एक महाप्रवास !

Submitted by कवठीचाफा on 8 October, 2011 - 11:56

ही मायबोली दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा आहे मुद्दाम पुन्हा प्रकाशीत करत आहे
*********
घाटातून गाडी तशी हळूवारच पण ठामपणे गावाकडे प्रवास करत होती. चांगली हसतीखेळती सकाळ एका फोनने उदासवाण्या दिवसात बदलून टाकलेली. गाडीतली शांतता मधेमधे ऐकू येणार्‍या वहिनीच्या हुंदक्यांनी थोडीफ़ार भंगत होती तितकीच. पावसाळा नुकताच रंग उधळायला लागल्याने बाहेरचे निसर्गसौंदर्य नक्कीच नजर वेधून घेणारे होते, पण गाडीतल्या सगळ्यांचीच मनःस्थिती आत्तातरी निसर्गाचा आस्वाद घेण्यासारखी नव्हती. सगळ्याच रविवारांप्रमाणे आजचाही दिवस आमच्या घरात हसतखेळत उगवला होता, थोडासा आळसावत, थोडा सैलावत. दिवसभरात काय काय करायचेय आणि मुख्य म्हणजे आजचा मेनू काय असावा या कुरकुरीत चर्चेत नुकताच रंग भरायला लागला होता आणि फोन घणघणला. नेहमीच्या सवयीनेच वहिनीनी फोन घेतला. आता कुणाच्या नावाचा पुकारा होणार याची वाट बघत असलेल्या आम्हाला वहिनीचा बदलत जाणारा चेहरा आणि तिने दिलेला हुंदका स्पष्ट दिसला. धावत जाऊन दादाने रिसिव्हरचा ताबा घेतला आणि त्या नंतर फक्त "कधी? किती वाजता? आम्ही निघालोच," असे नेमकेच तीन शब्द उच्चारुन त्याने फोन ठेवला. बाजूला वहिनीचे हुंदके चालूच होते. "हिचे आजोबा गेले!" एक हात वहिनीच्या खांद्यावर ठेऊन दादा म्हणाला. "आपल्याला लगेच गावाला निघायला हवे, तू गाडी काढ तासाभरात," दादा शांतपणे पुढे म्हणाला.

त्यानंतर तासाभरातच आम्ही रस्त्याला लागलो होतो. पेट्रोल, हवा वगैरे निघतानाच चेक करुन घेतल्याने गाडीचं असं काही टेंशन नव्हतंच. मी हळूच बाजूला बसलेल्या योगिताकडे नजर टाकली. तिच्या चेहर्‍यावर भांबावल्याचे भाव स्पष्ट वाचता येत होते. आमच्या लग्नाला आत्ताशी सहा महिने झाले होते. अशा एखाद्या दिवशी मी तिला घेऊन बाहेर पडलो असतो तर गाडी एका तासाच्या प्रवासाला चार तास वेळ घेत गेली असती, इतकं बाहेर वातावरण मोहक होतं, पण आजची बात वेगळीच. चार तासांचा प्रवास चारच तासांत पुरा करायचा होता. त्यात दादाची सूचना, 'काही झालं तरी स्पिडींग करायचं नाही, घाई नको आजिबात.' त्यामुळे वेगाला मर्यादा आपोआप पडलेल्या.

एकदाची गाडी गावात शिरून वहिनीच्या अंगणासमोर थांबली. मी बाहेर पडायच्या आतच दादाचा हात खांद्यावर पडला, "आधी गाडी पार्क करून घे कुठेतरी व्यवस्थित, मग तुम्ही दोघे या." मग जरा पुढे जाऊन गाडी जवळच्या मैदानातल्या झाडाखाली लावली आणि वहिनीच्या घरी आलो. योगिताला काय करावे ते न सुचल्याने जरा गोंधळली. पण बायकांमध्ये एक सराईतपणा असतो, त्या बायका असलेली ठिकाणे आपोआप शोधून काढतात कुणालाही न विचारता. अगदी लग्नातही हॉलमधल्या दहा खोल्यांमध्ये आपली मंडळी कुठे आहेत हे पुरूषांना शोधायला लागत असेल, त्यापे़क्षा निम्म्या वेळात बायका अचूक त्यांचा ग्रुप असलेली खोली शोधतात. आता या अशा प्रसंगी मला हे असले विचार सुचत होते, कारण मी पहिलटकर या बाबतीत. तसा दादा त्याच्याच शब्दांत सांगायचं तर बर्‍याच जणांना 'पोहोचवून' आलेला असल्याने त्याची कॉपी करत गंभीर चेहरा करून मी आपला हे असले विचार डोक्यात आणत उभा. समोर वहिनीच्या आजोबांचे पार्थिव ठेवलेले. त्याकडे पाहताना हळूहळू मी त्या प्रसंगात गुरफटून जात राहिलो.

"आगो माझा सोन्या गेला गोSSSSSबाSSई!" मी दचकून बाजूला पाहिले. आजोबांची जवळपास नात शोभेलशी बाई त्यांना चक्क सोन्या म्हणून एकेरीत साद घालत होती. मग हळुवारपणे ती रडण्याची लाट संपूर्ण माजघरात पसरत गेली. एकूणच गावातल्या रडण्याला एक खास असा सूर असतो. म्हणजे त्याला रडणे म्हणावे की गाणे ते कळत नाही... बहुतेक ते रडगाणे असावे आणि तेही अगदी 'मिले सुर मेरा तुम्हारा' स्टाईल एकमेकांकडे पास व्हायला लागते.

"आजोबाSSSS तुमच्यासाठी नवा पलंग करून घेतला ना! आता त्याच्यावर कोSSण झोपणाSSर?" आयला, हा काय विचित्र प्रकार म्हणून मी तिकडे नजर टाकली. हा सूर लावणारी ही वहिनीची वहिनी. म्हणजे माझी कोण मला माहित नाही. उगीच ते नात्यांच्या नावाचे चक्रव्यूह सोडवत बसायला मी कुणी अर्जुन नाही. एव्हाना वहिनीच्या वहिनीचा आलाप संपला होता आणि ती बाजूच्या कुणालातरी सांगत होती, "गेल्याच महिन्यात ह्यांनी हा सागाचा पलंग करून घेतला हो, आजोबांना पाठदुखी होती ना म्हणून." मघा घेतलेल्या आलापाचा लवलेशही आत्ताच्या आवाजात नव्हता.

"काय झालं हो आजोबाSSS सत्तर हजार खर्चून गेल्या आठवड्यात चालू केलेली ट्रीटमेंटसुद्धा पुरी नाही केलीत तुम्ही." हा नवा सूर नक्कीच वहिनीच्या बहिणीचा होता.
"तुमच्यासाठी घेतलेल्या टाटास्कायचं काय करू हो आजोSSSबा !" पुन्हा वहिनीची वहिनी.
"ह्यांनी घेतलेला वॉकर घेऊन चालायच्या आतच गेलात ना हो आजोबाSSSS," वहिनीची बहीण भावजयीचा सूर पडू देईना.
च्यायला, या नक्की रडतायत की जुगलबंदी करतायत? मलाही प्रश्नच पडला. आता या सगळ्या प्रकारात वहिनी कोणता सूर लावते? पण नाही, वहिनी आजोबांच्या पायाशी बसून टिपं गाळत होती.
"तुमच्या नातवाची पगारवाढ तरी बघून जायचतं की आजोSSबा," पुनश्च वहिनीची वहिनी.
"ह्यांचा पगार वाढला हो, आजच कळले म्हणून सांगायला धावत आले तर आजोबांचं हे असं झालेलं." गझल चालू असताना मधूनमधून जसा गायक शेर ऐकवतो तसा हा प्रकार.
"आमच्या नव्या गाडीतून देवदर्शनाला जाणार होतात, असे कसे देवदर्शन टाकून गेलात ना आजोबाSSS," ही वहिनीची बहीण. बहुतेक आजोबांवर केलेला खर्च संपला असावा.
"माझ्या हातची बासुंदी आवडत होती ना तुम्हाला, बासुंदी न खाताच कसे गेलात आजोबाSS," वहिनीची भावजय बहुतेक हार मानण्याच्या मूडमधे नसावी.
"इतके वर्ष ट्रिटमेंटचा खर्च केला आम्ही, आता काय आणखी जड जाणार होता का आजोबाSS," नणंदपण तयारीची.
"इतके महिने तुमचं सगळं केलं आणि आता असे पोरके करून कसे गेलात आजोबाSS," भावजय कच्ची नव्हतीच.
यापुढे कदाचित नवीन काही घडामोडी आठवल्या नसाव्यात. त्यामुळे वहिनीची बहीण अचानक चक्कर येऊन कोसळली. ताबडतोब तिच्या नवर्‍याने तिला उचलून आतल्या खोलीत नेले आणि पलंगावर झोपवून परत आला.
"हिचं आजोबांवर भलतंच प्रेम हो ! धक्का सहन नाही झाला तिला."

धक्का? आणि तोही इतका जबरदस्त सामना केल्यावर? बहुतेक तिला आजोबा गेल्याचेच उशिरा कळले असावे. आठ-दहा मिनिटे गेली असतील नसतील, वहिनीची वहिनीही नर्व्ह गॅसच्या संपर्कात आल्याप्रमाणे चक्कर येऊन कोसळली. तिची रवानगी आतल्या खोलीत झाली. कदाचित हा संसर्गजन्य रोग असावा. इतक्यात गावातल्या 'या' बाबतीतल्या एक्स्पर्ट लोकांनी पार्थिवाचा ताबा घेतला. मग ते अखेरचे स्नान वगैरे झाल्यावर आणि काय कुठे ठेवायचं यावरुन थोडी शिवीगाळ झाल्यावर एकदाची आजोबांची वाटचाल रामनामाच्या घोषात त्यांच्या महाप्रवासाकडे सुरु झाली.
मुलाने म्हणजेच वहिनीच्या वडिलांनी रितीनुसार मडके धरलेले, ते पुढे चालत होते. मागे खांदेकरी चालणार. आता या खांदेकर्‍यांमधे मानपान असतात लग्नासारखे, हे मला आत्ता कळत होते. तर हे स्पेशल मान्यवर खांदा द्यायला सरसावले. आता त्यांच्या मागून चालणे आलेच. मधेच मान म्हणून कुणीतरी दादाच्या खांद्यावर आजोबांचा एकचतुर्थांश भार टाकला. तोपर्यंत तरी दर दहा पंधरा मिनिटांनी खांदेकरी बदलत होते आणि मग कुणीतरी हळूच मला एका कोपर्‍याचा भार दिला. त्यानंतर मात्र खांदेकरी बदलण्याची पद्धत कुण्या दुष्टाने बंद केली आणि आजोबांच्या पार्थिवाचे निम्मे वजन पेलत आणि बाजूने येणारा एका मादकद्रव्याचा भपकारा सहन करत आम्ही स्मशानापर्यंत आलो. त्यानंतर मात्र मूळ खांदेकर्‍यांना आपले कर्तव्य आठवले आणि ते पुढे सरसावले.

साधारणतः एक किलोमीटरपर्यंत एका माणसाचे एकूण निम्मे वजन पेलून आपले खांदे कितपत ठिकाणावर आहेत याचा दादा आणि मी अंदाज घेत असतानाच समोर बाकी संस्कार सुरु झाले. आम्ही आपले लांबच.
"त्या किश्याची मुलगी पळून गेली म्हणे," कुणीतरी कुणाच्यातरी कानात फ़ुसफ़ुसलं.
"ती जाणारच होती कुणाचा तरी हात धरून. तिचं चालचलन ठिक नव्हतंच," आणखी मुक्ताफळे.
आता मी पामर लांबुळका चेहरा करून इथे उभा, कारण माहित नाही कसे वागायचे ते आणि इथे सरळसरळ गावगप्पा चालू. आपण काय करणार? जरा बाजूला तेवढा सरकलो.
"भाऊ, कालची पार्टी जरा जास्तच जोरात झाली की !" आणखी एक आवाज.
"तूच शेवटचा शेवटचा म्हणताना पीत र्‍हायलास. पियाची रे, पण ओकेपर्यंत नाय काय." इथला रंग वेगळाच दिसत होता.
"ती माझी चूक नाय रे, तुम्ही इंग्लिश म्हणून आणलेली गावठी होती वाटतं. नायतर दोन-तीन क्वार्टरनी आपण काय ओकत नाय बघ." म्हणजे याचं असं पण समर्थन असतं?
"तुला झेपत नाय तर बोलू नको. गावठी पाजण्याइतपत खाली घसरलो नाय आम्ही..." पुढे फुल्याफुल्यांचे शब्द.
इथे थांबणे माझ्या प्रकृतीमानाला घातक होते. मी बापडा सटकलो तिथून. इतक्यात समोरून गोंधळ ऐकू आला, म्हणून जरा तिकडे सरकलो.
"आयला, हे कुठलं न्हावी आणलं म्हणायचं? आर्धातास झाला आजून एकाचीच भादरतोय, आमच्या जिवाला आणला असता तर येव्हाना सगळ्यांची भादरुन टाकली असती टकुरी." म्हणजे वशिलेबाजी इथपर्यंत पोहोचलीये तर.

असा बराच वेळ गेल्यावर एकदाचा पार्थिवाला अग्नी दिला. आता आपलं काम संपलं म्हणून मागे फिरायच्या तयारीत असतानाच पुन्हा गलका झाला. यावेळी गावातले मान्यवर पुढचे 'दहावे' आणि 'बारावे' की 'तेरावे' यांच्या तारखा सांगत होते. एकमापी सगळं ऐकून घेतल्यावर मग परतीचा रस्ता धरला. वहिनीच्या घरी आलो. बाहेर हातपाय धुतोय तोच आतून 'चहा घ्या मंडळी' असा पुकारा. आत पाऊल टाकल्याटाकल्या समोरच वहिनीची वहिनी आणि वहिनीची बहीण दोघी एव्हाना चांगल्या ठणठणीत शुद्धीवर येऊन चहा घेत बसल्या होत्या. हा म्हणजे माझ्या दृष्टीने बाउंसरच होता. मघाशी गळा काढून काढून बहुतेक दोघींचे गळे सुकले असावेत.

दहा-पंधरा मिनिटे बसल्यावर दादा-वहिनी एकमेकांशी काहीतरी कुजबुजले आणि दादाने मला गाडी काढायला सांगितले. मघाच्या झाडाखालून गाडी काढून घरापर्यंत आलो तर दारात वहिनीची बहीण हजर. "अय्या, तुम्ही वॅगन-आर घेतलीये, आम्ही बाबा सॅन्ट्रो घेतलीय. आत्ता महिनापण झाला नाही." मघाच्या धाय मोकलून रडण्याचा आत्ता लवलेशही नव्हता. या लोकांनी बहुधा मला धक्क्यावर धक्के द्यायचे ठरवले असावे. मला काही बोलायलाच सुचेना! पण दादा आला आणि मी सुटलो. आता योगिता आली की आम्ही निघणार इतकेच गणित मनात होते, पण तिच्याबरोबर वहिनीला येताना बघून मी अवाक! पण काही न बोलता दोघी आत बसल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. परत जातानासुद्धा येतानासारखे शांत शांत असणार या जाणीवेने मी कंटाळलेलो, पण गाडी गाव सोडून मुख्य रस्त्याला लागताच पहिल्यांदा दादाच बोलला.

"काय रे ! वैतागलास का?"
"छे, मी कसला वैतागतोय, आपल्याला काही कळत नाही यातलं म्हणून गप्प बसलेलो इतकंच," मी गुळमुळीत बोललो.
"गावात हे असंच असतं रे!"
"पण दादा एक सांगू? त्या वीणाताई आणि वहिनीच्या वहिनींचे जे काय चालले होते त्याच्याने मला हसू दाबायला मुष्कील जात होते हं," वहिनी मागे बसलीये हे आठवून मी जीभ चावली.
"त्यांचा मोठेपणा गावाला ऐकवायची संधी!" इतकावेळ गप्प असलेली वहिनीच म्हणाली.
"आता पुढे कार्यांना यायला लागेल हं," दादाने सांगितले. "पण तेव्हा मीच येईन हिला घेऊन," पुढे पुष्टी जोडली.
"हा सगळा प्रकार म्हणजे माझ्या डोक्याचे तीन तेरा वाजले बाकी," मी दादाला हसून म्हणालो.
"हे तर काहीच नाही, पुढे आणखी असते. मागच्यावेळी पुण्यात गेलो होतो आपल्या काकांच्यावेळी, तेंव्हा पिंडाला कावळाच शिवेना. सगळ्या नातेवाईकांना काय काय बोलायला भरीस घातलं, पण छे ! मग मागे नंबर लावून असलेले लोक ओरडायला लागले, नसेल शिवत कावळा तर दर्भाचा कावळा करून घ्या, पण लवकर बाजूला व्हा. काय वैताग माहिताय?!"
"मग ? केला का दर्भाचा कावळा?" मला उत्कंठा.
"छे रे, कुणाला तरी सुचलं आणि पिंडावरच्या उदबत्त्या काढून घेतल्या आणि शिवला की कावळा ! आता त्या धुराचा चमत्कारिक हलता आकार बघून तो भित्रा प़क्षी कसा जवळ येईल रे?" दादाने अनुभवाची पोतडी सोडली.
"ए दादा, एक मस्त बिझनेस प्लान आला बघ डोक्यात." मी हळूहळू माझ्या स्वभावावर घसरत होतो.
"काय रे ? "
"बघ, एक कावळा पकडायचा, त्याच्या पायाला दोरी बांधून तिथे बसायचं पोपटवाल्या ज्योतिष्यासारखं. पिंडाला कावळा शिववून देतो, प्रती पिंड शंभर रुपये," यावर दादा खळखळून हसला आणि त्याच्या आवाजात आवाज मिसळून वहिनीचे मोकळे हस्य गाडीत पसरले.

मघाचा ताण एव्हाना नाहीसा झाला होता आणि पोटातल्या ओरडणार्‍या कावळ्यांना एका बर्‍याशा हॉटेलात शांत करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. वहिनीचे आजोबा त्यांचं सत्याऐंशी वर्षाचं आयुष्य संपवून त्यांच्या न परतीच्या महाप्रवासाला निघून गेले होते आणि आम्ही नेहमीसारखेच मोकळ्या मनानी आमच्या इटुकल्या परतीच्या प्रवासात गर्क झालो होतो.

गुलमोहर: 

Happy Happy

आधी मला ही एक गंभीर कथा वाटली होती, पण विनोदी निघाली.

छान आहे, खेड्यामध्ये तर हा प्रकार अत्युच्च पातळीपर्यंत पोहोचतो

"त्या किश्याची मुलगी पळून गेली म्हणे," कुणीतरी कुणाच्यातरी कानात फ़ुसफ़ुसलं.>>
च्ययला माझीच मुलगी गेली का पळुन दुसरी कोनाची मुलगी नव्हती पळुन जायला Lol

Happy

धन्यवाद मंडळी,
ही कथा या दिवाळी अंकातली नाहीये २००८ मधली आहे, माझा अज्ञातवास तिथूनच सुरु झाला Wink

मस्त कथा आहे. तुम्ही वर्णन केलेली सत्य परीस्थीती आहे. माझी आजी वारली त्यावेळीही असाच अनुभव आला होता. आजीचं शव जोपर्यंत तिथं होतं तोपर्यंत बर्याच जणांनी धायमोकलून तमाशा करून घेतला (आपलं किती प्रेम आहे याचं प्रदर्शन). तिचं शव हलल्यावर त्या सगळ्या रडणार्या बायकांच्या डोळ्यातील टिपूसं गायब आणि कुचाळक्या सुरू. प्रसंग काय आणि आपण बोलतोय काय याचं काहीच भान नाही. बरं ही मुंबईतली घटना आहे.....खेडेगावातील नाही. शेवटी काय माणसाची मनोप्रवृत्ती सगळीकडे सारखीच.

वहिनीची वहिनीही नर्व्ह गॅसच्या संपर्कात आल्याप्रमाणे चक्कर येऊन कोसळली. तिची रवानगी आतल्या खोलीत झाली. कदाचित हा संसर्गजन्य रोग असावा.>>>>>>>> हे भारी नाटक Lol