एका छेडछाडीची सत्यकथा.

Submitted by अनिताताई on 25 September, 2011 - 02:22

रस्त्यावर होणारी छेडछाड हा सर्व स्त्रियांना,मुलींना नेहमीच येणारा अनुभव. प्रत्येकजण आपापल्यापरीने अशा अनुभवाचा सामना करत आलीय. माझ्या बहीणीलाही कॉलेजच्या वयात असाच अनुभव आला.पण त्या प्रकरणानं अशी काही वळणं घेतली, की तो अनुभव आजही तसाच्या तसा लक्षात आहे. तो सगळ्यांशी शेअर करावा असं खूप दिवसांपासून मनात होते. आज सांगण्याचं धाडस करते!
त्या आधी थोडी आमच्या कुटुंबाची पार्श्वभुमी. ठाण्यातल्या मध्यमवर्गीय वस्तीत राहणारं आमचं कुटुंब.
साडेतीन खोल्यांचं चाळीतलं घर. आपलं शिक्षण, अंगी असलेल्या कला आणि चारित्र्य हेच आपलं धन अशी आई-वडिलांची विचारसरणी. आणि आम्हा भावंडांवर वाढीच्या वयांत आमच्या नकळत बारीक लक्ष!
आम्हा भावंडांचं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालं. त्या काळात मुले-मुलींची एकत्र शाळा असली तरी वर्गात किंवा एरवी मुलांशी बोलायचं नाही किंवा त्यांच्याकडे बघायचं नाही असा एकंदर खाक्या! अगदी सरळ रेषेत जायचं-यायचं वगैरे.
ही घटना घडली तेव्हा माझं वय १६ तर बहीणीचं १८ होतं. बहीणीचा स्वभाव बाहेरच्या जगात काहीसा अबोल आणि बुजरा. पण या सत्यकथेचा एक पदर म्हणून तिचं एक गुपित सांगायला हवे की कॉलेजमध्यल्या मुलाशी हिचं लग्न ठरल होतं! हे एक आमच्या दृष्टीनं एक आश्चर्यच होतं कारण तिचा स्वभाव. माझ्या त्यावेळी वुड बी असणा-या मेहुण्यांच्या मित्रांनी व हिच्या मैत्रिणींनी हे लग्न जुळवून आणलेलं! आमच्या आई व दादांना हे माहित होतं. त्यांनी तिला बजावलं होतं, की योग्यवेळ आली की आम्ही लग्न लावून देऊ. पण तोपर्यंत तिनं अतिशय जबाबदारीनं वागायला हवं. बाहेर जास्त बभ्रा होता कामा नये.
सगळं व्यवस्थित सुरु होतं.
सकाळी कॉलेज करुन संध्याकाळी बहिण टायपिंगच्या क्लासला जायची. तिच्याबरोबर ब-याचदा तिची एक मैत्रिणपण असायची. वाटेवर एका ठिकाणी नवी इमारत बांधण्याचं काम सुरु होतं. तिथलं काम बघणारा तरुण असिस्टंट बिल्डर रोज स्कूटरवरून हिचा पाठलाग करायला लागला. तोंडानं काहीबाही बडबडायचा. आमचं घर एका गल्लीत अगदी टोकाला होतं. तिथपर्यंत तो मागे मागे यायचा. ही अर्थातच खूप घाबरली. एक दिवस माझ्यापाशी बोलली. तिनं हे ही सांगितलं की, तिनं होणा-या नव-याला ही गोष्ट सांगितली आहे. तो यात लक्ष घालणार आहे. मी म्हणाले, हे बरंच झालं.
