आनंदी

Submitted by vandana.kembhavi on 6 September, 2011 - 00:17

ईथे सिडनी मधे आल्यापासून वेगवेगळ्या देशांचे लोक भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना खूप गंमत येते. प्रत्येकाची बोलण्याची त-हा वेगळी आहे. पण एकंदर लोक मात्र खूप प्रेमळ आहेत. समोरासमोर आले की अभिवादन करतात, स्मितहास्य करून कसे आहात याची चौकशी करून पुढे जातात.
ईथले आजी आजोबा आपलं आयुष्यं खूप छान जगतात. मी रहाते त्या उपनगरामधे एक खूप जुना मॉल आहे, तिथे सकाळी हे आजी आजोबा आपापल्या मित्रमैत्रिंणींबरोबर कॉफी प्यायला जमतात. माझ्या बिल्डिंगमधे बिल आणि कॅथी नावाचं एक वृद्ध ग्रिक जोडपं रहातं. ते रोज त्या मॉल मधे जातात.... अगदी नेमाने...सकाळी आरामात उठून, आवरून ते अकरा वाजता बाहेर पडतात ते तीनच्या दरम्यान परत येतात. साडेतीन चारला ते डिनर घेतात, पाच वाजेपर्यंत सगळं आवरून मग ग्रीक टीव्ही बघत बसतात. साधारणपणे सर्व वृद्धांचे थोड्याफार फरकाने असेच रुटीन असते. काही मात्र जमेल तो पर्यंत स्वयंसेवी संस्थांमधे जमेल ती कामे करत रहातात, स्वस्थ बसणे त्यांना मान्य नसते. त्यांचा तो उत्साह आपल्याला थक्क करून जातो.

बिलला बागकामाची प्रचंड आवड आहे. आमच्या बिल्डिंगच्या भोवती त्याने खूप सुंदर बाग बनवली आहे. वेळ मिळेल तेव्हा तो बागेत खुडबुडत असतो. निरनिराळ्या फुलांबरोबरच त्याने टोमॅटो, मिरच्या, कांदे, सेलरी, रोजमेरी,पुदिना, काकडी वगैरे लावले आहेत. नित्यनेमाने तो बागेला खते घालतो, पाणी घालतो, ती स्वच्छ ठेवतो. कोणी काही न विचारता झाडावरुन काही तोडलेलं त्या दोघांना खपत नाही. मला मात्र सगळं माफ, मी काहीही तोडू शकते, काहीही घेऊ शकते. अर्थात मी घेत नाही. पण टोमॅटो लाल झाले की कॅथी ते काढून मला आणून देते. काकड्या देखील देते, आणि खरच सांगते त्याची चव अगदी अवर्णनीय आहे.
बिल तसा आमच्या बिल्डिंगचा अनधिकृत केअर टेकर आहे. प्रत्येक गोष्टीकडे त्याचे बारकाईने लक्ष असते. ,अगदी कच-याचे डबेदेखील तो रोज तपासतो आणि लोकांनी रिसायकलच्या डब्यात वेगळा कचरा टाकला की तो व्यवस्थित बाजूला करतो. मी एकदा त्याला याचे कारण विचारले तर तो म्हणाला लोकांनी व्यवस्थित कच-याचे वर्गीकरण केले नाही तर बिल्डिंगला कौंसिलची नोटीस येते आणि दंड भरावा लागतो आणि तसे होऊ नये म्हणून मी ते रोज तपासतो. मला खरच त्याचे खूप कौतुक वाटते. मी मनाशी विचार केला की आपण असे वागु शकू का? लोकांसाठी कचरा तपासू शकू का? बहुतेक नाही.... काय माहित?.... नाहीच बहुतेक.....

मध्यंतरी कॅथीच्या पायाचे ऑपरेशन झाले, पंधरा दिवस ती हॉस्पिटल मधे होती, बिलने एकट्याने सगळं सांभाळलं. त्यांना जुळे मुलगे आहेत, आता ते देखील पन्नाशीच्या पुढचे आहेत. हॉस्पिट्ल मधे ते भेटायला येऊन गेले पण त्यानंतर ते घरी आलेदेखील नाहीत. घरी आल्यावर पण कॅथी खूप दिवस काही करू शकत नव्हती पण बिलने कोणाचीही मदत न घेता सगळं केलं. हळूहळू ती बरी झाली पण बिलंदर म्हातारी काठी घेऊन चालायला मात्र तयार नाही. मी तिला जेव्हा म्हटलं की काठी घेतलीस तर पायावर जोर टाकावा लागणार नाही, तर मला म्हणते काठी घ्यायला मी काय म्हातारी आहे का?
बिलला तशी सगळी कामे जमतात आणि त्याला ती करायला देखील आवडतात, सगळ्यांना मदत करायला तो नेहेमी तयार असतो. मला त्याची प्रचंड मदत मिळते, मध्यंतरी किचनच्या कपाटाचे दारखाली उतरले, माझी ठोकठोक ऐकून लगेच घरात आला आणि ते बसवून दिलं, आणि मला बजावून गेला की मला सांगायच काम, स्वतः करत बसू नकोस.
एवढं असलं तरी तो तितकाच तापट आहे, कोणी शिस्तीत वागलं नाही की याचा रागाचा पारा चढतो. बेजबाबदार पणा केलेला त्याला बिलकुल खपत नाही मग तो जोरजोरात भांडतो. कित्येकदा पोलीस आलेले आहेत पण त्याला त्याची फिकीर नाही. स्वतःच्या मूल्यांवर जगणारा माणूस आहे तो, स्वच्छ अन निर्मळं......

माझ्या समोरच्या घरात एक कोरीयन आजी रहाते, ६५-७० दरम्यान वय असावं, एकटीच रहाते. तिची मुलगी अधून मधून येऊन जाते. आजीला अजिबातच इंग्लिश येत नाही. मी आणि ती खाणाखुणांनी एकमेकींशी संवाद साधतो. रोज हॅलो म्हणतो आणि एकमेकींशी हसतो. आजी खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. सकाळी साडेसातला जवळच्या बागेत "ताई ची" करायला जाते. वृद्धांना करायला सोपे अन त्यांच्या स्नायूंसाठी चांगले व्यायाम प्रकार ताई ची मधे घेतले जातात. घरी आली की तिच दार ती नेहेमी उघडं ठेवते, पुढच जाळीच दार फक्त बंद करते. कदाचित तिला खूप एकटं वाटत असावं. ती रोज छान स्वयंपाक करते, त्याचा मात्र आम्हाला कधी कधी खूप त्रास होतो. ईतके उग्र वास येतात की सहन करण्यापलीकडे असतात. तिचा टीव्ही सतत चालू असतो अर्थात कोरीयन टीव्ही, पण कौतुक म्हणजे स्वतःला ती आनंदी ठेवते.

एकदा बिल्डिंगमधे इंटरकॉम बसवायला शनिवारी माणसं येणार होती, त्यामुळे सकाळी कुणीतरी घरी थांबा असा निरोप घेऊन बिल आला. बिलने आजीला सांगायचा प्रयत्न केला पण तिला कळल नाही. मी तिला खाणाखुणांनी इंटरकॉम सांगितला पण शनिवार सांगणे खूपच कठीण गेले. मी तिला संडे पासून सॅटरडे पर्यंत म्हणून दाखवले तर तिने मला कोरीयन मधे म्हणून दाखवले आणि कुठल्यातरी शब्दावर ती थांबली. आता मला कळेना की ती रविवार पासून मोजत होती की सोमवार पासून, शेवटी संवाद तिथेच सोडला आणि मी तिला शुक्रवारी हातवारे करून टुमारो असं सांगितल आणि हुश्श.. तिला ते कळलं.

शनिवारी ते काम करायला आले, एक उंच धिप्पाड लालबुंद म्हातारा, त्याच नाव लुई, तो हंगेरियन होता. लुई खूपच बोलका होता आणि मिश्किल ही. काम करता करता खूप गप्पा मारत होता. आमच्या घरापासून त्याने सुरुवात केली न मग आजीच्या घरी गेले. आजी एकटी असल्यामुळे मी तिच्या सोबतीला गेले. पहिल्यांदाच मी तिच्या घरात आत गेले होते. आपली आई ठेवेल असं स्वच्छ घर तिने ठेवलं होतं. तिच्या भिंतीवर तिच्या तरुणपणीचा नव-याबरोबरचा फोटो टांगलेला होता. लुई काम करता करता मला म्हणाला की हा फोटोतला नवरा कुठे आहे ते तिला विचार ना, मला प्रश्नाचा रोख कळला नाही, मी त्याला कारण विचारले तर म्हातारा हसून मला म्हणाला की अग तिचा नवरा देवाघरी गेला असेल तर मी तिला डेट वर येतेस का विचारीन कारण माझी बायको वारली आणि मी आता सिंगल आहे. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.मग त्याला म्हटले की बाबा रे मला कोरीयन शिकल्याशिवाय तिला काही विचारता येणार नाही, तुला जमत असेल तर तूच विचार. तो मिश्किल हसला. अर्थात त्याने काही तिला विचारले नाही.

मनाने तरुण रहाण्याचा यांचा हा प्रयत्न खूप सुखावून जातो. आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत जगणे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. कुठच्याही क्षणी ते म्हातारं आहोत असं स्वतःच्या मनाशी तरी कबूल करत असतील की नाही कोण जाणे. काही असो त्यांच्या या समजुतीने तरी ते आनंदी जीवन जगत आहेत....

गुलमोहर: