'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान'चे पाकिस्तानबद्दलचे डावपेच

Submitted by sudhirkale42 on 30 October, 2011 - 07:27

सुधीर काळे
[तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (पकिस्तानी तालिबान चळवळ-Student Movement of Pakistan-TTP) ही वेगवेगळ्या इस्लामी आतंकवादी गटांची व्यापक संघटना असून २००७च्या डिसेंबरमध्ये असे १३ गट बाइतुल्ला मेहसूद या नेत्याच्या नेतृत्वाखाली एक झाले (कांहीं बाहेरही आहेत). संघटनेचे मुख्य कार्यक्षेत्र अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पाकिस्तानचा "फाता"[१] हा प्रदेश आहे. या संघटनेची जाहीर उद्दिष्टें पाकिस्तान सरकारला प्रतिकार करणे, पाकिस्तानमध्ये शारि’या कायदा लागू करणे आणि एकत्र येऊन अफगाणिस्तानमधील नाटोच्या सैन्याविरुद्ध लढणे अशी आहेत. (२००९मध्ये बाइतुल्ला मेहसूद मारला गेला).

उद्या त्यांचा विजय होऊन त्यांनी जर पाकिस्तानमध्ये सत्ता काबीज केली तर ते त्यांचे डावपेच भारताविरुद्धही वापरतील. म्हणून त्यांच्याबद्दल माहिती असणे हितावह आहे. हाच या लेखाचा उद्देश].

(पेशावर विश्वविद्यालयात पत्रकारिता या विषयाचे प्राध्यापक असलेल्या (Professor of Journalism in Peshawar University) Prof. Syed Irfan Ashraf यांचा "TTP's Pakistan Strategy" हा लेख DAWN या पाकिस्तानी वृत्तपत्रात दि. 24th October 2011 रोजी प्रकाशित झाला. तो मला खूप आवडला. या लेखाचे हे भाषांतर आहे. त्यांच्या लेखातील कांहीं शब्दांचे अर्थ मला नीट कळले नाहींत म्हणून मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी अतीशय तत्परतेने त्यांची उत्तरे दिली. त्यातला बराच भाग टिपांमध्ये वापरलेला आहे. मूळ लेख http://www.dawn.com/2011/10/24/ttp%E2%80%99s-pakistan-strategy.html इथे वाचता येईल).

पाकिस्तानबरोबरचे सर्व "हिशेब चुकते करण्यास" आणि पाकिस्तानच्या आणि अफगाणिस्तानच्या आपापसातील अविश्वासाचे पर्व संपविण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्यास पाकिस्तानी तालिबान आंदोलन (TTP) आता सक्षम झालेले आहे.

गेली दोन-एक वर्षे कोशावस्थेत काढल्यानंतर आता ‘TTP’ च्या दुसर्‍या स्तरावरील नेतृत्वाने आपला मीडियाबरोबरचा संपर्क वाढविलेला आहे आणि त्यांनी आता पाकिस्तानी फौजेवर संघटितरीत्या आणि आत्मविश्वासाने प्रतिहल्ले करण्याच्या नव्या पर्वात पाऊल टाकले आहे.

अलीकडेच पंतप्रधान गिलानींच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. TTP च्या कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी तालिबानला चर्चेसाठी आमंत्रित करण्याचा ठराव या परिषदेत संमत करण्यात आला. त्यानंतर वार्ताहारांबरोबर टेलिफोनद्वारा केलेल्या वार्तालापात तालिबानच्या नेत्यांना या ठरावाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी TTP चे उपप्रमुख श्री फकीर महंमद यांनी अशा चर्चेची शक्यता फेटाळून लावली कारण त्यांच्या मतें "पाकिस्तान हे आता एक विश्वासार्ह राष्ट्र राहिलेले नाहीं"[२].

हे आतंकवादी हल्ली पाकिस्तान सरकारचे कां ऐकेनासे झाले आहेत? आणि सीमेपलीकडून होणार्‍या हल्ल्यांना एकाएकी असे उधाण येण्यामागील कारणे काय आहेत? दोनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने आपली स्वातमधील लष्करी मोहीम इतकी उग्र केली कीं "फाता" भागातील आपल्या शिबिरांतून पाकिस्तानवर असे हल्ले करणे TTP ला अशक्य होऊन गेले आणि त्यातूनच या समस्येचा उगम झाला.

स्वात विभागात कार्यरत असलेल्या तालिबानच्या पावलावर पाऊल टाकत वझीरिस्तानमधून शेकडो आतंकवादी बजौर विभागातील आतंकवाद्यांना येऊन मिळाले आणि त्यांनी एकत्र येऊन बजौरच्या पश्चिमेला असलेल्या अफगाणिस्तानमधील नुरिस्तान आणि कुनार या दोन प्रांतांच्या सीमेवरील महत्वाची नवी ठिकाणे व्यापली.

या स्थलांतरानंतर तालिबान संघटनेने या दोन प्रांतांत आपले बस्तान बसविण्यासाठी खूप कष्ट उचलले. इमारती लाकडाच्या धंद्याशी संबंधित असलेला माफिया आणि तालिबानविरोधी स्थानिक उच्चभ्रू नेते TTP च्या नेत्यांना कुनारमध्ये आपले बस्तान बसू देणार नाहींत हे माहीत असल्यामुळे त्यांनी प्रभावी माजी राज्यपाल मलिक झरीन खान आणि अतिरिक्त दहा लोकांचे खून केले. त्याचा परिणाम म्हणून दीर या शहराजवळील "शाही"पासून चित्राल या शहराजवळील अरुंडूपर्यंतची ८५० किमी लांबीची सीमारेषा या आतंकवाद्यांच्या प्रभावाखाली आली.

असे केल्याने पाकिस्तानी लष्करातील डावपेच आखणार्‍या तज्ञांनासुद्धा हेवा वाटावा असे यश TTP च्या आतंकवाद्यांनी मिळविले.
आपल्या पुनर्गठनामुळे आणि आपापसातील सुधारित संपर्कव्यवस्थेमुळे (networking) परिस्थितीची सारी सूत्रे आता TTP हातात होती. त्यांनी आता पाकिस्तानच्या नैऋत्य भागात दहशतवादाचे थैमान घालायला सुरुवात केली. कारण त्यांना तिथल्या स्थानीय सशस्त्र जनतेला[३] कुठल्याही भावी सुरक्षा करारात भाग घेण्यापासून परावृत्त करायचे होते. ग्रीस देशाच्या एका धर्मादायी संस्थेच्या कार्यकर्त्याचे दोन वर्षांपूर्वीचे अपहरण हा या तर्‍हेचा पहिला प्रसंग होता. बांबोराइत खोर्‍यातून केलेले सहा कामगारांचे अपहरण ही दुसरी घटना होती. त्यापैकी तिघांचा नंतर शिरच्छेद करण्यात आला होता. [४]

हे सहाजण मूळचे "वरच्या दीर"चे[५] रहिवासी होते. इथल्याच स्थानीय सशस्त्र जनतेने (civilian militia) वरच्या दीरच्या "धोग दारा" भागातून अफगाणिस्तानी तालिबान्यांना कित्येक आठवड्यांच्या घनघोर धुमश्चक्रीनंतर हाकलून दिले होते. म्हणून त्यांच्यावर सूड उगविण्यासाठी या सहा जणांचे अपहरण करण्यात आले होते. अशा तर्‍हेने वैयक्तिकरीत्या सूड उगविण्याचा कित्ता TTP ने त्यानंतरच्या कित्येक सीमापार केलेल्या पद्धतशीर घुसखोर्‍यांत गिरविला. दीर आणि चित्रालच्या वेगवेगळ्या ठिकाणी TTP च्या लोकांनी केलेल्या अशा घूसखोर्‍यात १८० माणसे, तीही बहुतांशी सुरक्षादलांची, मारली गेली.
दरोश येथील गुप्तहेर खात्याच्या अधिकार्‍याने मान्य केले कीं त्यांना अशा हल्ल्यांबद्दल कांहींशी पूर्वसूचना असायची व ते त्याबद्दलचे अहवालही सरकारकडे पाठवत असत. तरी या बेलगाम हल्ल्यांना सरकारकडून परिणामकारक प्रत्युत्तर मिळत नव्हते आणि स्थानिक अधिकार्‍यांना या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत नसायची.

निवडून आलेले लोकप्रतिनिधीही काळजीत पडले होते. "जसजशी आतंकवाद्यांची ताकत वाढत होती तसतशी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यामधील गुप्तमाहितीची घेवाण-घेवाण, मार्गदर्शनपर बैठका आणि लष्करी अधिकार्‍यांच्या परस्पर-भेटी याबद्दलचा आमचा विश्वास कमी होत चालला होता" असे चित्रल विभागाचे प्रमुख मुजफ्फर अली यांनी सांगितले.

अलीकडेच सुरक्षादलाच्या जवानांना तिथे पाठविण्यात आलेले आहे. पण या मोहिमेला लगेच यश मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल असे निरीक्षकांचे मत आहे. पण कांहीं विश्लेषक हे मान्य करत नाहींत. त्यांच्या मते पाकिस्तानी सैन्याला भुलवून त्यांना जास्त धोकादायक आघाडीवर खेचणे हाच या आतंकवाद्यांचा मूलभूत उद्देश आहे. आतंकवादाबाबतच्या एका तज्ञाच्या मतें अपहरण करणार्‍या आणि स्थानिक पैसेवाल्यांना भाडोत्री सैनिक पुरविणार्‍या संस्थांसाठी डवपेचांच्या दृष्टीने महत्वाची नूरिस्तानची जागा आणि आतंकवादामुळे कणखर बनलेले नूरिस्तानचे लोक अशा सीमापार चकमकींसाठी आदर्श आहेत.

पाकिस्तानने सैन्य तैनात केल्याने आतंकवाद्यांच्या कारवायांवर कसलाच अंकुश बसला नाहीं आणि यात आश्चर्य वाटायचे कारण नाहीं. एका आठवड्याच्या आतच खालच्या दीर[६] भागात चकमकी सुरू झाल्या. पाठोपाठ आणखी दोन-तीन चकमकी झाल्या आणि त्यात १५ आतंकवद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला. पण या हल्ल्यांमुळे सीमेच्या अफगाणिस्तानच्या बाजूला रहाणार्‍या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे हे सर्वात जास्त भयावह आहे.

सीमेवरील या चकमकींमुळे काबूल येथे उस्फूर्त निदर्शनांनी जोर धरला आणि त्यामुळे पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांमधील संबंधांत तणाव वाढला. पख्तूनिस्तानमधील दहशतवादी कृत्यांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते कीं लोकमताचा फायदा नेहमीच TTP ला मिळतो. इथेही सीमेवरील प्रतिगामी संस्कृतीचा फायदा TTP च्या आतंकवाद्यांना मिळतो व ते सरकारच्या नाजूक परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतात. याही वेळी पाकिस्तानची परिस्थिती नाजूकच आहे.

आतंकवाद्यांचा एक-कलमी कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे पाकिस्तानवर जबरदस्त वार करणे. या पार्श्वभूमीवर जर आतंकवाद्यांच्या ताकतीचा अभ्यास केल्यास TTP कडून पाकिस्तानला असलेला धोका स्थलांतरानंतर प्रमाणाबाहेर वाढला आहे.
अलीकडेच मीडियाला पाठविलेल्या निवेदनात TTP च्या सरदारानी भलतीच थेट स्वरूपाची भाषा वापरलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या नाटोच्या फौजांवर हल्ले करण्याआधी आम्हाला पाकिस्तानी लष्कराबरोबरचा आमचा हिशेब चुकता करायचा आहे असे TTP च्या स्वात विभागाचे माजी प्रवक्ते सिराजुद्दिन यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या नैऋत्य विभागाला अस्थिर करण्याच्या TTP च्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी पाकिस्तानने १०,००० सैनिक तिथे तैनात केले आहेत, पण तरीही त्यांचे हे उद्दिष्ट किती यशस्वी होईल याचे आताच भाकित करणे सोपे नाहीं. पण हे काम वाटते त्यापेक्षा जास्त गंभीर आणि कठीण आहे हे नक्की.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही कीं TTP ने चित्राल येथे २७ ऑगस्टला केलेल्या हल्ल्याला मदत केल्याबद्दल पाकिस्तानने नाटोलाच दोष दिला आहे. यात पाकिस्तानचे ३१ सैनिक धारातीर्थी पडले होते. एक मित्रराष्ट्र एका खतरनाक आतंकवादी संघटनेला दुसर्‍या मित्रराष्ट्राविरुद्ध सहाय्य करेल यावर विश्वास ठेवणेच कठीण. पण हे प्रत्यक्ष पाहिलेल्यांच्या साक्षी फारच बोलक्या आहेत.

या चकमकीच्या भागाला मी (अश्रफसाहेबांनी) दिलेल्या अलीकडच्याच भेटीत नाटोने TTP च्या आक्रमणाला हवाई संरक्षण दिले होते हे उघड दिसत होते! यावेळची नाटोंच्या विमानांची उड्डाणे नेहमीची "टेहेळणीची उड्डाणे" होती या विधानांबद्दल मला (अश्रफसाहेबांना) शंका आहे कारण सीमेपासून कांही मीटर्स अंतरावर उभे असलेले अझीझुल्ला म्हणाले, "आम्ही इथेच रहातो आणि हवाईदलाची नेहमीची टेहळणीसाठी केलेली उड्डाणे आणि असामान्य हवाई हालचाली यांच्यातील फरक आम्हाला नक्कीच समजतो!"

लगेच यानंतर काबूलवर दोन हल्ले पाठोपाठ झाले आणि एका आत्मघातकी बाँबहल्ल्यात अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष बरहानुद्दिन रब्बानी ठार झाले. या घटनांनंतर या प्राणघातक युद्धात कोण काय करत आहे हे कांहींसे स्पष्ट झाले. अमेरिकन अधिकार्‍यांनी तर काबूलवरील या हल्ल्यांचा "पाकिस्तानच्या समर्थनाने हक्कानी आतंकवाद्यांच्या टोळीने सूडभावनेने केलेला प्रतिहल्ला" असा अर्थही लावून टाकला.
या पार्श्वभूमीवर एकमेकांवर दोषारोप करण्याचा हा सततचा प्रकार पाहून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिका या दोन देशांमधील वितुष्ट इतके विकोपाला गेलेले आहे कीं पाकिस्तानला आणि अफगाणिस्तानला अफगाणिस्तानचे अवघड त्रांगडे गुण्यागोविंदाने रक्तपात न होऊ देता आपापसात सोडवताच येणार नाहीं. "तुम्ही आमच्या शत्रूंना मदत करा, आम्ही तुमच्या शत्रूंना मदत करू" या तत्वावर सारे काम चालले आहे असेच अनुमान एका संरक्षणविषयक विश्लेषकाने केले!

टीप -

[१] Federally Administered Tribal Areas. यात पाक अफगाण सीमेवरील डोंगराळ भाग येतो. त्यात उत्तर आणि दक्षिण वझीरिस्तान आणि इतर कांही भाग मोडतात. खालील नकाशे पहा.

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/06/Swat_NWFP.svg/5...

http://fata.gov.pk/images/stories/fata1.png

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5e/Federally_Admin...

