रेशमाचं खळं

Submitted by अज्ञात on 13 August, 2008 - 05:43

नभ उतरुन आलं झालं मेघाळ आभाळ
नव्या पावसानं नेलं सार्‍या जगाचं गबाळ
चिंब भिजले आकाश भोर झाली काळी माती
खुणावत अंकुरास वाहु लागला पन्हाळ

सण ओलावल्या रानी म्हणे पेरतेव्हा गाणी
हिरवळल्या जमाती उतु गेला वनमाळ
मन रंगाची कमान भय जिरले गुमान
यमनाच्या बेटावर दरवळ सदाकाळ

उन्हा आली सोनकळा भला सजला श्रावण
फुलावर गोळा दंव घुमे सावळं कोकीळ
सुवासिनीचं माहेर गौर मंगला मंगळ
झिम्मा फुगडीचा फेर घर सुखाचा समेळ

शीण गेला मैलावर मंद पहाटेची वेळ
मोहरल्या सार्‍या वाटा विरघळला विव्हळ
वसु-वासराचा पडे माझ्या अंगणात तळ
जिवाभावाचं वावर भरे रेशमाचं खळं

.......................अज्ञात
१२९३,नाशिक

गुलमोहर: 

>>उन्हा आली सोनकळा भला सजला श्रावण
फुलावर गोळा दंव घुमे सावळं कोकीळ
सुवासिनीचं माहेर गौर मंगला मंगळ
झिम्मा फुगडीचा फेर घर सुखाचा समेळ

शीण गेला मैलावर मंद पहाटेची वेळ
मोहरल्या सार्‍या वाटा विरघळला विव्हळ
वसु-वासराचा पडे माझ्या अंगणात तळ
जिवाभावाचं वावर भरे रेशमाचं खळं>>

व्वा! समृद्ध चित्र उभं केलत डोळ्यासमोर!

अज्ञातकाका .. 'मेघाळ आभाळ' ही शब्दरचना फारच आवडली Happy

मस्तच.... लयीत म्हणताना अजुनच छान वाटतय.

चिन्नु,
जेवणारा तृप्त झाला की पाककर्त्याला समाधान वाटतं तसं झालं. बरं वाटलं.
............................................ अज्ञात

संदीप,
अरे मी आजोबा झालो तरी मला मी "तो" वाटेन अशा माझ्या प्रकृतीत तुला काका कुठे दिसला यार! Happy असो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
.....................अज्ञात

क्षितिज,
या लयीचं श्रेय माझ्या घराच्या गच्चीतून दिसणार्‍या श्रवणाला आहे.
.......................अज्ञात

तुमच्या घराच्या गच्चीत मला यायला हवं
माझ्या वाटेचं आभाळ उरी न्यायला हवं

कौतुक,
माझ्या सर्व पाहुण्यांसाठी माझे घर आणि गच्ची मोकळी आहे. कधी येतोस ??? जरूर ये. Happy संपूर्ण आभाळ नेलंस तरी चालेल. मला पुन्हा नवीन मिळेल.
..................अज्ञात

ओहो, अतिशय सुंदर रचना, अज्ञात.
सारच सुंदर तरीही......

सण ओलावल्या रानी म्हणे 'पेरते व्हा' गाणी....
उन्हा आली सोनकळा भला सजला श्रावण.....
मोहरल्या सार्‍या वाटा विरघळला विव्हळ - कहर!

दाद,
तुझी दाद आली की खरंच धन्य वाटतं. तुझी शपथ.

सण ओलावल्या रानी म्हणे 'पेरते व्हा' गाणी....
तू म्हटल्याप्रमाणे 'पेरते व्हा' असं लिहिलं तरीही चालेल पण मी "पेरतेव्हा" असं लिहिलं कारण आमच्याकडे (विदर्भात. इकडेही खेड्यात तो असेल कदाचित. शहरातून मात्र दिसत नाही) ते एका पक्षाचं नाव आहे जो पाऊस पडल्यावर कोकिळेसारखा "पेरते व्हा पेरते व्हा" अशी शीळ घालतो.

बरं वाटलं.
.....................अज्ञात

सुरेख!! सुरेख!! सुरेख!!
डोळ्यांपुढे चित्र उभं केलत!! प्रत्येक ओळ सुंदर!!

आय टी गर्ल,
तुझ्या अभिप्रायाने माझ्यातल्या चित्रकाराचं सार्थक झालं. Happy
.....................अज्ञात