पिंट्या

Submitted by कवठीचाफा on 8 October, 2011 - 09:10

" अरे तो डिओ बुटात नको मारु " नेहमी प्रमाणे मी बॉडी स्प्रे बुटात मारत असताना पकडल्या गेलो आणि आशु कडाडली. आता माझाही त्याला नाईलाज आहे, दिवसभर पाय बुटात अडकवून भर उन्हातान्हाचं फिरायचं तर पायाला घाम येतोच आणि त्यामुळे पायमोजे आणि पर्यायाने बुटालाही भयानक वास येतो. तोच वास घालवण्यासाठी मी हे असले उद्योग करतो आणि मग सौ. उखडते.
" अगं हो SS असेच बूट ठेवले तर आजूबाजूच्या लोकांकडून प्रदूषण मंडळाला तक्रारी जातील, थोडेफार बेशुद्ध पडतील, आता त्याच बेशुध्दीत बाजूच्या काकूंची कवळी पळवता आली तर बरं होईल किमान त्यांच्या मुलाचा पगार ऐकायचा त्रास तरी वाचेल रोजचा " मी आपली फुटकळ बडबड केली.

विषय नक्कीच वाढला असता पण तेवढ्यात माझा फोन वाजला.
" बोल रे शल्या, आज काय अमावस्या आहे की पौर्णिमा माझी आठवण काढलीस ती ? " नंबर बघून मी थेट बोलायलाच सुरुवात केली.
" पिंट्याला अ‍ॅक्सिडंट झालाय संजीवन मध्ये आहे कधी येतोयस ? " शल्याच्या आवाजात थट्टेचा अंशही नव्हता.
शल्याचा फोन येताच ज्या वेगाने माझा चेहरा उजळला होता त्याच्या दुप्पट वेगात तो उतरला. बातमी काही ठीक नसावी हे आशुला मी न सांगताच कळले आणि ती प्रश्नार्थक चेहरा करून माझ्याकडे पाहतं राहिली.

इतर सगळी चौकशी करून मी फोन कट केला आणि आशुला नक्की काय झालं ते सांगून टाकलं काहीही न बोलता तिनं माझ्या निघण्याची तयारी सुरू केली अट फक्त एकच 'गाडी घेऊन जायचं नाही'.

आवराआवरी करून एकदाचा निघालो.

संपूर्ण प्रवासभर पिंट्या हा एकच विषय डोक्यात होता.

पिंट्या.... खरं नावं महेश, पण याच्या घरचे याला पिंट्या म्हणतात याचा शोध कसा काय तो संज्याने लावला आणि तिथून आमच्यासाठीही तो पिंट्याच झाला.
पाच फुट अकरा इंचाची दणदणीत उंची, शरीरयष्टीही मजबूत पण केवळ शरीराच्या रुंदीमुळे तो कायमच किरकोळ वाटत राहिलाय. केस कायम बारीक कापलेले, या नादात केसांतल्या भोवर्‍याच्या आजूबाजूचे केस कायम सावधान अवस्थेत राहतात याचं त्याला काहीच सोयरसुतक नसतं. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट त्याला आमच्यापासून वेगळा दाखवत असायची ती म्हणजे चेहर्‍यावरचे शांत भाव आणि कायम ओसंडणारं सौम्य हसू. सौम्यच हं, कारण आमच्यातलं बाकी कुणीही हसलं तरी पाच-पन्नास लोकांना काहीतरी विनोद झाल्याची खबर लागतेच.
आमच्या अचाट टारगट कंपूतला हा एकमेव गुणी मेंबर ( हे उद्गार अनेकांकडून ऐकलेयत ) जणू लांडग्यांच्या कळपात वावरणारी शेळीच.
बाकी कंपनी म्हणजे नमुने होते, आहेत आणि म्हातारपणी असेच राहिले तर काही खरं नाही.
म्हणजे शल्या, कधी कुणालाही धड नावानं हाक मारणार नाही आणि म्हणून कुणी वैतागलंच तर त्याला सरळ करायलाही अनेक मार्ग आहेत याच्याकडे.
संज्या, किरकोळ शरीरयष्टी पण त्यात मावणार नाही इतका इरसाल, याच्या तडाख्यातून कॉलेजचे प्रोफेसरही सुटले नाहीत.
तेजु, आमच्या ग्रुपची मुलूखमैदानी तोफ, एकदा धडाडली की समोर कोणताही किल्ला, किल्लेदार असला तरी शरण आलाच पाहिजे.
निली, प्रत्यक्षात कधी कोणताच उपद्व्याप करणार नाही पण बहुतांश इरसाल आयडिया हीच्या डोक्यातून निघतात.
मी ही याच मळ्यांतला, पण पिंट्यामात्र नाही.

पिंट्याचा स्वभाव एकूणच आमच्या विरुद्ध टोकाचा तरीही हा आमच्या ग्रुपमध्ये आजवर टिकून आहे कदाचित यालाच अपवाद म्हणत असावेत.
आम्ही बर्‍यापैकी टारगट तर हा नको इतका सुस्वभावी.

पिंट्याचा सरळपणा भयंकर महाग पडणारा असू शकायचा,
एकदा लेक्चर बंक करून पिक्चर टाकायचा प्लॅन केला, मारधाड चित्रपट होता कुठलातरी म्हणून हा नको म्हणाला आम्हीही म्हटलं 'बरं'..........
या पठ्ठ्याने लेक्चरला बसून आमच्यासाठी नोट्स जमवायच्या होत्या.
पिक्चर संपल्यावर आम्ही साळसूदपणे घरी आणि करकरीत तिन्हीसांजेला पिंट्या हातात नोट्सच्या झेरॉक्स घेऊन घरी हजर.. .. तोही थेट मातोश्रींसमोरच.
" का रे महेश आज इतक्या संध्याकाळचा ? " पिंट्याचा सातच्या आत घरात प्रकार माहीत असलेल्या मातोश्री अचंबित झाल्या.
" नोट्स द्यायला आलो होतो " थेट आईच्याच हातात नोट्सचे पेपर ठेवत स्वारी उवाचली.
" आजच्या नोट्स ? मग हा काय करत होता ?" आईने पिंट्याच्या सुटसुटीत अक्षरात वर लिहिलेली तारीख वाचली हे नक्की.
इतकी किल्ली मिळाली बस्स पिंट्याने रसरसत्या उत्साहात आमचा पराक्रम सांगून टाकला. पुढे जे रामायण घडले ते सांगायची गरज नसावी.
थोड्याफार फरकाने हाच प्रकार शल्या सोडून सगळ्यांच्याच घरी झाला. शल्याच्या बाबतीत त्याच्या वडिलांनी हात टेकल्याने त्याला फारसा फरक पडला नाही.
दुसर्‍या दिवशी पिंट्याला हाणायचाच बाकी ठेवलेला.

याच्या सरळपणाचा आणखी नमुना,
त्या काळी एक विनोद फारच प्रचलित होता. थोडासा इरसाल असल्यामुळेच पिंट्याच्या कक्षेबाहेर फेकल्या गेला.

एका प्रसूतिगृहात एक नवीनं डॉक्टर येतो, त्याच्या पाहिल्याच राऊंडला त्याला तिथल्या पेशंटची माहिती दिली जात असते.
वॉर्डमध्ये गेल्यावर तो पाहिल्याच स्त्री पेशंटला प्रश्न विचारतो,
" तुम्हाला कोणती डेट दिलेय ? "
" २७ नोव्हेंबर " तिचं उत्तर. हाच प्रश्न पुढच्या स्त्री पेशंटला विचारतो. उत्तर २७ नोव्हेंबरच.
आता तिसर्‍या पेशंटजवळ गेल्यावर उत्साहाच्या भरात तो बोलतो.
" तुम्हालाही २७ नोव्हेंबरच डेट दिलेय ना ? "
"नाही, मी त्यांच्याबरोबर पिकनीकला गेले नव्हते" शांतपणे बाजूच्या दोन्ही स्त्री पेशंटकडे पाहतं ती उत्तरते.
आता कदाचित हसू नाही येणार पण जेव्हा हास्याचे धबधबे चालू असतात तेव्हा असल्या एखाद्या विनोदाच्या सरीलाही तोंडभर हसू येते. आम्ही असेच खो खो हसत असताना एकटा पिंट्या शांत !
विचारलं " काय झालं तुला ? तू का गप्प ? "
" म्हणजे काय ? तुम्ही सगळे एकदम बकवास आहात " पिंट्याच्या इतक्या जहाल प्रतिक्रियेची अपेक्षा कुणीच केली नव्हती.
" का रे बाबा ? आता यात कसली बकवास ?"
" बकवास नाही ? बकवास नाही " पिंट्याचा राग अनावर झाला की तो वाक्याच्या सुरुवातीचे शब्द नेहमी दोनदा उच्चारतो. " अरे नसेल जमलं त्या बाईला जायला पिकनीकला, असेल तिचा काही प्रॉब्लेम, त्याच्यावर इतकं खदखदा हसायला काय झालं ?" एकच सेकंद शांतता आणि मग मघाचं हसू व्याजासहित आमच्याकडून उसळलं आणि आम्ही हसल्यामुळे पिंट्या नुसताच रागानं पाहतं राहिला.

पिंट्याचा 'भित्रेपणा' हा आणखी एक गुण. महाशय रात्री उशीरा घरी परत जात असले तर कॉलनीचे जिने चढताना खणखणीत आवाजात गाणी म्हणतं चढायचे, अं हं आवड म्हणून नाही, रात्री अंधार्‍या जिन्यातून जाताना वाटणार्‍या भितीकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून.
एकदा असाच आम्ही त्याला बळजबरीनं पकडून 'हॉरर्स ऑफ ड्रॅक्युला' या टरकीफाय पिक्चरला नेला. हा आला तर खरा पण उठसूट त्याच्या खिशातल्या वस्तू खाली पडायला लागल्या, बसल्याजागी काहीही न करता बुटाच्या नाड्या सैल व्हायला लागल्या आणि नेमकं हे व्हायचं कधी ? तर बरोबर समोर एखादा हॉरर सीन चालू झाला की. कायम चौफेर नजर भिरभिरत असलेल्या संज्याच्या लक्षात ते यायला अजिबात वेळ लागला नाही आणि ' हॉरर्स ऑफ ड्रॅक्युला' या चित्रपटात हसणार्‍या आम्हा मंडळीबद्दल आजूबाजूच्या लोकांचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असावा.

त्या दिवसानंतर किमान महिनाभर तरी पिंट्याला कधी सात नंतर फोन केला की पिंट्या चारचौघांसारखं 'हॅलो' म्हणायच्या ऐवजी 'रामराम' असं म्हणायचा. का ? ते सांगायला नकोच.

पिंट्याच्या महागड्या सरळपणाची सवय अगदी कॉलेज संपून नोकरी लागली तरी गेली नाहीये .
एकदा स्वारी मोटरसायकलवरून जाताना एका गाडीवर आपटली, यालाही बर्‍यापैकी खरचटलं आणि त्या गाडीचा मागचा दिवा फुटला. गाडीवाल्याने हमरीतुमरीवर येत याच्याकडून नुकसान भरपाईही घेतली. आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही गाSSर, कासवाला लाज वाटावी अश्या वेगात गाडी चालवणारा पिंट्या इतक्या वेगात ? पण जेव्हा त्यालाच विचारलं तेव्हा जो उलगडा झाला त्यावर हसावं की रडावं हेच कळेनासं झालं. प्रकार झाला होता असा,
पिंट्या नेहमीप्रमाणे अ‍ॅक्सिलेटर एखादा मिलीमिटर फिरवून चाललेला आणि त्याला भरवेगात ओव्हरटेक करून गेलेल्या गाडीकडे त्याचं लक्षं गेलं, गाडीच्या मागच्या दरवाजाचे लॉक बरोबर लागलं नव्हतं दरवाजा हालताना दिसत होता. क्षणात पिंट्याच्या नजरेसमोर चालू गाडीचा दरवाजा उघडल्यामुळे होऊ शकणार्‍या भीषण अपघाताचं चित्रं वगैरे उभं राहिलं असावं, याने गाडीला वेग दिला आणि पाठलाग सुरू केला पण हाय रे दैव ! समोर सिग्नल लागल्याने किंवा आणखी कशाने त्या गाडीने ब्रेक लावले, आणि अनादी कालापासून वेगाची सवय नसलेल्या पिंट्याच्या गाडीचे ब्रेक लागलेच नाहीत.........

