दिवाळखोरी..!

Submitted by A M I T on 21 October, 2011 - 01:31

"अहो दिवाळी जवळ येत चाललीय." दसर्‍याच्या दूसर्‍याच दिवशी सौ. मोठ्या उत्साहात म्हणाली.

डिव्हीडी प्लेअरमध्ये किशोरच्या गाण्यांची सीडी टाकत असतानाच मी चपापलो.

"मग?" मी दिर्घ श्वास घेत म्हणालो.

"थोडी खरेदी करावी म्हणते." पदराचं एक टोक आपल्या बोटाला गुंडाळीत सौ.

'खरेदी' हा शब्द ऐकताच माझ्या श्वासांची गती विलक्षण वाढली.

"अगं नुकत्याच नवरात्रीत तुझ्या हट्टापायी प्रत्येक दिवसाला एक याप्रमाणे नऊ रंगाच्या नऊ साड्या घेतल्या की. आता तुला आणखी साड्या पुरवायला तू काय द्रौपदी नाहीस किंवा मी श्रीकृष्णदेखील नाही." बोटात सीडी अडकवून मी भगवान श्रीकृष्णाची पोझ घेतली.

तरी बरं, माझ्या हातात सुदर्शन चक्र नव्हता म्हणून..!

"अहो, खरेदी म्हणजे काय फक्त साड्यांचीच असते का?" एव्हाना पदर तिचं बोट सोडून पसार झाला होता.

वास्तविक खरेदी हा प्रकार पुरूषांच्या काळजाला आणि एकंदर पाकीटाला धडकी भरवणाराच असतो आणि त्यात बायकांनी केलेली खरेदी हा तर परिसंवादातील महाचर्चेचा विषय ठरावा.
हे दूकानदारपण ना महाचतूर लेकाचे..! दिवाळीच्या मोक्यालाच सेल नि फेल लावत बसतील. खरतर आमच्या सौ.ला 'सेल' या शब्दाचं इतकं आकर्षण आहे की, ती 'सेल' टाकलेल्या खेळण्यासारखी लगेच तिकडे धाव घेते.

काही दिवसांत घरात दिवाळीचं वातावरण निर्माण करणार्‍या वस्तूंनी चंचुप्रवेश केला. हे पाहून शेजारच्या बायकांनी कौतूकाने आमच्या सौ.ची पाठ वगैरे थोपटली आणि आपापल्या नवर्‍यांच्या 'हात धुवून' पाठीमागे लागल्या.
वर आणखी माझ्या बायकोसमोर माझी मुक्तकंठाने स्तुती करणार्‍या आणि मी ऑफीसला निघताना माझं गबाळं रूप पाहून नाकं मुरणार्‍या याच का त्या शेजारिणी..! यावर माझा विश्वास बसेना.

दिवसागणिक माझ्या पाकीटातील 'गांधी नाम की आँधी' शमत चालली होती आणि एक दिवस तिथे मला शुकशुकाट पाहायला मिळाला.

सौ. चा उत्साह मात्र कमालीचा ओसंडत होता.

"हे बघ. ह्या कढईतील तेलाच्या तलावात हा असा एक-एक पदार्थ सोडून त्याला नीट तळावं." सौ. धोत्रेकाकांच्या शालूला फराळ शिकवत होती.

ही तिला तळायला शिकवतेय की पोहायला? या पेचात मी पडलो. सौ. च्या तोंडून "तेलाचा तलाव" हा शब्दप्रयोग ऐकून क्षणभर मी इराकमधील असंख्य तेलविहीरींचा मालक असल्याचा मला भास झाला.

एक मात्र नक्की.. दोन - तीन दिवस घरात फराळाचा नुसता घमघमाट सुटला होता. माझ्याही जीभेची चाळवाचाळव होत होती आणि ही चाळवाचाळव होत असताना निर्माण होणारं पाणी आवंढारूपी कालव्याने पोटाला मिळत होतं.

पण का कुणास ठावूक? फराळाने सौ. च्या हाताद्वारे तयार होण्याचे नाकारले. नाईलाजाने शेवटी फराळ दूकानातून आणवयाचे ठरले आणि ठरल्यानुसार कृती झाली.

अखेर दिवाळीची ती पहाट फटफटली ('फटफटली' हे क्रियापद फटफटीशी संबंधित नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.) भल्या पहाटे माझ्या अंगावरील चादर दूर करून सौ. ने मला हिंदी सिनेमात खून केल्यावर मुडद्याला जसे ओढत नेतात, तसे ओढत-ओढत बिछान्यापासूनही दूर केले. भर दिवाळीत मनातल्या मनात मी सौ. च्या नावाने 'शिमगा' केला.

नंतर सौ. ने चिरंजीवांना मागील वर्षीच्या पणत्या शोधण्याकरता माळ्यावर चढवले. 'पण त्या' काय तिथे सापडल्या नाहीत. अखेर नाकावरच्या दूकानातून खरेदी केलेल्या पणत्यांनी आमचं घर उजळलं.

सौ. जेव्हा दारासमोर रांगोळी काढण्यासाठी सरसावली, तेव्हा मी देखील तिची ही नवी कला पाहण्यास सरसावलो. ती आपल्या चिमटीत रांगोळी घेवून ठिपके काढू लागली.

"अबब..! इतके मोठ्ठे ठिपके तर मी कधी हरणाच्या पाठीवरदेखील कधी पाहीले नाहीत." मी थट्टा करण्याच्या मुडमध्ये होतो.

"आधी हरीण तरी पाहीलयं का, ते सांगा?" सौ. मात्र माझीच विकेट काढण्याच्या तयारीत होती.

"हो हो.. पाहीलाय ना... चित्रात..!" मी सौ.चं गर्व'हरण' केलं होतं.

"अहो आज पहीलाच दिवस आहे. उद्या येतील नीट." सौ. च्या ठिपक्यांवर मी ठेवलेला ठपका सौ. ने पुसून काढला.

काही तासांच्या मेहतनीनंतर फरशीवर रांगोळी साकार झाली खरी..
पण संध्याकाळी मात्र त्या रांगोळीची 'राखरांगोळी' झाली होती. आमच्या सोसायटीतील काही टारगट मुलांनी सौ. ने काढलेल्या रांगोळीतील रंग घेवून मनसोक्त 'धूळवड' खेळली होती. तेव्हा आमच्या सौ.च्या चेहर्‍यावर रांगोळीत वापर न केलेला लाल रंग स्पष्ट दिसत होता.

दूसर्‍या दिवशी दारासमोर एक सुबक रांगोळी पाहण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे त्या रांगोळीतील रंगांनी आपली जागाही सोडली नव्हती. कमाल आहे...! ही रांगोळी सौ.च्या हातातून साकार होणं जितके अशक्य आहे, त्यापेक्षा कितीतरी अशक्य सोसायटीतील टारगट मुलांच्या नजरेतून सुटणं..! ही मुले एकाएकी टारगटपणापासून अलिप्त कशी काय झाली बुवा..? या प्रश्नाने मला एकीकडे आश्चर्य आणि दूसरीकडे आनंदही झाला.

पुढील काही दिवस आमच्या दारासमोरील ती रांगोळी बदलली नाही. सौ. ला रांगोळीतील एकच डिजाईन जमत असावी बहूधा. आज ही रांगोळी पुसटली, तरच सौ. उद्या दूसरी रांगोळी काढेल, असा विचार करत असतानाच 'टारगटपणाने' माझ्या मनात प्रवेश केला.

मी ती रांगोळी पुसटण्याचा प्रयत्न करू लागलो, पण रांगोळी आपलं मुळ रूप बदलायला तयार होईना.

नंतर मला कळलं की, ती रांगोळी नसून बाजारात मिळणारं रांगोळीचं 'स्टीकर' आहे.

शेजारांत फराळांची देवाण-घेवाण झाली.
सौ. ने एका प्लेटीत मला काही फराळ दिला. मी त्यातील चकली उचलून तोंडात टाकली मात्र...
चकलीने माझे दोन दात पाडून माझ्या मुखातील दंतपंक्ती मोकळी केली. ब्रुस-ली ला जे काम करण्यास काही तास गेले असते, ते काम चक-ली ने एका क्षणात केले होते. हायला, आम्हांला मॅट्रीक परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्नसुद्धा इतके 'कठीण' नव्हते.
पुढे तो चकलीचा 'चक्रव्युह' भेदण्याची माझी इच्छाच संपून गेली. मी चकलीचा नाद सोडला आणि लाडवांकडे वळालो. लाडवांनीदेखील चकलीच्या गुणधर्माशी हातमिळवणी केलेली दिसत होती.
तोच माझ्या हातातील प्लेटीतल्या चकली आणि लाडवांवर हे अभेद्य संस्कार ज्यांनी केले, त्या दामलेकाकू घाईघाईत आमच्या घरात प्रवेश करत्या झाल्या.

"कसा झालाय फराळ?" दामलेकाकूंनी हा प्रश्न "मी कशी दिसतेय?" अशा थाटात विचारला.

वास्तविक त्यांनी हा प्रश्न आधी दामलेकाकांना विचारला असावा. पण घरातील काकूंच्या दहशतीला घाबरून त्यांनी केवळ 'नुसत्या वासानेच माझं पोट भरलयं' असं उत्तर देवून चतूराईने आपल्या दांताचं संरक्षण केलं असावं, म्हणून हा मोर्चा आमच्या घराच्या दिशेने आला होता.

"खरं सांगा काकू. किती वर्षांपुर्वीचा आहे हा फराळ?" मी उपरोधाने म्हणालो.

"कायच्या काय हो तुमचंपण..!" दामलेकाकू आपली बत्तीशी दाखवत म्हणाल्या. मी लागलीच त्यांचे दात पाहून घेतले. त्यांनी अजून फराळ खाल्ला नसावा. "काय गं दूकानातून आणलास की काय फराळ?" दामलेकाकूंचा हा प्रश्न अर्थात आमच्या सौ. ला होता.

"नाही बाई. घर्रीच बनवला. यांना विचारा हवतर. आय विटनेस..!" सौ. आपले मोठ्ठाले 'आईज' माझ्याकडे रोखीत म्हणाली. मी विटनेस बॉक्समधील साक्षीदारासारखी नुसतीच मान हलवली.

"खरं की काय..! किती खुसखुशीत झालाय म्हणून सांगू..! आता तर मला वाटू लागलयं, या जगात फक्त दोनच गोष्टी खुसखुशीत आहेत... एक म्हणजे तुझ्या हातचा फराळ आणि दूसरं ... यांच्या पुस्तकातील विनोद." दामलेकाकूंनी माझ्या नावावर खपवलेला दूसरा खुसखुशीतपणा मला मुळीच आवडला नाही.

'काळोखाच्या सावल्या', 'संन्यस्त मनाचे पडघम', 'उद्याचा भारत' इ. इ. या माझ्या रहस्यमय, धार्मीक आणि संशोधनपर पुस्तकात यांना विनोद कुठे आढळला? याचचं मला कोडं पडलं.
माझ्या ह्या साहीत्यिक उपहासाचा निषेध म्हणून माझ्या हातातला तो टणक लाडू फेकून मारून दामलेकाकूंच्या कपाळी निदान एखादं टेंगूळ तरी करावं, असा जहाल विचार माझ्या मनात तेव्हा आला होता.

पुढे मग सौ. आणि दामलेकाकूंमध्ये 'फराळ' या विषयावर 'खमंग' खलबतं झाली. त्यात पुन्हा मतभेद, इतरांच्या फराळांतली उणीदूणी इ. उपविषयांचादेखील उहापोह झाला.

संध्याकाळी फटाके फोडण्यासाठी मी आणि चिरंजीव सोसायटीसमोरील आवारात गेलो. एका गुंडीबाराच्या वातीला अग्नी दिला आणि पळतच दूर उभा राहीलो. काही वेळ गेला तरी गुंडीबार चिडीचूप. विझला असावा, असा विचार करून मी त्यास हाती घेतले आणि एकच धमाका झाला. माझा हात पोळला गेला.

पुढे आठवडाभर आमच्या सोसायटीतील काही उत्साही सभासदांमधे माझ्या हातात झालेल्या स्फोटामागे नक्की कुणाचा 'हात' असावा? या प्रश्नावर 'ज्वलंत' चर्चा झाली.

दूसर्‍या दिवशी संध्याकाळी दारासमोर टांगलेल्या आकाशकंदीलाने अचानक अंधाराला कवटाळले. काल तर बरा होता. निरीक्षणाअंती लक्षात आलं, त्यातील बल्ब गायब होता अर्थात चोरी झाला होता. वीजवाहक तारांवर आकडे टाकून केलेली वीजचोरी एकवेळ समजू शकतो... पण बल्बची चोरी म्हणजे...! हे म्हणजे बुशकोट सोडून लंगोट चोरी करण्यासारखे झाले.
बराच तपास करूनही बल्बचा शोध लागला नाही. अखेर बल्ब न लावता नुसताच आकाशकंदील टांगत ठेवावा, या सौ.च्या निर्णयाने त्या प्रकरणावर पडदा पडला.

त्या प्रकरणाच्या दूसर्‍याच दिवशी जीन्याच्या उजवीकडील कोपर्‍यातील रूममधल्या पावशेंनी मला फराळाचं आमंत्रण दिलं. फराळ खावून मी हात धूण्यासाठी म्हणून त्यांच्या मोरीत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आमच्या आकाशकंदीलातील बल्ब पावशेंच्या मोरीत उजेड पाडीत होता.
कारण गेल्या आठवड्यापासून मोरीतला बल्ब गेल्यामुळे पावशे चुकून 'व्हील' साबणाने अंघोळ करत होते, हे मला त्यांनीच एकांतात सांगितले होते.

चला.. या दिवाळीत पावशेंना माझ्यामुळे मोरीत 'लक्स' आयमीन 'लख्ख' दिसू लागेल, हे काय कमी..!

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

दिवसागणिक माझ्या पाकीटातील 'गांधी नाम की आँधी' शमत चालली होती आणि एक दिवस तिथे मला शुकशुकाट पाहायला मिळाला. <<< Lol

हे बघ. ह्या कढईतील तेलाच्या तलावात हा असा एक-एक पदार्थ सोडून त्याला नीट तळावं."............तलाव..:हहगलो:
नेहमीप्रंमाणे छान भौ Happy

<<भल्या पहाटे माझ्या अंगावरील चादर दूर करून सौ. ने मला हिंदी सिनेमात खून झाल्यावर मुडद्याला जसे ओढत नेतात तसे ओढत ओढत बिछान्यापासूनही दूर केले. भर दिवाळीत मनातल्या मनात मी सौ. च्या नावाने 'शिमगा' केला.>> Lol
तलाव... Lol

अशक्य हसलेय .. तेही ऑफिसात... Lol

"अबब..! इतके मोठ्ठे ठिपके तर मी कधी हरणाच्या पाठीवरदेखील कधी पाहीले नाहीत." मी थट्टा करण्याच्या मुडमध्ये होतो. >>>>>>> Happy Happy

वा! फारच छान!
अमित. तुझा हा ठिपका तुझ्या(कथेतल्या) सौने (इथून)काढला असता तर तुझी इथली ओळख नाहीशी झाली असती. Wink

मस्त रे....

आम्हांला मॅट्रीक परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्नसुद्धा इतके 'कठीण' नव्हते.
पुढे तो चकलीचा 'चक्रव्युह' भेदण्याची माझी इच्छाच संपून गेली.....हा: हा: हा:.

Pages