चलच्चित्रपटांमध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्सचा अतिरेकी वापर होतोय का ?

Submitted by Kiran.. on 16 November, 2011 - 13:48

कॉम्प्युटर ग्राफिक्सचा थक्क करणारा पहिला ठळक अनुभव घेतला तो स्टीव्हन स्पीलबर्गच्या जुरासिक पार्कमधे. त्याआधीही अनुभव घेतलाच असेल पण एक तर ते लक्षात राहण्यासारखे नव्हते किंवा हास्यास्पद तरी असावेत. जुरासिक पार्कनंतर ग्राफिक्सचा वापर सिनेमात मोठ्या प्रमाणात वाढत राहीला. डायनोसोर सारखे महाकाय पण अस्तित्वात नसलेले प्राणी पडद्यावर अवतीर्ण होऊ लागले. अ‍ॅनाकोंडा सारख्या अजगरांचं भय दाखवून झालं तर पूर्वी धुमाकूळ घालून गेलेले किंग काँग आणि गॉडझिला सारखे दैत्य पुन्हा एकदा न्यू इम्रोव्हाईज्ड रूपात डेरेदाखल झाले.

द मास्कचा उल्लेख टाळून इथं चालणारच नाही. थ्रीडी टूल्सचा अतिशय प्रभावी वापर केलेला हा एक अप्रतिम विनोदी सिनेमा होता. मुळात हे सिनेमे चांगले होतेच आणि स्पेशल इफेक्ट्ससाठी वापरलेल्या संगणकीय करामतींचा दर्जा अत्युच्च होता. ग्राफिक्स हे एक टूल झालं. पण त्यातली क्रिएटिव्हिटी महत्वाची. अ‍ॅनिमेटेड दृश्य देणा-या कलाकाराची कल्पनाशक्ती प्रेक्षकांच्या कल्पनाविश्वाशी रिलेट होणं अत्यंत महत्वाचं. पूर्वी बाबूभाई मिस्त्रीने दिलेले स्पेशल इफेक्टस आज बाळबोध वाटले तरी त्याकाळी त्या करामतींनी थक्क व्हायला होत असणार. पडद्यावर हनुमान उडताना पाहून बायाबाप्पे आश्चर्याने तोंडात बोट घालत असत.

पडद्यावर दृश्य कसं दिसतं हे महत्वाचं. त्यासाठी टूल्स कुठले वापरले ही दुय्यम बाब आहे. नेमकी ही बाब आजकाल नजरेआड होतेय कि काय अशी शंका यावी असं वातावरण आहे. जुरासिक पार्क हा फक्त संगणकीय करामतींनी चालला का ? मला वाटतं त्या सिनेमाची थीम, स्क्रीप्ट हे मेजर प्लेयर्स होते. ग्राफिक्सने त्यावर कळस चढवला. अ‍ॅनाकोंडा पाहताना कुठेतरी निव्वळ जुरासिक पार्कचं यश कॅश करण्यच्या इराद्याने बनवलेला सिनेमा असंच वाटत राहतं. गॉडझिला आणि द लॉस्ट वर्ल्डमधे काही फरक आहे असं कधी वाटलंच नाही.

मॅट्रिक्स या सिनेमामुळं अ‍ॅक्शनदृश्यामधे ग्राफिक्सच्या वापराचा बोलबाला झाला. क्राऊचिंग टायगर हिडन ड्रॅगन या सिनेमाने तर जिकडे तिकडे अ‍ॅक्शन दृश्याचीच चर्चा करायला लावली. या दोन्हीचा अ‍ॅक्शन दिग्दर्शक एकच गडी होता. बॉलिवूडमधेही मग त्याला बोलावणं येऊ लागलं आणि अ‍ॅक्शन दृश्यातली ग्राफिक्सची गाडी इतकी भरधाव सुटली कि ते अनिवार्य होऊन बसलं. पण आता ती दृश्यं इतकी तोंडपाठ झालीत कि वीट येतो. स्लो मोशनमधे सुटलेली गोळी आणि मागच्या बाजूला ९० अंशात वाकत हिरोने तिची केलेली फसवणूक किंवा एकाच वेळी हिरोला पंधरा जणांनी घेरलेले असता एकाच वेळी सर्वांनी आकाशात केलेले उड्डाण आणि स्लो मोशन मधे हिरोच्या दिसलेल्या वेगवान हालचाली आणि छोट्याश्या पॉजनंतर धडाधड कोसळणारे गुंड या दृश्यांनी डोळे झिजायला लागलेत.

कसलंच नावीन्य नाही या दृश्यांत. काही वेळा तर ग्राफीक्सचा वापर हास्यास्पद वाट्तो. भूत मालिकांमधे प्रकाशाचा झोत निघणे, रंगीबेरंगी प्रकाशशलाका नाचणे हे तर समजण्यापलिकडे आहे. त्यात घाबरण्यासारखे काहीच नसते. ज्या अ‍ॅनिमेशन कंपनीला तो सीन करायल दिलाय त्यांनी गळ्यात मारलेला असावा असं वाटतं. नाहीतर मग डोळे पांढरे दाखवणे किंवा किळसवाणे इफेक्टस वापरणे यामुळं हॉरर मालिका हल्ली कॉमेडी मालिका व्हायला लागल्यात. भूतपट निर्माण करणं तसंही अवघडच काम आहे. प्रत्येकाची भूताची किंवा भीतीची कल्पना वेगळी असते. जास्तीत जास्त लोकांना एकाच वेळी भीती वाटेल अशा दृश्यांची कल्पना करणं हे आधी जमायला हवं. पुढं त्या कल्पनेप्रमाणे सादरीकरण हा भाग ग्राफीक्सचा असू शकतो. पण मुळातच कल्पनाशक्तीची बोंब असल्यावर निव्वळ अ‍ॅनिमेशन कंपनीवर विसंबून कसं चालेल ?

जी गोष्ट अ‍ॅक्शन्सची तीच गाण्यांची. कोई मिल गया मधे जमिनीला समांतर होत हृतिक ने केलेलं नृत्य एकदा भावलं, पुन्हा तेच दृश्य लक्ष मधे "दाखवायची" काय गरज होती ? दिल चाहता है मधल्या एका गाण्यात ग्राफीक्सचा वापर करताना बॅकग्राऊंडसचे रंग बदलणे किंवा हवेत मासे उडताना दिसणं हे काहींना पटलं काहींना नाही. आधीच गाणी एमटीव्ही स्टाईल होत असताना त्यात ही नवी भर पडतेय कि काय अशी भीती वाटते. राज कपूर नर्गिसच्या एका गाण्यात हम ना रहेंगे , तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानिया या ओळींनंतर पावसात भिजत जाणारी तीन लहान मुलं बघताना ते गाणं एन्जॉय करता आलंच कि... राजच्या ड्रीम सिक्वेन्समधली गाणी कुठल्याही संगणकीय करामतींविना आजही बघणेबल नाहीत का ? संजय लीला भन्साळीने देवदास मधलं मोरे पिया हे गाणं चित्रीत करताना दाखवलेला रोमान्स कुठल्याही स्पेशल इफेक्टविनाही परिणामकारक वाटत नाही का ?

ममी टू हा सिनेमा चालला असला तरी त्यातले काही स्पेशल इफेक्टस अजिबातच भावले नाहीत. विशेषतः हेलिकॉप्टर येत असताना वरून पडणा-या धबधब्याच्या पाण्याने मुखवट्याचे आकार धारण करणे हा सीन खूपच कृत्रिम "दिसला".

याउलट हॅरी पॉटर किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधले स्पे इफेक्टस कुठंही खटकले नाहीत. कथेच्या ओघात ते येत राहतात आणि जाणवतही नाहीत. आपण त्यात गुंगून जातो. काँप्युटर ग्राफीक्सचा वापर करताना या गोष्टी महत्वाच्या असाव्यात असं म्हणावंस वाटतं...

अर्थात हे माझ्या चष्म्यातून मांडलंय... पटेलच असं नाही .. कि पटतंय ??

गुलमोहर: 

चलच्चित्रपटांमध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्सचा अतिरेकी वापर होतोय का ?
हो. खरे आहे.
मी तर माझ्या मुलाला सांगतो की पडद्यावर जे दिसतं ते सगळं कॉम्पुटरवर केलंय.