[२] यांचेही मत भारतासारखेच?-अनुवादक

[३] मूळ लेखकाने ई-मेलद्वारा दिलेली माहिती: जेंव्हां पकिस्तान सरकारला आतंकवाद्यांशी युद्ध करायचे असते तेंव्हां ते non-tribal भागात तिथल्या जनतेला सुरक्षा-मंडळे निर्माण करण्याची विनंती करते तर tribal भागात "लष्करी" लोकांना हे काम सांगितले जाते. लष्करी म्हणजे स्थानीय सशस्त्र जनता (Civilian Militia). हे लोक सुरक्षेसाठी नागरिकांची मंडळें स्थापन करतात आणि ही मंडळे पाकिस्तानी सैनिकांच्या बाजूने आतंकवाद्यांशी लढतात. त्यामुळे आतंकवादी नेहमी या सुरक्षा-मंडळातल्या लोकांना त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना मदत करू नये म्हणून धमक्या देतात. या मंडळातले बरेचसे लोक पंजाबच्या आतल्या भागातून-खेड्यापाड्यातून-आलेले असतात आणि त्यांना फाता विभागाबद्दल फारशी जाणीव नसते. आतंकवादी नेहमीच गनिमी पद्धतीने लढतात आणि त्यामुळे या सुरक्षा मंडळांची मदत फारच निर्णायक ठरते. म्हणून कुठेही हल्ला करायच्या आधी जनतेने सैन्याची बाजू घेऊ नये म्हणून आतंकवादी त्याबद्दल सखोल अभ्यास करतात. यासाठी ते त्यांना धमक्या देतात, बर्‍याच लोकांना अतीशय क्रूरपणे ठार करतात आणि जे लोक सैन्याला पाठिंबा देतात त्यांचा अनन्वित छळ करतात. तरीही स्वातमधील मोहिमेनंतर खूप पठाणांमध्ये तालिबानविरोधी लोकमत तयार झाले आहे आणि ते तालिबानविरुद्ध सशस्त्र लढा द्यायला तयार होतात. शत्रूबरोबर असे एकत्र होऊन लढायची पठाणांची परंपराच आहे.

[४] Upper Dir

[५] मूळ लेखकाने ई-मेलद्वारा दिलेली माहिती: स्थानीय सशस्त्र जनता पठाणी परंपरेनुसार स्वेच्छेने शत्रूविरुद्ध लढा जाहीर करून एकत्र येते. दोन-एक वर्षांपूर्वी मलकांड डिव्हीजनमधील वरच्या दीर जिल्ह्यातील धोग दारा विभागातील सात खेडी एकत्र आली आणि त्यांनी तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणा केली. या खेडूत लढवय्यांनी अफगाणी तालिबानच्या एका गटावर हल्ला केला. हे अफगाणी तालिबानचे लोक धोग दाराच्या आसपास रहात होते आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ले सुरू केले होते. या तालिबान्यांना खेडूत लढवय्यांनी तिथून पिटाळून लावले. म्हणून या तालिबान्यांनी सूड घेण्यासाठी धोग दारातील या सहाजणांचे चित्रालमधून अपहरण केले आणि त्यांना ठार केले आणि सर्वांना जणू एक संदेशच दिला कीं जे लोक तालिबानशी लढतील त्यांना योग्य संधी मिळताच अशीच शिक्षा दिली जाईल.

[६] Lower Dir

हा लेख दि. २९ ऑक्टोबर २०११ रोजी ई-सकाळवर प्रसिद्ध झाला.
लिंक आहे: http://72.78.249.107/esakal/20111029/5314141164214683280.htm

गुलमोहर: 

काळेसाहेब,

नुकतेच मूळच्या एका पाकिस्तानी पत्रकाराने लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा (Al Qayada Connection) मराठी अनुवाद - "अल् कायदाचे धागेदोरे" - वाचला. त्यात TTP व इतर अनेक पाकिस्तानी-अफगाणी अतिरेकी संघटनांची व त्यांच्या नेत्यांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यात १९८८ पासून लादेनच्या २०११ मधल्या हत्येपर्यंतच्या सर्व घटना लिहिलेल्या आहेत.

मास्तुरेसाहेब,
कृपया मूळ पुस्तकाचे नांव आणि त्याच्या लेखकाचे नांव कळवा. मला ते मूळ पुस्तक वाचायला आवडेल. तसेच मराठी अनुवादाच्या प्रकाशकाचे नांव/फोन नं कळवाल का? माझ्या 'न्यूक्लियर डिसेप्शन'साठीही मी प्रकाशक शोधतो आहे.

काळेसाहेब,

ही आहे पुस्तकाची माहिती -

मूळ इंग्लिश पुस्तक - The Al Qaeda Connection
मूळ पाकिस्तानी लेखक-पत्रकार - Imtiaz Gul
ही मूळ पुस्तकाबद्दलची संक्षिप्त माहिती - http://www.penguinbooksindia.com/category/Non_Fiction/The_Al_Qaeda_Conne...

मराठी अनुवाद - अल् कायदाचे धागेदोरे
अनुवादक - रेखा देशपांडे (जून २०११ मध्ये हा अनुवाद प्रसिद्ध झाला)
प्रकाशन - अक्षर प्रकाशन (www.aksharprakashan.com)
जरिवाला बिल्डिंग नं. १, A विंग,
Room no. 7, टी के कटारिया मार्ग,
माहिम, मुंबई - ४०००१६
प्रकाशक - चंद्रकांत माळगवे (चलभाष : ९३२२३-९१७२०)

या पुस्तकात पाकिस्तान व अफगाणिस्तान मधील FATA, पेशावर, वायव्य सरहद्द प्रांत, खैबर खिंड इ. प्रांतातील अनेक अतिरेकी संघटनांची सविस्तर माहिती व आकडेवारी आहे व त्यामुळे पुस्तक बर्‍यापैकी कंटाळवाणे आहे.

काळे साहेब दिवाळीच्या शुभेच्छा.

आपला लेख नेहमी प्रमाणेच खूप माहितीचा देणारा व विचार करवणारा आहे.

पाकिस्तान परत खालिस्तान चळवळीला खतपाणी घालायला लागली आहे त्याला सरकारने वेळीच आवर घातला नाही तर परत तो प्रश्न डोक काढेल.

काळेजी दिवाळीच्या शुभेच्छा !!! नेहेमी प्रमाणेच माहीती पूर्ण लेख.

भारत सरकार कधीही PROACTIVE नव्हते, परराष्ट्रीय विषयासंबंधात ना आंतर देशीय विषयात.
एक वेळ पाकीस्तानच्या बद्द्ल काहीही करू शकत नाही हे मान्य, पण बांग्ला देश,, नेपाळ, श्री लंका बाबतीत ही
आपले धोरण गुळ मुळीतच आहे पूर्वी पासून.

आजचीच बातमी तामिळनाडू मधील कुंदनकुलम येथील रु १३००कोटी निवेश असलेल्या अणू विज
प्रकल्पाला स्थानिक निवाश्याचा विरोध. हे स्थानीक निवसी कोण तर, कुन्दनकुलम येथील कोळी समाज.

विषेश म्हणजे हा प्रकल्प रशीया बरोबर करार करून गेल्या १०-१२ वर्षा पासून चालू आहे व प्रकल्प ९०%
पूर्णत्वा कडे आहे व ९०% निवेश हा खर्च झालेला आहे. ह्या प्रकल्पात ९.२ TW ( 9200 MW) वीज निर्मीती
होणार आहे. पूर्वी ह्या प्रकल्पाला विरोध झाला नव्हता. गेल्या ५-६ महीन्यातच विरोधाचे वारे वाहू लागले
आहेत.

ह्या प्रकल्पाला विरोध करणारे सर्व कोळी बांधव व महीला या काथोलीक चर्च ग्रूपचे मेंबर आहेत. ह्या
मेंबरर्सना ह्या विरोधाच्या जागी कित्येक महीने लोकानी पाहीले आहे व आश्चर्य व्यक्त केले जात आहे की यांना विरोध करण्यार्या कार्यकर्त्याना उपजिविके साठी काही करावे लागत नाना, ते आपल्या घरी सुद्धा जात नाहीत. की या सर्वाचा बोलवता धनी कोणी तरी दुसराच आहे व तो ह्या सर्वांची सोय लावून आहे.

यावर बरीच माहीती इंटर नेट वर उपलब्ध आहे. ह्या प्रकरणावर खा सुब्रमण्यम स्वामी सू द्धा लक्ष ठे वून आहेत.

विवेक नाईक-जी आणि रणजीत चितळे-जी,
कांहीं नवीन आणि अर्थपूर्ण मुद्दे उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.

>>> पाकिस्तान परत खालिस्तान चळवळीला खतपाणी घालायला लागली आहे त्याला सरकारने वेळीच आवर घातला नाही तर परत तो प्रश्न डोक काढेल.

१९८० च्या दशकात सुरू झालेल्या खलिस्तान चळवळीचा मुख्य पुरस्कर्ता पाकिस्तान होता. त्याचबरोबरीने परदेशातील, मुख्यतः इंग्लंड व अमेरिकेतील काही शीख या चळवळीला आर्थिक मदत करत होते. १९८९ मध्ये रशियाने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यावर, बेकार झालेल्या मुस्लिम अतिरेक्यांना पाकिस्तानने काश्मीरच्या दिशेने वळविले व त्यांना आर्थिक, राजकीय व शस्त्रास्तांची मदत सुरू केली. भारताला काहीही करून अनेक जखमा करून रक्तबंबाळ करणे हे पाकिस्तानचे मुख्य ध्येय होते. खलिस्तान्यांनी त्या ध्येयाला १९८० पासून साथ दिली. १९९० पासून मुस्लिम अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये तेच धोरण सुरू केल्यावर, पाकिस्तानचा खलिस्तान चळवळीचा ओघ आटला. तरीही ती चळवळ आधी मिळालेल्या मोमेंटममुळे १९९५ पर्यंत सुरू राहिली. १९९५ मध्ये खलिस्तान्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बिआंतसिंग व इतर १७ जणांची बॉम्बस्फोटात केलेली हत्या हा खलिस्तान्यांचा शेवटचा अतिरेकी हल्ला. त्यानंतर ही चळवळ थंडावली.

या चळवळीला पाकिस्तानच्या पाठिम्ब्याप्रमाणे अकाली दलातील व अकाल तख्तमधील सत्तासंघर्ष देखील कारणीभूत होता. अकाली दलातील प्रमुख नेते - भिंद्रनवाले, लोंगोवाल, तोहरा इत्यादींचा विविध कारणांनी मृत्यु झाल्याने व १९९२ पासून आळीपाळीने काँग्रेस व अकाली दल सत्तेवर येऊ लागल्याने तो प्रश्न मिटला. आंतरराष्ट्रीय जगतात दहशतवादाविषयी जागृती झाल्याने व हवाला व्यवहारांवरील कडक नियंत्रणाने परदेशातील शीखांना देखील या चळवळीला उघड आर्थिक मदत देणे कठीण होत गेले. दरम्यानच्या काळात भारताचे अमेरिका व इंग्लंडशी संबंध सुधारल्याने देखील या चळवळीचा जागतिक पाठिंबा कमी झाला. १९९८ पर्यंत अमेरिकेतला गुरमित सिंग औलख नावाचा शीख खलिस्तानसाठी अमेरिकन सिनेटर्स मध्ये लॉबिइंग करत होता. सध्या तो हे कितपत करतो याची कल्पना नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खलिस्तान चळवळ व दहशतवाद यामुळे आपले जबरदस्त नुकसान होत आहे व पंजाब हे वेगळे राष्ट्र म्हणून सुरक्षित राहणार नाही, अशी पंजाबी जनतेची देखील मनोभूमिका झाल्याने चळवळ थंडावली.

