मनात आता बरसे श्रावण....

Submitted by पुरंदरे शशांक on 26 September, 2011 - 07:26

मनात आता बरसे श्रावण....

झप्झप झप्झप झपतालावर
पाठमोरि कशि दिसशी सावर
पदर उडवितो वारा अल्लड
मनात आता बरसे श्रावण.....

कुंतल श्यामल रुळती कटिवर
मेघ दाटूनी आले इथवर
गोड सतारी कानी किणकिण
मनात आता बरसे श्रावण

मान अशी किंचित वेळावुन
सलज्ज हासू मृदु ओठांवर
लीलाविभ्रम मधुर मुखावर
मनात आता बरसे श्रावण

दिशा न उरती आसपास या
गंधित धुंदित आसमंत हा
प्राजक्ताची करतो पखरण
मनात आता बरसे श्रावण

हवे कशाला इंद्रधनू ते
रेशिमधारा ओझे वाटे
हिरवे वादळ आणी भोवळ
बरसत राही इथेच श्रावण........

गुलमोहर: 

शशांक, जबरा चित्रमय काव्य केलेस गड्या. हिवाळ्यातही पाऊस पाडला राव. नायिका पावसात भिजवली नाय काय?

छान.