मुद्दा नक्कीच मान्य होण्यासारखा आहे. "मेट्रिक्स" चालला तो फक्त ग्राफिक इफेक्ट्समुळे नव्हे, त्यातल्या संकल्पनेमुळे. हिंदी चित्रपटात हटकून मेट्रीक्स-टाईप मारामार्‍या दाखवल्या जातात, लगेच आठवलेलं उदाहरण 'मै हू ना'!बिन्डोक नक्कल कशी करावी याचंही उत्तम उदाहरण म्हणून या चित्रपटाकडे बोट दाखवता येईल.
'ममी' चित्रपटाचं उदाहरण फारसं पटलं नाही कारण एकूण ते चित्रपटच एवढे टुकार (किंवा विनोदी) आहेत की त्यात या ठिगळांनी काय फरक पडणार आहे? अर्थात हीच गत 'मै हू ना'चीही आहे, पण "मेट्रिक्स"चे असे देशी अवतार पाहून वैताग येतो खरा!

तंत्रज्ञान(कॉम्प ग्राफिक्स/ अ‍ॅनिमेशन पासून इतर सगळ्याच प्रकारचं) जसंजसं उपलब्ध होतं तसं तसं ते वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. चित्रपट हे माध्यमच मुळात तंत्रावर (technology)अवलंबून आहे (कॅमेर्‍याच्या लेन्समधून आणि मग प्रोजेक्टरमधून तुमच्यापर्यंत पोचते). तेव्हा कमी की जास्त वापर कसा ठरवणार?
प्रेक्षक म्हणून आवडलं/ नाही आवडलं, अनाठायी वाटलं/ नाही वाटलं हे म्हणता येतेच. म्हणावेच. पण निर्माता-दिग्दर्शकाला वाटले वापरावेसे तर त्याला थोडीच बंधनं घालता येणार.

बाकी संगणकापूर्वी आणि कृष्णधवलच्या जमान्यात चित्रीकरणात करामती(गिमिक्स याअर्थी) नव्हत्या असे नाही. ते असोच.. Happy

शाळेत माझ्या लहानपणी 'यंत्र; शाप की वरदान', 'टिव्ही; शाप की वरदान' असे निबंध लिहायला असत किंवा वक्तृत्व स्पर्धांमधे हटकून हे विषय बोलायला असत. नंतर बहुतेक 'संगणक; शा की व' असे विषय असतील.
सगळ्यांचा शेवट साधारण 'तस्मात यंत्र हे वरदानच आहे पण आपण चुकीचे वापरल्यास त्याचा शाप होऊ शकतो आणि माणसाने यांत्रिक होऊ नये' असा काहीसा करायला शिकवलेला असायचा.

माफ करा पण हा धागा 'शा की व' विषयांना समांतर वाटतोय. Happy

>>यामुळं हॉरर मालिका हल्ली कॉमेडी मालिका व्हायला लागल्यात. <<
अगदी खर आहे हे.
नॅशनल जियोग्राफी चॅनल वर लागणारी air crash investigation ह्या मालिकेत दाखवले जाणारे विमान अपघाताचे स्पेशल इफेक्टस तर अप्रतिम असतात.

Air Crash Investigation Deadly Crossroads (Mid-Air Collision)

हो किरण, पुर्वी ते कसे करायचे हे माहित नसायचे. पण मेकिंग ऑफ टायटॅनिक / ग्लॅडिएटर वगैरे बघून आता कशावर विश्वासच ठेवता येत नाही.
टिव्हीवरचे रामायण / महाभारत त्या काळात प्रभावी वाटले, आता ते दिवाळीतले फटाके वाटतात.

आता तंत्रज्ञ लोकांना कौशल्य पणाला लावावेच लागेल.
त्या नजरेने बघताना मला, लिमिटलेस हा ताजा चित्रपट खूप आवडला.

आणि त्याला भराभर शब्द सूचले.. अश्या अर्थाचे कथेमधले जे वाक्य असेल, त्याचे चित्रपटातले दृष्यरुप खरेच अनोखे आहे.

किरण, सहमत. अ‍ॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स हे पूरक हवेत. त्यांनीच चित्रपटाचा ताबा घेतला की करमणुकीचा चुथडा झालाच समजा.

मस्त लेख. अनेक मुद्दे पटले.

