न भेटून भेटणारा माबो आय डी - .... झक्की एक नक्की

Submitted by बेफ़िकीर on 11 November, 2011 - 07:07

ते एकटेच असतात. खूप विचार करतात. चहा करून झाल्यावर कपमध्ये गाळताना चहाचा गाळ गाळण्यात राहतो आणि चहा कपमध्ये येतो. आपल्याला चहाच हवा असतो. त्यांनाही चहाच हवा असतो. पण आयुष्याची दुपार संपताना किंवा तिन्हीसांजेचा काहीसा सुखद पण तरीही बोचराच वाटणारा गारवा प्रवेशताना जाणवत राहते की गाळ महत्वाचा होता. आपण चहा पीत बसलो. चहाचा आनंद मिळालाच. नाही असे नाही. पण गाळ महत्वाचा होता. ती सर्व माणसे, तो जमाना, ते संस्कार, त्या रुढी, त्या प्रथा, सणवार, कौटुंबिक सुखे दु:खे, आपुलकी, सध्या चौकोनी असलेल्या मनाला त्यावेळेस असलेला वर्तुळाकार आकार, साधी साधी स्वप्ने बरेच काही! सगळा गाळ फेकून दिला आपण!

ते एकटेच नसतात. त्यांच्या कुटुंबात, शेजारीपाजारी, मित्रवर्तुळात, आंतरजालावर, नातेवाईकात, केलेल्या किंवा करत असलेल्या कामाच्या ठिकाणी, भारतात, सगळीकडे खूप माणसे असतात. ती सगळी माणसे त्यांच्यापुरती त्यांची कोणीतरी असतात किंवा नसतात. ते एकटे कधीच नसतात. 'व्ही' आकारात फिरणार्‍या पारव्यांच्या थव्यातील एकही पारवा एकटा नसतो. तो त्या समाजाचा भाग असतो. तोही तेच दाणे खातो जे त्याचे बांधव खातात.

थव्यातील एक पारवा स्थलांतरही करतो.

स्थलांतराच्या वेळेस आज खूप वर्षे लोटलेली असतात.

पंखांची ताकद कमी होत असली तरी मनाचा उत्साह दशगुणीत होऊ शकतो. कारण स्थलांतराने दिलेले एक प्रकारचे स्थैर्य!

मग हळूच एकांतात मागे वळून पाहताना आठवतात त्या आकाशातील ते व्ही आकार! आपल्या मागे काही आणि पुढे काही पारवे! अन्नाच्या शोधार्थ होत असलेली उड्डाणे! वळचणीला थांबणे! घरटी बांधणे! पिल्लांना खाऊ देणे! किराणा मालवाल्याने किंवा एखाद्या पेन्शनरने टाकलेले दाणे फस्त करणे! त्यांची रोज वाट पाहणे!

मग डोळ्यात येतो एक अश्रू! मग वाटते एकदा ते आकाश पुन्हा पाहून यावे.

आता स्थलांतर करून जेथे गेलेला असतो तेथे अचानक परकेपण जाणवू लागते, जे इतक्या वर्षांच्या धांदलीत जाणवायचे चुकून राहूनच गेलेले असते. मी इथला नाही ही भावना मनाला व्यापून मग कृतीत येऊ लागते. स्थलांतर केल्यावर झालेली पिल्ले आणि सोबतीचे पारवे मन येथेच गुंतवायला लावण्याचे प्रयत्न करतात पण हारतात.

मग स्थलांतरित पारवा त्यांना स्थलांतर करून गेलेल्या ठिकाणचे तोटे सांगू लागतो. मूळ आकाश किती सुंदर असते ते पटवू लागतो.

मग सर्वानुमते ठरते की एकदा तरी मूळ आकाश पाहायला याला जाऊ देऊयात!

