प्राथमिक माहिती:
उज्जैन नामे एक आटपाट नगर असतं. तिथे एक राजा(प्राण) असतो. तो विसरभोळा असतो. तरी तो राज्य मस्त चालवत असतो. त्याला एक राणी(बिंदू) असते. ती दुसरी असते. पहिली राणी देवाघरी गेलेली असते. तिची मुलगी मोठी होऊन जयाप्रदा झालेली असते. दुसर्या राणीला एक भाचा असतो. तो का कोण जाणे, पण आत्येकडे/मावशीकडेच राहत असतो. तिथे त्याचे संगोपन व्यवस्थित झाल्याने तो गुटगुटीत अमजद खान झालेला असतो.
ढ्याण्ण्ण्ण्णण!
सिनेमा सुरू होतो तेव्हा उज्जैनीतल्या वार्षिक विविधगुणदर्शन कार्यक्रमांचा दिवस असतो. तिथे जिंकणार्याला राजकुमारीच्या हस्ते बक्षीस दिले जाईल, वगैरे घोषणा होते. मग एक डोक्याला इकडेतिकडे नारळाच्या करवंटीचे तुकडे लावून त्यातून केस डोकावत आहेत, दात किडले आहेत, दाढी वाढलेली आहे, पण व्यायाम भरपूर केला आहे, अशी गुणवैशिष्ट्ये असलेला मानव येतो. तो आल्याआल्या खांब इत्यादी अवाढव्य गोष्टींची लीलया तोडफोड करून राजकुमारीच्या हस्ते बक्षीस स्वीकारायला सज्ज होतो. तेवढ्यात त्याला आव्हान निर्माण होते. जितेंद्र उर्फ रामू हा पटांगणात उडी घेतो. तो दात न किडलेला, डोक्यावर भरपूर केस असलेला, दाढी न वाढलेला पण फारसा व्यायामही न केलेला असा मानव असतो. (यात मानवांबरोबरीने देवी, यक्ष, अप्सरा, राक्षस-कम-भुते अशा सगळ्या प्रजाती असल्याने शक्यतो तीही माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे.) मग ते मनपसंत आयुधे उचलून मारामारी इस्टार्ट करतात. मग कठीण, समतल जमिनीवर फारशी मजा न वाटल्याने उडी मारून, सर्कशीत झुल्यांचे खेळ करणार्या लोकांना क्याच करायला खाली जसे जाळे असते तशा जाळ्यावर मारामारी सुरू करतात. मग तिथूनही अशक्य उड्या मारून इकडेतिकडे जातात. पाचेक मिन्टे हा खेळ झाल्यावर रामू कळकट मानवास जाळ्यावर पाडतो जिथे खाली उभा भाला रोवलेला असतो. जाळे हे ताणले जात असल्याने पैलवान येऊन पडताच ते खाली जाते आणि भाला घुसून त्याचे देहावसान होते. राजकुमारी रामू यास बक्षीस देते. तेव्हाच रामूच्या मनात राजकुमारीविषयी प्रेमांकुर फुटतात. मग रामू घरी येतो. त्याच्यासोबत त्याचा दोस्त शक्ती कपूर असतो. (शक्ती कपुराने 'राजाबाबू'मधल्यासारख्या वेडगळ हसण्याची सुरुवात या चित्रपटात केली.) आई दोघांना जेवायला वाढायला जाते आणि इकडे रामू घराच्या मागच्या बाजूला येतो तो तिथे राजकुमारी सख्यांसोबत स्विमिंग करायला आलेली दिसते. यथावकाश आपल्याला कळते की, रामूची आई शाही माळीण असून तिची झोपडी राजवाड्याच्या आवारात ठेवायची परवानगी तिला राजाने उदार मनाने दिली आहे. राजवाड्याचे इंटिरियर हा त्याच्यालेखी नगण्य आयटम असावा. असो. रामू जेवणखाण विसरून राजकन्येचा डॅन्स बघतो. तिच्या सख्या स्विमिंग ट्युबांना सोनेरी चमकी (शाही ट्युबा!) लावून पाण्यात विहरतात.
दुसरी राणी बिंदू ही स्वभावाने मवाळ असते. (कस्काय बिंदूने असला मवाळ रोल केला पाताल भैरवी जाणे!) तिचा भाचा गुटगुटीत 'चंचल'(त्याचे नाव!) मात्र थोडासा व्हिलनटाईप असतो. तो त्याच्या दोन चमच्यांना घेऊन राज्यात लोकांकडून पैसे उकळत फिरताना दिसतो. मग रामू त्याला अडवून धडा शिकवतो आणि राजाकडून शाबासकी मिळवतो. राजाकडून शाबासकीबरोबरच राजकन्या मिळवणे, हे रामूचे ध्येय असते. त्यादृष्टीने तो प्रयत्न करू लागतो. आधी राजकन्येचेही आपल्यावर प्रेम आहे हे कन्फर्म करून घेतो. राजकन्येसाठी शाही उद्यानात शाही फुलांचा शाही झुला केलेला असतो. राजकन्या यायच्या वेळेस रामू तिथे झोपी गेल्याचे नाटक करतो. मग त्याच्या रमणीय, देखण्या चेहर्याकडे पाहत राजकन्या एका ठेकेबाज गाण्याचे स्वप्न पाहते. त्यात ती रामूबरोबर नाचते. (नाचाचा ड्रेस हिंदी पिच्चर अप्सरा ष्ट्यांडर्ड!) तिचे रामूवरच प्रेम आहे हे या गाण्यातून आपल्यालाही पक्के कळते.
बाकी वेळेला प्राण विसरभोळा बनून टीपी करत असला तरी 'राजघराणे की इज्जत' हा त्याच्याही दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा! त्यामुळे तो गरीब जावई नाकारतो. मग रामू राजकन्येला भेटायला चोरून येतो. चंचल एरवी न दाखवलेली चतुराई व चपळाई दाखवून त्यास पकडतो. मग राजा त्याला फाशीची शिक्षा ठोठावतो. थोड्या वेळाने अनाकलनीय कारणाने ती क्यान्सलही करतो. आणि एकदमच, कुठलीही पूर्वसूचना न देता, साध्या पद्धतीने सिनेम्यात भट्टारकाची एंट्री होते. 'पाताल भैरवी' लो बजेट असावा किंवा तांत्रिक इंडस्ट्रीत तेव्हा मंदी असावी. कारण त्याच्याकडे एक बाई (हिचे नाव लक्षात नाही) आणि डिगरी (असेच ऐकू आले!) उर्फ सदाजबा/सदाजपा/सदाजवाँ नावाचा एक माणूस एवढे दोनच मोजके विश्वासू सेवक आणि नंतरच्या दृश्यांमध्ये एक चारसहा काळे, शिंगे असलेले राक्षस एवढेच एंप्लॉयी दिसतात. मग तो एक तलवार मागवतो, बाईला संजीवनी तयार ठेवायला सांगतो आणि स्वतःचा हात छाटून, एका देवीला प्रसन्न करून घेतो. देवी बहुधा कुठल्यातरी महत्त्वाच्या कामात टॅम्प्लीज घालून आली असावी. ती बाकी गप्पा न मारता भट्टारकाच्या -
'सगळ्यांत महान देवी कोण जी मनोरथ पूर्ण करते?'
'तिचे स्थान कुठे आहे?'
'तिला प्रसन्न कसे करता येईल?' या प्रश्नांची कमीतकमी शब्दांत उत्तरे देते आणि अदृश्य होते. देवी घाईत असते, त्यामुळे प्रश्न विचारून झाला की, भट्टारक प्रश्नाच्या शेवटी 'बोल मेरी अंबे, बोल जगदंबे' असे म्हणतो. हे तो प्रत्येक प्रश्नाला करतो. हिंदी पिच्चरांमध्ये वॉकीटॉकीवर बोलताना वाक्य संपले की 'ओव्हर' म्हणतात तसेच हे पुराणकालीन! मग नंतर सदाजबाला तो हात हाताच्या जागी धरायला सांगतो आणि सेविकेला संजीवनीचा स्पर्श द्यायला सांगतो. लगेच हात जुळून पूर्ववत! यावरून तो एक महान तांत्रिक आहे हे आपल्याला कळते.
त्याच्या महान तंत्रज्ञानाचा दुसरा नमुना म्हणजे त्याने डेव्हलप केलेली त्याची दुर्बीण! हिच्या क्षमतेला पार नाही. एका गावात बसून दुसर्या गावातली मुंगीदेखील दिसू शकते. खेरीज एका जागी उभे राहून तुम्हांला वाटेल ती गोष्ट, अगदी आतली खोलीदेखील या दुर्बिणीने पाहता येते. त्याने तो रामूला पाहतो. कारण पातालभैरवीला बळी दोघांचेच चालणार असतात, एकतर हा मांत्रिक अथवा एखादा हुशार जाँबाज तरूण! म्हणजे आपला रामू!
मग भट्टारक आपल्या साथीदारांसह त्या नगरीत जातो. आपण नेपाळातून आलो आहोत असे सांगतो. (हे ऐकल्यानंतर त्याच्या पुढच्या काव्यमय संवादांना नवर्याने 'नेपाळी गझला' असे नाव बहाल केले!) जादूचे प्रयोग दाखवतो. एका संगमरवरी पुतळ्याला बाई बनवतो आणि ती बाई 'एक दुपट्टा, दो दो मवाली' असे शब्द असलेले गाणे म्हणते. प्रेक्षक खूश होतात. मग तो एक भलामोठा मातीचा कप काढतो. (म्हणजे चहा प्यायचा चिनीमातीचा कप नव्हे; जो स्पर्धांमध्ये जिंकतात तो कप!) त्यातून तो लोकांना गिफ्टा द्यायला लागतो. शक्ती कपुराला सोन्याची नाणीच नाणी देतो. मग रामू ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी उर्फ कप उचलून पळून जातो. (इथे जर त्या कपाला हात लागताच रामू उडायला लागून थेट भट्टारकाच्या अड्ड्यावर पोचला असता, तर रोलिंगबाईंनी ट्रायविझार्ड टूर्नामेंटीचा कप पोर्टकी असणे ही कल्पना पाताळभैरवीतून घेतली असे म्हणता आले असते. पण तसे होत नाही.) त्याच्यामागोमाग भट्टारक त्याच्याजवळ येऊन पोचतो. (मध्यमवयीन असला तरी स्पीड जबरी!) आणि त्याला भरपूर संपत्ती मिळेल, अशा भूलथापा देऊन पाताळभैरवीच्या स्थानाकडे घेऊन जातो.
तिथे गेल्यावर त्याला पुढे घालून, सगळ्या संकटांना तोंड द्यायला लावत, रस्ता मोकळा करून घेत अखेर देवीच्या मूर्तीसमोर येतो. प्रवासाने रामू मळकट झाल्याने तो त्याला आंघोळीस पाठवतो. तिथे रामूने आंघोळीस सदरा काढल्यावर त्याची झिप असलेली आधुनिक विजार दिसते आणि भारत तेव्हाही किती प्रगत होता, हे आपल्या मनावर ठसते. तिथे तो आंघोळ करत असताना नेमेचि येते ती मगर येते. रामूने तिला मारल्यावर तिथे देवी प्रकट होते. ही दुसरीच देवी, पाताळभैरवी न्हवे! तिला रामू शापमुक्त करतो. ती रामूला तांत्रिकाचा डाव सांगते आणि म्हणते, की युक्तीने तू त्याचाच बळी दे, मग पाताळभैरवी तुझ्यावर प्रसन्न होईल. रामू तसेच करतो आणि पाताळभैरवी त्याला आपली मूर्ती देऊ करते. मूर्ती हातात धरून 'जय पाताल भैरवी' असे म्हटले की तात्काळ ती प्रकट होते आणि 'मानव, बोल क्या इच्छा है तेरी?' हे एवढेच वाक्य इच्छा सांगेस्तोवर म्हणत राहते.
रामू परतून देवीकडून मोठा वाडा बांधवून घेतो आणि महागड्या, ब्रँडेड गिफ्टा देऊन राजकन्येला मागणी घालतो. राजा लग्नाला हिरवा सिग्नल देतो आणि सगळे मनोरंजनाचे रंगारंग कार्यक्रम बघायला रामूच्या वाड्यात येतात. तिथे पुन्हा आधुनिक ठेकेबाज आणि फास्ट डॅन्स असलेले गाणे होते. लग्नाची तारीख नक्की होते.
इकडे भट्टारक परत आला नाही म्हणून सदाजबा त्याच त्या दुर्बिणीने त्याला शोधतो तर तो मरून पडलेला दिसतो. ते ताबडतोब सतत धूर येत असणारी संजीवनी मुळी घेऊन तिकडे जातात आणि भट्टारकाला जिवंत करतात.
चंचलच्या मनात राजकन्येशी लग्न करावे असे असते आणि रामू तिला पटवतो म्हणून हा बारकासा दोर घेऊन आत्महत्या करायला निघतो. तिथे भट्टारक त्याला अडवतो आणि राजवाड्यातून मूर्ती चोरून आण, तुला राजकन्या मिळवून देईन, अशी खोटी आश्वासने देतो. मग चंचल घरचाच माणूस असल्याने आरामात जाऊन, मूर्ती उचलून आणतो. पण जाताजाता तो चुकून 'जय पातालभैरवी' म्हणतो आणि देवी प्रकट होते. ती सारखी 'मानव, बोल क्या इच्छा है तेरी?' असे म्हणायला लागल्याने त्याला इच्छा मागण्यावाचून गत्यंतर राहत नाही. तो राजकन्येला उचलून आणायला सांगतो. इकडे रामू म़ंगळसूत्र घेऊन राजकन्येच्या गळ्याकडे हात नेतो, तो राजकन्या गायब!
एवढे करूनही चंचल बावळट असल्याने भट्टारक त्याच्याकडून मूर्ती हस्तगत करतो आणि राजकन्या आणि चंचलला घेऊन दूर निघून जातो. बिचारा रामू! हनीमूनला जायचे सोडून शक्तीला सोबत घेऊन राजकन्येला शोधत निघतो.
ते रानात थांबतात, झोपतात. सकाळी रामू जागा होतो तो काय? कुणीतरी टाळ्या वाजवून त्याला बोलवते, अंगावर झेंडूच्या पाकळ्याच पाकळ्या उधळल्या जातात. मग डिंपलतै येतात आणि दिलखेचक आयटम साँग पेश करतात. नंतर त्या रामूला लगटू बघतात आणि तो त्यांना झिडकारतो. लगेच त्यांचे रुपांतर यक्षिणीमध्ये होते. त्यांना शाप मिळाल्यामुळे पाताळलोकात यावे लागलेले असते. 'तू एखाद्या पुरुषाशी लगट केल्यावर त्याने तुला झिडकारले तरच तुला मुक्ती मिळेल' अशी अट असते. तर ते काम रामूने केल्याने त्या त्याला मदत करतात. त्या त्याला भट्टारकाच्या अड्ड्याशी पोचायला एक पक्षी देतात. पक्ष्याच्या पाठीवर बसून रामू निघतो.
इकडे भट्टारकाचे दिल राजकन्येवर आलेले. इतके दिवस केवळ तांत्रिक साधनेत घालवल्यानंतर आता त्याला लग्न करायची इच्छा होते. राजकन्या अर्थातच नकार देते. मग संतापलेला भट्टारक मूर्तीकडे रामूला हातपाय बांधून इथे हजर कर, असे मागतो. पक्षी सरळ रेषेत उडत चाललेला आणि पाठीवरचा रामू गायब! तरी पक्षी विचलित न होता सरळ रेषेत उडत निघून जातो. निष्काम कर्मयोगी! इकडे रामू आणि चंचल बंदिवासात अडकतात.
तिकडे शक्ती कपूर जागा होतो तर त्याला यक्षिणी वगैरे सुंदर बायका न भेटता एकच डोळा कपाळात असलेले आणि दुसरे तसलेच विचित्र दिसणारे अशी दोन राक्षस-कम-भुते भेटतात. त्यांनी माणसाला उडायला लावणारे बूट आणि इन्व्हिजिबिलिटी क्लोक आणलेला असतो कुठूनतरी. त्या वस्तू वाटायच्या कशा, हा त्यांचा प्रॉब्लेम असतो. तो प्रॉब्लेम शक्ती सोडवतो म्हणजेच 'दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ' या कथेतल्या माकडाप्रमाणे दोन्ही गोष्टी घेऊन भट्टारकाच्या अड्ड्याकडे कूच करतो. रामूला भेटून मग ते सगळे (सुधारलेल्या चंचलसकट!) भट्टारकाला मारायचा प्ल्यान करतात.
मग सदाजबाला बेशुद्ध करून शक्ती त्याच्या जागी जातो आणि 'भयंकर' असे नाव असलेल्या राक्षससेवकाशी अंगकाठीत साधर्म्य असल्याने चंचल त्याची जागा घेतो. हे दोघे युक्तीप्रयुक्तीने भट्टारकाकडून त्याची शक्ती कशात आहे ते जाणून घेतात. ती असते त्याच्या दाढीच्या केसांत. (भारतीय सॅमसनच हा!) मग राजकन्येला कशी दाढी आवडतच नै, बाकी तिला तू आवडतोसच, दाढी काढली की ती तुझीच वगैरे सांगून त्याची ती दाढी काढून टाकतात. मग नेहमीप्रमाणे शेवटची फायटिंग होते. उडत्या महालातून रामू भट्टारकाला पाडतो आणि भट्टारक फायनली मरतो.
मग शेवटाला रामू पाताळभैरवीला म्हणतो की, माणसाच्या इच्छेला अंत नाही. तेव्हा ही मूर्ती मला नको. चंचल म्हणतो, आमचा सिनेमा पाहायला जे काही सगळे प्रेक्षक आले असतील त्यांना जाता जाता तू आशीर्वाद दे. हा सिनेमा पाहायला प्रेक्षक आले असतील, हा त्याचा विश्वास पाहून आपण नमतो, शेवटचा संदेश आणि रामूचे तत्त्वज्ञान ऐकून गहिवरतो आणि सिनेमा संपतो.
जय पाताल भैरवी!
(मूर्ती नसल्याने आता देवी प्रकटणार नाही. चिंता नसावी.)
(No subject)
जय पाताल भैरवी. अलिफ लैलाचे
जय पाताल भैरवी. अलिफ लैलाचे हिंदी रुपाम्तर आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी आणि माझ्या मैत्रिणीने हा
मी आणि माझ्या मैत्रिणीने हा सिनेमा पैज लावून बघितला होता थेटरात जाऊन
मस्त, पण पंचेस जरा कमी पडले,
मस्त, पण पंचेस जरा कमी पडले, नेहमीसारखे टॉवेल झाले नाहीत!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ह्या सिनेमाला माझ्या दृष्टीने भयानक महत्व आहे, कारण हा माझ्या आठवणीतला थेटरात पाह्यलेला सर्वात जुना सिनेमा आहे.
टाईम पास झाला सुपर हीट तिथे
टाईम पास झाला सुपर हीट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिथे रामूने आंघोळीस सदरा काढल्यावर त्याची झिप असलेली आधुनिक विजार दिसते आणि भारत तेव्हाही किती प्रगत होता, हे आपल्या मनावर ठसते.>>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
अगदी "चांदोबापट" आहे हा.
अगदी "चांदोबापट" आहे हा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकी ष्टोरीइतकीच, किंबहुना त्याहून वरचढ त्यातली गाणी न् अप्सरानृत्ये आहेत. कहर दांगडो आहे एकेका गाण्यात
कारण हा माझ्या आठवणीतला
कारण हा माझ्या आठवणीतला थेटरात पाह्यलेला सर्वात जुना सिनेमा आहे.<<<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आगावा, म्हणजे तुला आशीर्वाद मिळाला असेल नाही?
किंबहुना त्याहून वरचढ त्यातली गाणी न् अप्सरानृत्ये आहेत>>>
हो हो.. भट्टारकाचा जीव जसा त्याच्या दाढीत असतो तसाच या सिनेमाचा सगळा जीव त्याच्या गाण्यांत आहे.
हा एक नमुना.
हे सर्व एकाच सिनेमात घडते.
हे सर्व एकाच सिनेमात घडते.
मला या सिनेमाचे सेट फार आवडले. भन्साळी काय सेट बांधेल??
सही
सही![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
एकेका गाण्यावर खरंतर एकेक
एकेका गाण्यावर खरंतर एकेक परिक्षण लिहिता येईल. "झूम झूम नाचो झूम झूम, गावो गीत मिलनके" हे गाणं रोज लावून एरोबिक व्यायाम करण्याइतपत जबरी आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
झूम झूम ऐकले.. मला तर त्याची
झूम झूम ऐकले.. मला तर त्याची चाल चमत्कार मधल्या बिच्चु बिच्छु सरखी वाटली !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सॉलिड परीक्षण ! सिनेमा
सॉलिड परीक्षण !![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
सिनेमा पाहिला नाही, पण आता पहावासा वाटतो आहे.
वाचायची हिंमत नाही पण महान
वाचायची हिंमत नाही पण महान असेल नक्कीच.
हे सर्व एकाच सिनेमात घडते.>>>
हे सर्व एकाच सिनेमात घडते.>>> अगदी हाच प्रश्न माझ्याही मनात आला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त परीक्षण! कहर चित्रपट दिसतोय.
ती सारखी 'मानव, बोल क्या इच्छा है तेरी?' असे म्हणायला लागल्याने त्याला इच्छा मागण्यावाचून गत्यंतर राहत नाही.>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ते एक "सरदी मे प्यारा लगे जलता अंगारा/गरमी मे प्यारा लगे पानी का फव्वारा..." वगैरे अजरामर गाणे यातलेच ना?
मस्त परीक्षण.. मी ज्या काळी
मस्त परीक्षण.. मी ज्या काळी काही वाट्टेल ते सिनेमे पहायचो त्या काळी पाहिलेला हा एक. नांव आठवत नव्हते. पण जुन्या-नव्याचा भयंकर संगम म्हणुन आणि 'एक दुपट्टा... ' आठवत होते..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी हा पुण्यातील वसंत टॉकीजला
मी हा पुण्यातील वसंत टॉकीजला पाहिला. विनोदी पटांमध्ये प्रथम क्रमांकाचा आहे तो. डिम्पलचे आयटेम सॉन्ग येथे लिहितो.
ओ......
चुम्मा चुम्मा चुम्मा चुम्मा
दिलको चुराले प्रियतम्मा
तू जो मुझे नही मिला
दिल जो मेरा नही खिला
निकल जायेगा मेरा दम्मा
हाये.... प्रियतम्मा
रूप का मै हुं समुंदर
डूब ले मेरे अंदर
इत्यादी!
अशक्य आचरट पिक्चर आहे हा.....
अशक्य आचरट पिक्चर आहे हा..... गाणी तर खरच महान आहेत... कादरखान एकदमच भारी... झी सिनेमावर बर्याच वेळा लागतो.. त्यामुळे मधून मधून सगळा वेगवेगळ्या वेळी बघून झालेला आहे..
(No subject)
>>> मी हा पुण्यातील वसंत
>>> मी हा पुण्यातील वसंत टॉकीजला पाहिला. विनोदी पटांमध्ये प्रथम क्रमांकाचा आहे तो. डिम्पलचे आयटेम सॉन्ग येथे लिहितो.
मीसुद्धा १९८५ मध्ये वसंत थिएटरलाच हा भयानक सिनेमा पाहिला. याच्यात सदाजपा उर्फ असरानी (का की के कु कू के कै . . . अशी बाराखडी असलेले), कादरखान व अमजदखानचे अत्यंत आचरट संवाद आहेत. इतक्या वर्षांनंतर सुद्धा बुद्धी गहाण ठेवून हा सिनेमा पाहिल्याचा पश्चाताप होतो.
>>> मग एक डोक्याला इकडेतिकडे नारळाच्या करवंटीचे तुकडे लावून त्यातून केस डोकावत आहेत, दात किडले आहेत, दाढी वाढलेली आहे, पण व्यायाम भरपूर केला आहे, अशी गुणवैशिष्ट्ये असलेला मानव येतो. तो आल्याआल्या खांब इत्यादी अवाढव्य गोष्टींची लीलया तोडफोड करून राजकुमारीच्या हस्ते बक्षीस स्वीकारायला सज्ज होतो.
हा खडकी टपोरी मानव म्हणजे माणिक इराणी नावाचा एक झ दर्जाचा एक्स्ट्रॉ कलाकार.
LOL --/\-- नक्की बघेन आता..
LOL![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
--/\--
नक्की बघेन आता.. रेफरन्स म्हणून हे परिक्षण बाजूला ठेवून
श्रद्धा.. त्याच सुमारास
श्रद्धा.. त्याच सुमारास आलेल्या 'जबरदस्त' नामक सन्नीच्या चित्रपटाचे एक परीक्षण लिहा (च)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
श्र, हा माझा आवडता आ आणि आ
श्र,![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हा माझा आवडता आ आणि आ मुव्ही आहे
सहारा चॅनल वर सारखा लागतो, बघते मी मनापासून
जितुभाय, कादरखान आणि त्याच्या जाडजाड पिळदार भुवया, शोमा आनन्ददेवी (पातलभैरवी ), प्रेमा नारायण (बहुदा तुला जी आठवत नाहीये ती सेविका ?) , शापित डिंपल देवी , जितुभाय ला नेणारा खोटा जादुचा पक्षी सगळे फार भारी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हा चित्रपट मला आवडला होता.
हा चित्रपट मला आवडला होता. लहाणपणी सहावी की सातवीत असतांना बघीतला होता. दोन रूपये तिकीट होते तेव्हा.
आईग्ग!!! हे आत्ता वाचलं! एकदम
आईग्ग!!! हे आत्ता वाचलं!
एकदम हहपुवा!!
<<त्यांनी माणसाला उडायला लावणारे बूट आणि इन्व्हिजिबिलिटी क्लोक आणलेला असतो कुठूनतरी. त्या वस्तू वाटायच्या कशा, हा त्यांचा प्रॉब्लेम असतो<<
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
<<'तू एखाद्या पुरुषाशी लगट केल्यावर त्याने तुला झिडकारले तरच तुला मुक्ती मिळेल' अशी अट असते.<<
सुपर हीट लिहीलय!!! मन एका
सुपर हीट लिहीलय!!! मन एका झटक्यात २५ ते२६ वर्ष मागे गेलं.मला हा चित्रपट एके काळी प्रचंड आवडलेला होता.आता हसु येतं ,पण पाताल भैरवी मी कमित कमि १० वेळा पहीला असेन.आणि ते ही कमी पडल म्हणून या चित्रपटाची व्हीडीओ कॅसेट बाबांना खरेदी करायला लावली होती.घरच्यांचा खूप ओरडा खाल्ला आहे ,हा पुन्हा पुन्हा पाहताना.खरं तर मला ही पाताल भैरवी खरंच असेल असं वाटत होतं, आणि या इच्छा पुर्ण करणार्या देवी नी माझा गणिताचा अभ्यास पुर्ण करावा ,गणिताच्या बाईंना सगळी गणितं विसरायला लावावित हिच इच्छा होती,पण ती पुर्ण झाली नाही.मी बहुतेक तेव्हा पाचवीत होते.
झिप लगट वेडगळ हसू...कसं काय
हिरोईन कोण आहे जिच्यावर सगळेच भाळलेले असतात??
खुप वर्षापुर्वी हा चित्रपट
खुप वर्षापुर्वी हा चित्रपट बघितला होता.......मस्त लिहले![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
बापरे, हे इतके मस्त परिक्षण
बापरे, हे इतके मस्त परिक्षण असूनही वाचताना दमछाक झाली. पूर्ण शिणुमा बघणार्यांना माझे दंडवत.
श्रध्दा, लिंकमधले गाणे पाहिले. धन्य धन्य झाले. नुसते ऐकले तर पिकनिक साँग वाटेल आणि पाहिले तरी पिकनिक साँग वाटेल. फक्त पिकनिक एका इनडोअर झू मध्ये सुरू आहे एवढेच. पोपट, मोर, फुलपाखरं असे विविध पक्षी आणि कीटक आनंदाने 'हे ह्है' असे ओरडताना ऐकून कान धन्य झाले.
आजकाल मुलांच्या शाळेची ग्यादरिंगं पण यापेक्षा वरच्या दर्ज्याची असतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हिरोईन जयाप्रदा
हिरोईन जयाप्रदा
या सिनेमात एके ठिकाणी कादरखान
या सिनेमात एके ठिकाणी कादरखान जादूचे प्रयोग करून दाखवत असतो. ते बघून अमजदखान त्याची चेष्टा करून त्याला आव्हान देतो. त्यामुळे कादरखान त्याचे एका बाईत रूपांतर करतो व त्या रूपात अमजदखान एक गाणे म्हणतो (हे गाणे म्हणताना अमजदलाच बाईचे सोंग दिले आहे की त्या गाण्यापुरते ते काम तात्पुरते सिल्क स्मिताने केले आहे ते आठवत नाही).
ते ढंगदार गाणे पुढील प्रमाणे -
गली गली SSSS,
बात चली SSSS,
गली गली बात चली,
सब समझे मुझे अपनी साली,
मुझसे ना जाये जवानी सम्हाली SSSS,
ढ्या ढ्यां ढ्या ढ्यां ढ्या S S S S S S
एक दुपट्टा SSS, दो दो मवाली,
एक दुपट्टा SSS, दो दो मवाली S S S S
आयला SSS, आयला SSS,
आयला SSS, आयला SSS
. . . .
हा सिनेमा पाहिल्याच्या दुसर्याच दिवशी श्रीकृष्ण नावाच्या टॉकिजमध्ये मी "महागुरू" नावाचा एक दुसरा अत्यंत फालतू सिनेमा पाहिला होता. त्यात इथून तिथून मिथून, राकेश रोशन, कादरखान असे 'एक से बढकर एक' खतरनाक मंडळी होती. महागुरू पाहिल्यावर पातालभैरवी फारच सुसह्य होता असे लक्षात आले होते.
Pages