चांगला दिग्दर्शक तंत्राचा वापर चांगल्या प्रकारे करून घेतो, असे म्हणता येईल. 'मै हू ना' बद्दल प्लस वन. एकूणच शाहरुखच्या सिनेमांमधे मला 'तंत्राचा सोस' जास्त जाणवतो. (त्याने केले, मग मी का नको? )
(शारुक फ्यान क्लब- क्षमस्व.)

संजय लीला भन्साळीने देवदास मधलं मोरे पिया हे गाणं चित्रीत करताना दाखवलेला रोमान्स..

'बैरी पिया' म्हणायचे आहे बहुधा. Happy

अच्छा बैरी पिया Happy ( म्हातारा झालो बहुतेक.. रोमान्स चुकतोय ! )

मला मै हू ना मधलाच बिनडोक वापर अपेक्षित होता.

नीधप
तुम्हाला मुद्दा लक्षात नाही आलेला. रजनीकांतचा रोबो(ट) किंवा अर्नोल्डचा टर्मिनेटर टू हे ग्राफीक्सच्या वापरातले मैलाचे दगड आहेत. यात तंत्र अत्यावश्यक आहे आणि बुद्धीला ते पटतेही. समोरच्या करामती करणारं पात्र हे मशीन आहे हे एकदा बुद्धीला पटलं कि सगळंच भावतं. पण केवळ तंत्रज्ञानाचा वापर म्हणून मॅट्रिक्स सारख्या अशक्यप्राय करामती पुन्हापुन्हा दाखवण्यात बिबडोकपणा आहे आणि तो आपल्या माथी मारला जातोय हे या माध्यमातल्या लोकांनी लवकर ओळखावे.

याचीच दुसरी बाजू म्हणजे एकदा रोबोट ने हिंदी चित्रपटसृष्टीसाठी स्पेशल इफेक्टसचे स्टँडर्ड्स ठरवल्यानंतर शाहरूखला त्याचा रा-वन पुन्हा शूट करावा लागला आणि तरीही रोबोटशी स्पर्धा न करता आल्याने दणकून आपटला देखील. एकदा रोबोटमधे त्या करामती पाहून झाल्यावर प्रेक्षक रावन मधे आणखी नावीन्य काय पाहणार हा ही प्रश्नच आहे कि... तेव्हा ग्राफीक्स हे टूल वापरण्याआधी काय दाखवायचंय ही कल्पना मेंदूच्या पटलावर आधी दिग्दर्शकाला पाहता आली पाहीजे.. !

नाविन्यपूर्ण ग्राफिक्स मला श्यामलन च्या, द लास्ट एअरबेंडर (किंवा तसेच काहितरी नाव) मधे पण दिसले. हॉलो मॅन मधल्या करामती छान होत्या, पण त्याच्या सिक्वेलमधल्या नव्हत्या.

केवळ तांत्रिक करामतीमुळे सिनेमा चांगला होतो या भ्रमाचे सर्वात उत्तम उदा. 'मॅट्रिक्स ट्रिलॉजी'.त्याच्या भाग २ आणि ३ मधे, पहिल्या भागातली वैचारिक खोली जाउन नुसता तांत्रिक उथळपणा वाढला, इफेक्ट्स फॉर द सेक ऑफ इट.

दिनेशदा
तुम्ही उल्लेख केलेले सिनेमे पहावेच लागतील. तुमची आवड जबरदस्तच आहे..
@ आगावा - ट्रिऑलॉजी विसरलोच होतो. बरी आठवण केलीस.

वेताळा - एनजी चे इफेक्टस हा एक वेगळाच विषय आहे. मुळात ते माहीतीपर चॅनेल असल्याने त्यांना गरजेचंच आहे ते. पण त्या लिंकबद्दल आभार..

झक्की काका - ते उपोषण म्हणजेच स्पेशल इफेक्ट आहे असं बोल्ल जातंय Proud

लेखाशी सहमत आहे. हिन्दीत विशेषत: उगाचच वापरल्यासारखी वाटतात. हीरोने साईडव्हिलना फाईट मारली, तो खाली पडला एवढे सहज हल्ली चालत नाही - तो हवेत गरागरा फिरतो, सिंघम मधल्यासारखा जमिनीवरून रिबाउंड होउन परत आकाशात जातो Happy

हॉलीवूडमधेही सायफाय मधे फारच झाले आहे. अ‍ॅनाकॉण्डा मधला अजगर ग्राफिक्सवाला आहे हे लगेच कळते.

जुरासिक पार्कमधे सर्व अ‍ॅनिमेशन नव्हते. बर्‍याच वेळेस टी रेक्सचे फक्त डोके बनवून खराच शॉट घेतलेला आहे (तो त्या मुलांना शोधत कार उलतीपालटी करतो तो). त्यामुळे ते खूप खरे वाटतात. दुसरे म्हणजे स्पीलबर्गने डीटेल्सकडे खूप लक्ष दिले होते. टी रेक्स जेवढा उंच दाखवायचा आहे त्या उंचीला "मार्क" करून सीनमधे टी रेक्स कडे बघणार्‍या लोकांना त्याच उंचीवर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे बघायला लावत.

मला स्वतःला जुरासिक पार्क -२ (लॉस्ट वर्ल्ड) सुद्धा प्रचंड आवडला.

झक्की काका - ते उपोषण म्हणजेच स्पेशल इफेक्ट आहे असं बोल्ल जातंय

मग तर फारच बरे, जशास तसे!

आजकाल जिकडे तिकडे तंत्रज्ञान.

मोबाइल फोनमधे आंतर्जाल, कॅमेरा, व्हिडियो, इतकेच काय आता क्रेडिट कार्डपण. रोजनिशी, कॅल्क्युलेटर, रेकॉर्डिंग सग्गळे सग्गळे एक मोबाइल फोनमधे. अहो सिनेमेसुद्धा बघता येतात मोबाइलवरच! गाणी तर ऐकता येतातच, खेळहि खेळता येतात. आमच्या एका जाणत्या मित्राच्या मते, थोडा बदल करून मायक्रोवेव्ह सारखा पदार्थ गरम करायलाहि तोच मोबाइल वापरता येईल. मग पंखा, एसी फारसे दूर नाही.

मला स्वतःला अजून मोबाइलवर फोन आला तर तो कसा घ्यायचा, कुणाला कॉल करायचे तरी गोंधळ होतो.

खरे तर सिनेमा पहात असतानाच पडद्यावरून खरा बटाटेवडा, चटणी नि पिण्याच्या पाण्यासकट मिळेल अशी सोय करायला पाहिजे. म्हणजे मग सिनेमा कुठला बघायचा? इडली डोसा वाला की बटाटेवडा वाला, की तंदूरी चिकन वाला असे प्रश्न पडतील. नि त्यावरूनच सिनेमा कुठला चांगला नि कुठला वाइट हे ठरेल. ते तंत्रज्ञान जास्त उपयोगी. डायनासोरस, जळणारी बिल्डींग या गोष्टी कितीतरी जुन्या झाल्या.

मा.ने.कि. तुम्ही लेखात चक्क "अवतार" वर भाष्य केलेले नाहीये. अहो कित्येक लोक वेडेपिसे झाले होते तो सिनेमा आणि त्यात वापरलेले तंत्रज्ञान बघून. Happy

सुनिधी + १
रुनी + १ Happy

मला 'ममी रिटर्न्स (हाच ममी-२ ना?) आवडला होता. तो थ्री-डी चांगला झाला असता असं वाटतं.

आता MI-4 ची वाट बघायची..

रूनी

अवतार बरोबर रिटर्न ओफ द जेद्दा , स्टार ट्रेक, स्टार वॉर्सचे तीनही भाग यांच्यासहीत अनेक सिनेमांचे उल्लेख राहून गेलेत. सर्वांचा उल्लेख शक्यच नाही. मूळ मुद्दा आहे तो गरज नसताना किंवा बिनडोकपणे केलेला ग्राफिक्सचा वापर... केवळ हाताशी तंत्र आहे म्हणून बुद्धीला न पटणारे सीन्स प्रेक्षकांच्या माथी मारण्याची प्रवृत्ती.