"अरे, पण तुला कुणी नसत्या उठाठेवी सांगितल्या होत्या ? त्याची गाडी त्याचा दरवाजा, तुला काय घेणं देणं होतं ? " वैतागलेल्या शल्याने प्रश्न टाकला.
" कसलं डेंजर असतं माहिताय चालू गाडीचं दार उघडल्या जाणं ! " आमच्या माहितीत भर घालत पिंट्या उत्तरला.
" अरे पण, शेवटी आपटलास ना, त्याच गाडीवर ? " माझी कुरबूर.
" अरे पण तो वाचला ना ! "
" हो , पण त्याच त्याला काही घेणं देणं आहे का ? त्यानं तुझ्याकडून भरपाई घेतलीच ना ?" मी आणखी वैतागलो.
" असते रे एखाद्याची सवय जाऊ दे " हे तो नक्की कुणाबद्दल म्हणाला ते मला अद्याप कळले नाहीये.

काही चमत्कारिक सवयी कधी कधी आपोआप उचलल्या जातात, माझं तसं झालं त्याला कारण पिंट्याच.
नोकरीच्या मुलाखतीला कधी टाय वापरला नाही आणि नोकरी लागल्यावर काही खास कारणांसाठी हे कंठलंगोट वापरणं गरजेचं झालेलं. अशावेळी संज्याची मदत न घेणं सोईस्कर, कारण काहीतरी मख्खी होण्याची दाट शक्यता. शल्या त्या बाबतीत अगदीच निरुपयोगी, त्याने कंपनीच अशी शोधलीये की जिथे तो घालेल ते कपडे चालतात, किंवा तो निदान कपडे तरी घालून जातो यात त्याचे व्यवस्थापन समाधानी असले पाहिजेत. यादी कमी केल्यावर विश्वासू असा एकच माणूस दिसला तो म्हणजे 'पिंट्या'
पिंट्याचा धावा करून त्याला तो कंठलंगोट कसा आवळावा याचं प्रशिक्षण द्यायची गळ घातली, पिंट्यानेही ते मनापासून शिकवलेय पण नेमका लोच्या असा झालाय की आता मला टाय माझ्या गळ्यात घालून नीट बांधताच येत नाही त्यासाठी किमान एक स्पेअर गळा शोधावाच लागतो, बरं हे सगळं का व्हावं तर पिंट्याने मला टाय बांधायला तसाच शिकवला. आता दोष दुसर्‍याच्या माथी मारायची आपली सवयच म्हणा पण माझ्या या विचित्र सवयीचा एक शतांश का होई ना ! कारण पिंट्याच.

पिंट्या आमच्या ग्रुपमध्ये टिकला याचं कदाचित एक कारण असू शकेल, पिंट्या म्हणजे आमच्या ग्रुपचे दाखवायचे दात आहेत. कधी कुठेही किचकट वाटण्याऱ्या ठिकाणी (उदाहरणार्थ, चौकशी खिडक्या) शक्यतो प्राथमिक बोलणी करायची कामगिरी बहुदा पिंट्यावर सोपवली जाते, कारण तोच एकटा आमच्यात असा माणूस आहे की समोरच्याने कितीही प्रयत्न केले तरी न चिडता कितीही प्रश्नांना उत्तरे देऊ शकतो ती ही मुद्द्याला धरून. पिंट्याचं बोलणं एकदम मुद्देसूद म्हणजे वादाच्या ठिकाणी तरी अश्या ठिकाणी आमच्यापैकी एकही मेंबर कामाचा नाही आणि शल्यातर नाहीच नाही कारण पिंट्या मुद्देसूद बोलणार तर शल्या गुद्देसुद.... म्हणजे होणारं कामही खात्रीलायकरीत्या होणार नाही.
आमच्यासाठी अशक्य असलेल्या या गुणामुळे पिंट्याने कित्येक अचाट गोष्टी पार पाडल्यात. म्हणजे खिडकीसमोर हाऊसफ़ुल चा बोर्ड लागलेल्या तिकीटखिडकीतुन एक दोन नव्हे चक्क सहा सात तिकिटं आणण्याचं अचाट कर्तृत्व फक्त पिंट्याच्याच अंगी असू शकतं. याच्या भोळ्याभाबड्या चेहऱ्याने आम्हाला कित्येक दुर्धर प्रसंगातून सुखरूप बाहेर काढलेय नाहीतर एव्हाना 'रस्टीकेट'चा स्टिकर लावून आम्ही गाव उनाडत असतो. याचा आम्हाला अविस्मरणीय किस्सा,

