तू कसा फुलतोस रे वेड्या?

Submitted by निशिकांत on 9 November, 2011 - 23:49

पिऊनी आसवांना तू कसा जगतोस रे वेड्या?
उन्हाळी मोगर्‍यासम तू कसा फुलतोस रे वेड्या?

जमूनी दु:ख सार्‍यांनी, रडावे रीत आहे पण
सभेला पीडितांच्या तू कधी नसतोस रे वेड्या?

मनी हा प्रश्न माझ्या, पाहता क्षितिजावरी तुजला
नसूनी पंख फुटलेले, कसा उडतोस रे वेड्या?

जरी त्यांचे निराळे विश्व आहे, वळचणीला तू
मुलांचे पाहुनी ऐश्वर्य का खुलतोस रे वेड्या?

पहारा पापण्यांचा का असावा आसवावरती?
झरूदे, व्यर्थ का तुजलाच तू छळतोस रे वेड्या?

जशी ती दूर गेली, जीवनाचा तोल गेला अन्
मला पुसती कशाला एवढी पीतोस रे वेड्या?

मशाली पेटल्या ज्यांच्या, तयांना ओढ क्रांतीची
जुनेर्‍या तू विचारांनी, कसा विझतोस रे वेड्या?

मिळवणे शक्य आहे जे, तयाची आस ठेवावी
गवाक्षातून तारे व्यर्थ का बघतोस रे वेड्या?

मनी का पेलसी "निशिकांत" ओझे लाख प्रश्नांचे?
कशाला उत्तरे शोधीत तू जगतोस रे वेड्या?

निशिकांत देशपांडे मो.क्र.-- ९८९०७ ९९०२३

गुलमोहर: 

जरी त्यांचे निराळे विश्व आहे, वळचणीला तू
मुलांचे पाहुनी ऐश्वर्य का खुलतोस रे वेड्या?

शेरातला विचार आवडला Happy

१. 'रे वेड्या' ही रदीफच भरतीची आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. ती नसती तरी शेरांचा अर्थ अजिबात बदलला नसता. शेरातून जे शब्द वगळून सुद्धा शेराचा अर्थ तोच रहात असेल तर असे शब्द शेरात आणू नयेत असे वाटते.

२. निशिकांतजी आपल्या प्रत्येक गझलेत जुन्या पुस्तकी मराठीतील(खास करून काव्यातील) मजला, तुजला, जमूनी, करूनी, जया, तया इ.इ. शब्द असतात ते आता कालबाह्य झाले आहेत. अगदी नाईलाज असेल तरच असे शब्द वापरावेत. उदा. जुन्या उर्दू गझलेत टुक हा शब्द जरा, नुकताच ह्यासाठी वापरला जायचा. तेरे ऐवजी तिरे, मेरे ऐवजी मिरे असे शब्दप्रयोग व्हायचे ते आधुनिक उर्दू गझलेतून केव्हाच हद्दपार झाले आहेत.

३. शेर अजून स्पष्ट आणि नेमके यावेत ही अपेक्षा

लहान तोंडी मोठा घास घेत आहे त्याबद्दल क्षमस्व. प्रचंड शुभेच्छा!!

कणखरजी,
धन्यवाद आपल्या मौलिक मार्गदर्शनाबद्दल. या आधीही बेफिकिरजीनी याच धरतीवर एका प्रतिसादात मार्गदर्शन केले होते. प्रयत्न करतोय; पण आवघड जातंय. आपण दिलेला सल्ला नक्कीच लक्षात ठेवीन.

गजल फार आवडली. कणखरांशी सहमत आहे. गजलेतील बर्‍याच शेरांबाबत आपल्याशी प्रत्यक्ष चर्चा करेन म्हणतो. Happy

एक अप्रतिम गझल निशिकांतराव! प्रत्येक खयाल आवडला. वा वा! एखादा शेर कोट करत बसण्यात अर्थ नाही. कणखर व डॉक्टर यांच्या रदीफबाबतच्या मताशी काहीसा सहमत असतानाच असेही म्हणावेसे वाटते की आपण ती रदीफ खयालांच्या ताफ्यात बेमालूम गुंफलेली आहेत. प्रतिसाद द्यायला उशीर झाला कारण वीज नव्हती. उत्तम खयालांनी नटलेली गझल!

खूप शुभेच्छा!

-'बेफिकीर'!