अवतारच्या संकल्पनेत्च तंत्राचा वापर अत्यावश्यक असल्याने ते स्पेशल इफेक्ट्स उपरे वाटत नाहीत. इथं आपण दिग्दर्शकाने कल्पिलेले जग पाहत असतो. त्या एका ग्रहावरची जीवसृष्टी त्याने आधी पाहीली आणि आपल्याला दाखवली. यासाठी तंत्राचा जो उपयोग केला गेला तो अप्रतिम आहे. मला स्वतःला त्यातले चतुष्पाद प्राणी यांत्रिक खेळण्यासारखे वाटले. त्यांच्या आकारात आणखी सुधारणा हवी होती असे वाटले. पण हा कदाचित कल्पनाविश्वातला फरक असू शकतो. कदाचित असं मत हे दिगदर्शकावर अन्याय करणारंही ठरेल. ते महत्वाचं नाहीच. इथं दिग्दर्शकाचं कल्पनाविश्वच अंतिम असणार !! असो.

गरज नसतांना केला गेलेला कुठल्याही गोष्टीचा मारा हा लेखाचा विषय असेल तर ह्यात बरेच काही येवू शकेल ना म्हणजे नुसते तंत्रज्ञान नाही तर चित्रपटातील बाकीचेही बरेचसे घटक. जसे गरज नसतांना सिनेमात घुसडलेली गाणी, प्रसंग, पात्र, अवाढव्य सेट किंवा अजून काही.
एकंदरीत मार्केट बघितले तर (जाहिरातींचा मारा करून) आधी गरज निर्माण केली जाते आणि मग ते प्रॉडक्ट आपल्याला विकले जाते आणि आपल्याला ते गरजेच आहे असे वाटायला लागते.
तसेच ह्या तंत्रज्ञान वापरलेल्या चित्रपटांचे पण आहे. मुद्दाम हे स्पेशल इफेक्ट जावून बघणारा वर्ग आहेच तेव्हा त्यांच्यासाठी असे सिनेमे निघणारच. शिवाय एकाने केलेले काही यशस्वी झाले तो फॉर्मुला लोक वापरणारच.

जसे गरज नसतांना सिनेमात घुसडलेली गाणी, प्रसंग, पात्र, अवाढव्य सेट किंवा अजून काही...

मला वाटतं यावर प्राचीन काळापासून वादविवाद चालू आहेत. शिवाय इथं तो लेखाचा विषयही नाही. तरीही मुद्दा आणखी स्पष्ट करण्यासाठी म्हणून त्याबाबत असं म्हणता येईल कि तुम्हाला संगीत सिनेमात हवं असेल तर ते कसं असावं आणि त्याचा वापर सिनेमात कसा करायला हवा हे नक्की असेल तर प्रेक्षक ते खपवून घेतात. राजकपूरचं नाव यासाठी पुन्हा घेईन कारन त्याला संगीतकाराकडून हवं ते काढून घ्यायची कला अवगत होती. निव्वळ संगीतकारावर आणि कोरिओग्राफरवर अवलंबून राहील्याने दिग्दर्शकाला जे हवं ते न दाखवता पॅच वर्क दिसेल.

साधारण हाच मुद्दा ग्राफिक्सला लागू होईल. मला स्वतःला माझं प्रॉडक्ट विकण्यासाठी अ‍ॅनिमेशन आणि सॉलीड मॉडेलिंग करून घ्यावं लागतं. त्यामुळं या तंत्रामधे काय शक्य आहे त्याची साधारण कल्पना आहे. माझ्या केस मधे सृजनशीलतेला फारसा वाव नाही. पण याच तंत्रज्ञांकडून जेव्हा सिनेमासारख्या माध्यमासाठी काम करवून घ्यायचं असेल तेव्हा दिग्दर्शकाला पडद्यावर काय दिसायला हवं हे क्लिअर हवं. महत्वाचं म्हणजे ते त्याला या तंत्रज्ञांकडून काढून घेता यायला हवं. अर्थात सिनेमासाठी ग्राफीक्स देणारे तंत्रज्ञ वेगळे असतात. तरीही निव्वळ त्यांच्यावर अवलंबून राहील्याने त्या दृश्यात एक उपरेपण येतं. यासाठी ममीचं उदाहरण दिलं होतं.

दुसरा महत्वाचा मुद्दा गरज नसतानाचा.. मै हूं ना मधे शाहरूख जे काही करतो ते अजिबात शक्य नाही हे आपल्याला माहीत असतं. समोरचं दृश्य हे निव्वळ तांत्रिक करामत आहे हे जाणवत राहतं आणि ते अपील होत नाही. उदा. ७० च्या दशकातले हिरो खालून वर उलटी उडी मारायचे हे दृश्य जितकं हास्यास्पद आहे तितकंच मागच्या बाजूला ९० अंशात झुकण्याचं दृश्यही. केवळ ग्राफीक्सद्वारे शक्य आहे म्हणून काहीही दाखवावं का हा मुद्दा इथं उपस्थित करावासा वाटतो. याउलट रोबो मधले अतर्क्य सीन्स देखील संगणकीय करामत असूनही सिनेमाच्या थीममधे त्याची शक्यता आधीच स्पष्ट केलेली असल्याने आपण ते सहज स्विकारतो. एक वेगवान रोबो याप्रकारच्या करामती करू शकतो हे आपलं आणि दिग्दर्शकामधलं एमओयू सिनेमा सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच झालेलं असतं.

गरज नसताना म्हणजे हा भाग इथं अपेक्षित आहे.

तिसरा भाग तांत्रिक सफाईचा. तो स्पष्ट झालेला असावा असं वाटतं. स्पेशल इफेक्ट्ससाठी सिनेमा पाहीला जातो हे मलाही मान्य आहे.. पण हिरा योग्य त्या कोंदणात बसवलेला असावा ही त्यांचीही अपेक्षा असतेच.

चित्रपट हे माध्यमच मुळात तंत्रावर (technology)अवलंबून आहे >> अगदी पटले.

कॅमेर्‍याच्या तंत्राव्यतिरीक्त इतर तंत्रे मात्र अत्यावश्यक नसतात. एका गोष्टीचे बीज आणि ते खुलवण्याचे दिग्दर्शकाचे कसब यावर चित्रपटाचा दर्जा ठरतो.

अतिशय सुंदर अ‍ॅनिमेशनपट (ज्यात निव्वळ संगणकीय अ‍ॅनिमेशनच वापरलय) पाहताना पण त्यावरची दिग्दर्शकाची पकड जाणवतच रहाते. बग्स लाईफ, टॉय स्टोरी सारख्या चित्रपटात तंत्र महान आहे पण दिग्दर्शकाने त्यातल्या व्यक्तिरेखा इतक्या ठसठशीत केल्या आहेत की तंत्राचे कौतुक करता करता आपण त्या व्यक्तिरेखात पण गुंतत जातो. आणि म्हणूनच चित्रपट आवडतो.

नुसते तंत्र-प्रदर्शन करायचे तर अमेरीकेतल्या Universal / MGM Studio सारख्या ठिकाणी दाखवल्या जाणार्‍या अर्ध्या तासाच्या तांत्रीक खेळासारखा खेळ करता येईल पण त्याला चित्रपट म्हणता येईल का?

पण तरीही चित्रपटात तंत्र हे आवश्यकच आहे. नाटक आणि सिनेमा यात फारकत करणार्‍या अनेक गोष्टींपैकी तंत्र हे मुख्य आहे. अमूर्त कल्पना तंत्राने मूर्त स्वरुपात आणता येतात पण त्या तशा आणाव्यात का? माबोवरचा हॅरी पॉटरवरचा बाफ वाचताना जाणवते की जे तंत्राने दाखवले आहे ते पुस्तकाने उभ्या केलेल्या काल्पनीक-सृष्टीपेक्षा कमी दर्जाचे होते म्हणून अनेकांना पुस्तकेच जास्त आवडली.

काल्पनिकेत तंत्र कसे वापरावे याचे मला आवडलेले सुंदर उदाहरण म्हणजे टर्मिनेटरमधले वितळलेल्या धातूमधून टर्मिनेटर पुन्हा बनत जातो ते दृष्य. तो अमर आहे हे जणवते त्यातून.

माधव

अगदी अगदी. नेमकं लिहीलत. शेवटी हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे. आपन ज्याला रूढ अर्थाने सिनेमा म्हणतो ती दिग्दर्शकाने सांगितलेली ( दाखवलेली ) गोष्ट असते. ती गोष्ट सांगण्याची कला ज्याची त्याची वेगळी.. म्हणूनच त्यात येणारे इअतर अनेक घटक त्या शैलीशी सुसंगत असणे गरजेचे असं म्हणता येईल..

गरज नसतांना केला गेलेला कुठल्याही गोष्टीचा मारा हा लेखाचा विषय असेल तर ह्यात बरेच काही येवू शकेल ना
सहमत