त्यानंतर ५/६ दिवसांनी आम्ही दोघी एकट्याचं घरात होतो. संध्याकाळ होती. आई-दादा भाजी आणायला बाहेर गेले होते. आणि २५/२६ दुचाकींवरुन अनेक तरुण व २/३ मध्यमवयीन माणसं आमच्या दारात आक्रमक होऊन आली. त्यातल्या काहींना बहीणीनं ओळखलं. ती घाबरून म्हणाली, अगं हाच तो माणूस माझ्या मागे लागलेला. लोकांना घेऊन आलाय. त्या लोकांनी आमच्या घराबाहेरच्या जाळीच्या दारावर मुठी आपटायला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. ''दरवाजा उघडा. नाहीतर घर जाळून टाकू. ठाण्यात राहायचय का नाही??'' मग मात्र माझा संताप संताप झाला. चोर तो चोर. वर शिरजोर!! आणि ही माणसं कशाला आली याच्या बाजूनी? मी पुढे झाले, आणि म्हणाले,,'' आमचे आई-वडिल घरात नाहीत. ते आले की या. मग बोलू.'' त्यावर त्यांनी '' आम्हाला नाहीये वेळ. तुमची वाट लावतो''वगैरे भाषा केली. मग मी दार उघडलं, आणि '' कोण तो माणूस मागे लागणारा? समोर ये आधी. आणि तुम्ही कोण त्याची बाजू घेऊन आलायत? गुंडाची बाजू घेणारे तुम्ही सगळे गुंडच!!'' असं बोलून रणरागिणीचा अवतार धारण केला. त्यावर बहिण कानात कुजबुजली,'' अगं असं नको बोलूस. त्यात आमचे टायपिंगचे सरही आहेत!!!'' मी तिला म्हणाले, '' मग ते कशाला आलेत त्यांच्या बाजुने? आणि ही त्यांची भाषा कशी खपवून घेतायय?? तेव्हढ्यात आमचे आई-दादा येताना दिसले. आमची गल्ली अर्धी अधिक या लोकांनी भरली होती. आणि कोणी तरी आईला म्हणाले, ''अहो, तुमच्याकडेच चाललंय सर्व!!''
मी त्या लोकांमधून वाट काढत दादांपाशी पोहोचले व त्यांना भराभर काय झालेय ते सांगितले.
तो मागे लागणारा वासु ज्याच्याकडे काम करत होता, तो इमारतीचा बिल्डर, त्याचा बॉस जहालसेनेचा पदाधिकारी होता. आणि टायपिंग क्लासचे सर त्यांचे मामा होते. म्हणुन ते दोघे आमच्या दारात आले होते.तो जहालसेनेचा बिल्डर खूप जहाल बोलत होता. प्रकरणाला राजकीय रंग चढत होते.
त्या प्रसंगात वडिलांचं प्रसंगवधान पाहायला मिळालं. त्यांनी या दोघांना अतिशय आदरानं घरात घेतलं. त्यांच्या बरोबर त्यांची सेना, तो वासु सगळे घरात घुसले. वडिलांनी शांतपणे सगळा वृत्तांत विचारून घेतला. आणि आमची काही चूक असेल तर माफीही मागायची तयारी दर्शवली. [मी डोक्याला हात लावला!] वासुच्या बिल्डर बॉसनी खूप तारे तोडले!'' काय असतं.हातात पैसा असतो, तरूण वय असतं..दुचाकी असते बुडाखाली! रस्त्यात सुंदर मुलगी दिसते. मग काय करणार???'' आणि ते बॉस बहिणीला म्हणाले, '' काय गं, वडिलांना सांगायचं सोडून कुठल्या त्या मुलाला सांगितलंस गं? '' त्यावर मी म्हणाले, '' म्हणजे काय? तिचं लग्न ठरलंय याच्याशी !!'' त्यावर बिल्डर बॉस म्हणाले,'' करुन दाखवच लग्न. हार तुरे घेऊन येईन.'' वडिल काय समजायचे ते समजले. त्यावर त्यांनी ''त्या'' तरूणाला विचारले. एवढे सगळे लोक आमच्या घरी घेऊन आलात. तुम्हाला कसं कळलं आमचं घर? त्यावर तो म्हणाला, '' रस्ता काय हिच्या बापाचा आहे काय?'' झालं यावर ते क्लासचे सरही काय समजायचं ते समजले. यावर वडिल त्यांना म्हणाले'' तुम्ही या मुलाबद्दल १००% खात्री देत असाल तरच बोलु.'' त्यावर त्यांनी नंतर बोलु असं म्हणत काढता पाय घेतला.
झालं होतं असं की तो तरुण बहिणीचा पाठलाग करत असताना मेन रोडवर वुड बी मेहुण्यानी आणि त्यांच्या मित्राने याला थांबवलं. व जाब विचारला. त्यावर तो ''कोण मुलगी?? समोर आणा तिला.'' असं हसत हसत म्हणाला.त्यावर मेहुण्यांच्या मित्राने त्याच्या थोबाडीत लगावली होती. आणि समोर म्हणे बँक होती. तिथे या वासुचं खातं होतं. म्हणून म्हणे याचा घोर अपमान झाला. व त्याने जहालसेनेला हाताशी धरलं. आमच्याकडून ही गुंडागर्दी आमच्या मेहुण्यांच्या घरी गेली. त्यांच्या वडिलांसमोर असंच नाटक केलं. लग्न मोडण्याच्या धमक्या दिल्या. आणि निघून गेले. मेहुण्यांचे वडिल मवाळसेनेचे आश्रयदाते. त्यावेळी आणि आजही या सेनेंची युती आहे! हे प्रकरण ठाण्याच्या जहालसेनेच्या प्रमुखांच्या कानावर गेले. ते व्यक्ती म्हणून चांगले होते. त्यांनी या बिल्डर गुरु-शिष्यांची चांगली हजेरी घेतली. व त्यांना त्यांची चूक दाखवून माफी मागायला सांगितली. मेहुण्यांचा पिढीजात बिझीनेस कोळीवाड्यात. तिथले तरूण त्यांना जीवाला जीव देणारे. ते ही संतापले. त्यांना शांत करताना त्यांची पुरेवाट झाली.
नंतर हे बिल्डर महाशय घरी आले व आई- दादांना म्हणाले, ''तुमच्या पायावर डोकं ठेवायला हवं''
त्यावर आई त्यांना म्हणाली, ''आमच्या दारात एवढा तमाशा केलात! आता लाऊड स्पीकरवरूनच माफी मागा!'' इथे हे प्रकरण संपले. पण आमच्या मनांवर कायमचा ओरखडा उठला. आपण एकटे असतो ही जाणीव झाली. आम्ही दोघी बहिणी या लोकांसमोर एकट्या असताना शेजारीपाजारी नुसते बघे झाले. कोणीही मधे पडून त्यांना समजावले नाही. उलट काहीतरी वावगे आम्हीच वागलो असणार या संशयानं आमच्याकडे बघत बसले. आपला लढा हा फक्त आपला लढा असतो. ही शिकवणही मिळाली.

गुलमोहर: 

खूप कठीण प्रसंग होता, अनिताताई. तुमच्या धीराचं कौतुक वाटलं. जरी तुम्ही म्हटला की ते १६ वं वर्षं होतं वगैरे, तरीही तुमची अन्यायाला सामोरंजाण्याची प्रवृत्ती वरील प्रसंगातून दिसून येते. अगोने लिहिलेल्या प्रतिक्रियेतून ते अधोरेखित झाले आहेच.

सर्वांना मनापासून धन्यवाद.
लिम्बु टिम्बु , तुमच्या 'स्वैर चिंतनाला' पूर्ण अनुमोदन. महाठक समजल्या जाणा-यांशी ओळख असल्यास आयुष्यभर त्यांचा उपयोग होतो. हे ही खरंच. काही ठिकाणचा तर असा अनुभव आहे की असे लोक आपल्या एरियातल्या महिलावर्गाचे रक्षण करतात. वावगे वागणा-या लोकांचा 'योग्य' बंदोबस्त करतात.
शक्ती पेक्षा युक्तीचा प्रयोग नेहमीच यशस्वी ठरतो.
मल्लीनाथ , तुम्ही अपघातग्रस्ताला मदत केलीत्.तुमचे कौतुक. अशावेळी बघ्यांनी फक्त बघे न राहता मदतीला पुढे यायलाच हवं!
शशांक , तुम्ही घडु शकणा-या/घडणा-या काही गंभीर घटनांचा उल्लेख केलात.एकतर्फी प्रेमातून असे अविवेकी प्रकार घडतात. त्याबद्दल असं वाटतं....मैत्री करताना फार सावधानता बाळगणे आवश्यक.
मैत्री झाल्यावरही गाफिल न राहता समोरच्याच्या मनात काय चाललंय हे ओळखता यायला हवे. [बोलण्यावरून , देहबोलीतून.]
मैत्री झालेल्या मुलांना/मुलींना वारंवार घरी आणून आपल्या पालकांशी त्यांची ओळख करून देणे. पालकांचा त्यांच्याशी चांगला परिचय व्हायला हवा.
आपल्या मुलांशी/मुलींशी निखळ मैत्री आणि एकमेकांच्या मनात विश्वास व प्रेम असायला हवे.
असे अजून अनेक उपाय वाचकमित्रांना माहित असतील. तरीही क्वचित दुर्दैवी प्रकार घडू शकतात.
भर रस्त्यात असे हल्ले होतात तेव्हा बघे काही करत नाही ही खंत तर कायमचीच आहे.

अनिताताई तुमच्या हिंमतीला दाद दिलीच पाहिजे. त्यातही घरी कुणी ज्येष्ठ व्यक्ती हजर नसताना ज्या तडफेने त्या गुंडांच्या [हो, गुंडच म्हटले पाहिजे त्या नीचांना] समोर जाब विचारण्यास गेला होता, ती तडफ तिथे हजर असणार्‍या 'बघ्या' ना नक्कीच जाणवली असणार.

"बघ्यांची मानसिकता' हा एक आपल्या समाजजीवनाला लागलेला शाप आहे, अन् त्याला कारणीभूत आपले पोलिसखातेही आहेच आहे हे नाकबूल करण्यात अर्थ नाही. 'चोर सोडून संन्याशाला' या उक्तीनुसार या खात्याचे वर्तन असल्याने बरेचसे लोक शक्यतो अपघात प्रसंगात मदत करायला कचरतात हे मीदेखील अनुभवले आहे. पण तुमच्याबाबतीत घडलेली घटना हा 'अपघात' नसून 'एका मुलीवर आलेला बाका प्रसंग आहे, आणि त्यासाठी आपण शेजारी या नात्याने पुढे जाणे अत्यंत गरजेचे आहे' असे त्यांच्याकडून अपेक्षित होते.

पण असो, तुम्ही दोघीच नव्हे तर सर्व कुटुंबच त्या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडला याचाच आनंद जास्त आहे.

अनिता ताई
खरच अभिनंदन !!! असे अनुभव खुप वेळा येतात की आपण एखाद्या माणसाला प्रतिकार करत असतो आणि इतर बघत असतात.
मी कोलेज मध्ये असताना, सकाळ च्या तासाला जाताना सहा वाजता निघायला लागायचे. रोज बाबा यायचे. तेंव्हा आम्ही ठाण्याला
राम मारुती रोड वर रहायचो. तेंव्हा तो रोड एवढा गजबजलेला आणि मोठा न्हवता. एकदा माझी मैत्रिण येणार होती म्हणून बाबा आले नाही.
मैत्रिण आलीच नाही, मग मी एकटीच चालू लागले. जरा वेलानी जाणवले की जे रस्त्याचे काम करणारे मजूर असतात त्या पैकी एक माझा
पाठलाग करत आहे. मी जोरात चालायला लागले. तर तो ही जोरात पाठी यायला लागला. एक वालनावर त्याने मला पाठीमागे हात लावला.
माझ्या हातात छत्री होती. मी गरकन वलून त्याला त्या छत्री ने जोर जोरात मारायला सुरवात केलि. त्याला अपेक्षा न्हवती की मी प्रतिकार
करेन, तरी तो सावरला आणि मला जोरदार प्रतिकार करू लागला. तेंव्हा रस्त्यावर दूधवाले, पेपर वाले, मोर्निंग walk करणारे असे बरेच जन होते.
पण कोणीही पुढे आले नाही. शेवटी मी जोरात ओरडले, तेंव्हा तो माणूस पलुन गेला. तिकडे सायकल वर एक दूधवाला मुलगा चालला होता तो
माझ्याकडे बघत फिदी फिदी हसत गेला.
त्यावेलेला कोणालाही मला मदत कराविशी वाटली नाही. कोणालाही वाटले नाही की एकटी मुलगी आहे. निर्लज्ज पणाचा कहर.
त्या नंतर असे प्रसंग दोन तीन वेळा आले, पण पहिल्या प्रसंगात आला तोच अनुभव आला लोकांचा !!!
आपला समाज मरत चालला आहे.
मीरा

चांगल लिहीलय. खर तर चांगलाच अनुभव तुमच्या आणि कुटुंबाच्या वाट्याला आला. तुमचे वुड बी मेहुणे मवाळसेनेशी संबंधित नसते तर काय झालं असतं ? अशा वेळी आधी वडिलांना सांगायला हवं होतं.. असो. शेवट गोड तर सगळच गोड

अनिताताई,

केव्हढा शूरवीर होता नाही तो वासू! एकदम पंचवीसेक फटफट्या घेऊन आला तुमच्या समाचाराला. मात्र दार उघडल्याबद्दल तुमच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे.

तुम्ही एकट्या असता ही जाणीव झालेली एका अर्थी चांगली असते. बर्‍याचदा लोक इतरांच्या भरवश्यावर अवलंबून बसतात. तुम्हाला स्वावलंबी बनण्याची संधी मिळाली आणि तुम्हे तिचं सोनं केलंत. Happy त्याबद्दल अभिनंदन!!

पण आ##सेना आणि #वसेना यांची जुगलबंदी बघायला मिळाली नाही. जाउद्या, परत कधी! Wink अर्थात हा तमाशा तुमच्यासारख्या निरपराध्यांच्या जिवावर खेळला जायला नको, हे ओघाने आलंच. Happy

आ.न.,
-गा.पै.

अनेक गोष्टी पटल्या नाहीत. क्षमस्व!
========================

२५/२६ दुचाकींवरुन अनेक तरुण व २/३ मध्यमवयीन माणसं आमच्या दारात आक्रमक होऊन आली>>>

म्हणजे किमान अठ्ठावीस माणसे असायला हवीत! आपण कसे 'फेस' केलेत हा स्तुत्य विषय असला तरी पोलिस केस झाली का?

=======================

वयाच्या सोळाव्या वर्षी आपण रणरागिणीचा अवतार धारण केलात व वडिलांनी मात्र नम्रपणा दाखवला, असे का?
खाली 'अगो' यांनी त्यांच्या प्रतिसादात दिलेले मत कॉपीपेस्ट करत आहे.

<<<<ह्या वरच्या प्रसंगात दादांच्या धोरणीपणाचीही मला कमाल वाटली. त्यांचा स्वभाव एरवी थोडा आक्रमकच आहे पण ह्या वेळी जर त्यांनी आवाज चढवून बोलायला सुरुवात केली असती तर त्या प्रसंगाला फार विचित्र वेगळं वळण मिळू शकलं असतं. दुर्घटना घडू शकली असती. प्रक्षुब्ध जमावाला अक्कल नसते, विवेक नसतो.>>>>

हे सगळे आपण रणरागिणिचा अवतार धारण केलात तेव्हा का घडू शकले नाही? तेव्हाही तो जमाव प्रक्षुब्धच होता ना?

======================

<<<<[मी डोक्याला हात लावला!]>>>>

हे विधान तर अतिशय नवलाचे वाटले. आपल्या वडिलांनी सुसंवाद साधून आलेला प्रसंग टाळण्याचा उपाय योजला त्यावर आपण डोक्याला हात लावलात. अठ्ठावीस माणसे आलेली असताना आपल्या वडिलांनी काय करायला हवे होते? आपण काय करू शकला असतात? तेही वयाच्या केवळ 'सोळाव्या' वर्षी?

======================

आपण एकटे असतो ही जाणीव झाली. आम्ही दोघी बहिणी या लोकांसमोर एकट्या असताना शेजारीपाजारी नुसते बघे झाले. कोणीही मधे पडून त्यांना समजावले नाही. >>>>

अठ्ठावीस माणसांच्या विरोधात कसे शेजारी जाऊ शकतील? लोखंडाच्या जाळीच्या दारावर प्रहार करून दार उघडण्याचा आग्रह करणारा आणि घर जाळण्याची धमकी देणारा जमाव असल्यावर मधे पडण्याची हिम्मत कोणाची होईल? दुर्दैवाने अशावेळेस मध्ये पडून मार खायला कोणीही तयार नसतेच.
======================

उलट काहीतरी वावगे आम्हीच वागलो असणार या संशयानं आमच्याकडे बघत बसले. आपला लढा हा फक्त आपला लढा असतो. ही शिकवणही मिळाली. >>>

होय, दुर्दैवाने स्त्रियांना भलतेच दुर्दैवी लढे द्यायला लागतात हे खरे आहे आणि माणूस एकटाच असतो हेही

======================

वयाच्या त्या पातळीला आप्ण दाखवलेली जिगर जबरदस्त असली तरी मला व्यक्तीशः वरील मुद्दे पटले नाहीत, याचा अर्थ आपला संदेश मान्यच नाही असा मात्र करून घेऊ नयेत, आपला संदेश खरच स्फुर्तीदायक आहे.

-'बेफिकीर'!

खरंच वाईट प्रसंग.
पण रीतसर तक्रार केलीत का पोलिसात ? सॉलिड चार्जेस पडले असतील त्या मुर्खावर.

अनिल सोनावणे ,
आम्ही ही घटना वडिलांना सांगितली नाही कारण त्यांचा स्वभाव मुळात कडक होता. म्हणून होता होईल तो पर्यंत प्रकरण वाढू नये असे वाटले. ह्या गोष्टी विशिष्ट वयांत आधी बहीण, मैत्रिण अशांनाच सांगितल्या जातात. त्यातून मेहुण्यांना सांगताना त्यांच्या किंवा त्यांच्या मित्राच्या ओळखीची ''ती'' व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीशी बोलून, समजूत काढून मार्ग काढावा असे ठरवले.
बेफिकीर,
आपण आपली प्रतिक्रिया मोकळेपणाने दिलीत त्या बद्दल धन्यवाद.
मी कोणी लेखिका नाही .जसं घडलं तसं एकटाकी लिहिलं. हा प्रसंग आमच्यावर गुदरला. त्यावेळची सामाजिक स्थिती, आमची कुवत, आमची मानसिकता याप्रमाणे घडत गेलं. आज आपण यावर चर्चा करतोय. त्यावेळी सगळ्या घटना भराभर घडल्या.
दुसरं असं त्याकाळी काही एक्सपोजर नव्हतं. टि.वी,फोन, विविध विषयांवर मोकळेपणी चर्चा हे होत नव्हतं. आज आपण मुलांना लवकरपासून तयार करतो. आमचं विश्व फार सीमित होतं. असं काही घडतं/घडू शकतं हे कल्पनेतच नव्हतं. त्यातून मध्यमवर्गीय वस्ती , पांढरपेशी माणसं असंच वातावरण.
पोलिस केस केली नाही. कारण समोरचे लोक उन्मत्त आणि धनदांडगे व आक्रमक संघटनेचे होते. त्यामुळे आमची काय पाड लागली असती याचा विचार करावा. यामुळेच वडिलांनी चातुर्याने तोंड दिले व 'त्यांना'' माफी मागावी लागली. हातात पैसा व सत्ता असली की कसंही वागता येतं अशा विचारांच्या माणसांची सरशी झाली नाही!
वाट्टेल तो अन्याय सहन करायचा नाही अशी वृत्ती आणि वय यामुळे मी त्यांना सामोरी गेले असेन. रस्त्यानं ''माफक'' छेड्छाड चालते त्याकडे त्या वयातही दुर्लक्ष करत होतो. पण या व्यक्तीकडून जास्तच घडत होतं. स्त्रियांना सिक्स्थ सेन्स असतं त्याप्रमाणे रिअ‍ॅक्शन घडते. मी समोर होऊन जाब विचारला तेव्हा दुर्घटना घडली नाही कारण त्यांची बाजू पूर्ण चुकीची होती. हे काय त्यांना कळत नव्हते????
माझा सात्विक संताप त्यांना कळला असं समजायला पाहिजे. त्यात ते टायपिंग क्लासचे सर होते. त्यांचा चेहरा साफ पडला होता!! आणि माझे वडिल नम्रपणे वागले..ही त्यांची चाल होती हे आम्हाला नंतरच्या वयांत कळले! आम्हाला घरात त्यांचा कड्क स्वभावच माहित होता. अशी प्रसंगातूनच माणसं कळत जातात. त्यांच्या वयाप्रमाणे आणि जगातल्या अनुभवाप्रमाणेच ते वागले.
''मी डोक्याला हात लावला''.....माझ्या वयानुसार वडीलांनी ''त्याला'' फैलावर घ्यावे आणि बाकीच्या महान लोकांना हे लोक त्याच्या बाजुने कसे आले हे विचारावे असे होते. आणि त्या उलट होत होते..त्यावेळच्या माझ्या वयानुसार व अकलेनुसार माझे विचार होते!!
बघ्यांचे वागणे बरोबरच. असे तुम्ही म्हणता...त्याबद्दल. त्या माणसांजवळ शस्त्रे नव्हती. आणि अश्या प्रकारच्या रस्त्यावरच्या प्रसंगात आम्ही वडिलांना मधे पडताना पाहिले होते. माझ्यावरही तेच संस्कार आहेत्.[आणि तो काळ.] म्हणून असे घडत असेल तर अगदी चांगल्या शब्दांत समजूत घालणे, संवाद साधणे मी करते. त्या त्या प्रसंगाप्रमाणे विवेकी होऊन सगळ्यांनी हे करायला हवं असं वाट्तं. मी ज्यांच्याकडून अपेक्षा केली ते आमचे वर्षानुवर्षांचे शेजारी होते. आमचे संबंध सगळ्यांशी चांगले होते. आमचे घर जाळले असते तर त्यांची बि-हाडे वाचली असती का?? त्यामुळे घाबरत का होईना त्यांनी २ शब्द बोलायला हवे होते. अकु म्हणाली तशी असा प्रसंग कोणाच्याही मुलीवर येऊ शकतो.
असो. कोणी कसे वागावे हे हातात नाही. पण ज्यांना सामाजिक भान असेल, संवेदनशील मन असेल त्यांनी घेतला वसा सुरु ठेवावा.
धन्यवाद.

अनिताताई....खरच तुमच्या धीराचं खुपच कौतुक. ह्यातून आम्हा सर्वांना प्रेरणा मिळावी हीच अपेक्शा.

फक्त तुझी आणि तुझ्या मुलींचीच नाही रस्त्यात इतर कुणाचीही छेड काढली जात असेल, कुणा दुसर्‍यावरही अन्याय होत असेल तर तुझा होणारा सात्विक संताप, त्याविरुद्ध आवाज उठवायची तुझ्यातली धमक ह्याचं मला नेहेमीच कौतुक आणि अभिमान वाटत आलाय. >>> अगोच्या ह्या विधानानुसार असे लक्षात येते की तुम्ही तुमच्या वयाच्या १६ व्या वर्षी ज्या तडफेने आणि हिंमतीने आवाज उठवला होता, ती तडफ, ती हिंमत, ती अन्यायाविरुद्धची ह्रदयातील आग आजही तुम्ही तशीच धगधगत ठेवलीय ! ................खरंच खुप ग्रेट आहात !!!!!!!!!!!!!!!

Pages