहाय्याने हल्ला करीत होता. अर्थात पोलीसांनी त्याला पकडले असले तरी कुठलाही कायदा मोडल्याचा ठपका ते त्याच्यावर ठेऊ शकत नाहीत कारण मुळातच त्याला कुठलेही कायदे लागू होतच नाहीत. कायदे इथल्या अधिकृत नागरिकांकरिता बंधनकारक असतात किंवा मग अधिकृतरीत्या व्हिसा घेऊन येणार्‍या परकीय नागरिकांवर. हा तर बेकायदा घुसलेला म्हणजे याला शहरात आल्यावर नव्हे तर देशाच्या सीमेवर घुसखोरी करीत असतानाच पकडायला हवा होता आणि तो ही सैन्याने, पोलिसांनी नव्हे. तसे घडले नाही हा सैन्याचा दोष नाही का?

दुसरे अतिशय महत्त्वाचे म्हणजे कसाब व त्याचे साथीदार साठ तास पोलिसांसोबत / सैन्यासोबत लढता येईल इतका शस्त्रसाठा / दारुगोळा स्वत:बरोबर घेऊन आले. इतका दारुगोळा व शस्त्र सैन्याच्या नजरेखालून सुटून या देशात / शहरात आलेच कसे? त्यानंतरही शहरात पोलिसांनी त्यांना या गोष्टी बाळगण्याबाबत दोषी मानून आधीच अटकेत का टाकले नाही? आपल्या देशात स्वसंरक्षणासाठी देखील सहा इंच किंवा त्याहून लांब पात्याचे हत्यार इथले अधिकृत नागरिकही जवळ बाळगू शकत नाही तिथे नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवरच येऊन पडते. या जबाबदारीचाच एक भाग म्हणून शहरातील सर्वच जण या शस्त्रास्त्र कायद्याचे पालन करताहेत याची खात्री करून घेणे, ज्याचे पालन मुंबई पोलिसांनी इमानदारीने केले नाही असे अत्यंत खेदाने नमूद करावे लागते.

थोडक्यात कसाब, त्याचे साथीदार व त्यांची शस्त्रसामुग्री मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात सैन्य अथवा पोलिसांचा पहारा चुकवून आत पोचतात आणि साठ तास शहराला वेठीस धरून अंदाधुंद गोळीबार करतात, कित्येक निरपराधांचे प्राण घेतात हे सारेच अविश्वसनीय आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या दहा जणांचा मुकाबला आपण हजार जणांच्या मदतीने करतो (पोलीस, एनएसजीचे कमांडो, इत्यादी) आणि शेवटी जेव्हा हे सारे रोखण्यात आपण यशस्वी होतो तेव्हा आपण त्याला आपला विजय (?) मानतो. हे सारेच अतर्क्य आणि आचरटपणाचे नाही का? पुर्वी शिवाजी महाराज अतिशय निवडक मावळ्यांच्या सोबतीने मुघलांवर स्वारी करीत आणि मुघलांचे सैन्य हजारोंच्या संख्येने असले तरी त्याला धूळ चारीत. आजच्या काळात कसाब फक्त मोजक्या दहा साथीदारांसह इथे येतो आणि आपल्याला त्याच्याशी लढायला हजार माणसे लागतात आणि तीही आपल्याच प्रदेशात. युद्धाच्या डावपेचांमध्ये कोण कुणाचे अनुयायी आहेत?

तीन वर्षे झाली कसाब पोलिसांच्या ताब्यात आहे. या कालावधीत त्याला इथपर्यंत येण्यास कोणी मदत केली त्या सैन्यातल्या व पोलिस दलांमधल्या नावांचा अजून आपल्याला छडा लागू नये? पोलिसांनी थर्ड / फोर्थ अगदी हव्या त्या डिग्रीचा वापर करून गुन्हेगारांकडून आतापर्यंत इतर प्रकरणांत माहिती मिळविली आहेच ना? मग या प्रकरणात त्यांना ही माहिती का मिळू शकली नाही? ही माहिती जर तीन वर्षांत मिळविता येत नसेल तर मग त्याला जिवंत पकडून त्याच्या पालनपोषणाचा खर्च करण्यात काय हशील आहे? त्याच्या इतर साथीदारांप्रमाणेच त्यालाही जागच्या जागी संपविता आले असतेच की.

कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वत:च्या देहाची चाळण करणार्‍या तुकाराम ओंबळे यांचे बलिदान व्यर्थच गेले म्हणायचे.

गुलमोहर: 

लेख विचार करायला लावतो, आवडला... पण कसाबला काय आणि कशी शिक्षा करायला हवी होती? हे पण सुचवा...

कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वत:च्या देहाची चाळण करणार्‍या तुकाराम ओंबळे यांचे बलिदान व्यर्थच गेले म्हणायचे.
----- बलिदान व्यर्थ गेले असे म्हणणे त्यांच्यावर व त्यांच्या सारख्या अनेकांवर अन्याय करणारे ठरेल. हे वाक्य सोडुन मला लेख आवडला. त्यांचे बलिदान व्यर्थ नको जायला तर काय करायला हवे हे सुचवू शकता... पण शिक्षेला दिरंगाई होते आहे म्हणुन बलिदान व्यर्थ असा संबंध नाही जोडता येत.

ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत त्यापैकी आणखीही काही प्रश्न मनात आहेत.

अजमल कसाब ला फाशी होणार का हा प्रश्न आहेच आहे...
त्याबरोबरच..

संसदेवर हल्ला करणारे किंवा अक्षरधामवर हल्ल्ला करणारे, संकटमोचन मंदिरावर हल्ला करणारे सगळेच ठार मारले गेले. यातल्या एकालाही जिवंत पकडणे शक्य झाले नाही का ? अतिरेक्यांना ठार करण्यापेक्षा हे कट कोण आखतंय याची माहीती चव्हाट्यावर आणणं हे जास्त परिणामकारक नाही का ?

२६/११ च्या पार्श्वभूमीवर करकरेंसारख्या अधिका-याची झालेली हत्या आणि अशोक कामठेंच्या पत्नीने विचारलेले प्रश्न.. तसंच हू किल्ड करकरे मधे विचारलेले प्रश्न यांची उत्तरे सरकार का देत नाही ?

>>> आपल्याला असे दाखवायचे होते की आपण कसाबची बाजू पूर्णपणे न्यायाने आणि त्याला ती मांडण्याची सर्वप्रकारे संधी देऊन मगच निर्णय घेणार आहोत (हे सारे आपण कुणाला दाखविणार आहोत? अंकल सॅमला?>>><<<<
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर
>>>> आता तो देशाविरुद्ध युद्ध पुकारतोय म्हंटल्यावर सैन्याच्या ताब्यात असायला हवा पण आहे मात्र पोलिसांच्या ताब्यात कारण त्याला पोलिसांनी पकडलेय, सैन्याने नाही. <<<<
हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे.

देशाबरोबर युद्ध पुकारणार्‍याला या देशाचे कायदे नि तदनुषन्गिक सवलती कशा काय बहाल केल्या जातात? आपल्याकडे "शत्रूपक्षाबरोबर" काय नि कसे वागायचे याबद्दलचे स्वतन्त्र लष्करी कायदे काय आहेत?

बाकी, तुम्ही मुम्बईच्या सुरक्षाव्यवस्था व पोलिसान्चे जे वर्णन केलय ते अगदीच अनाठायी नसल तरी एक लक्षात घ्या की "उघड दिसते" ती सुरक्षाव्यवस्था असूच शकत नाही. गुन्हेगार ज्या पद्धतीने तुमच्या डोळ्यात धुळ फेकत हल्लाबोल करतात, त्याच पद्धतीने गुन्हेगारान्च्या डोळ्यात धुळफेक करणारी सुरक्षाव्यवस्था तुमच्या-आमच्या सारख्या सामान्यान्ना तर नक्कीच लक्षात येणार नाही, येऊही नये. अन लोकशाही आहे म्हणून आपल दाखवा बर सुरक्षाव्यवस्था काय काय आहे असे अवसानघातकी प्रश्नही विचारले जाऊ नयेत. (असे आपले माझे मत बर का!).

>>>> संसदेवर हल्ला करणारे किंवा अक्षरधामवर हल्ल्ला करणारे, संकटमोचन मंदिरावर हल्ला करणारे सगळेच ठार मारले गेले. यातल्या एकालाही जिवंत पकडणे शक्य झाले नाही का ? अतिरेक्यांना ठार करण्यापेक्षा हे कट कोण आखतंय याची माहीती चव्हाट्यावर आणणं हे जास्त परिणामकारक नाही का ? <<<<
किरण, तुमचा माहिती चव्हाट्यावर आणण्याबाबतचा मुद्दा बरोबर आहे पण ते "लष्करी न्यायालयाअन्तर्गत" देखिल करता आले असते, माझ्या वरिल पोस्ट मधे म्हणल्याप्रमाणे, या देशाच्या नागरिकान्करताचे कायदे व सवलती, शत्रूस का द्याव्यात?
कायदेतज्ञ जाणकारान्नी खुलासा करावा.
दुसरे असे की तुमच्या "सगळेच ठार मारले गेले एकालाही जिवन्त पकडणे शक्य झाले नाही का?" या मुद्द्याला थोडा "फेक एन्काऊन्टरचा" वास येतोय असे नाही वाटत? Proud Wink तसा येऊ नये. चेकमेट!

विषण्ण करणारे आहे हे सगळे.
सर्वच बाबतीत कमालीचा विलंब हि आपली खासियत आहे. प्रत्येक पायरीला कालमर्यादा घालता आली असती. तशी कायदेशीर तरतूदही आहे, पण ती पाळली जात नाही. अजूनही तिच प्रोसिजर आंधळेपणाने पाळली जातेय.

चेतन, तुम्ही एका वर्षानंतरचा अनुभव सांगताय. २६/११ ला मी CST येथे होतो. (तो सर्व अनुभव मी मायबोलीवर कथन केलाय). पहाटे चार वाजता,म्हणजे जेमतेम ६ तासांनतर, टॅक्सीने परतताना आम्हाला कोणी हटकले नव्हते.

'२६/११ आणि कसाब' यांच्या खटल्याच्या हिसाब किती दिवस अनुत्तरीत राहणार आहे कुणास ठाऊक?
अतिरेकी संघटना आणि अतिरेकी हल्यातल्या दोषी व्यक्तींचे खटले तात्काळ निकालात काढून शिक्षा हि व्हायलाच हवी. पण हे आपल्या देशात कधी होणार? Sad खरंतर कसाबला तेव्हाच ठार मारायला हवं होतं. पण त्याच्या सुदैवानं तो वाचला आणि दुर्दैवानं काही सक्षम अधिकार्‍यांचा नाहक बळी गेला. एकाद्या राजकिय नेत्याविरुद्ध असभ्य वर्तनाचा निषेध म्हणून बंद पुकारला जातो, सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे राजकीय नेते या गोष्टींचं फक्त भांडवल करू शकतात आणि विशेष म्हणजे खेळतं भांडवलं बरं का ! न्यायालयीन प्रक्रियेमधे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या केलेली ढवळाढवळ हेच इथलं सर्वात भयानक 'बांडगूळ' आहे. एवढी देशव्यापी आंदोलनं होतायेत आत्ता पण कुठेतरी या प्रश्नांवर चर्चा होताना दिसतेय काय? त्या आंदोलनाची या देशाला गरज आहेच पण अतिरेकी कारवायांच्या विरूद्ध एखादं आंदोलन हवंच. राजकीय आणि न्यायालयीन प्रक्रियेलाच वेठीस धरायला हवं निदान यासारख्या काही व्हिआयपी खटल्यांसाठी.

मी मतदान करतोय. मी भारतीय संविधानाचा योग्य तो मान राखतोय. मी माझ्या देशाचे हित संपुर्णपणे जाणतोय. पण मी माझ्या देशात अतिरेकी कारवायांपासून सुरक्षित आहे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार?

माणसे कापणार्‍यांचे आम्ही
बकरे कापून लाड करतो
फासावर चढवण्याएवजी
धर्मनिरपेक्षता पाळतो. !

दरवर्षी आम्ही फक्त
श्रध्दांजली वाहणार
कसाब मात्र अरामात
जेल मधे रहाणार !!!

नादखुळा,
न्यायालयीन प्रक्रिया हेच दुखणे आहे. कुठलाही साधासा अर्ज करुन, कुठल्याही खटल्याची सुनावणी, कुठल्याही टप्प्यावर रोखता येते.
कारण एकदा अर्ज केला कि तो आधी समोर घ्यावा लागतो, मग त्यावर "सामनेवाले" यांना म्हणणे मांडण्यासाठी किमान तीन तारखा द्याव्या लागतात... अगदी अर्ज फेटाळायचा असला तरी त्यावर सुनावणी व्हावीच लागते. आणि तीन तारखा म्हणजे किमान तीन महिने.

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.
आता प्रतिसादांमधून व्यक्त केल्या गेलेल्या मुद्यांबाबत -

<< कसाबला काय आणि कशी शिक्षा करायला हवी होती? हे पण सुचवा... >>

<< बलिदान व्यर्थ गेले असे म्हणणे त्यांच्यावर व त्यांच्या सारख्या अनेकांवर अन्याय करणारे ठरेल. >>

<< त्यांचे बलिदान व्यर्थ नको जायला तर काय करायला हवे हे सुचवू शकता... पण शिक्षेला दिरंगाई होते आहे म्हणुन बलिदान व्यर्थ असा संबंध नाही जोडता येत. >>

शिक्षा काय द्यावी किंवा द्यावी किंवा नको याविषयी मला काही भाष्य करायचे नाहीय. किंबहुना तो मुद्दाच अतिशय गौण आहे. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी जे काही केलंय त्याबद्दल त्यांना फाशीची दिली तरी ती फक्त औपचारिकता होईल. त्याला त्याच वेळी मारता आलं असतं. तसंही आपल्याकडे कित्येक गुन्हेगारांना जागच्या जागी ठार करण्यात येतं ज्याला चकमक म्हणतात. कसाबचे बाकी साथीदार आपण असेच मारलेत. आता हा कसाब तेवढा ओंबळेच्या मृत्यूची किंमत चुकवून जिवंत पकडला गेला आणि इतके दिवस आपण त्याला पोसला आहेच तर त्याच्याकडून महत्वाची माहिती मिळविणे गरजेचे होते. ही माहिती म्हणजे तो आणि त्याचे साथीदार भारतीय सैन्य / पोलीस / राजकारणी यांच्या मदतीशिवाय इथवर एवढी शस्त्रे / स्फोटके घेऊन येणे आणि वास्तव्य करणे अशक्य असल्यामुळे त्या मदतनीसांची नावे. हे कसाबचे मदतनीस म्हणजे घरभेदी, फितूर आहेत.
आपण कसाबला किंवा यासारख्या इतर अनेकांना ठार केले तरी जोपर्यंत त्यांना मदत करणार्‍या घरभेद्यांना पकडून ठार करीत नाही तोवर आपण अशा हल्ल्यांना तोंड देत राहणारच. तेव्हा तीन वर्षात ही माहिती मिळविली नसल्यामूळेच कसाब जिवंत राहून काय फायदा झाला असे वाटते. यामुळेच बलिदान व्यर्थ गेले असे वाटते. त्यात ओंबळेंचा अवमान करण्याचा उद्देश नसून आता ज्यांच्या ताब्यात तो आहे त्यांच्या नाकर्तेपणाविषयी ती केलेली तक्रार आहे.
शिक्षेच्या दिरंगाईचा तर त्याच्याशी अजिबात संबंध नाही.

<< अतिरेक्यांना ठार करण्यापेक्षा हे कट कोण आखतंय याची माहीती चव्हाट्यावर आणणं हे जास्त परिणामकारक नाही का ? >>

हाच माझ्या लेखाचा मुद्दा आहे जो आपण बरोबर ओळखलात.

<< २६/११ ला मी CST येथे होतो. (तो सर्व अनुभव मी मायबोलीवर कथन केलाय). पहाटे चार वाजता,म्हणजे जेमतेम ६ तासांनतर, टॅक्सीने परतताना आम्हाला कोणी हटकले नव्हते. >>

हा अक्षम्य गलथानपणा आहे सुरक्षा व्यवस्थेचा. यामूळेच आपण आजही भयाच्या छायेखाली वावरत आहोत.

<< पण मी माझ्या देशात अतिरेकी कारवायांपासून सुरक्षित आहे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? >>

आपल्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. सर्वांनाच ते ठाऊक आहे. पण अधिकारपदावरील ते उघडपणे मान्य करीत नाहीत.

दिनेशदा, तिथेच तर हे सांडपाणी मुरतंय ना. अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात थेट आरोपी असेल तर कशाला पाहिजे बचावपक्ष? थेट आरोप थेट शिक्षा असंच सुरु व्हायला हवं. या बदलाचं स्वागत सर्व स्तरावर होईल. यातून कदाचित थोडीफार जरब तरी बसेल अश्या अतिरेकी कारवायांना.

अतिरेकी काय आणि त्यांच्या कारवाया काय? त्यानी केलेले कट आणि त्याबद्दलची माहिती उघड करूनही त्यामधे काहीसा फरक पडणार नाहीये. कारण कित्येकदा काही अतिरेकी संघटना 'खुलेआम हमाम' जबाबदार्‍या स्विकारतातच की.

एकीकडे सरकार तुकाराम ओंबळे यांचा अर्धपुतळा उभारून त्यांनी केलेल्या विशेष धाडसी कार्याचा मान आदर राखण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात सत्तापक्षाचं नशिब चांगलच म्हणायचं कारण नगरपालीका,महानगरपालीकेच्या होऊ घातलेल्या निवडणूका. कसाबला सुद्धा पोसणारं सुद्धा सरकार तेच ना? तुकाराम ओंबळे आणि त्यांच्या सहकारी अधिकार्‍यांच्या शहिद होण्याला सार्वमतानं कसाबला फाशी सुनावणारं आणि इतर अप्रत्यक्ष आरोपींना योग्य ती शिक्षा देणारं न्यायालय या देशात कधी पहायला मिळणार?

>>> ही माहिती म्हणजे तो आणि त्याचे साथीदार भारतीय सैन्य / पोलीस / राजकारणी यांच्या मदतीशिवाय इथवर एवढी शस्त्रे / स्फोटके घेऊन येणे आणि वास्तव्य करणे अशक्य असल्यामुळे त्या मदतनीसांची नावे. >>>>>> कोण सांगणार त्या मदतनीसांची नावे? गुन्हा घडल्यावर पहिल्यांदा पुरावे नाहिसे करण्यात तरबेज असलेले 'हिरो' मोकाट फिरतात. त्यामुळे नावे कळल्यावरही आरोप सिद्ध करायला आणि एक तप जाणार. एक कमिशन एक अहवाल. दुसरी कमिशन दुसरा अहवाल. दोन्ही अहवाल गुलदस्त्यातच. नंतर तेच अहवाल ऐकमेकांच्या चांगल्या वाईट काळात प्रसिद्ध करून नवं राजकारण. हेच चालणार इथे.

