एका छेडछाडीची सत्यकथा.

Submitted by अनिताताई on 25 September, 2011 - 02:22

रस्त्यावर होणारी छेडछाड हा सर्व स्त्रियांना,मुलींना नेहमीच येणारा अनुभव. प्रत्येकजण आपापल्यापरीने अशा अनुभवाचा सामना करत आलीय. माझ्या बहीणीलाही कॉलेजच्या वयात असाच अनुभव आला.पण त्या प्रकरणानं अशी काही वळणं घेतली, की तो अनुभव आजही तसाच्या तसा लक्षात आहे. तो सगळ्यांशी शेअर करावा असं खूप दिवसांपासून मनात होते. आज सांगण्याचं धाडस करते!
त्या आधी थोडी आमच्या कुटुंबाची पार्श्वभुमी. ठाण्यातल्या मध्यमवर्गीय वस्तीत राहणारं आमचं कुटुंब.
साडेतीन खोल्यांचं चाळीतलं घर. आपलं शिक्षण, अंगी असलेल्या कला आणि चारित्र्य हेच आपलं धन अशी आई-वडिलांची विचारसरणी. आणि आम्हा भावंडांवर वाढीच्या वयांत आमच्या नकळत बारीक लक्ष!
आम्हा भावंडांचं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालं. त्या काळात मुले-मुलींची एकत्र शाळा असली तरी वर्गात किंवा एरवी मुलांशी बोलायचं नाही किंवा त्यांच्याकडे बघायचं नाही असा एकंदर खाक्या! अगदी सरळ रेषेत जायचं-यायचं वगैरे.
ही घटना घडली तेव्हा माझं वय १६ तर बहीणीचं १८ होतं. बहीणीचा स्वभाव बाहेरच्या जगात काहीसा अबोल आणि बुजरा. पण या सत्यकथेचा एक पदर म्हणून तिचं एक गुपित सांगायला हवे की कॉलेजमध्यल्या मुलाशी हिचं लग्न ठरल होतं! हे एक आमच्या दृष्टीनं एक आश्चर्यच होतं कारण तिचा स्वभाव. माझ्या त्यावेळी वुड बी असणा-या मेहुण्यांच्या मित्रांनी व हिच्या मैत्रिणींनी हे लग्न जुळवून आणलेलं! आमच्या आई व दादांना हे माहित होतं. त्यांनी तिला बजावलं होतं, की योग्यवेळ आली की आम्ही लग्न लावून देऊ. पण तोपर्यंत तिनं अतिशय जबाबदारीनं वागायला हवं. बाहेर जास्त बभ्रा होता कामा नये.
सगळं व्यवस्थित सुरु होतं.
सकाळी कॉलेज करुन संध्याकाळी बहिण टायपिंगच्या क्लासला जायची. तिच्याबरोबर ब-याचदा तिची एक मैत्रिणपण असायची. वाटेवर एका ठिकाणी नवी इमारत बांधण्याचं काम सुरु होतं. तिथलं काम बघणारा तरुण असिस्टंट बिल्डर रोज स्कूटरवरून हिचा पाठलाग करायला लागला. तोंडानं काहीबाही बडबडायचा. आमचं घर एका गल्लीत अगदी टोकाला होतं. तिथपर्यंत तो मागे मागे यायचा. ही अर्थातच खूप घाबरली. एक दिवस माझ्यापाशी बोलली. तिनं हे ही सांगितलं की, तिनं होणा-या नव-याला ही गोष्ट सांगितली आहे. तो यात लक्ष घालणार आहे. मी म्हणाले, हे बरंच झालं.
त्यानंतर ५/६ दिवसांनी आम्ही दोघी एकट्याचं घरात होतो. संध्याकाळ होती. आई-दादा भाजी आणायला बाहेर गेले होते. आणि २५/२६ दुचाकींवरुन अनेक तरुण व २/३ मध्यमवयीन माणसं आमच्या दारात आक्रमक होऊन आली. त्यातल्या काहींना बहीणीनं ओळखलं. ती घाबरून म्हणाली, अगं हाच तो माणूस माझ्या मागे लागलेला. लोकांना घेऊन आलाय. त्या लोकांनी आमच्या घराबाहेरच्या जाळीच्या दारावर मुठी आपटायला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. ''दरवाजा उघडा. नाहीतर घर जाळून टाकू. ठाण्यात राहायचय का नाही??'' मग मात्र माझा संताप संताप झाला. चोर तो चोर. वर शिरजोर!! आणि ही माणसं कशाला आली याच्या बाजूनी? मी पुढे झाले, आणि म्हणाले,,'' आमचे आई-वडिल घरात नाहीत. ते आले की या. मग बोलू.'' त्यावर त्यांनी '' आम्हाला नाहीये वेळ. तुमची वाट लावतो''वगैरे भाषा केली. मग मी दार उघडलं, आणि '' कोण तो माणूस मागे लागणारा? समोर ये आधी. आणि तुम्ही कोण त्याची बाजू घेऊन आलायत? गुंडाची बाजू घेणारे तुम्ही सगळे गुंडच!!'' असं बोलून रणरागिणीचा अवतार धारण केला. त्यावर बहिण कानात कुजबुजली,'' अगं असं नको बोलूस. त्यात आमचे टायपिंगचे सरही आहेत!!!'' मी तिला म्हणाले, '' मग ते कशाला आलेत त्यांच्या बाजुने? आणि ही त्यांची भाषा कशी खपवून घेतायय?? तेव्हढ्यात आमचे आई-दादा येताना दिसले. आमची गल्ली अर्धी अधिक या लोकांनी भरली होती. आणि कोणी तरी आईला म्हणाले, ''अहो, तुमच्याकडेच चाललंय सर्व!!''
मी त्या लोकांमधून वाट काढत दादांपाशी पोहोचले व त्यांना भराभर काय झालेय ते सांगितले.
तो मागे लागणारा वासु ज्याच्याकडे काम करत होता, तो इमारतीचा बिल्डर, त्याचा बॉस जहालसेनेचा पदाधिकारी होता. आणि टायपिंग क्लासचे सर त्यांचे मामा होते. म्हणुन ते दोघे आमच्या दारात आले होते.तो जहालसेनेचा बिल्डर खूप जहाल बोलत होता. प्रकरणाला राजकीय रंग चढत होते.
त्या प्रसंगात वडिलांचं प्रसंगवधान पाहायला मिळालं. त्यांनी या दोघांना अतिशय आदरानं घरात घेतलं. त्यांच्या बरोबर त्यांची सेना, तो वासु सगळे घरात घुसले. वडिलांनी शांतपणे सगळा वृत्तांत विचारून घेतला. आणि आमची काही चूक असेल तर माफीही मागायची तयारी दर्शवली. [मी डोक्याला हात लावला!] वासुच्या बिल्डर बॉसनी खूप तारे तोडले!'' काय असतं.हातात पैसा असतो, तरूण वय असतं..दुचाकी असते बुडाखाली! रस्त्यात सुंदर मुलगी दिसते. मग काय करणार???'' आणि ते बॉस बहिणीला म्हणाले, '' काय गं, वडिलांना सांगायचं सोडून कुठल्या त्या मुलाला सांगितलंस गं? '' त्यावर मी म्हणाले, '' म्हणजे काय? तिचं लग्न ठरलंय याच्याशी !!'' त्यावर बिल्डर बॉस म्हणाले,'' करुन दाखवच लग्न. हार तुरे घेऊन येईन.'' वडिल काय समजायचे ते समजले. त्यावर त्यांनी ''त्या'' तरूणाला विचारले. एवढे सगळे लोक आमच्या घरी घेऊन आलात. तुम्हाला कसं कळलं आमचं घर? त्यावर तो म्हणाला, '' रस्ता काय हिच्या बापाचा आहे काय?'' झालं यावर ते क्लासचे सरही काय समजायचं ते समजले. यावर वडिल त्यांना म्हणाले'' तुम्ही या मुलाबद्दल १००% खात्री देत असाल तरच बोलु.'' त्यावर त्यांनी नंतर बोलु असं म्हणत काढता पाय घेतला.
झालं होतं असं की तो तरुण बहिणीचा पाठलाग करत असताना मेन रोडवर वुड बी मेहुण्यानी आणि त्यांच्या मित्राने याला थांबवलं. व जाब विचारला. त्यावर तो ''कोण मुलगी?? समोर आणा तिला.'' असं हसत हसत म्हणाला.त्यावर मेहुण्यांच्या मित्राने त्याच्या थोबाडीत लगावली होती. आणि समोर म्हणे बँक होती. तिथे या वासुचं खातं होतं. म्हणून म्हणे याचा घोर अपमान झाला. व त्याने जहालसेनेला हाताशी धरलं. आमच्याकडून ही गुंडागर्दी आमच्या मेहुण्यांच्या घरी गेली. त्यांच्या वडिलांसमोर असंच नाटक केलं. लग्न मोडण्याच्या धमक्या दिल्या. आणि निघून गेले. मेहुण्यांचे वडिल मवाळसेनेचे आश्रयदाते. त्यावेळी आणि आजही या सेनेंची युती आहे! हे प्रकरण ठाण्याच्या जहालसेनेच्या प्रमुखांच्या कानावर गेले. ते व्यक्ती म्हणून चांगले होते. त्यांनी या बिल्डर गुरु-शिष्यांची चांगली हजेरी घेतली. व त्यांना त्यांची चूक दाखवून माफी मागायला सांगितली. मेहुण्यांचा पिढीजात बिझीनेस कोळीवाड्यात. तिथले तरूण त्यांना जीवाला जीव देणारे. ते ही संतापले. त्यांना शांत करताना त्यांची पुरेवाट झाली.
नंतर हे बिल्डर महाशय घरी आले व आई- दादांना म्हणाले, ''तुमच्या पायावर डोकं ठेवायला हवं''
त्यावर आई त्यांना म्हणाली, ''आमच्या दारात एवढा तमाशा केलात! आता लाऊड स्पीकरवरूनच माफी मागा!'' इथे हे प्रकरण संपले. पण आमच्या मनांवर कायमचा ओरखडा उठला. आपण एकटे असतो ही जाणीव झाली. आम्ही दोघी बहिणी या लोकांसमोर एकट्या असताना शेजारीपाजारी नुसते बघे झाले. कोणीही मधे पडून त्यांना समजावले नाही. उलट काहीतरी वावगे आम्हीच वागलो असणार या संशयानं आमच्याकडे बघत बसले. आपला लढा हा फक्त आपला लढा असतो. ही शिकवणही मिळाली.

गुलमोहर: 

अतिशय कठीण प्रसंग अनिता ताई.......

पण धीराने आणि विचाराने हाताळला की लक्षात येईल की आपण एकटे नसतो..

असो.

फक्त तुझी आणि तुझ्या मुलींचीच नाही रस्त्यात इतर कुणाचीही छेड काढली जात असेल, कुणा दुसर्‍यावरही अन्याय होत असेल तर तुझा होणारा सात्विक संताप, त्याविरुद्ध आवाज उठवायची तुझ्यातली धमक ह्याचं मला नेहेमीच कौतुक आणि अभिमान वाटत आलाय. ह्या वरच्या प्रसंगात दादांच्या धोरणीपणाचीही मला कमाल वाटली. त्यांचा स्वभाव एरवी थोडा आक्रमकच आहे पण ह्या वेळी जर त्यांनी आवाज चढवून बोलायला सुरुवात केली असती तर त्या प्रसंगाला फार विचित्र वेगळं वळण मिळू शकलं असतं. दुर्घटना घडू शकली असती. प्रक्षुब्ध जमावाला अक्कल नसते, विवेक नसतो.

**************************

कालचाच किस्सा. रस्त्यात मध्यभागी दीडदोन वर्षांचं एक मूल सैरावैरा पळत होतं. कुठल्याही क्षणी गाडीखाली येईल अशी स्थिती. गाड्या हॉर्न वाजवून पुढे जात होत्या. आजूबाजूची लोकं कुणाचं मूल म्हणून आश्चर्य करत होती पण त्याला बाजूला घ्यायला पुढे होत नव्हती. आईवडीलांचा पत्ता नाही. अनिताताईने त्या मुलाला बाजूला घेतलं, आईवडिलांना शोधायचा प्रयत्न केला पण यश आलं नाही. मग सरळ पोलीसांना फोन केला, त्यांच्या सुपूर्त केलं आणि मगच घरी आली ( नंतर पोलीसांनी फोन करुन सांगितलं की ते मूल हायवे क्रॉस करुन आतल्या रस्त्यांवर आलं होतं तरी आईवडिलांना पत्ताच नव्हता. पण आईवडील सापडले, मुलानेही त्यांना ओळखले. ) मागे एकदा रस्त्यात एका शाळकरी मुलीला एका वाहनाने धक्का देऊन पाडलं आणि तो माणूस पळून गेला. तेव्हाही अनिताताईने तिला उठवून धीर देऊन तिच्या शाळेत पोचतं केलं होतं. तिची परीक्षा होती त्यादिवशी तर तिच्या बाईंना भेटून असं झालंय हे consider करा असं आवर्जून सांगितलं होतं.
बघ्याची भूमिका घेणारा समाज हा आपल्याकडचा अत्यंत चिंतेचा विषय आहे. फक्त गुंडागर्दीच्या बाबतीतच नाही तर अपघातासारख्या बाबतीतही. म्हणून हे मुद्दाम लिहावसं वाटलं इथे.

अनिताताई, केवळ बघ्याची भूमिका न घेता किंवा घाबरून न जाता धैर्याने पुढे झालात व कधी जाब विचारलात तर कधी त्या त्या परिस्थितीनुसार उपाययोजना केलीत.... तुमचं कौतुक आणि त्याचबरोबर केवळ बघ्याची भूमिका घेणार्‍यांचा, तमाशा बघणार्‍यांचा निषेध!

पोलिसांच्या ससेमिर्‍याला घाबरून काही केलं नाही म्हणण्याला अर्थ नसतो. ती फक्त पळवाट असते. किमान एक फोन करायला तर कोणी तुमचे हात धरत नाही ना? उद्या वेळ न येवो, पण तुमच्या घरातील किंवा अति प्रिय व्यक्तीबद्दलही बाकीच्यांनी अशीच बेपर्वाई दाखवली तर?? हा विचार अवश्य करा. आज जे लोक तमाशे बघतात, उद्या दुनिया त्यांचा तमाशा बघेल.

डॉ. कैलास, खरंय. अशा एकटे असण्यानं आपली हिंमत दुप्पट वाढते!!
जाई जुई,अश्विनी, अगो,वज्र,शैलजा,जिप्सी,मास्तुरे, अकु सर्वांना मनापासून धन्यवाद.
अकु, तुमचे सामाजिक समस्या व उपायांवरचे लिखाण मी वाचत असते. मला त्याचे खूप कौतुक वाटते.
इथल्या व इतरही वाचकांच्या सामाजिक जाणीवा रुंदावण्याचे तुमचे कार्य ग्रेट आहे.
तुमच्या मताशी सगळेच सहमत होतील. आज '' आम्हा काय त्याचे?'' ही संस्कृती फोफावली आहे.
जनमनांत इतकी बधीरता आली आहे की मृत्यु, अपघात, कोणावर दिवसाढवळ्या अन्याय याचे कोणाला काही वाटत नाही अशी परिस्थिती आहे. मुंबईत म्हणूनच बाँब स्फोट घडवून आणण्यात अतिरेकी यशस्वी होतात. रेल्वेतून जाताना, रस्त्यात बेवारस पडलेली वस्तू दुर्ल़क्षित केली जाते. प्रत्येक माणूस जर पोलीस झाला तर अशा घटना घडवून आणणे शक्य होणार नाही.

अनिताताई, खरेच खूप कठिण प्रसंग होता. अशा वेळी घरी एकटे असताना तुम्ही दाखवलेले धैर्य आणि नंतर तुमच्या वडिलांनी ज्या सामजस्याने परीस्थिती हाताळली ते कौतुकास्पद आहे.

ग्रेट.. अगदी.. !!! तुम्ही दरवाजा उघडलात... बाप रे, कसली हिंमत आहे तुमच्यात.
अरुंधती.. अनुमोदन.
अगो, धन्यवाद तु लिहिलेल्या प्रसंगांबद्दल.

तुम्ही दरवाजा उघडलात... बाप रे, कसली हिंमत आहे तुमच्यात.
----- निव्वळ धाडस किंवा हिंमत उपयोगाची नाही आहे असे मला वाटते. जोडीला प्रसंगावधान आणि डिप्लोमॅसी हवीच (कराटे, ताय-क्वांदो शिकता आल्यास उत्तम)... समोरच्या व्यक्ती च्या मनात काय आहे हे जाणणे अवघड आहे.

गल्लीच्या कोपर्‍यात कट्ट्यावर बसुन रोज सकाळ संध्याकाळी शिट्ट्या वाजवणारे आपण बघतोच. काही चांगल्या मुली अशा प्रकारांकडे संपुर्ण दुर्लक्ष करतांत (दिवसांतुन किती टवाळां कडे लक्ष देणार ?) कारण त्यांना त्यांचे आयुष्यातले ध्येय (शिक्षण) साध्य करायचे असते. आता काहीच विरोध होत नाही म्हणजे आपल्या प्रेमाचा स्विकार झालेला आहे असा (गैर)समज निर्माण होतात. मग आपण जिच्या साठी शिट्ट्या (प्रेम करायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल... शिट्टी वाजवणे हे एक प्रातिनिधिक) वाजवतो त्या मुलीचे लग्न ठरल्याचे कळल्यावर हे प्रेमविर रागाने बेभान होतात, आणि काहीतरी अत्यंत टोकाची कृती करतात. मला अशा प्रकारांची कमालिची चिड येते.

अनिताताईंना वरिल प्रसंगी यश आले हे वाचुन खुप समाधान वाटले...

सॉलिड अनुभव. खूप काही शिकवणारा!
इथे लिहिल्याबद्दल आभार.
बाकी वरच्या सगळ्यांशीच सहमत.

वज्र,
तुम्ही दरवाजा उघडलात>>>>>>>> अहो माझं वय १६ होतं आणि अशी छेडछाड करणा-यांबद्दल मनात प्रचंड राग होता!! आज मात्र असं घडल्यास मी दार उघडले नसते व मुलींनापण उघडू दिले नसते! सेफ्टी दारामागूनच वाकताडन केले असते. आणि १०० ला फोन केला असता. त्याकाळी फोनही नव्हता.
Happy

>>>>पण आमच्या मनांवर कायमचा ओरखडा उठला. आपण एकटे असतो ही जाणीव झाली. आम्ही दोघी बहिणी या लोकांसमोर एकट्या असताना शेजारीपाजारी नुसते बघे झाले. कोणीही मधे पडून त्यांना समजावले नाही. उलट काहीतरी वावगे आम्हीच वागलो असणार या संशयानं आमच्याकडे बघत बसले. आपला लढा हा फक्त आपला लढा असतो. ही शिकवणही मिळाली. <<<
यातिल तथ्य सर्वात महत्वाचे! पण कैलास म्हणतात तसे आपण नेहेमीच "एकटेही" नसतो.
[अर्थात त्याकरताही योग्य जनसम्पर्कात रहाणे महत्वाचे असते. समर्थान्ची वचने याकरीता ध्यानात ठेवावीत व वेळेस ठकासी महाठक उद्धटासी महाउद्धट, "स्वतः तसे वागायचे नसले" तरी दुसरा कोण उभा करण्याची क्षमता बाळगावी, तसेच उठसुठ हा ठक, तो मवाली, तमका असाच काहीतरी अशी दुषणे देऊन माणसे दुरावुन ठेवण्यापेक्षा ती जी जशी आहेत तशी मोजकी निवडून जवळ करुन ठेवावीत. संगत धरणे वेगळे अन माणसांस जवळ करणे वेगळे, यातिल फरक लक्षात घेऊन आपले वागणे असावे, आयुष्यभर उपयोगी पडते. हे आपले माझे स्वैर चिन्तन बर कां]

अनिताताई, प्रसंग नुसता वाचूनच काटा आला अंगावर, पण तुम्ही प्रत्यक्ष फार शिताफिने हाताळलात. इथे लिहिल्याबद्दल अभारी आहे, खूप जणांना/जणिंना मार्गदर्शन मिळेल.

बाप्रे, ...कठिण प्रसंग आला... होता.तुमच्यावर ... पण आश्यावेळी.. शेजारच्यांनी मदत करायलाच हवी.....होती...

खरं ’बघ्यांचा’ अनुभव मलाही आलाय. Sad काय मानसिकता असते तेच कळत नाही. अपघात झाल्यावर साधं जवळ जाउन पाहतही नाहित, मदत करायचं तर राहीलंच. एक वेळा तर मी एका अपघात ग्रस्ताला मदत करत होतो, त्याचं डोकं मांडीवर असल्याने समोरच पडलेल्या त्याच्या सेल फोन उचलुन मला फोन करता येत नव्हते. येनारे जानारे पाहत उभे होते, मी ओरडुन सांगत होतो कि त्या सेल वरुन फर्स्ट डायल्ड नंबवर फोन लावा तरी सगळेच ढिम्म.. Angry

काय मानसिकता घेउन हिंडतात तेच कळत नै.

अनिताताई, खरेच खूप कठिण प्रसंग होता.
अशा वेळी घरी एकटे असताना तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी ज्या प्रकारे परीस्थिती हाताळली ते कौतुकास्पद आहे.

एक मुलगी म्हणुन तरी हा प्रसंग आणि त्याच गांभीर्य चांगलच जाणवल वाचताना..

जबरदस्त हिंमतवान आहात अनिताताई......
<<वज्र,
तुम्ही दरवाजा उघडलात>>>>>>>> अहो माझं वय १६ होतं आणि अशी छेडछाड करणा-यांबद्दल मनात प्रचंड राग होता!! आज मात्र असं घडल्यास मी दार उघडले नसते व मुलींनापण उघडू दिले नसते! सेफ्टी दारामागूनच वाकताडन केले असते. आणि १०० ला फोन केला असता. त्याकाळी फोनही नव्हता.>>> हे ही बरोबर आहे - आता.
सगळ्यात गंभीर बाब -
सध्याच्या काळातील - 'आवडत्या' व्यक्तिवर ‍अ‍ॅसिड फेकणे आणि खून करण्याचा प्रयत्न / खूनच अशा गोष्टीत काय व कसा प्रतिकार करणार कळतच नाही......

अनिता ताई .....तुमच्या धिराचे आणी शौर्याचे खुप खुप कौतुक्क... झासि कि रानी बनुन होत्या तुम्ही तर ....सादर प्रणाम ...

अनिताताई, या घटना नविन नाहीत, पण तूम्ही आणि तूमच्या आईवडीलांनी ज्या धैर्याने या प्रसंगाला तोंड दिलेत, त्यावद्दल अभिनंदन.

वाचतानासुद्धा सगळा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला आणि तेव्हा तू प्रत्यक्ष अशा प्रसंगाला सामोरी गेली होतीस.. ग्रेट आहेस. दादांनीपण त्यावेळी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याचंही विशेष कौतुक वाटतं.

Pages