मग हा पारवा मनात लक्षावधी आशा अपेक्षा घेऊन एक भरारी घेतो. कसे कोणास ठाऊक, पण याही जागेचे आपल्याला इतके प्रेम आहे हे त्याला त्याच क्षणी जाणवते. भरारी घेऊन खालून हात करणार्‍यांना पाहताना डोळ्यात टच्चकन पाणी येते.

पण ते पाणी ओसरायला असा कितीसा वेळ लागणार? मग आठवतात फोनवर केलेले लक्षावधी संवाद, आपल्या मूळ जगातील लोकांशी! त्यांनी अनेकदा केलेली आमंत्रणे! आपण लांब गेल्यामुळे त्यांना झालेले दु:ख त्यांनी व्यक्त करणे! सातत्याने इकडे बोलावणे! मग वाटते, ह्यॅट स्साला! काय जिंदगी जगलो आपण!

इकडे कशाला आलो होतो आपण? किती महत्व आहे आपल्याला अजून आपल्या जुन्या आकाशात!

अजून सूर्य उगवताना वळचणीतून पारवे भरारी घेत असतील. पिल्ले वडिलांची वाट पाहात असतील्. आया दिवस दिवस दाणे शोधून पिल्लांच्या चोचीत घालत असतील. व्ही आकारात एका नेत्यामागे सगळे उडत असतील. वार्‍याच्या सुगंधी थंडगार झुळुकी आणि टाक्यांवरचे पाणी! किराणा मालवाल्याने टाकलेले दाणे आणि पेन्शनर आजोबांचे 'आ आ'!

ये दौलत भी लेलो ये शोहरतभी लेलो
भले छीनलो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटादो बचपनका सावन
वो कागझकी कश्ती वो बारिश का पानी

३६ तासांनी आपण आपल्या त्या जुन्या आकाशात पहिल्यांदा दिसू! तेव्हा किराणा मालवाला आनंदाने बाहेर येऊन हासत हासत खूप दाणे टाकेल. पेन्शनर आजोबा असतील त्या परिस्थितीत रस्त्यावर येऊन हाक देतील.

आणि आपले व्ही आकारातले पारवे?? कोणी आजोबा झाला असेल, कोणी पणजोबा! कोणी आजी! कोणी नातू! कोणी नवा मित्र असेल तर एखादी नवीन वळचणही! आपण आकाशात प्रथमच दिसू तेव्हा अक्षरशः नाचू लागतील. तोच व्ही आकार करून वायूवेगाने भरार्‍या घेऊ लागतील. आपले स्वागत अभूतपूर्व होईल. आपले मन भरून येईल.

३६ तासांनी दमून भागून पण उत्साहाच्या शिखरावर जाऊन पारवा त्या जुन्या आकाशात पहिली भरारी घेतो तेव्हा...

आकाश तर तेच असते. पण खाली सगळे बदललेले असते. मोठ्या मैदानावर मॉल झालेला असतो. त्याला बसण्यासारखी एकही जागा नसते. किराणा मालवाला आपली जागा त्या मॉलला विकून निघून गेलेला असतो. पेन्शनर आजोबा जाऊन बरीच वर्षे झालेली असतात. जुन्या इमारती पडून तेथे नवीन स्कीम्स झालेल्या असतात. त्यांच्यात काही जुने पारवे जुना काळ शोधत टुकूटुकू बघत बसलेले असतात. त्यांच्या घरट्यांना आता जागा नसते. त्यांची अंडी आता कावळे तरी खातात किंवा त्यांना स्वतःला मांजरे तरी! दाणे कोणीच टाकत नसतो. एकेका दाण्यासाठी कित्येक तास उडावे लागत असते. व्ही आकारात उडण्याची सोय राहिलेली नसते कारण मोठमोठाल्ल्या टॉवर्सची भीती वाटते. पिल्ले विचारतात भूक लागली तर खायला कधी देणार? उत्तर नसते. मग नको तेच उत्तर द्यायला लागते. 'बेटा, तुझे आजोबा, काका कसे स्थलांतरित झाले ना? तसे स्थलांतरित व्हायचा आपण प्रयत्न करू हां?'! पिल्ले स्थलांतरापर्यंत जगणारच नाहीत हे माहीत असते. आपल्याला आपण त्यात कुठेच दिसत नाही. आपल्या स्वागतासाठी कुणीच वळचणीतून बाहेर आले नाही. ओळखूनही न ओळखल्यासारखे केले काहींनी! काहिंनी चौकशी केली. काहींनी मिठ्या मारल्या. काहींनी थोपटले तर काहींनी आपल्याबरोबर एका वळचणीत नेले. मी तिकडून आणलेले नवीन दाणे त्यांना दिले. खुष झाले बिचारे! नंतर दोन तासांनी त्यांची कुजबूज सुरू झाली. आपल्यात हा आणखीन एक स्पर्धक आला की काय अन्न शोधण्याच्या मोहिमेतला?? हा जात का नाही? वागण्यात परकेपणा येऊ लागला. मी तर कित्येक जुन्या आठवणी काढल्या. पण आता गप्पा तशा होत नाहीत. पुर्वी आम्ही अंधार पडला की एखाद्या आडोशाला रात्र रात्र गप्पा मारायचो. आता कुणाला वेळच नाही. त्यातच वाहनांचे कर्कश्श आवाज! मी इथून स्थलांतरित झालो होतो???

वैतागलेला पारवा परत निघतो. निरोप मात्र त्याला खूप उत्साहात देतात सगळे. पुन्हा या बरं का असे निक्षून सांगतात. कारण नवीन दाणेही हवेच असतात. हा पारवा वैतागलेला असतो. पुन्हा कधीच येणार नसतो.

मग पुन्हा जेथे स्थलांतर केले होते तेथेच पोचतो. काय विलक्षण आनंद मिळतो तेथे! सगळे जण विचारतात? जुने आकाश कसे आहे? आम्हाला न्याल का? हा पारवा तात्पुरते हो म्हणतो.

काही दिवसांनी पुन्हा त्याही जागेतील दोष दिसू लागतात.

मग प्रत्यक्ष, फोनवर, लिहिताना सगळीकडेच रोखठोकपणा येतो. थेटपणा येतो. दोन्हीपैकी कोणतेच आकाश दोन्ही आनंद देत नसते. जुने आकाश जुना जमाना काही प्रमाणात आठवून देत असते. पण त्यात मन रमू शकत नाही. नवे आकाश स्थैर्य, सुबत्ता देते, सोबती देते, पण जुन्या जमान्याची आठवण काढू देत नाही आणि नष्टही करू शकत नाही.

मग पुन्हा चहा करताना गाळ टाकून देताना वाईट वाटते. मग बोलण्यात उपरोध येऊ लागतो. पण पारवा असहाय्य झालेला असतो. उपरोध टाळायची इच्छा असते, पण तसाच ठेवायची इच्छा त्याहून प्रखर ठरते.

एक, दिड किंवा दोन पिढ्यांमधील अंतरामुळे आलेले रिकामेपण मनातल्या वादळांना मुखावाटे बाहेर जायला प्रवृत्त करते. दोष स्थलांतराचा नसतो, कोणत्याच आकाशाचा नसतो, कोणत्याच पारव्याचाही नसतो. काळाचाच असतो.

मग जाणवते!

माझ्या वयाचे स्थलांतरित झालेले किंवा न झालेले पारवे काय करतात??

पश्चिम क्षितीज लालावत आहे पाहून काळवंडतात. सावल्या लांब होताना पाहून शरीर आखडून घेऊन चोच पोटात घालून भीती व्यक्त करत राहतात. संधिप्रकाशाचा पहिला किरण पंखांना हुळहुळत असताना डोळे अंधारतात.

आणि मी काय करत आहे?

मी जुन्या नव्या आणि आणखीन सगळ्याच नव्या पारव्यांशी दिलखुलास बोलत आहे. तेही आनंदाने बोलत आहेत माझ्याशी! मी सगळ्यांना हवा अहे. कोणत्याही आकाशात असलो तरी! माझ्यावर कोणी रागावत नाही. माझे स्वागतच असते. माझ्या बोलण्या वागण्याचे तर अनेक फॅन आहेत.

मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते जेव्हा रुचेल तेव्हा

झक्की....... एक नक्की

देश कोणताही असला तरी त्यावर माणसाला दिसणारे आकाश एकच असते. Happy

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान.... बरंचसं पटलं....कोणाला काही वाटो तुम्ही एकला चलो रे !!! कारवा बनता गया तर तुम्ही अनुभवत आहातच... शुभेच्छा...

मलाही आवडंल.

पण झक्की किंवा कुणाचे नाव न घेता असेच लिहिले असते तर ते अजून जास्त रुचले असते. स्पेशली " मग पुन्हा चहा करताना गाळ टाकून देताना वाईट वाटते. मग बोलण्यात उपरोध येऊ लागतो. पण पारवा असहाय्य झालेला असतो. उपरोध टाळायची इच्छा असते, पण तसाच ठेवायची इच्छा त्याहून प्रखर ठरते" हे लिहून त्यातली धार वैयक्तीक झाली. कारण तुमच्या लेखांवरील त्यांच्या प्रतिक्रियांनी तुम्ही विचलित झालात.

हे ललित खरेतर बर्‍याच पारव्यांचे प्रातिनिधिक ठरू शकले असते. त्यातील वैयक्तीक विधाने काढून टाका.

कोणा एका पारव्याचे ललित म्हणून चांगले आहे. Happy

>>दोष स्थलांतराचा नसतो, कोणत्याच आकाशाचा नसतो, कोणत्याच पारव्याचाही नसतो. काळाचाच असतो.
खरं आहे.

केदार
>>हे ललित खरेतर सर्वच पारव्यांचे प्रातिनिधिक ठरू शकले असते
अजिबात नाही. पुन्हा नेहमीचीच चर्चा इथे नको. त्यामुळे थांबते.

प्रिय मित्रांनो,

मी झक्कींच्या मला दोन विपू आल्यानंतर त्यांना केलेल्या प्रतिसादाच्या विपूत स्पष्ट लिहिले होते की मी त्यांच्याबाबत लिहिणार आहे. मी वरील लेखात कोणतीही आकस असलेली प्रतिक्रिया दिलेली नसून मला स्वतःला तरी विश्वास वाटतो की जर हे झक्कींनी कधी वाचलेच तर त्यांनाही तसे वाटणार नाही. अर्थात, आपल्या सर्वांच्या मतांचा प्रामाणिकपणे आदर आहेच. कृपया गैरसमज नसावा. Happy मी केवळ 'मला प्रत्यक्ष न भेटताही भेटत राहिलेले झक्की' इतक्याच विषयावर माझ्याकडून जमेल तितके प्रामाणिक ललित लिहिण्याहा प्रयत्न केला आहे. Happy

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!

-'बेफिकीर'१

तसेचः

१. मी आधी त्यांचे नांव न लिहिताच प्रकाशित केले होते हे ललित! नंतर मला असे वाटले की शीर्षकावरून काही लक्षात आले नाही असेही होऊ शकेल म्हणून बदल केला. Happy

२. बर्‍याच अंशी त्या वयातील प्रातिनिधिक व्यक्ती म्हणून माझ्या काही विधानांच्या कारणांकडे बघितले जावे, जसे उपरोध किंवा चहा गाळतानाची गोष्ट वगैरे! Happy

-'बेफिकीर'!

खर सांगू का ,' झक्की' नाव लिहिलय ते काढुन टाकल तर छान ललित होईल. आवडल.

वाचकांनी पारव्याच्या ठिकाणी स्वतःला अभिप्रेत असणारी कोणतीही व्यक्ती किंवा स्वतःला का घातल तरी चालेल. पारवा हे रुपकार्थी घेतलय ना? मग नावाची गरज नसावी.

लेख आवडला. बर्‍याच गोष्टी (स्वानुभवामुळे) पटल्या.
>>>>दोष स्थलांतराचा नसतो, कोणत्याच आकाशाचा नसतो, कोणत्याच पारव्याचाही नसतो. काळाचाच असतो>> अनुमोदन.
पु.ले.शु.

वाचकांनी पारव्याच्या ठिकाणी स्वतःला अभिप्रेत असणारी कोणतीही व्यक्ती किंवा स्वतःला का घातल तरी चालेल. पारवा हे रुपकार्थी घेतलय ना? मग नावाची गरज नसावी.>>>> १००% अनुमोदन, लेख छान झालाय

बेफिकीर, उत्तम लेख.
मला तुम्ही ओळखलेत! खालील वाक्ये, त्यातले रूपक अगदी फिट्ट लागू पडते मला.
पण गाळ महत्वाचा होता. ती सर्व माणसे, तो जमाना, ते संस्कार, त्या रुढी, त्या प्रथा, सणवार, कौटुंबिक सुखे दु:खे, आपुलकी, सध्या चौकोनी असलेल्या मनाला त्यावेळेस असलेला वर्तुळाकार आकार, साधी साधी स्वप्ने बरेच काही! सगळा गाळ फेकून दिला आपण!

केदार, मी वाचले तेंव्हा मला तरी खालील वाक्य दिसले नाही, पण तेसुद्धा माझ्या मनःस्थितीचे अचूक निदान आहे. स्पेशली " मग पुन्हा चहा करताना गाळ टाकून देताना वाईट वाटते. मग बोलण्यात उपरोध येऊ लागतो. पण पारवा असहाय्य झालेला असतो. उपरोध टाळायची इच्छा असते, पण तसाच ठेवायची इच्छा त्याहून प्रखर ठरते" हे लिहून त्यातली धार वैयक्तीक झाली. कारण तुमच्या लेखांवरील त्यांच्या प्रतिक्रियांनी तुम्ही विचलित झालात.

बेफिकीर तसे विचलित झाले नसावेत. त्यांनी मला विपु त जे लिहीले त्यावरून ते थोर आहेत. असली निंदा, टीका यांनी ते विचलित होणार नाहीत. नाहीतर इतके सुंदर लिहूच शकले नसते. मी लिहीतो तसे काहीतरी वेडेवाकडे लिहीले असते.

एकूण काय, बेफिकीर, मस्तच लेख!!

अहो, माझे नाव लिहीलेत तरी चालेल. मला तरी त्यात काही वाटत नाही. त्या चहाच्या गाळात ती शिंची लाज, वैयक्तिक मान, अपमान, गर्व सगळे राहून गेले. राग कसा काय चहात उतरला, देव जाणे.

तुमचे हे छान लिखाण पाहून त्या रागाचा अंमल थोडा वेळ उतरतो. पुनः चहा पिताना तेच. तेंव्हा आता चहा पिणेच बंद.

पुनश्च - उत्तम, अतिशय आवडले!!

एक सूचना - आता माझ्यासारख्या फालतू माणसा ऐवजी कुणा थोर व्यक्तीबद्दल लिहा. लोकांना स्फूर्तिदायक होईल. तुमच्या लेखणीत ते सामर्थ्य आहे. बोटात, कीबोर्डात म्हणा हवे तर.

Happy Happy Happy

धन्य ते बेफिकिर....अन त्याहून धन्य झक्की...........

अप्रतिम ललित अन त्यावरील झक्कींची प्रतिक्रिया त्याहून अप्रतिम .

Happy

चांगले लिहीलय, आख्खे लेखन वाचताना हे "झक्कीन्वरच" आधारित आहे हे जाणवत होतेच, सबब नाव घातले तेच योग्य केले.
बायदिवे, झक्किबोवा, परत कधी येताय इकडे? थोडे आमचे दाणे थोडे तुमचे दाणे, मस्त खिचडी करु, काय? Proud

धन्य ते बेफिकिर....अन त्याहून धन्य झक्की...........

अप्रतिम ललित अन त्यावरील झक्कींची प्रतिक्रिया त्याहून अप्रतिम .

अगदी अगदी.... + १

भूषणराव, अगदी 'वास्तविक' लेख आहे हा. काकांचे नाव लिहले नसते तरी लेख आवडलाच असता..... ( न आवडणारं असं तुम्ही लिहता तरी काय म्हणा Happy )

"आकाश तर तेच असते. पण खाली सगळे बदललेले......," या उतार्‍यात अगदी नेमके बदल मांडले आहेत.

काळाचा दोष असतो....सहमत पण, तरी; दोष तसा कुणाचाच नसतो असं वाटतं..(म्हणजे "दोष" हा शब्द प्रयोग खटकतो म्हणुन) , "बदल" हा निसर्गाचा नियम आहे.
जगातील कोणतीही गोष्ट तीच्या हयातीच्या दुसर्‍याच क्षणी आधी होती 'तशीच' राहत नाही.
मग ते माणसाचे 'मन' असो वा निर्जन निर्वातात फिरणारा 'दगड'.

आणि इथेही मी तुम्हाला प्राईवेटली सांगतो.... हा नियम मी लक्षात ठेउनच पुढे जगणार आहे.

धन्यवाद!!

सर्वांचा मनापासून आभारी आहे.

झक्कीसाहेब,

आपण दिलखुलासपणे काही विधाने घेतलीत व घ्याल असे वाटलेही होतेच. मनःपुर्वक आभार मानतो की आपण दिलखुलास प्रतिसाद दिलात. चुभुद्याघ्या

-'बेफिकीर'!

बेफिकीर

अतिशय सुंदर ललित...

झक्की यांच्या प्रतिक्रियेला लवून कुर्निसात !!
टीप : या निमित्त मी मायबोली प्रशासनाकडे आग्रही मागणी करत आहे कि त्यांनी पुणेरी खवचटपणे हसणारी नागपुरी संत्री अशी एक स्माईली कल्पावी.
ती स्माईली
:झक्की:
असं टाईप केल्यावर
CA1VRIUECA3V1UYRCAY2BEYZCA8VPIMYCA5ER1K2CAX8NMNOCAF27VVACA0QFDT5CA4RHOHLCAZO4WUWCA4IZARCCATAPOAKCAC4CWVRCAB5297SCAVN823UCA2HW10OCAZU0DUHCA7QV6AECAR5KMRUCAA76KL3.jpg
अशी दृश्यमान व्हावी.

जयहिंद ! जयमाबो !!

बेफिकीर, उत्तम लेख व लेख लिहायची कल्पनाही उत्तम. तुमच्या या लेखानंतर तुम्हाला "सर्जन"शील लेखक म्हणायला हरकत नाही.

त्यावरील झक्कींची प्रतिक्रिया ही आवडली. पण हा सगळा मास्क तर नाही. Happy

बेफिकीर पण आकाश तर दिसतच नाही हो. तो असतो भास. खरे असतात ते ग्रह, नक्षत्र आणि तारे. पण ते देशोदेशी तुमचे आमचे सेम नसतात. Happy

पण हा सगळा मास्क तर नाही.
मी तरी मास्क लावत नाही.
आता माझ्याकडे पाहून काही लोक विचारतात की मास्क लावला आहे का होळी, हॅलोवीनसाठी?

पण मी उत्तर देतो, हो ना. माझा खरा चेहेरा पहाल तर हिंदी सिनेमातले अनेक खान, कुमार, कपूर, किंवा इकडचे पॉल ओ'नील, जॉर्ज क्लूनि या सर्वांपेक्षा एकदम जास्त हँडसम, रुबाबदार, सेक्सी वगैरे दिसतो!!

Pages