मांगल्याचे औक्षण करूनी..

Submitted by प्राजु on 25 October, 2011 - 19:57

मेंदी भरले पाऊल घेऊन
पहाट अवतरली..
अलगद नाजूक, धरतीवरती
चाहूल थरथरली..

जागी झाली सृष्टी सारी
ऐकून भूपाळी
निळेजांभळे क्षितिज तेव्हा
झाले सोनसळी

क्षितिजावरती डोकावुनीया
हळूच तो हसला
आळसावल्या चराचराला
सूरही गवसला

लगबग झाली दहादिशांतुन
तया पाहण्याला
ओलेत्याने सज्ज जाहल्या
जणू स्वागताला

धरतीवरती शिंपण झाले
सडा रांगोळ्यांचे
मनी मानसी दीप उजळले
नविन आशांचे

काळोखाची संपून जाईल
मुजोर बळजोरी
आकांक्षांची किरणे येतील
हसून सामोरी

नविन आशा आकांक्षांनी
भरु दे ही झोळी
मांगल्याचे औक्षण करूनी
हसेल दिवाळी..

- प्राजु

गुलमोहर: