धन्य झाल्याचा अनुभव--नवख्या शायरांसाठी

Submitted by निशिकांत on 10 October, 2011 - 12:21

मित्रहो,
गजलेच्या संदर्भात एक अतिशय चांगला आलेला अनुभव मी सर्वांसाठी आणी विशेषतः माझ्या सारख्या नवख्या गजलकासाठी येथे देत आहे.

मी कांही दिवसापूर्वी माझी एक गजल "रात्र अंधारी किती?" माबोवर प्रकाशित केली होती. त्यातील मतला आणी दोन शेर खाली देत आहे कारण त्यावर थोडे लिहिण्यासारखे घडले आहे.

संपता संपेचना ही रात्र अंधारी किती?
एक शोधाया कवडसा, रोज बेजारी किती?

टोळधाडी भोवर्‍यांच्या, पाहता भ्याली फुले
राखण्या बहरास घेऊ मी खबरदारी किती?

शोषितांच्य फायद्यास्तव योजना बनल्या किती?
अल्प पदरी दुर्बलांच्या, खर्च सरकारी किती?

आज आदरणीय इलाही जमादारांना भेटायचा योग आला. भेटीत मी माझी वरील गजल त्यांना वाचून दाखवली.माझ्यासारख्या नवख्या गजलकाराची गजल डोळे झाकून लक्ष देवून ऐकत होते. ऐकल्या नंतर त्यांनी टोळधाडीच्या शेराबद्दल खालील सुचना केल्या.
१)टोळ्धाड ही टोळांचीच असते. भ्रमराची नव्हे
२)भोवरा म्हणजे भ्रमर नव्हे. भोवरा म्हणजे मुले खेळतात तो.
३)भ्रमर आणी भुंगा एकार्थी शब्द आहेत. पण भ्रमर हा हळूवार व भावनेशी संबधित शब्द आहे. भुंगा थॉडा आक्रमक शब्द आहे. या शेरात फुले भ्याले असे म्हणावयाचे असल्यामुळे भुंगा शब्द वापरणे जास्त संयुक्तिक ठरेल.
४)हीच गजल माननीय बेफिकीर यांना वाचून दाखवली असता ते म्हणाले की बहर आणी भ्रमराचा संबंध नाही. शेरात दुरुस्ती हवी.
वरील चर्चेनंतर इलाहींनी पहिली ओळ स्वतःच रचून दिली. बेफिकीरांशी झालेल्या चर्चेनंतर दुसरी ओळ मी बदलली. या सर्व मंथनानंतर नवी शेर खालील प्रमाणे बनला.

धाड भुंग्याची बघोनी भ्यायली कोमल फुले
गंधकोषा राखण्या घ्यावी खबरदारी किती?

शोषितांच्या फायद्यास्तव---या शेराबद्दल इलाहींचे म्हणणे असे:
पूर्ण गजलेत "किती" हा रदीफ आहे. या शेराच्या पहिल्या ओळीत तो वापरला गेला आहे.रदीफ एकटा येत नाही. तो लागलीच काफियाची मागणी करेतो. म्हणून किती या शब्दाची जागा बदलावी किंवा योग्य तो काफिया या ओळीत वापरावा. असे केल्यास हा शेर पण मतला बनेल आणी तो गजलेचा दुसरा शेर होईल. या सर्व चर्चेनंतर तो शेर खलील प्रमाणे बदलला.

शोषितांच्य फायद्यास्तव योजना बनल्या तरी
अल्प पदरी दुर्बलांच्या, खर्च सरकारी किती?

वरील सर्व लिहिण्याचे कारण इलाही आणी भूषणजी यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे मी खूप कांही शिकलो. इलाहीजीचा साधेपणा आणी बारीक निरिक्षणाने भारावून गेलो. मॉठ्या लोकांचा सहवास कसा संजिवनी ठरू शकतो याचा अनुभव आला.

हा माझ्यासाठी खूप आनंददायी अनुभव होता आणी तो सर्वांना, विशेषतः नवख्या शायरांना सांगावासा वाटला म्हणून हा प्रपंच.

गुलमोहर: 

छान.
मोठ्या शायरांची निरीक्षणशक्ती आणि मार्गदर्शनाची तयारी जेवढी वाखाणण्यासारखी आहे, तेवढीच तुमची कृतज्ञ भावनाही कौतुकास्पद वाटते मला !

२)भोवरा म्हणजे भ्रमर नव्हे. भोवरा म्हणजे मुले खेळतात तो.

हे बरोबर आहे. संस्कृतातला भ्रमर आणि मराठीतला भुंगा हा हिंदीत 'भवरां' (रा वर अर्धचंद्र) बनून येतो. त्यामुळे मराठीत भवरा /भोवरा हा शब्द भुंगा या अर्थाने वापरणे चूक आहे. मराठीत भोवरा मुले खेळतात तो, शिवाय धुळीच्या वावटळीला आणि पाण्यात खोलगट भागात तयार होतो त्यालाही भोवरा म्हणतात.

असो.
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो !

तेवढीच तुमची कृतज्ञ भावनाही कौतुकास्पद वाटते मला !>>> अगदी सहमत. निशिकांतजींचे वय पासष्टीच्या आसपास असावे पण त्यांच्यातली शिकण्याची वृत्ती पाहिली की कधी कधी असे वाटते की आपण असे का नाही

मोठ्या शायरांची निरीक्षणशक्ती आणि मार्गदर्शनाची तयारी जेवढी वाखाणण्यासारखी आहे, तेवढीच तुमची कृतज्ञ भावनाही कौतुकास्पद वाटते मला !>>>>अगदी अगदी...सहमत.

अनुभव सर्वाना उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद निशिकांतजी !
गजल लिहताना, शब्द कसा नेमका असावा हे शिकायला मिळाले.