काय सांगू (मौन)

Submitted by उमेश वैद्य on 5 October, 2011 - 02:35

काय सांगू (मौन)

शब्द नाही स्पर्शती ज्या ती निशाणी काय सांगू ?
जेथ भाषा मौन झाली ती दिवाणी काय सांगू !

ते असे की सर्वकाळी नांदणारे आत माझ्या
ओळखाया सांगणारी वेदवाणी काय सांगू !

काय केल्याने मिळे ते? प्राप्त आहे सांगताती
लागलेली ओढ आता ती विराणी काय सांगू !

जे कळेना स्पर्शग्रंथी बोट कैसे दाखवावे?
रूप नाही रंग नाही ती कहाणी काय सांगू ?

भोगता ज्या वीट येतो येथली सारी सुखे ती
चाखता जी संपली ना सौख्य खाणी काय सांगू !

जन्म कैचा होय मृत्यू लौकिकाची मोजपट्टी
अंत नाही आदि ऐसा चक्रपाणी काय सांगू ?

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: