आमच्या साहेबांचे बालपण

Submitted by pradyumnasantu on 8 November, 2011 - 22:59

चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे बालपण
सहा वर्षाचं बच्चं
मडकं अजून कच्चं
आईला वाटायचं तिचं पोरगं लई ग्वाड
खरं तर होतं पक्कं कोल्हापुरी द्वाड
ताटात आई वाढायची भात आणि वरण
याला हवं असायचं रस्सा आणि मटण
नाजुकपणे आई द्यायची चिउ-काउचा घास
पोराच्या नाकात मात्र मासा-बाऊचा वास
घरी दूध दिलं तर मुळीच नाही शिवायचं
गंगावेशीत कट्ट्यावर वाडगाच तोंडाला लावायचं
मुळीच नाही आवडायची मुगामटकीची उसळ
चव घेऊन चापेल मात्र खासबागची मिसळ
संध्याकाळी शेजारच्या तालमीत जाउन बसेल
जोडीचा पैल्वान दिसला तर पटात त्याच्या घुसेल
हळुहळू मोठा होऊ लागला बाळा
बाप त्याच्यासाठी शोधु लागला शाळा
बाळा म्हणाला बाबा, शिकलं पायजे कशाला
घालायचंच तर तुम्ही मला एम.एल.जीत घाला
(बाप मिशीत हसून म्हणाला, वाघाचा बच्चा वाघावर गेला)
शाळेत मास्तर दाखवायचा त्याला प्राण्यांची चित्रं
ह्ये हरीण, ह्यो वाघ, ह्ये मांजार, ह्ये कुत्रं
दुस-या दिवशी मास्तरनं कुत्रं दाखवायला सांगितलं
बाळानं काही नं बोलता त्यांच्याकडंच रोखून बघितलं
मास्तर चांगलाच तडकला
"मी कुत्रा व्हय रं?" म्हणून भडकला
च्या मायला, पायताणानं हाणीन, जाशील बोंबलत, मास्तर शिव्या देउ लागला
तसा बाळा दप्तर घेउन सरळ घरी निघून गेला.
***
पुढचा वाढदिवस आला
बापानं ठरवला मोठा सोहळा
आक्खं कोल्हापुर झालं गोळा
चौघडा सनई वाजली
सगळी ईस्टेट सजली
केकच होता पाच मजली
गायकांनी गाणी म्हटली
कानांना गोड ती वाट्ली
अचानक बाळा लागला रडायला
हात पाय झाडायला
स्पीकर होता जवळ
त्यांमु्ळे पाहुण्यात माजली खळबळ
बाप झाला कासावीस
अले अले काय जाले जला गप बैस
गाणं म्हननार का बाळ माजा शाणा
आणा रे जरा माईक इकडं आणा
हातात येताच माईकचा गोळा
चोखणं समजून चोखू लागला बाळा
चोखताचोखता बाळाने समोर टाकली नजर
तिथे बसला होता नेमका त्याचा मास्तर
बाप म्हणाला सांग बाळा मास्तरनं काय सिकवलं शाळंत
माईक धरून बाळा ओरडला," च्या मायला, पायताणानं हाणीन, जाशील बोंबलत."

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खरंच भरून आलं.
साहेब आहे तस्सा डोळ्यासमोर नकोसा वाटणा-या चाकरांना साहेबांचं बालपण दाखवणारी ही कविता डोळ्यात झणझणीत अंजन घालते. साहेबावर निस्सीम प्रेम असल्याशिवाय का त्याच्या जन्मापर्यंतचे डिटेल्स सांगता येतात ? कर्मचारी आणि चेयरमन यांच्यातल्या या अर्थपूर्ण नात्याचा पदर उलगडून दाखवणारी एक वास्तववादी कविता ...

अधून मधून.....जी जी रं जी जी.. माझ्या बाळ्या रं जी जी, माझ्या पाटला रं जी जी...असे स्वर हवे होते. चांगला पोवाडा झाला असता