ते राहूनच गेलं...

Submitted by झुलेलाल on 3 August, 2008 - 15:35

एक वाईट बातमी आहे.
अरूण गेला.
मागं मी अरूणनं सांगितलेली, त्या लेलेंची- सिद्धिविनायकाच्या शेजा-याची - गोष्ट तुम्हाला सांगितली, त्या लेल्यांना भेटायचं आमचं ठरलं होतं.
नेहेमी आम्ही भेटलो, की त्या लेलेंची आठवण यायची, आणि, कधीतरी नक्की त्यांच्याकडे जाऊ असं अरुण म्हणायचा...
गेल्या आठवड्यात, तो अचानक, अगदी अकल्पितपणे, निघून गेला...
गुजरातेतल्या गावी वृद्ध आईला भेटायला गेला होता, तिथेच त्याला हार्ट ऎटॆक आला...
...त्या दिवशी सकाळीसकाळी, माझ्या एका सहकार्‍याचा फोन आला, आणि माझ्या मनात कसलीतरी पाल चुकचुकली... आमच्या माहितीतल्या कुणाकडेही, काहीही झालं, की आम्हा सर्वांना हा हळवा सहकारी ते जाणीवपूर्वक कळवतो...
अगदी सकाळी त्याचा फोन म्हणजे काहीतरी गडबड असणार, असा विचार करतच मी हॆलो म्हटलं, आणि त्यानं ही बातमी सांगितली.
मी क्षणभरासाठी अक्षरश: बधीर झालो.
अरूण राहायचा त्या सोसायटीतल्या त्याच्या शेजार्‍याला फोन केला.
बातमी खरी होती.
.... आम्हा पत्रकारांचं खाजगी जग खूप छोटं आहे.
गेल्या वर्ष-दोन वर्षांत मुंबईतल्या आमच्या या जगानं असे खूप आघात सोसले.
अरूणच्या जाण्याच्या आणखी एका आघातामुळे त्या दिवशी आमचं छोटंसं जग पार कोलमडून गेलं...
त्या दिवशी प्रत्येकजण अरूणच्या आठवणींनी हळहळत होता.
माझी व्यथा वेगळी होती...
अनेक आनंदाचे, गंमतीचे क्षण आम्ही शेअर केले होते.
तो माझ्या क्षेत्रातला, अनुभवी, ज्येष्ठ सहकारी होताच, आणि कधीकाळचा माझा सख्खा शेजारीही होता.
माणुसकीला हात घालणा-या अनेक उदाहरणांचा खजिना अरूणच्या अनुभवांच्या पोतडीत होता...
कितीतरी लेले त्याला भेटले होते...
कितीतरी लेल्यांना त्यानं प्रोत्साहन दिलं होतं...
... त्या दिवशी सिद्धिविनायकाच्या शेजार्‍याची, त्या लेलेंची हकीकत मी तुम्हाला सांगितली, त्यानंतर पुन्हा आम्ही लेलेंना भेटायचं पक्कं ठरवण्यासाठी एकमेकांशी बोललो.
... आणि एका नव्या ‘लेले’ची माहिती मिळाली.
*** *** ***
मुम्बईतल्या टाटा हॉस्पिटलच्या आसपास दिवसादेखील अकल्पिताची एक भयाण सावली वावरत असल्याचा भास होतो. अनेक हतबल जीव, उपचाराच्या आशेनं आजूबाजूच्या कट्ट्यांवर, फूटपाथवर आसरा घेऊन दिवस ढकलत असतात... कितीकांनां मुम्बईची ओळखदेखील नसते... कुठल्याश्या कोपर्‍यातल्या आपल्या एवढ्याश्या खेडेगावातून, गाठीची सारी पुंजी कनवटीला बांधून कुणीतरी आशेनं एखादा मरणासन्न जीव घेऊन इथे येतो, आणि रुग्णाबरोबरच, स्वत:ही इथल्या जगण्यामरण्याच्या लढाईत उतरतो...
कधीतरी कनवटीची पुंजी रिती होते, आणि त्या रुग्णाला वाचवण्याच्या लढाईबरोबरच, जगण्याचीही लढाई सुरू होते...
कधी कल्पनेतही विचार केला नसेल, अशी, जगासमोर मदतीसाठी हात पसरायचीही वेळ येऊन ठेपते, आणि जगणंही केविलवाणं होतं...
*** *** ***
.... घाटकोपर किंवा तिथल्याच आसपासच्या एका गार्डनमधे एका संध्याकाळी फेरफटका मारणा-या दोनचार मित्रांसमोर असाच एक दीनवाणा, हतबल हात पसरला गेला.
‘माझी बायको कॆन्सरनं आजारी आहे... मला मदत करा’ कसंबसं एवढंच वाक्य उच्चारताना त्या माणसाच्या दु:खानं करपलेल्या चेहे-यावरच्या दीनवाण्या रेषा आणखीनच गडद झाल्या आणि हे मित्र चालताचालता थबकले.
... मुम्बईत एखादा माणूस पैसे उकळण्यासाठी प्रसंगी मरणाच्या कहाण्याही रंगवितो, ह्याचा अनुभव असलेल्या त्या मित्रांनी ह्या केविलवाण्या देहाकडे अगोदर तशाच नजरेनं पाहिलं...
त्याचा चेहेरा खोटं बोलत नाही, हे त्यांना पटलं.
पण बागेत फिरायला येताना एखाद्याजवळ असतील, तेव्हढेच पैसे त्यांच्याकडे होते.
तरीही सगळ्यांनी आपले खिसे त्याच्या पसरलेल्या ओंजळीत रिकामे केले.
पण ते अपुरं दान त्यांना समाधान देऊ शकलं नाही.
बायकोच्या आजाराच्या चिंतेनं खंगलेल्या त्या माणसाला त्यांनी हॊस्पिटलाचा पत्ता, वॊर्ड नंबर विचारला, आणि दुस-याच दिवशी हे मित्रमंडळ हॊस्पिटलमध्ये पोहोचले...
तो खंगलेला, श्रमलेला दीनवाणा माणूस आणकीनच थकल्या शरीरानं रुग्णशय्येवरल्या बायकोच्या पायाशी बसलेलाच होता...
त्याच्या हाती नोटांचं एक बंडल सोपवून, त्याच्या पाठीवर थोपटून, काहीही न बोलता हे मित्र तिथून बाहेर पडले.
... पण तो केविलवाणा माणूस आणि त्याची मरणपंथाला लागलेली बायको त्यांच्या नजरेसमोरून हलत नव्हती.
दुस-या दिवशी कामधंद्याला निघताना ट्रेनमध्ये पत्ते खेळताखेळता त्यांच्यतल्याच एकानं ग्रूपमधल्या आपल्या इतर दोस्तांना ही हकीकत सांगितली,
आणि पत्ते खेळणारे हात थबकले....
पुढच्या क्षणाला ते हात खिशात गेले होते...
माणुसकीच्या एका झर्‍याचा उगम झाला होता...
पुन्हा त्या संध्याकाळी हॊस्पिटलमध्ये जाऊन ते जमलेले पैसे त्यांनी त्या माणसाच्या स्वाधीन केले...
एका आगळ्या समाधानाचा अनुभव त्या दिवशी सगळ्या ग्रुपनं घेतला होता...
दुसर्‍या दिवशी तो ग्रूप ट्रेनमधून प्रवास करताना पत्ते खेळत नव्हता...
... बर्‍याच चर्चेनंतर, अशा गरजूंसाठी आपल्या खिशाचा एक कोपरा राखून ठेवायचा निर्णय त्या तसाभराच्या प्रवासात झाला होता.
... आता ह्या ग्रूपमध्ये आणखी कितीतरी हातांची भर पडलीये.
... एक ट्रस्ट उभा राहिलाय.
... पैशाअभावी उपचार घेऊ न शकणार्‍या रुग्णांसाठी हे हात सैल होतात...
आजवर कितीतरी रुग्णांना ह्या ट्र्स्टनं जीवदान दिलंय...
ट्रेनमधला, पत्ते कुटणारा, एक गट, एका अपघातानं घडलेल्या साक्षात्कारातून, माणुसकीचं आगळं रूप घेऊन नव्या जाणीवांनी ‘जबाबदार’ झालाय.
*** *** ***
लेलेंच्या निमित्तानं गप्पा मारतामारता त्या दिवशी अरूणकडून मिळालेल्या या नव्या माहितीमुळे, त्या ग्रुपला भेटायची माझी इच्छा तीव्र झाली आहे.
पण आता त्यांना भेटायला घेऊन जायला अरूण सोबत असणार नाही.
... ‘कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ पत्रकार, ‘हिंदू’ या दैनिकाचे महाराष्ट्र ब्यूरोचे उपप्रमुख अरूण भट यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले’ अशी बातमी गेल्या आठवड्यात मुम्बईतल्या सगळ्या मराठी वर्तमानपत्रांत आपण वाचली असेल...
...लेलेंच्या निमितानं त्याच अरूणशी मी तुमची ओळख करून दिली होती.

त्यानंतर अशा ‘आणखी काही लेलें’ची माझ्याशी ओळख करून दिली, आणि अरूण गेला!

http://zulelal.blogspot.com

गुलमोहर: 

झुलेलाल, तुमचं लिहिणं काही कळायच्या आधी आत पोचलेलं असतं. हे एक असच. भारतातल्या "पत्रकारितेशी", दैनिकं वाचून जेव्हढा संबंध असू शकतो तेव्हढा(च) असणारी माणसं आम्ही. माहीतही नसलेल्या कुणा अरूण भट नावाच्या एका तुमच्या पत्रकार मित्राबद्दल आधीच्या लेखात बोललात तेव्हाच त्या 'लेलें' सोबत तो ही थोडा वस्तीला आलाच.

माणसं का लक्षात रहातात आणि का नाही... ह्याचं प्रत्येकाचं गणित वेगळं. पण विठ्ठलाची 'जाणीव' तेवती ठेवणार्‍या पुंडलिकाचं नाव आपल्यातला हरेक घेतो नाही?

लिहा हो! अजून लिहा!

झुलेलाल,
गणपतीने आई-वडिलांना प्रदक्षिणा मारून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. तुम्ही या निमित्तानं "थोडक्यात सर्वकांही फिरवून आणलं." अप्रतीम !!
.......................अज्ञात

दाद, मी तुझ्याशी सहमत गं. खुप भिडतं तुमचं लिखाण झुलेलाल. कारण त्यात 'माणूस' उतरलेला असतो. चॅनेल्सच्या झगमगाटी, पॅनिक करणार्‍या पत्रकारितेच्या पार्श्वभुमीवर तुमची, अरुणची माणुसकीने भरलेली पत्रकारिता खुप भावली...

झुलेलाल,
तुमचे लिखाण मी वाचते. तुम्ही वेगवेगळ्या ट्रस्टविषयी लिहिता. बरेच लोक या ट्रस्टना मदत करत असतात. माझी एक छोटीशी शन्का आहे. यामधले किती लोक आपण केलेली मदत योग्य ठिकाणी पोचते की नाही हे तपासून पाहतात? आजकाल अस बरेचदा होत की ज्याना गरज आहे तिथे मदत पोचतच नाही. तुमच्या 'लेलेन्च्या निमित्ताने' लेखावरील प्रतिक्रिया वाचताना अस मनात आल की मदत करण्याची ईच्छा बय्राच लोकाना असते. पण आपण केलेल दान सत्पात्री आहे की नाही हे ही प्रत्येकाने तपासून पहायला हव.
तुमच्या कळकळ मनाला खूप स्पर्शून जाते. ईथे तुम्हाला दुखवण्याचा अजिबात हेतु नाही. तुमच्या लेखणीतून मला समजलेले अरूण नेहमीच लक्षात राहतील.