ते सांगतात काही..

Submitted by रसप on 8 September, 2011 - 04:46

ते सांगतात काही ते ऐकतात काही
असते मनात काही ते बोलतात काही

का भावविश्व माझे दावू कुणासही मी
दु:खावरी सुखाला आधारतात काही

ना सोबती कुणीही होता मला हवासा
माझा प्रवास पाहूनी चालतात काही

केला कधीच नाही मी द्वेष वेदनेचा
आनंदही जगी ह्या क्षण वाटतात काही!

बोलू नये परंतु ही बात खास आहे
देवासही "अधाशी" संबोधतात काही!

मद्यालयात माझे नाहीच रोज जाणे
रस्ते उगाच तेथे का पोचतात काही?

जीतू नको बघू तू मागे-पुढे मुळीही
हे चावले कधी ना, पण भुंकतात काही!

....रसप....

गुलमोहर: 

बोलू नये परंतु ही बात खास आहे
देवासही "अधाशी" संबोधतात काही!.....सही!

मद्यालयात माझे नाहीच रोज जाणे
रस्ते उगाच तेथे का पोचतात काही?...क्या बात!!

जीतू नको बघू तू मागे-पुढे मुळीही
हे चावले कधी ना, पण भुंकतात काही!....खल्लास मक्ता.....ये हुई ना बात!!

आवडले हे शेर...जियो!

ते सांगतात काही ते ऐकतात काही
असते मनात काही ते बोलतात काही

...व्व्व्वा बो हो त अच्छे.. मस्त मतला

का भावविश्व माझे दावू कुणासही मी
दु:खावरी सुखाला आधारतात काही

???? मिसरा नाही कळला (" हे भावविश्वमाझे दावू कुणास सांगा".. असे वाचून बघीतले)

मद्यालयात माझे नाहीच रोज जाणे
रस्ते उगाच तेथे का पोचतात काही?.... छा न ..पण अजून छा न करता येइल
नाहीच रोज जाणे :- म्हणजे कधितरी जाण होतय तर Happy

ना सोबती कुणीही होता मला हवासा
माझा प्रवास पाहूनी चालतात काही

का काय माही त पण लयीत नाही येत म्हणता .."पाहूनी" हा श ब्द म्हणताना लय जातेय..:(

बोलू नये परंतु ही बात खास आहे.....मस्त ओळ
देवासही "अधाशी" संबोधतात काही!... ही ओळ नाही झेपली

माझे प्रांजळ मत दिले..कृपया गैरसमज नसावा..लिहीत रहा मित्रा..

मयुरेश,

कुणासही म्हणजे 'कुणालाही' असं म्हणायचं आहे. कुणालाही मी माझ्या मनातलं का सांगू.. (मला कुणाकडेच मन हलकं करावंसं वाटत नाही.)

"माझा प्रवास पाहूनी चालतात काही"
हा मिसरा गंडलाय म्हणायला हरकत नाही.. यतीभंग आहे.

"देवासही "अधाशी" संबोधतात काही!"
देवाला गोडाचा नैवेद्य दाखवतात... नवस करतात.. जणू तो हपापलेला आहे, अधाशी आहे.

धन्यवाद मयुरेश व सुप्रिया ताई !!

कुणासही म्हणजे 'कुणालाही' असं म्हणायचं आहे. कुणालाही मी माझ्या मनातलं का सांगू.. (मला कुणाकडेच मन हलकं करावंसं वाटत नाही.)

वरची ओळ मलाही कळली रणजीत पण मिसरा नाही कळला
दु:खावरी सुखाला आधारतात काही
??? म्हणजे.... काय...आणी दोन्ही ओळींचा काय एकत्रीतपणे (मिसरा म्हणून काय अर्थ)

तू माझा अभिप्राय सकारात्मक घेतलास.. बरे वाटले

ओह!

म्हणजे (दुसऱ्याच्या) दु:खावर (स्वत:चं) सुख आधारतात काही (लोक).
किंवा काही लोकांना दुसऱ्याचं दु:ख जाणून विकृत आसुरी आनंद होतो.

असं काहीसं म्हणायचं आहे..

मी भावविश्व माझे का दाखवू कुणाला
पाहुन दुःख सुद्धा मग हासतात काही

बोलू नये परंतू ही गोष्ट सत्य आहे
देवास हरघडीला अजमावतात काही

मी सोबती कधीही ना घेतले कुणाला
वाटेवरुन माझ्या पण चालतात काही

:)...शाम

ना सोबती कुणीही होता मला हवासा
माझा प्रवास पाहूनी चालतात काही
.
केला कधीच नाही मी द्वेष वेदनेचा
आनंदही जगी ह्या क्षण वाटतात काही!
.
जीतू नको बघू तू मागे-पुढे मुळीही
हे चावले कधी ना, पण भुंकतात काही!

विशेष भावलेत. Happy

रस्ते उगाच तेथे का पोचतात काही >> वा वा!

(आनंदकंदमध्ये सहसा यती पाळावा लागतो. - तिसर्‍या शेरातील दुसरी ओळ) Happy

साऱ्यांचे आभार..!
बेफिकीरजी,
हो, बरोबर आहे तुमचं. तो शेर किंचित गंडलाच आहे..!