तारुण्याचा बहर आलेला असताना प्रेमात पडणं हे फार स्वाभाविक होतं, साहजिकच तसं ते घडलं, एका ज्युनियर कॉलेजच्या मुलीवर संज्याचं प्रेम बसलं असल्याचा त्याला साक्षात्कार झाला. काही दिवस ही गोष्ट नुसत्या चर्चेत राहिली आणि एक दिवशी कसं काय ते शल्या आणि संज्याने मिळून रात्री सातच्या आसपास त्या मुलीच्या मोकळ्या वर्गात शिरून फळ्यावर चक्क प्रेमपत्र लिहिलं.
दुसर्‍या दिवशी कॉलेजात आल्या आल्या संतापलेला उपप्राचार्य हा गरमागरम पदार्थ समोर आला त्यानेही कुठुनशी केल्या उपद्व्यापाची माहिती मिळवलेली, आणि एकंदर त्याच्या बोलण्यातून लागलेला महाभयानक शोध असा होता की ज्या मुलीला ते प्रेमपत्र लिहिल्या गेलं ती त्या उपप्राचार्यांची कनिष्ठ कन्या होती. बर्‍यापैकी महाभारत घडू पाहतं होतं आमच्या एकूण इतिहासावरून बाजू आमच्या विरुद्ध जाणार हे नक्की होतं आणि अशावेळी पिंट्या मदतीला धावला. पाउणतास खर्च करून त्याने आमच्यापैकी कुणीही त्यावेळी कॉलेजमध्ये असणं शक्य नाही कारण आम्ही पिंट्याच्याच घरी एकत्र अभ्यास करत होतो हे त्यांना पटवून दिलं केवळ आणि केवळ त्यानेच सांगितलं म्हणून उपप्राचार्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि आमची सुटका झाली अन्यथा काही खरं नव्हतं. तिथून संज्याने प्रेमप्रकरणाचा असा धसका घेतला की म्हणे त्याने प्रेमा नावं असलेल्या दोन मुलीही लग्नासाठी नाकारल्या.

विषयच प्रेमाचा निघाला तर एक आठवणीतली आठवण आलीच, पिंट्याचा प्रेम विवाह आहे, सांगून कुणालाही पटत नाही पण आहे. अर्थात त्यामागे पल्लवी म्हणजे पिंट्याची सौभाग्यवती तिचीच धडपड जास्त आहे.
पल्लवीला पिंट्या आवडला, आमच्यात वावरत असूनही आवडला हे महत्त्वाचं.
पल्लवीने तिच्याकडून प्रयत्न सुरू केलेले तेजु आणि निलीच्या चाणाक्ष नजरेतून सुटणं शक्य नव्हतं त्याही आणि पर्यायानं पिंट्या सोडून आमचा सगळा ग्रुप पल्लवीच्या मागे उभा ठाकला. होतील तितके प्रयत्न करूनही पिंट्याकडून काहीही प्रतिसाद येत नाही असं पाहिल्यावर एकदा पल्लवीनं त्याला भर रस्त्यात गाठून प्रपोज केलं. अजूनही लाजून लाल झालेली पल्लवी आणि शिंग फुटलेल्या सशाकडे पाहावं तश्या नजरेनं तिच्याकडे पाहणारा पिंट्या नजरेसमोर येतायत. दोघांच्यात काहीच निर्णय होत नसल्याचं पाहिल्यावर तेजुनेच पल्लवीला " हा विचार करून परवा सांगेल " असं सांगून वेळ मारून नेली. त्यानंतरचे दोन दिवस शब्दशः पिंट्याचं ब्रेनवॉशिंग चाललेलं. इतक्या उपद्व्यापानंतर पिंट्या तिला भेटायला तयार झाला. पाच मिनिटांत दोघांची पहिली भेट आटोपली.
प्रेमाची कबुली दोन्हीकडून असली तरी आम्ही तरी पिंट्या आणि पल्लवीला एकत्र असं थेट लग्नानंतरच पाहिलं.

दिवस आता बदललेत प्रत्येकजण आपापल्या कुटुंबात, कामात व्यस्त आहे तरी एकमेकांची ख्यालीखुषाली विचारणारे फोन अधुनमधुन होतंच असतात सध्यातर त्यात आणखी पाच मेंबर वाढलेत ते म्हणजे संज्याची अर्धांगींनी माधवी, तेजुचा बिचारा नवरा संदिप, निलीचा पतिराज गिरीष, पिंट्याची पत्नी कोण ते सांगायला नकोच आणि माझी सौभाग्यवती आशु.
एकदा असाच पल्लवीचा फोन आला घाबरलेल्या आवाजात तिनं पिंट्यानं नोकरी सोडल्याची बातमी दिली. अत्यंत तातडीनं आम्ही बहुतेक सगळेच पिंट्याकडे धडकलो, जाब विचारायला म्हणून. काहीच न बोलता पिंट्याने त्याची डी फार्मसी ची डिग्री आणि नव्या मेडिकल स्टोअरसाठी लागणार्‍या एकुणएक गोष्टींची पूर्तता केल्याची फाइल दाखवली.
" इतके दिवस नोकरीतल्या भपक्यामागे उगाचच धावत होतो, गळ्यात टाय आणि अंगावर ब्लेझर असला की उगीचच मोठं असल्याची भावना वाटायची पण एकदा हातात प्रिस्क्रीप्शन घेऊन या मेडिकल मधून त्या मेडिकल मध्ये धावत असलेली एक आजी बघितली, तिला का पळावं लागलं तर तिच्या एकुलत्या एक मुलाला फीट्सचा त्रास होत होता आणि त्यासाठी लागणारी औषधं शेड्युलल्ड असल्यानं तिला नव्या प्रिस्क्रिप्शनशीवाय मिळत नव्हती, अगदी ती नेहमी ज्या दुकानातून औषधं घेत होती त्यानेही ते प्रिस्क्रिप्शन नाकारलं, वेळेवर गोळी मिळाली नाही तर मुलाला फिट येईल या भितीनं बिचारी भर उन्हात फिरत होती, कंपनीच्या मेडिकल ऑफिसरला फोन लावून तिला त्या गोळ्या मिळवून दिल्या खर्‍या पण अश्या किती आज्यांच्या मागे मी धावणार होतो. आता मला ते शक्य आहे "
पिंट्या न थांबता सलग असं इतकावेळ पहिल्यांदाच बोलला किंवा बोलू शकला या वेळी कुणीच त्याला अडवलं नाही.
मनात एकच विचार आला. सालं, आपण समाजाचं असं कधीच देणं मानलं नाही, वेळच्यावेळी पगार, राहायला चांगलंसं घर, माझी बायको, माझी मुलं सगळं माझं माझंच कधीच साला दुसर्‍याचा विचार आलाच मनात तर एखाद्या संस्थेला हजार रुपयाची देणगी दिल्यावर आपली बांधीलकी संपल्याची भावना, त्याचीही जाहीरात सतरा ठिकाणी केल्याशिवाय राहवत नाही.
नोकरी सांभाळून फावल्यावेळात डी फार्मसी करून दुकान टाकण्याची वेळ येईपर्यंत आपल्या बायकोलाही न सांगण्याची समज असणारा पिंट्या त्या दिवशी एकदम भव्यदिव्य वाटला. त्याला जाब विचारायला गेलेले आम्ही त्याच्या त्या ज्येष्ठ नागरिकांना दहा टक्के सूट असणार्‍या मेडिकल स्टोअरच्या उद्घाटनाला हजर राहिलो न चुकता. जर आयुष्यात कधी हिशोब लावल्या गेलाच तर ही एकच गोष्ट कदाचित पुण्याची बाजू रिकामी राहून देणार नाही.

विचारांच्या नादात कधी 'संजीवन' पर्यंत पोहोचलो कळलंच नाही. धडधडत्या काळजानं रिसेप्शनला चौकशी केली आणि पिंट्याच्या रूमकडे निघालो.
आत उसळलेल्या हशाने बाहेरपर्यंत बाहु पसरले बाहेरच्या सिस्टर मंडळींच्या कपाळावर जरी नापसंतीच्या आठ्या उमटल्या असल्या तरी माझ्या मनावरचं ओझं एका क्षणात उतरून गेलं.

एक हात गळ्यात आणि एक पाय लटकत ठेवलेला पिंट्या आणि आजूबाजूला उरलेला सगळा कंपू.
" आलास ? तुलाच फोन करणार होतो " शल्याचा नेहमीचा बेफिकीर आवाज
" अरे नक्की काय झालं " ?
" काही नाही रे याला वाटलं आपल्याला बाइकसकट जे.सी.बीच्या आरपार जाता येऊ शकतं, म्हणून तसा प्रयत्न करायला गेला तो "
" अरे बापरे, म्हणजे थेट जे.सी.बी. लाच धडकला हा ? मग ? " माझ्या आवाजात चिंता.
" मग काय, सहा तास अंतराळप्रवास चाललेला महाशयांचा " शल्याने जे उत्तर दिलं त्याचा अर्थ इतकाच की पिंट्या सहा तास बेशुद्ध होता, अर्थात त्यावेळीच शल्याने मला फोन केला असणार
" आता काय म्हणतेय स्वारी "
" काय म्हणणार? डॉक्टरांनी सी.टी.स्कॅन केला रिपोर्ट ओ.के. मला वाटतंय याचा असला अचाट प्रयत्न पाहून डॉक्टरांनी याला मेंदू आहे की नाही हे पाहायलाच तो केला असणार." शल्याची मूळ वृत्ती त्याला गप्प बसून देणार नव्हतीच अर्थात पिंट्या सुखरूप आहे म्हंटल्यावर सगळंच चाललं असतं, गेले सहा-सात तास हीच स्वारी चिंतामग्न अवस्थेत सगळी धावपळ करत असणार याची मलाही जाणीव होती.
एव्हाना पिंट्याची झोप चाळवली गेली असावी आणि तो हालचाल करायच्या मार्गावर दिसला सेकंदातच पल्लवी त्याच्याकडे धावली.
टक्क जाग्या झालेल्या पिंट्याला एकच प्रश्न विचारावासा वाटत होता
"अरे, पण तुला कुणी नसत्या उठाठेवी सांगितल्या होत्या ? "
आणि त्यानेही असेच काहीतरी उत्तर दिले असते
" अरे कसलं डेंजर असतं माहिताय...............

गुलमोहर: 

Happy
चाफा बर्‍याच दिवसांच्या गॅप नंतर परत लिहायला लागलास वाटतं.
कथा संपूर्ण वाचून झाल्यावर कथा अजून सफाईदार व्ह्यायला हवी होती असे वाटून गेले.

कथा आवडली कचा.

बादवे एक पिंट्या होता आमच्या संग्रहात. नको ती पुस्तकं मित्राच्या आईवडलांच्या हाती देउन वर "तूम्ही बघू नका" अस सांगून आला होता एकदा. Proud

धन्यवाद दोस्तकंपनी !

@ रुनी .. मी बरेच दिवस झाले लिहीतोय तु वाचले नसावेस Wink शेवट सफाईदार करणे म्हणजे लांबड लावण्यासारखं वाटलं मला म्हणुन मुद्दाम अर्धवट तोडला.

@ चिमुरी -- शल्या अजुनही तुम्हालोकांच्या मनातून जात नाही यातंच मला समाधान Happy

@ बा बु . >>> वर "तूम्ही बघू नका" अस सांगून आला होता एकदा<<<< Lol हसु आवरत नाहीये तुझी परिस्थिती डोळ्यासमोर आल्यावर Lol

>>>>>" इतके दिवस नोकरीतल्या भपक्यामागे उगाचच धावत होतो, गळ्यात टाय आणि अंगावर ब्लेझर असला की उगीचच मोठं असल्याची भावना वाटायची पण एकदा हातात प्रिस्क्रीप्शन घेऊन या मेडिकल मधून त्या मेडिकल मध्ये धावत असलेली एक आजी बघितली, तिला का पळावं लागलं तर तिच्या एकुलत्या एक मुलाला फीट्सचा त्रास होत होता आणि त्यासाठी लागणारी औषधं शेड्युलल्ड असल्यानं तिला नव्या प्रिस्क्रिप्शनशीवाय मिळत नव्हती, अगदी ती नेहमी ज्या दुकानातून औषधं घेत होती त्यानेही ते प्रिस्क्रिप्शन नाकारलं, वेळेवर गोळी मिळाली नाही तर मुलाला फिट येईल या भितीनं बिचारी भर उन्हात फिरत होती, कंपनीच्या मेडिकल ऑफिसरला फोन लावून तिला त्या गोळ्या मिळवून दिल्या खर्‍या पण अश्या किती आज्यांच्या मागे मी धावणार होतो. आता मला ते शक्य आहे "
पिंट्या न थांबता सलग असं इतकावेळ पहिल्यांदाच बोलला किंवा बोलू शकला या वेळी कुणीच त्याला अडवलं नाही.
मनात एकच विचार आला. सालं, आपण समाजाचं असं कधीच देणं मानलं नाही, वेळच्यावेळी पगार, राहायला चांगलंसं घर, माझी बायको, माझी मुलं सगळं माझं माझंच कधीच साला दुसर्‍याचा विचार आलाच मनात तर एखाद्या संस्थेला हजार रुपयाची देणगी दिल्यावर आपली बांधीलकी संपल्याची भावना, त्याचीही जाहीरात सतरा ठिकाणी केल्याशिवाय राहवत नाही.<<<<<

कवठीचाफा या कथेमध्ये वरील परिछेद जास्त आवडला. बाकी Start to end जबरदस्त.
असा भावनिक विचार करणारी व्यक्ती Really Great असते.

कचाफा, छान जमलय हे व्यक्तीचित्रण. भाषा, ओघ सुंदर.
पण एक सांगू? मलातरी तुकडा मोडल्यासारखं संपल्याचं वाटतय... सॉरी...
अजून वेगळ्या तर्‍हेनं शेवट करता येईल का?

कचा, मस्त लिहिलं आहेस. हा जर तुझा खराखुरा अनुभव लिहित असशील तर असे मित्र आणि अशी मैत्री म्हणजे तु खरंच लकी. तुझा शल्या आणि आता पिंट्यापण आवडला.

मलातरी तुकडा मोडल्यासारखं संपल्याचं वाटतय... सॉरी. >>>>
दाद माझ्या कथेच्या शेवटाबद्दल नेहमीच गोंधळ असतो म्हणुन यावेळी शेवट असा तुकडा मोडून करुन टाकला तसंही आणखी काही लिहीण्याची अवश्यकताच वाटली नव्हती.
अवांतर : दाद आपण पुन्हा आपल्या दमदार शैलीत पुनरागमन केंव्हा करणार ? केवळ मा बो च नाही तर इतरही मराठी संकेतस्थळावर हा प्रश्न ऐकायला मिळाला.

जुई : धन्यवाद Happy

मनिमाऊ : मित्र आणि अशी मैत्री म्हणजे तु खरंच लकी. >>> अरेव्वा ! आणि माझ्यासारखा मित्र मिळाला म्हणुन ते लकी नाहीत का ? Happy

Pages