हुंदका

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हुंदका साधा तुझा सांगून गेला
प्राण माझा देह हा सोडून गेला

दाट होते मेघ गगनी भारलेले
नीर भरला मेघ का वाजून गेला

आज चुकले बोल माझे का सख्यारे
जीव हा माफी तुझी मागून गेला

दुःख जाण्याचे असे येथे क्षणाचे
गाव माझा आज मज विसरून गेला

भार जो तो हा तनाचा वाहतो रे
प्राण हा अतनू जणू होऊन गेला

काळ, सीमांचा न आता बंध देही
लौकिकाचे पाश ही तोडून गेला

देह असता, आस जी जीवास होती
अंतराळी आज ती सांडून गेला

सांग मज पाण्यात टाळी वाजते का
शांत डोहा कोण हादरवून गेला

भास ग्रीष्माचे, कसे होती वसंती
बहर बागेचा कसा उधळून गेला

मावते ब्रह्मांड का डोळ्यात सारे
भाव विश्वाचे कसे दावून गेला

जीवनाचा कलह जीवा व्यर्थ भासे
श्रीहरीच्या संगती रंगून गेला

सुधीर

प्रकार: 

अरे 'हुंदका साधा तुझा' ही तर जयवीची कविता आहे ना? मला आता नकी पुर्ण बोल आठवत नाही पण हेच होती वाटते.
चु. भू. द्या. घ्या.

जयावीची 'हुंदका साधा तुझा' वेगळी आहे..

manuswini वैभव जोशीनी मराठीगझल.कॉम वर कार्यशाळा घेतली होती. त्यातली ही गझल आहे, त्यामुळे तुला अशा अनेकजणांच्या गझल दिसतील

ITgirl धंन्यवाद

प्राण हा अतनू जणू होऊन गेला>> अतनू असा शब्द आहे का?? निव्वळ माहिती करुन घेण्याच्या उद्देशाने विचारतोय.
बाकी छान आहे.

मस्त ग़ज़ल! Happy

<<हुंदका साधा तुझा सांगून गेला
प्राण माझा देह हा सोडून गेला

दुःख जाण्याचे असे येथे क्षणाचे
गाव माझा आज मज विसरून गेला

सांग मज पाण्यात टाळी वाजते का
शांत डोहा कोण हादरवून गेला

मावते ब्रह्मांड का डोळ्यात सारे
भाव विश्वाचे कसे दावून गेला>>

या द्वीपदी आवडल्या.

"हुंदका माझा तसा बंदिस्त आहे..
आसवांना लावलेली शिस्त आहे!" हा इलाहींचा मथळा आठवला.

भ्रमरप्रमाणे मलाही 'अतनु' या शब्दाचा अर्थ समजला नाही.

शरद