एकतर्फी..

Submitted by नादखुळा on 6 September, 2011 - 06:00

भावनांची जाणून बुजून
केलेली ओढाताण,
नात्यांच्या रुळलेल्या प्रवासाला,
अश्या वळणावरती संपवण्याचा,
तो अनाकलनीय हट्ट !
जुन्या आठवणींचा,
मी लिहिलेल्या पत्रांचा,
जपलेल्या क्षणांचा,
तो बाजार लिलाव..
शाश्वतीच्या गृहीतावर,
मुक्या संवेदनांचा तो आव..
अन सततचे निर्दयी घाव..
हे समजण्याचे सामंजस्य,
अजूनही शिल्लकीत आहे म्हणूनच..

आपल्यातल्या या तफावतीला,
तक्रार म्हणून मांडताही आलं नाही,
अन जीव रस्ताळून भांडताही आलं नाही...
हे कालच्या 'एकतर्फी'च्या आरोपानं
बोचलंस ना तेव्हाच जाणवलं !

- नादखुळा

गुलमोहर: 

खूपच सुंदर आशय! नादखुळा राव, जीव 'रस्ताळून' असेच म्हणायचे आहे की 'रक्ताळून' असे? कारण 'रस्ताळून' हा शब्दही अत्तिशय आवडला.

(शेवटी काय, कवीनेच शब्द निर्माण करायचे असतात, माझा तरी यावर विश्वास आहे) Happy

शाश्वतीच्या गृहीतावर,
मुक्या संवेदनांचा तो आव..>>> सुंदर

आपल्यातल्या या तफावतीला,
तक्रार म्हणून मांडताही आलं नाही,
>>>

सुंदर!

-'बेफिकीर'!

जीव 'रस्ताळून' असेच म्हणायचे आहे की 'रक्ताळून' असे? कारण 'रस्ताळून' हा शब्दही अत्तिशय आवडला.

धन्यवाद. रस्ताळून हा शब्द मी आईच्या तोंडी बर्‍याचदा ऐकला आहे. जीव रस्ताळून म्हणजे अगदी त्रस्त, हतबल झालेली अवस्था. त्यामुळे हा शब्द माझ्यासाठी नविन नाही. असे बरेच शब्द आहेत जे तीच्या तोंडून ऐकले आहेत. Happy

आपल्यातल्या या तफावतीला,
तक्रार म्हणून मांडताही आलं नाही,
अन जीव रस्ताळून भांडताही आलं नाही...
हे कालच्या 'एकतर्फी'च्या आरोपानं
बोचलंस ना तेव्हाच जाणवलं ! >>>> सुंदर, खुप सुंदर ! Happy