अमेरिका मुर्दाबाद!

Submitted by sudhirkale42 on 22 October, 2011 - 01:36

(या कामरान शफ़ी यांनी लिहिलेल्या आणि २९ सप्टेंबर २०११ रोजी "एक्सप्रेस ट्रिब्यून"मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या "Hate America, Crush America" या सुंदर लेखाचा मी अनुवाद केलेला आहे. हा आजच ई-सकाळवरही प्रकाशित झालेला आहे. या लेखात आलेले प्रथमपुरूषी उल्लेख लेखकाबद्दलचे आहेत.)

पाकिस्तानातील एका बाजारात ’अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍या पाकिस्तानी नागरिकांचा "वॉल स्ट्रीट जर्नल"मध्ये गेल्या बुधवारी प्रसिद्ध झालेला फोटो खूप लोकांनी पाहिला असेल. पाहिला नसेल तर तो http://si.wsj.net/public/resources/images/P1-BC689_MULLEN_G_201109271847... इथेही पहाता येईल. सगळ्यात पुढे डाव्या बाजूला संतापाने वेडा-वाकडा झालेल्या चेहर्‍याचा एक दाढीवाला माणूस आणि त्याच्या आजूबाजूला यथा-तथा कपडे घातलेले १०-१५ लोक! पण नीट पाहिल्यास दिसेल कीं खरी परिस्थिती तशी नाहीं कारण या निदर्शकामागील हे लोक छद्मीपणे हसताना दिसत आहेत!

त्या निदर्शकांच्या हातात फलक आहेत आणि ते निदर्शक वार्ताहारांच्या पुढे-पुढे करत आपापले फलक कॅमेर्‍यांच्या भिंगांसमोर आणत आहेत. फलकांवर "अमेरिका मुर्दाबाद", "अमेरिकेला चेचून टाका" यासारख्या घोषणा लिहिलेल्या आहेत. यातले बहुसंख्य निदर्शक जहालमतवादी वृत्तपत्रांच्या पाठिंब्यावर जमविलेले होते[१]. ओसामा बिन लादेन यांच्या मृत्यूनंतरही "ISI झिंदाबाद"च्या फलकांसह अशीच निदर्शने इस्लामाबादला झाली होती!

यातल्या "अमेरिकेला चेचून टाका" या फलकाने मला (मला म्हणजे कामरान शफींना) ४१ वर्षे मागे नेले आणि त्यावेळच्या "भारताला चेचून टाका" मोहिमेची आठवण करून दिली. ही मोहीम पाकिस्तानी लष्कराने एका लाहोरहून प्रकाशित होणार्‍या उर्दू वृत्तपत्राच्या सहकार्याने उभी केली होती[२]. आजच्या तरुण पिढीतील पाकिस्तानी वाचकांना या ४१ वर्षांपूर्वीच्या मोहिमेची माहितीसुद्धा नसेल. कारण ही मोहीम पाकिस्तानच्या त्यावेळी झालेल्या विभाजनाच्या निषेधार्थ होती. या विभाजनात स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीने पाकिस्तानचा अर्धा भूभाग कापला गेला होता आणि तिचे अर्ध्याहून जास्त नागरिक विभक्त होऊन ’बांगलादेश’चे नागरिक झाले होते.

त्यावेळी आपण एका आर्थिकदृष्ट्या दुबळ्या[३] पण आपल्याहून खूप मोठ्या देशाला चेचून टाकायला निघालो होतो. तसे पहाता शस्त्रास्त्रांबाबत आपली आणि भारताची बर्‍यापैकी बरोबरी होती. पण यावेळी काय परिस्थिती आहे? यावेळी आपण कुणाला चेचून टाकायला निघालोय? आपण निघालोय अमेरिकेला चेचून टाकायला! जगातल्या एकुलत्या एक महासत्तेला! आपले लष्कर आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी, आर्थिक मदतीसाठी आणि नैतिक पाठिंब्यासाठी ज्या महासत्तेच्या औदार्यावर अवलंबून असते आणि ज्या महासत्तेच्या पाठिंब्याच्या बळावरच पाकिस्तानी सरकार सार्‍या जगावर गुरगुरत "दादागिरी" करत असते त्याच महासत्तेला चेचून काढायला आपण निघालो आहोत!!

अलीकडेच "अमेरिकेला चेचून टाका" मोहीमवाल्या एका जिहादी लेखकाने त्याच्या ब्लॉगवर "अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला कशी आली" याबद्दल नेमकी माहिती वाचकांना देण्यासाठी त्याच्या ब्लॉग-वाचकांना आवाहन केले आहे. मी (शफीसाहेबांनी) जेंव्हां १९६५ सालच्या भारताबरोबरच्या लढाईनंतर पाकिस्तानी खड्या सैन्यात कमिशन घेतले (इमर्जन्सी कमिशन नव्हे) त्यावेळी मी जे पाहिले ते खाली देत आहे.

मी पाकिस्तान मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेत असताना आम्हाला ब्रिटिश काळातल्या "No.4 Mk 1" या बोल्ट-ऍक्शनवाल्या रायफलवर आणि .३०३ लाईट मशीन गन (LMG) वर प्रशिक्षण दिले गेले होते. मे १९६६ मध्ये आम्ही जेंव्हां आमच्या पहिल्या तुकडीत (unit) प्रवेश करते झालो त्यावेळी आम्हाला अमेरिकन बनावटीची अर्ध स्वयंचलित (semi-automatic) .30 M-1 रायफल आणि .30 Browning स्वयंचलित रायफल (BAR) light machine gun आणि .३० भारी machine gun दिली गेली. ही सारी शस्त्रें कोरियन युद्धाच्या वेळची उरली-सुरली शस्त्रें होती व ती त्या युद्धाच्या समाप्तीनंतर पाकिस्तानकडे वळविण्यात आली होती.

आम्हाला भली मोठी M38 Willys जीपही मिळाली होती. आम्ही गमतीने तिला "छोटी विली" (Little Willy) म्हणायचो. फारच तगडी असलेली ही जीप नेऊ तिथे जायची व पडेल ते काम करायची. पुढे हिचा M-38 A-1 असा नवा (आणि सुधारित) अवतारही आला. ही जीपही कुठेही जायची आणि कांहींही करायची. ही M38 तावी नदीतून नेलेले मला आजही आठवते. त्यावेळी तिचा exhaust pipe पाण्याखाली दोन फूट होता. याखेरीज पाऊण टनी डॉज गाडी, अडीच टनी कार्गो गाडी आणि पॅटन रणगाडे व F-86, F-104, F-16 जातीची लढाऊ विमाने, C-130 ही सैनिक आणि माल वाहून नेणारी विमाने आणि ORION-P3C ही पाणबुडी-विनाशक (Anti-submarine) विमानेही मिळाली होती. (सारी ORION-P3C विमाने अलीकडेच अल कायदाच्या आतंकवाद्यांच्या मेहरान येथील नाविक हवाई तळावरील हल्ल्यात नष्ट झाली ही किती नामुष्कीची गोष्ट आहे!). या खेरीज नौदलातील जहाजे, क्रूझर्स, पाण्यातील सुरुंग काढणारी जहाजेही अमेरिकेकडूनच मिळाली होती. हा सारा इतिहास इतक्या सहजपणे विसरणार्‍या आपल्या (पाकिस्तानी) लोकांचा धिक्कारच केला पाहिजे!

अमेरिकेची क्षमा मागण्याचा माझा मनसुबा नाहीं. कारण मी अमेरिकेकडून जास्त साह्य मिळावे म्हणून कांही मूलभूत बदल करणार्‍या अयूब खानपासून ते जुलमी झिया आणि वाईट चिंतणार्‍या मुशर्रफपर्यंतच्या लष्करशहांना पाठिंबा देणार्‍या त्यांच्याधोरणाचा पुरस्कर्ता मुळीच नाहीं. मी फक्त गेल्या कित्येक दशकांच्या आपल्या लष्करासंबंधीच्या अमेरिकेच्या औदार्याची माहिती इथे देत आहे. दुर्दैवाने आपले लष्कर या औदार्याला (तथाकथित) राष्ट्रीयतेच्या नांवाखाली ओळखत नाहीं असे वाटते.

हे कृत्य म्हणजे बेइमानीची आणि दुटप्पीपणाची हद्दच आहे. हा प्रचार केवळ स्वतःच्या उणीवापासून व अलीकडील अबोटाबादच्या (Abbottabad) बिन लादेनच्या हत्त्येपासून आणि मेहरान येथील नाविक हवाईतळावरील पीछेहाटीपासून जनतेचे लक्षदुसरीकडे वळविण्यासाठी केला जात आहे. या घटनांमुळे आपल्या लष्कराचा नाकर्तेपणा आणि भोंगळपणा सार्‍या जगाला दिसलेला आहे. अशा लटक्या उन्मादाने आणि दुराग्रहाने रचलेली निदर्शनें वापरून असल्या समस्या दृष्टिआड सारता येतात. या समस्यात मग "नाहीशी" केलेली माणसे आणि सलीम शहजादसारख्या वार्ताहाराचा अमानुष आणि निर्दय खून वगैरेसारख्या गोष्टीही येतात.

सलीम शहजाद यांच्या अमानुष खुनानंतर ISI ने अतिशय आढ्यतेने आपल्या "चमचा" मीडियाद्वारा जाहीर केले होते, कीं ते त्याच्या खुनाचा छडा लावण्यात कसलीही कसर ठेवणार नाहींत आणि त्यांच्या खुन्याला पकडतील. खरे तर या खुनाच्या संशयाच्या सार्‍या खुणा ISI च्याच दिशेनेच बोट दाखवीत होत्या. आता या खुनाला चार महिने होऊन गेले पण त्यांच्या खुन्याला अद्यापही अटक झालेली नाहीं. थोडक्यात ISI वाले जी ऐट मिरवतात त्यात कांहींच दम नाहीं.

पुन्हा एकदा आपल्या ’रोमेल’ आणि ’गुडेरियन’ची[४] ऐट दाखविणार्‍या आपल्या सेनाधिकार्‍यांच्या लुटपुटीच्या "सात्विक" संतापाकडे वळू. अमेरिकेवर ते किती अवलंबून आहेत आणि कसे अमेरिकेच्या मिठीत आहेत हे या सेनाधिकार्‍यांना चांगले माहीत आहे. अमेरिकेने सार्‍या जगापुढे त्यांचा दुटप्पीपणा जाहीर केलेला आहे. आपले लष्कर कसे वाईट लोकांशी शय्यासोबत करत आहे हे सार्‍या पाकिस्तानी जनतेला माहीत झाले आहे मग अमेरिकेला राग आल्यास त्यात त्यांचे काय चुकले? आणि अफगाणिस्तानमधील भावी राजवटीत मोलाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने वापरले जाणारे चुकीचे परराष्ट्र धोरण अद्यापही तसेच आहे. मग तालीबान, आणि तालिबानचे मित्र हक्कानी वगैरे पाकिस्तानच्या दृष्टीने चांगले कसे? कारण त्यांची आतापर्यंतची कृत्ये एकजात वाईटच आहेत.
--------------------
टिपा:
[१] त्या मानाने भाड्याने घेतलेली तट्टेही खूप कमी दिसत आहेत!-अनुवादक
[२] पाकिस्तानी मीडिया आणि पाकिस्तानी वृत्तपत्रें त्यांच्या लष्कराला आणि ISI संस्थेला Deep State या नावाने संबोधतात!
[३] हे मूळ लेखक कामरान शफी यांचे मत आहे आणि १९७१ साली ते बर्‍याच अंशी खरेही होते!
[४] दुसर्‍या महायुद्धातले सुप्रसिद्ध आणि पराक्रमी जर्मन सेनाधिकारी. इथे लेखकाने सध्याच्या पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांची टर उडविण्यासाठी त्यांची उपमा दिलेली आहे!

(पाकिस्तानी फौजेतील माजी वरिष्ठ अधिकारी कामरान शफ़ी हे पाकिस्तानचे खूप विख्यात स्तंभलेखक आणि समालोचक आहेत. त्यांनी डेली टाइम्स, डॉन सारख्या वृत्तपत्रांत लेखन केलेले असून सध्या ते ’एक्सप्रेस ट्रिब्यून’साठी लिहितात. वरील लेख ’एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्येच २९ सप्टेंबर २०११ रोजी सर्वात प्रथम प्रसिद्ध झाला होता. बेनझीर भुत्तोंच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांचे वृत्तपत्र सचिव होते).

गुलमोहर: 

सुधीरजी,

नेहेमी प्रमाणे चांगला लेख.

याच "वॉल स्ट्रीट जर्नल"मध्ये ११ सप्टेंबर २०११ ला एक जाहीरात झळकली होती.
पाकिस्तान सरकार व सैनिक संस्था यांच्या वतीने. हा सोबत दिलेला फोटो पहा.
पाकिस्तान ने अमेरिकन जनतेच्या जखमेवर कसं मीठ चोळल ह्या जाहीराती ने.
ह्या जाहीरातीवरून अमेरीकेत खूप गदारोळ झाला .

Advet in Wall Street Journal.jpg

आणी त्याच पेपर मध्ये २९ सप्टेंबर २०११ ला अमेरीका मुर्दाबाद ?

कामरान शफींचा मी अनुवादित केलेला लेख 'एक्सप्रेस ट्रिब्यून'मध्ये प्रकाशित झालेला आहे 'वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये नव्हे. आणि 'वॉल स्ट्रीट जर्नल'मधील जाहिरात सरकारी आहे (बेनझीरबाईंचा फोटो मिरवत असल्याने कदाचित PPP पक्षाकडून प्रसृत केली गेली आहे) तर 'एक्सप्रेस ट्रिब्यून'मधला लेख एका पाकिस्तानी नागरिकाने-माजी ज्येष्ठ लष्करी अधिकार्‍याने-लिहिलेला आहे.

काळेजी, माहितीपूर्ण लेख.

विवेक नाईक, ही जाहिरात माहित नव्हती हो. इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्या जाहिरातीत काय लिहिलंय पहा. $68 billion loss to national economy. च्यायला जसं काय स्वतःच्या खिशातून भरतायेत पैसे!

पाकिस्तान म्हणजे कशात काही नसताना वाघाच्या डरकाळ्या फोडायचा प्रयत्न करत असतात. ह्याउलट भारतीय राजकारणी सगळं असूनसुद्धा शेळपटासारखे वागणारे वाटतात.

सुधीरजी,

<<<<< पाकिस्तानातील एका बाजारात ’अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍या पाकिस्तानी नागरिकांचा "वॉल स्ट्रीट जर्नल"मध्ये गेल्या बुधवारी प्रसिद्ध झालेला फोटो खूप लोकांनी पाहिला असेल.>>> ह्या फोटो बद्द्ल बोलत होतो.

सुधीरजी ह्या जाहीरातीवर तूम्ही स्वतंत्र लेख लिहावा असे मी सुचवू ईच्छितोय.

आजच TV वर बातम्या मध्ये अफघाणच्या राष्ट्र्पती करझईनी उधळलेल्या मुक्ता फळांबद्द्ल माहीती आलीय.

अफघाणीस्तानचे राष्ट्रप्ती करझाई व पाकीस्तानचे राष्ट्र्पती आसीफ अली झरदारी यानीं प्रसार माध्यमाना दिलेल्या संयुक्त वक्तव्यात भारताने आक्रमण केल्यास अफघाणीस्तान, पाकीस्तानच्या वतीने युद्धात उतरेल असे सांगीतले.

याचा अर्थ फक्त पाकीस्तानच नव्हे तर अफघाणीस्तान सुद्धा भारतावर कधीही उलटू शकतो हेच सिद्ध होते.

विवेक - Angry ? भारता बद्दल त्यांचे मत अत्यंत मवाळ आहे असे आजवर माझे मत होते. भारताबरोबर ३ ऑक्टोबरलाच "Strategic Partnetship" करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. अजुन ३ आठवडेही नाही झाले कराराला.

करझाईंनी असे वक्तव्य करण्या अगोदर भारताला आणि अमेरिकेला विश्वासात घेतले असावे. किंवा ३ ऑक्टोबरच्या त्यांच्या दिल्ली भेटीत त्यांना जास्त काही हाती लागले नसेल. अमेरिका आता मैदानातुन बाहेर पडणार आहेच (अफगाण मधे तेलसाठे पण नाही... Sad ) मग भारत कितपत मदत करेल हे चाचपण्यासाठी त्यांनी दिल्ली वारी नुकतीच केली होती.

मला कधी कधी या अफगाणिस्तान सारख्या देशांच काही कळत नाही , घरात खायला भाकरीचा तुकडा नाही आणि शेजार्यांची भांडण भांडतायत Sad

वज्र
<< अमेरिका आता मैदानातुन बाहेर पडणार आहेच (अफगाण मधे तेलसाठे पण नाही >>

नेहेमीच अमेरिका त्या त्या देशातुन बाहेर पडते असे फक्त प्रसार माध्यमांना सांगीतले जाते पण प्रत्यक्षात
अमेरिकेचे सैनीक परत जातात व त्यांच्या जागी दुप्पट संख्येने अमेरिकेचे खासगी सुऱक्षा गार्ड देशात घुसवले
जातात. आज अफघाणिस्तानात अमेरिका बर्याच् राष्ट्र पुर्ननिर्माण प्रोजेकक्ट्वर काम करत आहे. त्यात
भारतीय कंपन्या व त्यांचे अभियंते सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
अमेरिका अफघाणिस्तानात असलेल्या अगणित खनिज संपंत्तीवर डोळा ठेवूनच हे काम करतेय. पण
भारताला ह्या सर्वाचा काय फायदा?

२००८-०९ साली भारताने अफघाणिस्तान ला १०० च्या वर बसेस, ट्र्क्सची मदत केली होती.

असेही जागतीक स्तरांवर भारत कुठच्याही देशाला मदत करत असेल हेच कोणी मानणार नाही. त्यावर
भारतीय External Affairs Ministry ने ही भारताच्या अफघाणिस्तानतल्या कामाचा कुठेही गाजावाजा
केलेला नाही.

असे असतानाही जर अफघाणिस्तान आपल्या भारताची जागतीक स्तरावर नामुश्की करण्यावर उतारू होत
असेल तर त्याला अद्द्ल घडवलीच पाहीजे.

काही वर्षांपूर्वी बांग्लादेशाने भारताबद्द्ल असे उद्दगार काढले होते. जो देश प्रत्येकवर्षाकाठी दोनदा निसर्गाच्या
अवक्रुपा झेलतो ( उन्हाळ्यात व पावसाळ्यात अतीव्रुष्टी) त्यावेळी ज्याला भारताकडेच हात पसरावे लागत
त्यांनेच असे करावे !
झाले तात्कालीक पंतप्रधान ईंदिरांजींनी ठरवले कि बांग्लादेशाला चांगला दणका द्यायचा.
पुढच्याच अतीव्रुष्टीवेळी बांग्लादेशाने भारताकडे हात पसरले व तातडीने औषाधाची मागणी केली.
बांग्लादेशात अशा परीस्थीत वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी सुद्दा भारतीय विमान तळाची गरज लागे.

भारताने ही लगेचच वैद्यकीय मदत व औषाधा एवजी ५० कोटी रुपये मदत जाहीर केली व बांग्लादेश
सरकारला सांगीतले की ह्या पैश्यानी तुम्हाला लागेल ती औषाधे विकत घ्या.
ही मात्रा लेगच लागली, आणी बांग्लादेश सरकार वठणी वर आले.

एकदा आपल्या गणतंत्राच्या वाढदिवसाच्या समारंभात अफगाणिस्तानचे त्यावेळचे राजदूत मला भेटले होते. त्यांना मी विचारले कीं पळवून लावलेल्या तालीबानला तुम्ही पुन्हा कसे काय उभे राहू दिलेत?" ते म्हणाले "तुमच्या शेजार्‍याला विचारा!". मी विचारले "कुठल्या?" "अर्थातच पाकिस्तानला!" ते उत्तरले. सांगायचा मुद्दा असा कीं अफगाणी लोकांना पाकिस्तानी आवडतातच असे नाहीं. आपण जसे आपल्याला न आवडणारे शेजारी सहन करतो तसे त्यांनाही करावे लागते असे मला वाटते. करझाई स्वत:ला कांहींच करू शकत नाहींत. मग एक इंग्लिश म्हण आठवते "If you can't win over your enemies, join them!"
करझाई तेच करत आहेत असे दिसते!

हमिद करझाई ह्यांची मुक्ताफळं काल टि व्ही वर पाहिलं.
जर का अमेरिका X पाकिस्तान युध्द होणार तर अफगाणिस्तान पाकिस्तान ला सपोर्ट करणार.

कोणाची तरी एक्झिट घेण्याचे वेळ जवळ आलेली आहे Proud

खालील नकाशात अफगाणिस्तानला रसद पाठविण्यासाठी उपलब्ध पर्यायी मार्ग जास्त स्पष्ट दिसतो. भूमध्य समुद्रातून बॉस्फोरसची सामुद्रधुनी ओलांडून काळ्या समुद्रातून जॉर्जिया-अझरबाईजान ओलांडून कॅस्पियन समुद्रातून तुर्कमेनिस्तानातून शेवटी अफगाणिस्तान असा हा वैकल्पिक मार्ग आहे. सध्या या मार्गावरून रसद पोचविण्याची 'Trial Run' चालू आहे!
New route to Afghanistan2C.JPG