खुषखऽबर ! खुऽषखबऽर !! खुऽषखबरऽऽ !!!

Submitted by कविन on 8 September, 2011 - 04:15

(आजच्या दैनिक स्वप्नरंजन मधून आलेलं हे पत्रक तुमच्या माहिती साठी इथे देत आहे)

खुषखबरऽ ! खुऽषखबऽर !! खुऽषखबरऽऽ !!!

शहरात प्रथमच येत आहे "जिवनोपयोगी वस्तूंचे भव्य दिव्य प्रदर्शन"

प्रदर्शन स्टॉक असे पर्यंतच चालू राहील. आमच्या अनुभवानुसार एका दिवसात विक्री होऊन सर्व माल संपतो तेव्हा त्वराऽऽ कराऽऽ

असे प्रदर्शन जे ह्यापुर्वी १० हजार वर्ष कधी झाले नव्हते, १० हजार वर्षात झाले नाही आणि ह्यापुढील १० हजार वर्ष होणारही नाही.

त्वराऽ कराऽ त्वरा करा, लवकरच भेट द्या आणि आपलं जीवन सुकर करा.

आमचे निवडक कोहिनुरी प्रॉडक्टस काय आहेत ते आधी वाचा, मगच भेट द्या.

१) बहुपयोगी "जो जे वांच्छील तो ते लाहो चष्मा"

आता चष्म्याचे असे काय बहु उपयोग आहेत असं वाटेल तुम्हाला. पण हा भव्य दिव्य प्रदर्शनातला दिव्य चष्मा आहे. तेव्हा हा लावल्यावर खालील प्रमाणे फळ मिळते

हा चष्मा" लावल्यावर

अ) गझलेच्या अतिडोसाने त्रस्त झालेल्या मंडळींना "पहिल्या पानावर गझला अजिबात दिसत नाहीत.

ब)पाकनैपुण्याचे प्रयोग पाहून पाहून कंटाळलेल्या जनतेला पाकातला "प" सुद्धा दिसत नाही

i) ii) iii)..... ह्यात आपल्या आपल्या त्रासाप्रमाणे ज्याने त्याने भर घालू वाचावे

क)घरी त्या इडीयट बॉक्स समोर बसल्यावर रिमोट आपल्या हातात नसला आणि समोर टुकार सिरिअल्स चालू असल्या तरिही आपल्या आवडीचेच चॅनल्स आपोआप दिसू लागतील. जसं एच्बीओ भक्तांना तिथले सिनेमे, मॅच वाल्यांना मॅच, एफ़्बी भक्तांना एफ़्बी असं बरच काही. भक्ती जितकी तीव्र तितका चष्मा लावल्यावर दिसणारा चॅनल सुस्पष्ट हे ध्यानात ठेवायचे.

२)म. जोशी कानपट्टी

ही कानपट्टी लावल्यावर लोकं कितीही बोंबा मारोत आपल्या पर्यंत त्या पोहोचतच नाहीत. आणि पोहोचतात तेव्हा आपल्याला जे शब्द ऐकायचे असतात त्याच धर्तीचे शब्द ऐकू येतात
उदा. गझलतिरेकाने वेड्यापिशा झालेल्या पब्लीकने गझलेच्या पूराला अतिसार म्हंटले काय कींवा अजून काही, ही पट्टी कानाला लावली की आपण निवांत होतो. पट्टीला असलेल्या जाळीतून फक्त "व्वा! जबरी शेर" "क्या बात है" "तरही" "वृत्त, मात्रा" इतकच ऐकू येईल. बाकी (अती) सार(र वर अनुस्वार द्यावा) (व)गाळलं जाईल.

पा.की. (म्हणजे पाककलेतले किडे उर्फ पाकविषारद) लोकांना "कै बाई तरी नारळाच्या करवंटीचाही पदार्थ करुन दाखवतील एक दिवस" टाईपच्या कमेंटस गाळुन फक्त "स्लर्पऽऽऽ" टाईपच्याच गोष्टी ऐकू येतील.

घरातल्या वादात "नरो वा कुंजरोवा" भुमिका घ्यायला ह्याने फायदाच होईल.

३)वजनरहीत दप्तर

कितीही वजनाची वह्या पुस्तकं ह्यात भरा, पाठीवर घेताच हे दप्तर फुलपाखराच्या वजना इतकं हलकं होतं

४)दौपदीची झोळी (महाभारतात द्रौपदीची थाळी होती त्यावरुन प्रेरणा घेऊन आम्ही ही झोळी तयार केलेय)

ही झोळी बाजरहाट झोळी म्हणुनही प्रसिद्ध झालेय. ह्याचं वैषिष्ट्य हे की कांदा बटाटा इतर भाज्या ह्यांचे भाव कितीही वाढले तरी आपाल्याला त्याचा काहिही फरक पडत नाही. "झोळीत हात घाला हवी ती भाजी काढा" अशी ख्याती आहे तिची.

५) जादूई अंथरुण

अंथरुण पाहून पाय पसरा ही म्हण आता विसरा. हे अंथरुण तुमच्या पाया प्रमाणे आपणहूनच पसरतय म्हणजे वाढतय.

६) हास्यविलसती दंतमंजन

हे मंजन वापरल्यावर आपोआप हास्य विलसते ओठी अशी अवस्था होते. ते हास्य मग बोटांतून पोस्टींपर्यंत झिरपते.

ट्रेनच्या गर्दीत, ट्रॅफिक जॅमच्या लायनीत तुमचं मनस्वास्थ्य टिकवून ठेवणारं अजीबो गरिब तेल देखील आमचे खास आकर्षण आहे.

अजून बरिच प्रॉडक्टस आहेत जी तुमचे जीवन सुखकर करतील तेव्हा मेहरबान कदरदान मायबापहो विचार करु नका, यायच्या तयारीलाच लागा.

खालील ठिकाणी खालील दिवशी खालील वेळी आमच्या भव्य दिव्य प्रदर्शनाला भेट देऊन सुखी व्हा.

ग्राहकांचे निवडक प्रतिसाद खास तुमच्यासाठी (अर्थात कानपट्टी आणि चष्मा लावून मगच ऐकले/बघितलेले हे वेगळं सांगायला नकोच.) :-

अग्गोबाई सुनबाई: गेल्या ३१ सप्टेंबरच्या प्रदर्शनात मी कानपट्टी घेतली आणि काऽऽय सांगूऽऽ सा(रख्या) सु(चना) चा अखंड सप्ताह एकदम बंद झाला ऐकू यायचा. साबाईंना दंतमंजन नेऊन दिले आणि तेव्हापासून मल बघताच होणारा Angry अस्सा चेहरा Proud अशा स्मायलीत बदलला.

गरिब बिच्चारा रोजंदार: आम्ही आधी पाण्याबरोबर भाकरी खायचो. गेल्या ३१ सप्टेंबरच्या प्रदर्शनात द्रौपदीची झोळी खरेदी केली आणि तेव्हापासून रोऽऽज मलई कोफ्ता पालक पनिर खातोय.

ह्यांच्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका आमच्यावरही ठेवू नका, पण भेट जरुर द्या आणि स्वत:च खात्री करा.

"पहले इस्तमाऽल करेऽऽ फिर विश्वाऽस करेऽऽ"

ठिकाण:
स्वप्नरंजन पार्क,
दिवास्वप्न कार्यालयाच्या समोर
अतिरंजीत नगर
पीनकोड ४२०४२०४२०

वेळ: रात्रौ १० ते पहाटे ५

प्रदर्शन दिनांक ३० फेब्रुवारी पासून सुरु होईल आणि स्टॉक असे पर्यंतच चालू राहील.

त्वरा कराऽऽ त्वरा कराऽऽ त्वरा कराऽऽ

(तळटीप १: खरतर "मुंबईतले कार्यक्रम" ह्या सदराखाली टाकायचे होते पण नक्की पत्ता मुंबईतला आहे की बाहेरचा हे न कळल्याने इथेच टाकत आहे. माहिती हवी आहे हा प्रकार गृप पुरताच मर्यादित आहे आणि त्यातूनही फक्त पत्त्याविषयी माहिती मिळाली असती. माझ्याबरोबर अजून कोण कोण इथे यायला उत्सुक आहे हे त्यातून समजलं नसतं म्हणूनही मी हे पत्रक इथे पोस्ट करत आहे. दैनिक स्वप्नरंजन आणि जाहिरातदार ह्या दोघांशीही पत्रव्यवहार करुन प्रताधिकार भंग होत नाही आहे ह्याची दक्षता घेतली आहे ह्याची नोंद घ्यावी. पत्रातून पत्त्याविषयीच्या शंका विचारल्या असता "कोणीही सांगेल, जगप्रसिद्ध ठिकाण आहे हे" असा फु.स.(*) मिळाल्याने आम्ही इथे जगभरातली नानाविविध माहिती डोक्यात साठवलेली माणसे असल्याने इथेच पोस्ट करायचं धाडस दाखवलं आहे.)

*फु.स. = फुकट सल्ला (हे माहित नसणार्‍या माझ्या सारख्या अज्ञ लोकांसाठी ही * वाली टिप, ज्यांना हे आधीच माहितेय त्यांना पत्ताही नक्कीच माहित असणार ह्यत काही शंकाच नाही.)

(तळटीप २: ही जाहिरात "ललित" सदराखाली पोस्ट करत आहोत. प्रतिसादात स्मायली न झिरपल्यास प्रदर्शनाला जरुर भेट द्यावी आणि त्यांचं हास्यविलसती दंतमंजन वापरुन मगच प्रतिसादावं. तरिही उपेग न झाल्यास तो चष्मा वापरुन कानाडोळा करावा, आम्ही कानपट्टी घेऊन यायच्या विचारात आहोतच)

गुलमोहर: 

Rofl
ओ ताई आम्हाला तेव्हड "म. जोशी कानपट्टी " किंवा "हास्यविलसती दंतमंज" द्याच Proud

वजनरहीत दप्तर आणलय तस आम्हाला पण वजनापासुन मुक्ती मिळेल असे काहीतरी आणा हो Wink

बाकी खालील वस्तु उपलब्ध करुन द्या Happy

१] स्वत:ला पाहिल्यावर सुंदर दिसु असा आरसा

२] मुलांच्या डोक्याला स्पर्श केल्याबरोबर सगळे मेमराइज होइल अशी पुस्तके

३] माझ्या लेखणावर क्लिक करताच शेकडो ( पॉझीटीव्ह Proud ) प्रतिसाद पडतील असा किबोर्ड Lol

कविताजी,
------^-------

-------------------------------------------------------------------------
माझा अनुभव
"जो जे वांच्छील तो ते लाहो चष्मा"
मी हा चष्मा घेतला आणि तो लावल्यावर,

१) मला डु-आयडी मागची खरी माणसं दिसायला लागली की हो !

२) गुलमोहरच्या गद्य विभागांमध्ये
फक्त सारांश दिसायला लागला…….
…….डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा.
(कृपया हलके घेणे)

कविता,
Happy
तळ टीपेत फु.स. च्या जागी फु.क. झालेय ते ठीक कर.
नको अस्लेल्या लोकांना फुटवायची फुटपट्टी मिळेल का?

सह्हिये..

आता वजनरहीत अस्तित्वाचा करिश्मा दाखवणारी वस्तू सेल कर.. Proud म्हणजे जाजु समोर आली तरी जेलो एवढी दिसली पाहिजे.. Proud खप हजारोनी होईल.. Wink

मला १, २ व ३ या वस्तू, प्रत्येकी ३ पाठवा. कारण मी वस्तू हरवतो. आता कधीहि न हरवणारा चष्मा, छत्री अश्या वस्तू कधी बाजारात येतील याची वाट पहातो आहे. मी तुम्हाला एक रिकामे पाकीट पाठवीन, एका हातात ते पाकीट धरायचे नि शेजारच्याचे लक्ष नाही असे पाहून हळूच त्याच्या खिशातून पैसे काढायचे.