शंभर अपराधी सुटले तरी चालतील.... वगैरे तत्व आहे ना ते.
आपण तर रामन राघवला पण वकिल दिला होता (वंदना गुप्ते च्या नवर्‍याने वकिलपत्र घेतले होते.) त्याला शिक्षा होऊ शकली नाही. खून करताना आपल्याला दैवी आदेश होते असे तो सांगत असे, आणि या मुद्द्यावरुन त्याची मानसिक अवस्था ठिक नाही.. या कारणावरुन त्याची शिक्षा टळली (त्याने अनेक नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रियांचे डोक्यात दगड घालून खून केले होते.)

त्याने निर्माण केलेली दशहत मी लाहनपणी अनुभवली आहे. रात्र रात्र लोक पहारा देत असत.
शेवटी वकिलाच्या हुशारीवरच ठरणार सगळे. आणि बहुतेक वेळा पोलिसांच्या तपासात त्रुटी राहिलेल्याच असतात.

लिंबूदादांचे म्हणणे थोडे फार खरे आहे, की सुरक्षेसंबंधी गुपित जाहीर करायची नसतात, पण लोकांना सुरक्षित वाटेल असे वर्तन आहे का देशात? अतिरेकी म्हणून कुणावर संशय घ्यावा, नि त्याने अतिरेकी कृत्ये करण्या आधी त्याला (तिला) 'थांबवावे' तर ज्यांना सुरक्षा, कायदा यातले काही कळत नाही असे लोकसुद्धा बोंबलत उठतात नि विचारतात की पुरावा कुठे आहे? आमच्या मते तो (ती) निर्दोष आहे!! वगैरे, वगैरे! इतके हुषार वकील नि लोक, फक्त देशाविरुद्धच कसे? देशाच्या बाजूने त्यांच्याहून हुषार लोक नाहीतच?
मग देश खड्ड्यातच जाणार!!
माझी तर खात्री आहे की की भारतात जगात सर्वात जास्त हुषार, कर्तबगार, स्वाभिमानी, देशप्रेमी असे लोक आहेत पण, दुर्दैवाने वाईट लोकहि संख्येने जगातल्यापेक्षा जास्त आहेत. प्रचंड लोकसंख्या! फक्त दहा टक्के वाईट म्हंटले तरी कित्येक देशांच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा अधिक!!
हटकेश्वर, हटकेश्वर!!

लिंबुसिंग...

हल्ल्याबाबत सगळे मारले गेले तरी एकतरी जिवंत पकडला जाणं हे का महत्वाचं असावं हे वयाची २१ पूर्ण केलेल्या कुठल्याही व्यक्तीला अंदाजाने सांगता येऊ शकतं... Proud किमान संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेत २१ पेक्षा कुणी कमी असेल असं वाटत नाही.

आता कुणी कट रचला, कुठं रचला, कोण त्याचे खरे शिल्पकार होते ... बसा अंदाज करत !!

आमच्यासारख्यांना एक वाईट्ट खोड आहे.. जे पाहीलं नाही त्याबद्दल निकाल सोडा, निष्कर्षही सोडा.. साधा अंदाजदेखील बांधता येत नाही. तशी दैवी देणगी बहुधा विशिष्ट लोकांनाच असू शकते !! खोटी चकमक हा देखील निष्कर्षच कि हो .. काय म्हणता ??

जे पाहीलं नाही त्याबद्दल निकाल सोडा, निष्कर्षही सोडा.. साधा अंदाजदेखील बांधता येत नाही.

तसे सोपे आहे हो ते! आता मला कुठे भारताबद्दल काही माहिती आहे, पण मायबोलीवर फक्त वाईटच ऐकतो, नि तेव्हढेच वाचून शिव्या देत सुटतो. चांगले वाचायला मिळाले तरी त्यावर विश्वास ठेवायचा तर लोकांना नावे कशी ठेवणार? नि त्याशिवाय मी सगळ्यंपेक्षा किती हुषार, स्वतंत्र विचाराचा हे कसे दाखवणार?
सत्य ज्यांना माहित आहे ते इथे येणारच नाहीत इथे. कशाला येतील? हुषार म्हणा, वेडे म्हणा, ते फक्त काम करतात, बाकीचे बोंबलत बसतात!

माझ्यासारखे तसे विरळा, पण भारतातली लोकसंख्याच इतकी की कितीहि कमी टक्के असले तरी संख्येनी खूप!

आता एका पोस्टला फक्त ५० रुपये द्या असे ठरवले मायबोलीने, तर ९० टक्के लोक कमी होतील इथे लिहीणारे!

२६/११ च्या घटनेबद्दलचा उद्वेग व्यक्त करणारं लिखाण. त्यावरचे प्रतिसादही निव्वळ उद्विग्नता व्यक्त करणारे, पण लेखनाबद्दल पुरेशी स्केप्टिसिझम न दाखवणारे दिसल्याने याच लेखावर इतरत्र दिलेला प्रतिसाद इथेही देतो आहे.

मात्र काही प्रश्न पडतात. ४ नोव्हेंबरच्या रात्री तुम्ही स्कूटर-मोटरसायकलवरून रस्त्यावरून जाणार तर पोलिसांनी हटकावं अशी अपेक्षा का ठेवली होती हे कळलं नाही. कदाचित अशीही शक्यता असेल की तुम्ही पाठवलेल्या पत्राची माहिती सर्व पोलिसांना ताबडतोब करून दिली असेल. आणि त्यांनी तुम्हाला ओळखून यात काही धोका नाही असा योग्य निष्कर्ष काढला असेल. जो सकृद्दर्शनी धोकादायक दिसत नाही (खांद्यावर मोठी सॅक वगैरे) अशा माणसाकडूनही धोका असेल (तो केवळ उशीरा रात्री बाहेर आहे म्हणून) असं पोलिसांनी गृहित धरणं योग्य वाटत नाही.

सैन्याच्या ताब्यात ठेवणं की पोलिसांच्या अखत्यारित ठेवणं याबाबतीत कायदेशीर विचार झालेला नसेल असं काहीतरी लेखात सूचित केलेलं दिसतं. कायद्यानुसार खरं काय करायला हवं होतं या बाबतीत काही स्वतंत्र अभ्यास सादर केलात तर बरं होईल.

ड्यू प्रोसेस बद्दल तक्रार असू शकते, पण ती काही विशिष्ट कारणासाठी अस्तित्वात असते. कोणाला दाखवण्यासाठी पाळण्यापेक्षा योग्य म्हणून पाळायची असते. 'इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी हे इतरांसाठी ठीक आहे, पण कसाबसारख्यासाठीही?' हा प्रश्न विचारताना नक्की कुठे रेषा आखायची हे कसं ठरवणार हा मोठा प्रश्न उभा रहातो. ती रेषा धूसर केली तर सामान्य नागरिकांचे जे हाल होऊ शकतात त्यापेक्षा एखाद्या कसाबची शिक्षा लांबवलेली परवडते.

<< ४ नोव्हेंबरच्या रात्री तुम्ही स्कूटर-मोटरसायकलवरून रस्त्यावरून जाणार तर पोलिसांनी हटकावं अशी अपेक्षा का ठेवली होती हे कळलं नाही. जो सकृद्दर्शनी धोकादायक दिसत नाही (खांद्यावर मोठी सॅक वगैरे) अशा माणसाकडूनही धोका असेल (तो केवळ उशीरा रात्री बाहेर आहे म्हणून) असं पोलिसांनी गृहित धरणं योग्य वाटत नाही. >>

मी साधारण त्याच भागातून फिरलो जिथे एक वर्षापूर्वी हा हल्ला झाला होता. दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून प्यावे या सूत्रानुसार पोलिसांनी तेथून जाणार्‍या (विशेषत: मी रात्री दोनच्या पुढे फिरत होतो व रस्त्यावर इतर कुणी फारसे नव्हते. शिवाय हेल्मेटच्या काळ्या काचेतून माझा चेहराही दिसत नव्हता) सामान्य लोकांचीही थांबवून चौकशी करायला हवी. मी जिथे राहतो त्या पिंपरी-चिंचवड नवनगर भागात जर उत्तररात्री फिरत असलो आणि पोलिसांच्या नजरेस पडलो तर ते थांबवून चौकशी करतात असा अनुभव आहे. चौकशीत साधारण नाव, पत्ता, कुठून आलात, कुठे चाललात, काय प्रयोजन असे प्रश्न अतिशय सभ्यपणे विचारले जातात. जे मला तरी आवश्यक वाटतात. त्याचप्रमाणे जवळ येऊन वास घेऊन ही बघतात (पिलेला तर नाहीना ह्याची खात्री करून घेतात)

<< कदाचित अशीही शक्यता असेल की तुम्ही पाठवलेल्या पत्राची माहिती सर्व पोलिसांना ताबडतोब करून दिली असेल. आणि त्यांनी तुम्हाला ओळखून यात काही धोका नाही असा योग्य निष्कर्ष काढला असेल. >>

माझ्या ई-पत्राच्या प्रती अगदी रस्त्यातल्या तपासणीनाक्यावरील पोलिसांपर्यंत पोचल्या असतील ही शक्यता फारच धूसर वाटते आणि तसे असेल तरी हातात ती प्रत घेऊन वाहनाचा क्रमांक पाहून खात्री करुन घेणे इष्ट नव्हे का?

<< ड्यू प्रोसेस बद्दल तक्रार असू शकते, पण ती काही विशिष्ट कारणासाठी अस्तित्वात असते. कोणाला दाखवण्यासाठी पाळण्यापेक्षा योग्य म्हणून पाळायची असते. 'इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी हे इतरांसाठी ठीक आहे, पण कसाबसारख्यासाठीही?' हा प्रश्न विचारताना नक्की कुठे रेषा आखायची हे कसं ठरवणार हा मोठा प्रश्न उभा रहातो. ती रेषा धूसर केली तर सामान्य नागरिकांचे जे हाल होऊ शकतात त्यापेक्षा एखाद्या कसाबची शिक्षा लांबवलेली परवडते. >>

कसाबच्य़ा शिक्षेचा मी आग्रह धरलेला नाहीये. उलट ती फक्त एक औपचारिकताच आहे असे मी म्हणतोय. बाकी माझ्या लेखाचा मुख्य सूर हाच की एवढ्या काळात कसाबचे मदतनीस कोण (जे की भारतीय पोलिस, सैन्यातील अधिकारी व राजकारणी यांच्यापैकीच कुणीतरी आहेत) ज्यांच्यामुळेच तो एवढा शस्त्रसाठा घेऊन सीमा ओलांडून आत आला ते शोधून का काढले नाही? अशी माहिती मिळवायची असते तेव्हा ताब्यात असलेल्या कुठल्याही व्यक्तिला पोलिस तिसरी पदवी दाखवून ही माहिती मिळवितातच ना? मग कसाबच्या बाबतीत पोलिसांनी अजुन हे का केले नाही? की ही माहिती मिळूनही ते ती लपवित आहेत?

या हल्ल्याबाबत खूपच वदंता, अफवा आहेत. सामान्य माणूस गोंधळून गेलाय. या अफवा पसरवायला आपन आणखी हातभार नको लावायला पण एकदाचा सोक्षमोक्ष लागू दे ... नाही तर सर्वांवरचा विश्वास उडत चालला आहे. उद्या कुणी म्हटलं मंत्रीमंडळानेच हा हल्ला घडवून आणला तरी सामान्य माणसाचा पटकन विश्वास बसेल अशी परिस्थिती होत चालली आहे.

सरकारचं गुप्त वार्ता सक्षम असेलच.. तेव्हां या बाबतीत आश्वासक पावलं लवकरच उचलली जातील अशी आशा करूयात..

या हल्ल्याबाबत खूपच वदंता, अफवा आहेत.

कामा मधील गोळीबाराबाबत फारसं कुणी लिहिलं नाही. मेडियाचं सगळं लक्ष सी एस टी वरच होतं

<<<तीन वर्षे झाली कसाब पोलिसांच्या ताब्यात आहे. या कालावधीत त्याला इथपर्यंत येण्यास कोणी मदत केली त्या सैन्यातल्या व पोलिस दलांमधल्या नावांचा अजून आपल्याला छडा लागू नये?>>>

कसाब आणि त्याचे साथीदार मुंबईत कसे आले ते आता वेगळं सांगायला हवंय ? सैन्यातले आणि पोलिसातले लोक सामील होते हा निष्कर्श कशाच्या जोरावर?
मुंबईत रात्री ११ वाजता मोटरसायकलवर फिरणारा युवक ही लक्ष वेधून घेणारी गोष्ट नाही. रात्री एक वाजताही मुंबईच्या लोकलगाड्या भरलेल्या असतात.

<< कसाब आणि त्याचे साथीदार मुंबईत कसे आले ते आता वेगळं सांगायला हवंय ? सैन्यातले आणि पोलिसातले लोक सामील होते हा निष्कर्श कशाच्या जोरावर? >>

सीमेवरून घुसखोरी करणार्‍यांना सैन्याने अडवावे अशी अपेक्षा असते. जर ६ इंचापेक्षा जास्त लांबीचे पाते असलेले शस्त्र बाळगले तर नागरिकांनाही आपल्या देशात पोलिस अटक करतात तेव्हा हत्यारे, स्फोटके घेऊन शहरातल्या प्रसिद्ध हॉटेलात राहिलेल्या व्यक्तिंना पोलिसांनी अटक करायला हवी (ते सक्रिय होण्याआधीच) ही अपेक्षा रास्त नाही का?

<< मुंबईत रात्री ११ वाजता मोटरसायकलवर फिरणारा युवक ही लक्ष वेधून घेणारी गोष्ट नाही. रात्री एक वाजताही मुंबईच्या लोकलगाड्या भरलेल्या असतात. >>

रात्री २ नंतरही मी फिरत होतो व तेही जिथे वर्षभरापूर्वी हल्ला झाला त्या भागातून.

रात्री २ नंतरही मी फिरत होतो व तेही जिथे वर्षभरापूर्वी हल्ला झाला त्या भागातून.

आम्ही नेहमीप्रमाणे त्या दिवशी अंधेरी ते घाटकोपर बसने आणि नंतर डोंबिवली ट्रेनने आलो. सी एस टी ला काय झाले ते आम्हाला दुसर्‍या दिवशी समजले.

आणि अतिरेकी प्रत्येक वेळी त्याच ठिकाणी कशाला हल्ला करतील? एक वर्षापूर्वी तिथे हल्ला झाला म्हणून अनंतकाळ तिथे लष्कर ठेवनार की काय?

<< आणि अतिरेकी प्रत्येक वेळी त्याच ठिकाणी कशाला हल्ला करतील? एक वर्षापूर्वी तिथे हल्ला झाला म्हणून अनंतकाळ तिथे लष्कर ठेवनार की काय? >>

हाच हिशेब लावायचा तर पुण्यात जिथे हल्ला झाला होता त्या कोरेगाव पार्क परिसरात सध्या कडेकोट पोलिस बंदोबस्त कशाकरिता आहे? अनंतकाळ लष्कर ठेवण्याची अपेक्षा नाही परंतू समुद्रकिनारा आहे. सागरी सीमेवरही गस्त हवी तसेच. समुद्रकिनार्‍याला लागुन असलेल्या रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांनी निदान उत्तररात्री फिरणार्‍या व्यक्तिला थांबवून चौकशी करायला हवी ना.. (इथे आमच्या परिसरात तरी अशी चौकशी पोलिस करतात.)

मुंबईचे पोलिस हुशार आहेत.. त्यानी तुम्हाला नुसतं बघून्नच ओळखलं असणार हे काय अतिरेकी वाटत नाही म्हणून.. Proud

<<< त्यानी तुम्हाला नुसतं बघून्नच ओळखलं असणार हे काय अतिरेकी वाटत नाही म्हणून.. >>>

माझ्या हेल्मेटच्या काळ्या काचेतून माझा चेहरा कुणालाच दिसू शकत नाही.

रात्री २ नंतरही मी फिरत होतो व तेही जिथे वर्षभरापूर्वी हल्ला झाला त्या भागातून. >> अहो गुगळे साहेब, मरिन लाईन्सच्या किनार्‍यावर २४ तास पर्यटकांची रहदारी असते.......तसेच त्या संपुर्ण विभागात कुलाब्या पर्यंत किंवा कामाठीपुर्‍याच्या गल्ल्यांमध्ये जरी तुम्ही मोकाट फिरलात तरी पोलीसच नाही तर तिथला कुणीच तुम्हाला हटकाणार नाही.......ते सोडा......आतकवादी व्यक्ती किंवा संशयास्पद व्यक्ती आपल्या सारखी अशी बिनधास्त आणि मोकाट फिरत नसते शहरात. त्यातच तुम्ही शासनाचे पत्र घेउन फिरत आहात म्हटल्यावर चेहर्‍यावर हेच 'सर्टिफिकेट' घेउन फिरत आहात की, मी आतंकवादी, नक्सलवादी नाही. एक भारतीय पर्यटक .जे आतकावाद्यांच्या गावी नसते Proud . मुंबई पोलिसांना इतके तरी नालायक समजु नका साहेब... Proud

हं तर तो कसाब....,

कसाब मरणार नाही.
ज्या अधीकार्‍यांच्या कस्टडीत तो आहे.... जो विभाग त्याच्या खटल्याशी निगडीत आहे, त्या विभागातील सर्वच व्यक्ति विशेष/अधीकारी यांचा तो 'एक्स्ट्रा' इनकमचा महामार्ग आहे. आणि तो 'कसाब' जिवंत असे पर्यंत खुलाच राहणार.
कसाबवर होणार्‍या प्रचंड खर्चा मधुन हे क्वचितच शक्य आहे की, त्या बिच्चार्‍या इवल्याश्या जिवावर त्यातला २०% तरी खर्च होत असावा. अशी आपल्या अधीकार्‍यांची ख्याती आहे.

क्रमशः

कसाब मरणार नाही.
ज्या अधीकार्‍यांच्या कस्टडीत तो आहे.... जो विभाग त्याच्या खटल्याशी निगडीत आहे, त्या विभागातील सर्वच व्यक्ति विशेष/अधीकारी यांचा तो 'एक्स्ट्रा' इनकमचा महामार्ग आहे. आणि तो 'कसाब' जिवंत असे पर्यंत खुलाच राहणार.
कसाबवर होणार्‍या प्रचंड खर्चा मधुन हे क्वचितच शक्य आहे की, त्या बिच्चार्‍या इवल्याश्या जिवावर त्यातला २०% तरी खर्च होत असावा. अशी आपल्या अधीकार्‍यांची ख्याती आहे.

त्यांना मिळणारे पैसे म्हणजे किस झाडकी पत्ती! सगळ्या वकीलांना (दोन्ही बाजूंच्या) केव्हढे पैसे मिळत असतील! महत्वाचा खटला म्हणजे फी पण भरपूर पाहिजे! एकदा खटला संपला तर मग काय करायचे?

Pages