खलिस्तान चळवळ १९९५ मध्येच पूर्णपणे संपली. आता २०११ मध्ये किंवा नंतर ती चळवळ पुन्हा सुरू होण्याची सुतराम शक्यता नाही.

खलिस्तान चळवळ १९९५ मध्येच पूर्णपणे थांबली. आता २०११ मध्ये किंवा नंतर ती चळवळ पुन्हा सुरू होण्याची सुतराम शक्यता नाही.
---- सुतराम शक्यता नाही असे म्हणणे हार धाडसाचे ठरेल. त्याकाळी प्रयत्न केला, तब्बल १५ वर्षे लढा चालला, अयशस्वी झाला. पण पुन्हा नव्याने प्रयत्न होणारच नाही असे म्हणता येत नाही. अशा प्रकारच्या युद्धात पाकला गमावण्यासारखे काहीच नाही आहे... आणि भारताची मोठी शक्ती व्यस्त रहाते.

काळेसाहेब,
नेहेमी प्रमाणे माहीतीपूर्ण लेख.

आजचीच बातमी तामिळनाडू मधील कुंदनकुलम येथील रु १३००कोटी निवेश असलेल्या >>
विवेक नाईक, बातमी इथे दिल्याबद्दल धन्यवाद. हे वाचण्यात आले नव्हते.

श्री. सुधीर काळे,

आपले लेखन नेहेमी वाचत असतो. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर, वृत्तपत्रांवर बारकाईने नजर ठेवून, भारतासाठी महत्वाच्या विषयांवरील लेखांचा ज्या सातत्याने आपण पाठपुरावा करता, अनुवाद करता आणि मांडणीत त्रुटी राहू नये म्हणून जे विशेष प्रयत्न करता ते खरोखरच अतिशय कौतुकास्पद आहे.

न्यूक्लिअर डिसेप्शन या पुस्तकाचा आपण केलेला अनुवादही उत्तम झाला आहे.

इथे काय आणि इतरत्र काय, काही चिल्लर खोडसाळ प्रतिसाद येणारच, त्याकडे दुर्लक्ष करुन आपला हा उपक्रम अधिक नियमितपणे सुरू ठेवा ही विनंती. आपले लेखन आवर्जुन वाचणारे, पण ज्यांचे प्रतिसाद द्यायचे राहून जाते असे माझ्यासारखेच अनेक वाचक असतील याची खात्री बाळगा.

पुन्हा एकदा धन्यवाद.

मास्तुरे , टण्याने अन्य्त्र लिहिल्याप्रमाणे , खलेस्तान व एल्टीटीई चळवळीत अमेरिकेसारख्या महासत्तांचे हितसंबंध गुन्तलेले नसल्याने त्यात त्याना काही रस नव्हता त्यामुळे त्या स्थानिक प्रशासनाला नष्ट करता आल्या हेही कारण आहे आणि ते सयुक्तिक पण आहे....

अनुवाद इथे टाकल्याबद्दल धन्यवाद. नवीन माहिती मिळाली.

जीएस, पूर्ण अनुमोदन. काळेसाहेब, आपण खरोखरच सातत्याने ह्या विषयावर लिहिता. नुसते इथेच नाही तर इतर संकेतस्थळांवर, इ-सकाळमध्येही आपण प्रकाशित करता. तुमचा हा उपक्रम खरोखर आदरणीय आहे. आपण असेच लिहीत रहावे ही विनंती.

जीएस, फचिन , १००% अनुमोदन....

काळे साहेब तुम्ही लिहित रहा.... कारण तुम्ही लिहिल्याने सर्वसामान्य वाचकाला आंतरराष्ट्रीयघडाममोडी

मागील अंतरंग कळतात, अन्यथा वाचका समोर सादर केलेली प्रत्येक बातमी ही त्या त्या प्रसार माध्यमाच्या

धोरणाप्रमाणे त्या त्या चष्म्यातून सादर केली जाते, रंगवली जाते. ह्या प्रसार माध्यमाच्या धोरणात भारताच्या

हिताचा कोणीही विचार करताना दिसत नाही,

काळेसाहेब आपण लिहीता हे चांगल आहे.

भारताच्या अदुरदर्शी पणामुळे परराष्ट्रीय किंवा अतिरेक्यांविरुध्दच्या धोरणातल्या घोडचुका लोकांच्या समोर येतील.

यावर जेव्हां किमान जाग्रुती होईल तेव्हाच भारताची दुर्दशा संपले.

>>> मास्तुरे , टण्याने अन्य्त्र लिहिल्याप्रमाणे , खलेस्तान व एल्टीटीई चळवळीत अमेरिकेसारख्या महासत्तांचे हितसंबंध गुन्तलेले नसल्याने त्यात त्याना काही रस नव्हता त्यामुळे त्या स्थानिक प्रशासनाला नष्ट करता आल्या हेही कारण आहे आणि ते सयुक्तिक पण आहे....

सहमत. खलिस्तान चळवळ पूर्णपणे थांबण्याचे हेही एक कारण आहे. पण ही चळवळ पुनरूज्जिवीत होईल असे मात्र वाटत नाही.

खलिस्तान चळवळ पूर्णपणे थांबण्याचे हेही एक कारण आहे. पण ही चळवळ पुनरूज्जिवीत होईल असे मात्र वाटत नाही.
----- वाटत नाही या गोष्टीला अर्थ नाही. लाहोरला बस नेतांना कारगिलची तयारी सुरु होती, कुणाला कल्पना होती. हिंदी - चिनी भाई- भाई नारा देतांना १९६२ मधे चिन युद्ध छेडेल असे कुठे वाटले होते.

हे तर low cost या प्रकारचे युद्ध आहे. गुंतवणुक कमी, आणि तुलनेने भारताचे फार मोठे नुकसान.

सदा सर्व काळ सतर्क रहावे एव्हढेच मला सांगायचे आहे.

खलिस्तान चळवळ पूर्णपणे थांबण्याचे हेही एक कारण आहे. पण ही चळवळ पुनरूज्जिवीत होईल असे मात्र वाटत नाही >>

मास्तुरे, बाजो -
ही चळवळ पूर्णपणे थांबली असे तुम्हाला वाटत असेल तर ते अर्ध्यसत्य आहे. अमेरिकेतील कॅलीफोर्नियाभागात व कॅनडामध्ये ह्या चळवळीचे अनेक कार्यकर्ते व पाठींबा देणारे राहतात. दर १५ ऑगस्टला वगैरे आय हेट इंडिया चे बॅनर, पोस्टर्स इ पाहायाला मिळतील. लंडन मध्ये खलिस्थान्याचे मुख्य कार्यालय आजही आहेच. भारतात कोणी भाव देत नाही हे मात्र खरेच.

काळेसाहेब नेहमीप्रमाणेच ..

काळेसाहेब मिडल इस्ट व पाकवर भाष्य करणारे पंडित म्हणून तुम्ही CNN इंडीया सारख्या वाहिन्यांना का संपर्क करत नाहीत? इथे अजून हा प्रकार नवीन असला तरी अमेरिकेत एख्यादा देशावरील पंडित अनेक चर्चात भाग घेतात, हळू हळू भारतीय मिडीया मध्ये पण हे होणार. आणि जितके निदान मी तरी वाचतो / ऐकतो त्यात पाक वर एवढे व्यवस्थित बोलणारा मला कोणीही भारतीय पत्रकार पण दिसला नाही. तुम्ही सिरियसली ह्याचा पाठपुरावा कराच.

>>> ही चळवळ पूर्णपणे थांबली असे तुम्हाला वाटत असेल तर ते अर्ध्यसत्य आहे. अमेरिकेतील कॅलीफोर्नियाभागात व कॅनडामध्ये ह्या चळवळीचे अनेक कार्यकर्ते व पाठींबा देणारे राहतात. दर १५ ऑगस्टला वगैरे आय हेट इंडिया चे बॅनर, पोस्टर्स इ पाहायाला मिळतील.

स्वतःला "कौन्सिल ऑफ खलिस्तान्"चा स्वयंघोषित अध्यक्ष म्हणवून घेणारा अमेरिकास्थित गुरमितसिंग औलख शांत झालाय की अजून खलिस्तानचा पाठपुरावा करतोय?

१९८० व ९० च्या दशकात परदेशातून खलिस्तानला पाठिंबा देणारे एकदम आपला विचार बदलणार नाहीत. १५ ऑगस्ट व इतर काही दिवशी ते पोस्टर्स, बॅनर्स फडकावणारच. लाहोरजवळच्या, एका शीखांच्या धार्मिक स्थानाला, एका विशिष्ट उत्सवाच्या दिवशी भेट द्यायला दरवर्षी भारतातून अनेक शीख जातात. तिथे सुद्धा पाकिस्तानस्थित काही मूठभर शीख खलिस्तानचे बॅनर्स दाखवत असतात. पण ते तेवढ्यापुरतेच. अमेरिका किंवा पाकिस्तानमधल्या काही थोड्या शीखांचा अजूनही ह्या चळवळीला पाठिंबा असला तरी, ही चळवळ पुन्हा सुरू होणार नाही.

खलिस्तानची मागणी करण्यामागची बरीचशी मुख्य कारणे संपुष्टात आली आहेत. अकाल तख्तातल्या दोन गटातला संत्तासंघर्ष, पाकिस्तानने आर्थिक, राजकीय व शस्त्रांस्त्रांच्या स्वरूपात दिलेला पाठिम्बा, शीखांवर अन्याय होत असल्याचा कांगावा (इंद्रकुमार गुजराल व मनमोहन सिंग हे २ पंजाबी पंतप्रधान झाल्यावर हा कांगावा करण्याचे कारणच राहिले नाही), अकाल तख्ताची चळवळीपासून फारकत, पंजाब पोलिसांनी केलेली अत्यंत कठोर कारवाई, चळवळीत एक संपूर्ण पिढी होरपळून निघाल्याने सर्वसामान्य शिखांचा झालेला चळवळीविषयीबद्दलचा भ्रमनिरास, पाकिस्तानविषयी झालेला भ्रमनिरास, आर्थिक उदारीकरणाने आलेली समृद्धी इ. अनेक कारणांमुळे ही चळवळ थंडावली. त्याचबरोबर, कितीही तीव्र चळवळ केली व अतिरेकी हल्ले केले, स्वतंत्र खलिस्तानसाठी कितीही किंमत मोजली तरी, भारत, पंजाब हे राज्य भारतीय संघराज्यातून कधीही बाहेर पडून देणार नाही, याविषयी सर्वसामान्य शिखांची खात्री झाली आहे. तसेच स्वतंत्र झाल्यावर भारत व पाकिस्तान यांच्या संघर्षात खलिस्तान भरडून निघेल तसेच पाकिस्तान खलिस्तानला सुखाने जगू देणार नाही, हे उघडच आहे. भारतात तर १९९५ पासून ही चळवळ म्हणजे एक डेड मूव्हमेंट आहे.

या चकमकीच्या भागाला मी (अश्रफसाहेबांनी) दिलेल्या अलीकडच्याच भेटीत नाटोने TTP च्या आक्रमणाला हवाई संरक्षण दिले होते हे उघड दिसत होते! यावेळची नाटोंच्या विमानांची उड्डाणे नेहमीची "टेहेळणीची उड्डाणे" होती या विधानांबद्दल मला (अश्रफसाहेबांना) शंका आहे कारण सीमेपासून कांही मीटर्स अंतरावर उभे असलेले अझीझुल्ला म्हणाले, "आम्ही इथेच रहातो आणि हवाईदलाची नेहमीची टेहळणीसाठी केलेली उड्डाणे आणि असामान्य हवाई हालचाली यांच्यातील फरक आम्हाला नक्कीच समजतो!"

>>>
नाटो असे करेल हे जवळ जवळ अशक्य वाटते. पाकिस्तानात तालेबान आणुन नाटोला काय मिळणार?
याउलट ती "टेहेळणीची उड्डाणे" असणार, पण सर्वसाधारण टेहेळणी नसुन नाटो कदाचित TTP वर या भागात हल्ला पण चढवेल. नाटो आजकाल पाकिस्तान लष्कराला विश्वासात घेत नाही कारण अशा हल्ल्यांची माहिती पाकिस्तान लष्करातील हकानी नेटवर्क मधुन शत्रुपक्षाला लगेच कळते.
"नाटोने TTP च्या आक्रमणाला हवाई संरक्षण दिले होते" हे विधान मला लुफ्तवाफेने मित्रराष्ट्रांच्या हल्ल्याला संरक्षण दिले इतके हास्यास्पद वाटले. अर्थात आपला लेख माहितीपुर्ण आहे, मी मुळ लेखकाच्या विधानाबाबत बोलत होते.

पाकिस्तान प्रेणित खालिस्तान चळवळ पुन्हा उगम घेऊ पाहात आहे. अंबाला येथे मिळालेल्या स्फोटकात हे सिद्ध झाले आहे - मास्तुरे, ही चळवळ थांबली असे आपल्याला का वाटते मला कळले नाही. आपण जर डोळ्यात तेल घालून बसलो नाहीतर पंजाबात काय पण राजस्थानात सु्द्धा सुरवात होऊ शकते.

आपण जर डोळ्यात तेल घालून बसलो नाहीतर पंजाबात काय पण राजस्थानात सु्द्धा सुरवात होऊ शकते.
----- अनुमोदन, सतर्क राहिले तर नुकसान काय आहे? (शत्रुच्या) हेतूंबाबात शंका असायचे कारणच नाही....

जर कोणाला खालिस्तान चळवळीबद्दल खात्री करायची असेल तर हे पहा, ह्या नुसार पाकिस्तान खालिस्तान चळवळ पुनरुत्जिवीत करू पहात आहे.

भारताने बांगलादेशाची निर्मीती करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याचा त्यांना बदला घ्यायचाय.
बर्याच वर्षापासून पाकिस्तान प्रयन्तांत आहे. india today mag 2.jpg

Ref: India Today International Edition Dtd: Nov 14th

>>> जर कोणाला खालिस्तान चळवळीबद्दल खात्री करायची असेल तर हे पहा, ह्या नुसार पाकिस्तान खालिस्तान चळवळ पुनरुत्जिवीत करू पहात आहे.

माहितीबद्दल धन्यवाद! पाकिस्तान खलिस्तान्यांना फूस देत राहणार यात शंका नाही. पण आता त्या चळवळीचे पुनरूज्जीवन होणार नाही असे मला म्हणायचे आहे. कारण या चळवळीला आता पंजाबमधूनच पाठिंबा राहिलेला नाही आणि स्थानिक पाठिंब्याशिवाय कोणतीही चळवळ उभी राहू शकत नाही. अर्थात सावध राहिलेच पाहिजे. गाफील बसून राहिलो तर पश्चातापाची वेळ येऊ शकेल.

सर्वश्री रणजीत चितळे, विवेक नाईक, जीएस, फचिन, नितीनचंद्र, केदार, limbutimbu, निलिमाताई आणि आरतीताई
लेख लिहिल्यावर ३-४ दिवस अभिप्राय पहायला बर्‍याचदा ’मायबोली’वर येणे होते आणि प्रतिसाद आटायला लागले कीं येणे-जाणे कमी-कमी होत शेवटी थांबते. आज बर्‍याच दिवसानी इकडे डोकावलो अणि इतके सुंदर प्रतिसाद वाचून इतके दिवस न फिरकल्याबद्दल वाईट वाटले. आपल्या प्रतिसादांकडे इतके दिवस दुर्लक्ष केल्याबद्दल क्षमस्व.
आपणा सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद देतो!
कित्येक प्रतिसादांना त्या प्रतिसादांच्या खालीच उत्तरे दिली आहेत.
माझा आगामी लेख चीन-भारत तंट्यावर आहे. माझ्यासाठी हा विषय नवा आहे. जरूर वाचा!
पुनश्च धन्यवाद
सुधीर काळे

Pages