मंतरलेले दिवस

Submitted by सुराग्रही on 22 November, 2011 - 23:41

मी स्टुडिओत पाऊल ठेवलं.  कंठसंगीताच्या रेकॉर्डिंगचा पहिलाच दिवस होता.  जो गायक समोर येऊन गाणार होता, ज्याच्या आवाजात माझ्या अल्बमचं पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होतं, त्या गायकाने जवळजवळ गेली ३५ वर्षे मराठी आणि हिंदी संगीतक्षेत्रात आपल्या मृदु, मुलायम आणि सुरेल आवाजाने स्वतःभोवती एक वलय निर्माण करुन अढळपदी स्थान मिळवलं होतं. आणि असा गायक आपलं गाणं गातोय, यासारखी अभिमानास्पद गोष्ट कोणती असली तरी या गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही.

२००१ साली आईवर कविता सुचली, बरोबर चालही सुचली. आईच्या घराण्यातंच संगीत. तिथुनंच संगीत आमच्यात उतरलं. मामानी ती कविता आणि चाल ऐकली. आणि त्याच्या पुढच्या भेटीत मला मंगेश पाडगांवकरांचं जिप्सी भेट म्हणुन मिळालं. तेव्हा पहिल्यांदा कविता समजू लागली, कवितेबद्दल आवड निर्माण होऊ लागली. संगीतकार जसा स्वरज्ञान घेऊनच जन्माला येतो, तशी कविताही सूर घेऊनच जन्माला येते. संगीतकार आणि कवितेचे सूर जुळले, संगीतकाराला कवितेचा सूर समजला, भिडला, की ते सूर तो लोकांना ऐकवतो. आणि कवितेचं गाण्यात रुपांतर होतं. कवितेला जबरदस्ती सुरात बांधलं, कि तेच सूर साखळदंडासारखे नकोसे वाटतात. विहीर खोदून मिळवलेलं पाणी आणि दगडाला पाझर फुटून वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी, यांच्या गोडव्यात जो फरक असतो, तोच फरक बांधलेल्या चालीत आणि सुचलेल्या चालीत असतो. त्या बांधकामात झालेली ओढाताण आपल्याला जाणवते. सुचलेल्या चालीत नाजुक, विणलेलं नक्षीकाम अनुभवायला मिळतं. हे जेव्हा समजलं, तेव्हापासून चाल सुचायची वाट पाहु लागलो. देवाच्या कृपेने छान कविता समोर येत गेल्या आणि त्यातल्या चाली मला दिसू लागल्या, सुचू लागल्या.

माझ्या अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनी वेगवेगळ्या प्रसंगी माझी गाणी ऐकली. २००९ साली माझ्या गाण्यांचा एक कार्यक्रम कट्टेकर मित्रांनी ठेवला. त्याला फार छान प्रतिसाद मिळाला. आपल्या चाली लोकांना आवडू शकतात याची जाणीव मला तेव्हा झाली. आणि हीच गाणी आपण लोकांसमोर आणायची असा निर्णय मी घेतला.

घर बांधणं जसं एक काम आहे, तसंच घर आतुन सजवणं ही देखील एक कला आहे. घर बांधणारा माणूस हा उत्तम interior decorator असतोच असं नाही. त्यासाठी वेगळ्या, त्यात माहीर असलेल्या माणसाची आपण मदत घेतो. पाटावरच्या गणपतीएवढंच महत्त्व मखरालाही आहे. गाण्य़ाची चाल म्हणज गणपती-आत्मा-गाभा. गाण्यात वाजणारं वाद्यवृंद, दोन कडव्यांमधलं म्युझिक म्हणजे मखर. चालीएवढंच त्या सजावटीलाही महत्त्व आहे. संगीत-संयोजक म्हणजे गाण्याचा मेक-अप मॅन. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी मला आनंद सहस्रबुद्धेसारखा योग्य आणि कोणी माणुस मिळाला नाही. श्री. अनिल मोहिले यांच्या हाताखाली शिकून आणि गेली ६-८ वर्ष संगीतक्षेत्रात राहुन तो ताराही आता लखलखू लागलाय. संगीत-संयोजनाशिवाय, एक मित्र म्हणून त्याने अनेक बाबतीत मला मदत केलीये, आणि त्याची एक मोठी यादी आहे.

अनेक चर्चांमधून कोणतं गाणं कसं करावं? त्यात कोणती वाद्य वापरायची? गाण्याचा साधारण आवाज कसा असेल? गाणं कसं ऐकु येणं अपेक्षित आहे? गाणं कोण कोण गाणार? त्यांच्या पट्ट्या काय? गाण्याची लय काय? या बाबी नक्की करण्यात आल्या.

पार्ल्यातल्या एका छोट्याश्या खोलीत आनंद, अभिजित सावंत(हा तबलजी Indian Idol चा विजेता नाही), अनिल करंजावकर आणि मी तालवाद्याच्या संयोजनासाठी भेटलो होतो. अनिल करंजावकरांचा मिश्किलपणा सुरु होता. माणुस ३०च्या आसपास असेल असा माझा अंदाज होता. नंतर समजलं कि संगीतसाधना करून माणुस १०-१५ वर्ष तरुण सहज राहु शकतो. धुमाळचे बोल ते "श्रीराम जय राम जय जय राम" असे बोलतात तर दादऱ्याचे "ह्याला पाडलं, त्याला पाडलं" असं म्हणतात. आनंद त्यांना एकेक गाणं वाजवुन दाखवे, M0, M1,M2, Fillers वगैरे वाजवुन दाखवे. कुठे कोणता ताल वापरावा? कसा पॅटर्न असावा? पखवाज कुठे असाव?, ढोलक कुठे असावं? इतर तालवाद्य कुठे असावीत? डफ कुठे असावा? टिंपनी कुठे असावी? मादल कसा वाजावा...वगैरे गोष्टींवर चर्चा करून सात तासात ती मैफल संपली. माझे स्टुडिओचे ७ तास वाचले.  दोन दिवस हे तालवाद्यांचं सत्र चाललं.

त्यानंतर विजुजी आले. १० च्या ऐवजी ११ वाजले यायला. बाहेरगावहुन आल्याचा थकवा चेहऱ्यावर दिसत होता, अंगात थोडा ताप आहे असंही ते म्हणाले ते. पण हातात बासरी घेतल्यावर कानाला जे सुख मिळालंय ते अवर्णनीय! प्रत्येक पीसमध्ये एवढा भाव भरलेला होता! परत आखडूपणा न करता स्वतः अजुन सुधारणा करीत होते. "higher octave मध्ये वाजवुन बघतो", "lower octave घे याचा", "याचा सेकंड पण घेतो lower मध्ये" असं म्हणून जे काही द्यायचे.......प्रत्येक प्रयत्न आधीच्या प्रयत्नापेक्षा सरस आणि त्यांना जे सुचत होतं ते आधीच्या प्रत्येक पायरीपेक्षा वरचढ. दिल खुश हुआ........

दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता परत रेकॉर्डिंग सुरु होणार होतं. मी पावणे दहालाच हजर होतो.१० ला ५ कमी असताना स्टुडिओच्या गेटपाशी एक रिक्षा थांबली. त्यातुन साठीच्या आसपास वय असलेले एक काका उतरले. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. त्यांनी रिक्षातुन एक उभ्या आकाराची बॅग काढली. आणि ते होते उमाशंकर शुक्ला. ती सतार पाहिल्यानंतर मला आठवलं, की गुलाम अलीसाहेबांच्या एका लाईव्ह शो ला मी गेलो होतो, तेव्हा बाजुला जे सतारवादक होते ते सतारवादक माझ्या गाण्यांसाठी सतार वाजवणार आहेत. आणि मी किती नशीबवान आहे याची जाणीव झाली मला.

संतुरवादन ही तर काही गाण्यांची गरज होती. त्याशिवाय गाणं पूर्णच झालं नसतं. आनंद म्हणाला आपण उल्हासजींना विचारु. त्यांचं मानधन आपल्या बजेटमध्ये बसणार असेल तर उत्तम. कारण VST किंवा साउंडफॉंट वापरुन वाजवलेल्या संतुरमध्ये मजा नाही. उल्हासजींना फोन लावला, त्यांचं मानधन आम्हाला झेपणार नव्हतं. त्यामुळे आम्ही मनाची तयारी करुन तो नाद सोडला होता. कारण सर्विस घ्यायची तर त्याचा मोबदला पण तेवढा गेला पाहिजे असं आमचं मत होतं. पण आधी नाही सांगुन त्यानंतर स्वतःहुन उल्हासजींचा फोन आला. "तुमच्याबरोबर मी कधीच काम केलेलं नाहीये, त्यामुळे मी वाजवीन संतुर". अगदी एस. डि. बर्मन, पंचमदांच्या काळापासुन म्हणजे कमीत कमी गेली ४० वर्षे जी व्यक्ती संतुर वाजवत्ये, आणि एवढ्या मोठ्या संगीतकारांसाठी ज्यांनी काम केलंय ते संतुरवादक ४ गाण्यांसाठी संतुर वाजवुन गेले. एकामागुन एक असे पिसेस देत होते. स्टुडिओ प्रसन्नतेने भारुन गेला होता. श्रावणातला वारा सुटावा, सगळीकडे हिरवंगार, प्रसन्न दिसावं असं काहीसं वाटत होतं. संतुरचा नाद कानात भिनत होता रात्री झोपल्यावर पण! उल्हास बापट दि ग्रेट!!!

ज्ञानेशदादांचं स्पॅनिश गिटार आणि ट्वेलस्ट्रिंग लाजवाब होतं. ज्ञानेशदादांना फक्त गाण्याची पट्टी सांगायची आणि गाणं ऐकवायचं, गाणं ऐकता ऐकता गाण्याचं बार टु बार नोटेशन काढतात. कसली तयारी असेल या माणसाची! ते खरोखर पट्टीचे वादक आहेत. टोनी वाझ म्हणून पंचमदांचे बेस गिटारवादक होते, उतारवयात त्यांना वृद्धाश्रमात राहायला लागले. त्यांची उतारवयात सगळी सेवा मनिष कुलकर्णीने वृद्धाश्रमात जाऊन केली. टोनीजींनंतर त्यांच बेस गिटार थेट मनिषदादाकडे. पंचमदांच्या गाण्यांमधलं बेस गिटार म्हणजे अतुलनीय. तीच नजाकत मनिषदादाच्या वादनात उतरलीये. गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय असलं होत नाही. मला नाही वाटत गुरुंची अशी सेवा हल्ली कोणी करत असेल.

या सगळ्यांना साथ मिळाली ती दिपक बोरगांवकरांच्या साईड ऱ्हिदमची. तुम्हाला कसला आवाज हवाय एवढं फक्त सांगा, स्टुडिओभर त्यांची वाद्य असतात, त्यातुन ते वेळेत नेमक वाद्य शोधुन काढतात. पक्ष्यांचा, झऱ्याचा, वाहत्या पाण्याचा, घंटांचा, घुंगरुंचा, पाण्यात पडणाऱ्या थेंबांचा.........तुमच्या अपेक्षा पूर्ण होणारंच!

धर्म हे वंश हे देश भाषा किती,
सर्व सीमा सहज सूर ओलांडिती

हे दाखवण्यासाठी आम्ही भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातली वाद्य वापरुन ताल आणि सूर जुळवुन वरील ओळींचा अर्थ प्रगट केला. अक्षरश: १-१ बारसाठी नवीन वाद्य वापरलंय. म्हणजे गाण्यात एक वाद्य अंदाजे ५ सेकंदांसाठीच. ही सगळी वाद्य ते एवढ्या कमी अवधीसाठी शोधुन, ट्युन करून, परत त्याच जागी बांधुन ठेवत होते. एखादा असता तर कावला असता, आणि आम्हाला शिव्या हासडल्या असत्या. पण त्यांचा काम करण्यात असलेला लगाव बिनतोड. आता हे गाणं इथे ऐका आणि कसं वाटलं ते सांगा.
ComScore

‘बरसत आल्या अमृतधारा’मध्ये तर त्यांनी वाजवलेले घुंगरु डोळे मिटुन ऐकले तर समोर कथ्थक नृत्याच्या steps पण दिसतात, एवढं ते जिवंत वाजवलंय. दिपककाका तुफान आहेत!

कंठसंगीताच्या रेकॉर्डिंगचा पहिलाच दिवस होता.  जो गायक समोर येऊन गाणार होता, ज्याच्या आवाजात माझ्या अल्बमचं पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होतं, त्या गायकाने जवळजवळ गेली ३५ वर्षे मराठी आणि हिंदी संगीतक्षेत्रात आपल्या मृदु, मुलायम आणि सुरेल आवाजाने स्वतःभोवती एक वलय निर्माण करुन अढळपदी स्थान मिळवलं होतं. आणि असा गायक आपलं गाणं गातोय, यासारखी अभिमानास्पद गोष्ट कोणती असली तरी या गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यांचं नाव श्री. सुरेश वाडकर! नावाप्रमाणे सुरेश....... एका दिवसात ४ गाणी रेकॉर्ड केली. एक गाणं समाधानकारक झालं नाही. तेव्हाच आणि वेळ नसल्यामुळे काही दिवसांनी रेकॉर्ड करू परत असंही सांगितलं आणि त्याप्रमाणे केलं. मी त्यांच्यापुढे एवढा छोटा असुनही मी सांगितलेल्या चुका मोठ्या मनाने सुधारत होते. कुठेही मी नवोदित संगीतकार आहे अस मला भासवु दिलं नाही. कोणा लहान माणसामुळे लहान होण्याच्या पलिकडे गेले आहेत ते.....

मंदारने तर मला सीडीची कल्पना डोक्यात आल्यापासूनच वेगवेगळ्या प्रकारे आणि वेळी मदत केली आहे. कितीही वरची पट्टी असली तरी त्याचा आवाज गोडच येतो. तो स्वतः उत्तम संगीतकार असल्यामुळे कवितेची जाण आहे त्याला. वैशाली तर विश्वगायिका शोभेल अशीच गायलीये. तिच्यातला सर्वात चांगला गुण असा कि तिला तिची चुक समजते आणि ती लगेच सुधारते. मोठं होण्याचं लक्षण आहे हे. श्रीरंग तर फारच सुरेख गायला आहे. त्याचा आवाजही गाण्याला साजेसा, कॉलेजमधल्या मुलासारखा आल्यामुळे ते गाणं एकदम तरुण झालंय.

हे सगळं एकत्र बांधण्यात मला सर्वात जास्त मदत केली आनंदनी. त्याच्या संयोजनाने गाण्यांचं सोनंच नाही, तर गाणी सोन्याहुन पिवळी झालीत. Hats off to his sincerity, commitment, devotion, creativity and aesthetic sense. त्याच्या कामाची पद्धत बघुनच हा ‘लंबे रेसका घोडा’ असल्याची मला खात्री पटली.

सगळे गायक, वादक, रेकॉर्डिस्ट यांनी आपापली कामे चोख केली आहेत. आता पाळी श्रोत्यांची. उत्तम दर्जा राखण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते ते सगळं आम्ही आमच्यापरीनी केलं. सर्व गायकांनी, वादकांनी गाण्यांचं नुसतं सोनंच केलं नाही, तर गाणी सोन्याहुन पिवळी केली आहेत. ‘टेक’ म्हणून ते जे काही देतात ते घ्यावं तेवढं कमीच! त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी तरी ‘आता उजाडेल’ हा अल्बम सर्वांनी विकत घ्यावा हि माझी सुज्ञांकडुन किमान अपेक्षा आहे. आपणा सर्वांसाठी १०० रुपये जड नाहीत. ४० रुपयांमध्ये १५० गाणी आणि १०० रुपयांमध्ये दहाच गाणी? असा विचार कृपया कोणीही करु नये. ही दहा गाणी समोर येण्यासाठी खुप मेहनत, लगाव आणि कामावरची निष्ठा असायला लागते, ती ४० रुपयांमध्ये १५० तयार गाण्यांची सीडी बनवुन धंदा करणाऱ्यांना नाही समजणार. आपण सुज्ञं रसिक आहात, त्यामुळे पायरसी करणाऱ्यांमध्ये तुम्ही सहभागी होणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे.
गाणी ऐका, गाणी विकत घ्या आणि तुमचा जो काही खराखुरा अभिप्राय असेल तो मला नक्की कळवा...धन्यवाद.
(माझ्याच ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

गुलमोहर: