कारुण्य

Submitted by vandana.kembhavi on 15 September, 2011 - 19:36

तिची आणि माझी भेट झाली त्याला दहा वर्ष तरी होऊन गेली असतील. ऑफिसच्या एका ट्रेनिंग मधे आम्ही पहिल्यांदा भेटलो. उंच, थोडीशी स्थूलच म्हणावी अशी शरीरयष्टी, वर्ण सावळा, आखूड केस, दिसायला सर्वसाधारण...पण तिचे डोळे वेगळेच होते, खूप काही सांगणारे बोलके डोळे, त्यात कारुण्याची एक हलकीशी झाक होती.

ट्रेनिंगचा पहिलाच दिवस होता, सगळे मिळून २१ जण होते आणि फक्त १० संगणक होते. एका संगणकावर दोन जण अशी वाटणी करुन घ्या म्हटल्यावर प्रत्येकाने पटकन आपला पार्टनर निवडला आणि ही मात्र एकटीच बाजूला राहिली. तिने हलकेच एक दोघांना मी तुमच्या मधे येऊ का म्हटले खरे पण नकार ऐकून ती खट्टू झाली. माझं तिच्याकडे लक्ष गेलं. तिच्या त्या टपो-या करुण डोळ्यांमधलं दुःख मला अस्वस्थ करुन गेलं. मी माझ्या पार्टनरला सांगून तिला आमच्या ग्रुप मधे यायला सांगितले. तिचा चेहेरा खुलला.

ती खूप अबोल होती. तिच्या नावाव्यतिरिक्त फारशी माहिती आम्हाला नव्हती. वेगळ्या ब्रॅंच मधून आल्यामुळे ओळखही नव्हती. ट्रेनिंगला सुरुवात झाली. आम्ही लक्षपूर्वक एक एक गोष्ट शिकत होतो. अगदी लगेच लक्षात आली ती तिची आकलन क्षमता. तिथे सांगितलेला प्रत्येक कन्सेप्ट तिला पटकन लक्षात येत होता. ती खूप हुशार होती.

संगणकावर प्रत्येकाला वेळ विभागून घ्यावा लागत होता. इतर संगणकावर दोन आणि आम्ही तिघी म्हणून आम्हाला जास्त वेळ लागत होता पण आम्ही तिघीही एकमेकींना सांभाळून घेऊन ते ट्रेनिंगचे दहाही दिवस खूप चांगल्या प्रकारे पार पाडले. त्या दहा दिवसांत आमची चांगली ओळख झाली. आम्ही साधारण एकाच वयाचे होतो त्यामुळे मैत्रीही होऊ लागली. प्रवासात जाता येता आम्ही एकमेकींसाठी थांबू लागलो. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमधे आम्ही एकत्र बसून जेवलो. खूप गप्पा झाल्या. पण बहुतेक वेळेला माझीच बडबड जास्त असायची. माझा स्वभाव खूप बोलका तर ती एकदम अबोल. पण आमचे सुर जुळत गेले आणि छान मैत्री फुलू लागली.

दहा दिवसांच्या ट्रेनिंग नंतर शेवटच्या दिवशी आमची परिक्षा झाली आणि ती त्या परिक्षेमधे पहिली आली. सगळ्यांच्या तिच्याकडे पहाण्याच्या नजरा एकदम बदलल्या. दहा दिवसांत तिच्याशी फारसा संवाद नसलेल्यांना तिने एक आश्चर्याचा धक्काच दिला होता. आम्हाला दोघींना खूप आनंद झाला आणि आम्ही दोघींनी तिचे अभिनंदन केले. घरी परत जाताना आम्ही तिघींनी छोटस सेलिब्रेशन देखील केलं. त्यानंतर एकमेकींना फोन नंबर देऊन आम्ही एकमेकींचा निरोप घेतला.

आमची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे आणि इतर वेळी घरच्या व्यापांमुळे एकमेकींना फोन करणे जमलेच नाही. एक दिवस अचानक तिची अन माझी ट्रेन मध्ये भेट झाली. तिच्या डोळ्यांमधे मला पहाताच दाटून आलेला आनंद पाहून मी ही आनंदले. खूप गप्पा झाल्या, अर्थात माझी बडबड जास्त...माझं स्टेशन आल्यावर मी उतरुन गेले. पुन्हा बराच काळ आमची भेट नाही. आणि एक दिवस अचानक तिची माझ्याच ऑफिसमधे बदली झाली.

मला खूप आनंद झाला आणि तिलाही. माझ्या सर्व सहका-यांना मी तिची ओळख करुन दिली. ती खूप हुशार आहे आणि अबोल आहे हे सांगितल्यामुळे सगळ्यांनी तिला पटकन आपल्यात सामावून घेतले. तिला हा अनुभव खूप सुखावून गेला. ती पटकन ऑफिसमधे रुळली. एकाच ट्रेनने आम्ही ऑफिसला येत जात असू त्यामुळे पुन्हा गप्पा रंगू लागल्या. त्या दरम्यान माझ्या मुलाच्या आजारपणा मुळे मी दुःखात होते, तिच्याशी मी त्याबद्दल कधीतरी बोलले तर तिच्या डोळ्यात मला अपार दुःख दिसले. त्यानंतर ती अबोलपणे माझ्या सोबत माझं दुःख जगू लागली. मी दुःखी असले की ती ही दुःखी होत असे. ती कधीही मला तसे बोलली नाही पण मला ते नेहेमी जाणवत असे.

एकदा माझ्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला ती तिच्या दोन्ही मुलांना घेऊन आली. तिला दोन मुलगे होते. खूप गोड होते. मोठा माझ्या मुलाच्या वयाचाच होता आणि दुसरा थोडा लहान. भरपूर पैसे देऊन जायच्या यायच्या करारावर रिक्षा ठरवूनच ती आली होती. थोडा वेळ बसली, माझ्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले आणि मग लगेचच गेली. तिच्या त्या छोट्याश्या कॄतीत सुद्धा तिचं अबोल प्रेम मला दिसलं.

त्यानंतर काही दिवसांनी माझी बदली झाली आणि आमची पुन्हा भेट झालीच नाही. मी माझ्या मुलाच्या उपचारांमधे एवढी गुरफटून गेले की अखेर मला नोकरीचा राजिनामा द्यावा लागला. काही वर्ष मी माझे इतर जगाशी दोर कापूनच टाकले होते. मधून मधून मैत्रिणींचे फोन येत पण मी तेवढ्या पुरते बोलून ठेवत असे. मी मुलाला मदत करण्याच्या विचारात एवढी गुरफटलेली असायची की इतर गोष्टींवरचे लक्ष मी काढून टाकले होते. तिचा तर मला पूर्ण विसर पडला होता.....

आणि अचानक ऑफिसमधल्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि तिने मला ती बातमी सांगितली. माझ्या त्या अबोल मैत्रिणीला ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यात तिचा मॄत्यू झाला होता. मी खूप सैरभैर झाले. तिच्या दोन्ही मुलांचे चेहेरे माझ्या डोळ्यासमोर आले. मी खूप जणांकडून काय झाले ते माहित करुन घ्यायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने कुणालाच काही माहिती नव्हते. मला अपार दुःख झाले.

आजही मला वाटते की तिला काही दुखले खुपले ते तिने कुणाला सांगितले असेल का? तिच्या मनातल्या गोष्टी कुणी जाणून घेतल्या असतील का? तिच्या मुलांच्या काळजीने ती बेचैन झाली असेल तेव्हा ती कुणाजवळ काही बोलली असेल का? मी माझ्या दुःखामधे तिच्या कडे दुर्लक्ष केले ही भावना आजही माझे काळीज कुरतडते......मागच्या महिन्यात तिचा वाढदिवस होता, पुर्ण दिवस मी तिच्या आठवणींनी बेचैन होते. आज तिच्या आठवणी शब्दांत उतरवल्यावर मला पुन्हा तिचे ते डोळे माझ्याकडे स्नेहार्द नजरेने पहात आहेत असे वाटले.....

गुलमोहर: