तस्मै श्री गुरवे नमः|

Submitted by अ.नि.सा on 5 September, 2011 - 18:14

शाळा... एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा चालू असताना कधी संपणार ही? असं वाटणारी...आणि जून महिना सुरु झाला कि कधी एकदा सुरु होतेय असं वाटणारी...शाळा.

किती विविध गोष्टी निगडीत आहेत या एका शब्दाशी! सगळ्यात महत्वाचे म्हणजे 'शिक्षक'. शिक्षकांशिवाय शाळा होऊच शकत नाही. अर्थात त्या अनुषंगाने इतर गोष्टीही आहेतच. नवीन पुस्तके, वह्या, दप्तर, रेनकोट, छत्री अशी सगळी नव्याने जमवाजमव करत आपण वाट बघत राहतो '१३ जून' ची. शाळा सुरु होण्याचा हा अनभिषिक्त, अघोषित दिवस. ज्यांच्यासाठी शाळेचा आयुष्यातील पहिला दिवस आहे अशी चिमुरडी मुलं आणि त्यांचे पालक एका नव्या उत्साहात असतात. चिमुरडी मुलं थोडीशी भांबावलेली.... नवीन कपडे, नवीन दप्तर, डबा अशा नव्या नवलाईने एकीकडे हरखलेली तर दुसरीकडे शाळा दृष्टीक्षेपात येताक्षणी गर्दी आणि आईचा हात सुटून येणाऱ्या असुरक्षिततेच्या अनामिक भीतीने भोकाड पसरणारी... शाळेच्या पहिल्या काही दिवसात न रडणारी मुलं अगदी हाताच्या बोटावरच असतील.

ह्या चिमुरड्या मुलांना तास-दोन तास सांभाळणाऱ्या शिक्षकांची तर खास कसोटी असेल. ह्या चिमुरड्यांचा मन वळवून त्यांना शाळेत येण्याची गोडी लावण्याचं केवढं अमूल्य काम हे शिक्षक करत असतात. ह्या खऱ्या अनघड गोळ्यांना त्यांच्या आयुष्यात 'शाळा' नावाचं नव दालन उघडून, विविध विषयांची गोडी लावून, त्यांचा आयुष्याला प्राथमिक आकार प्राप्त करून देणारे 'हे' शिक्षक आपल्या किती जणांच्या स्मरणात राहतात? किती सहजपणे विसरतो आपण 'ह्या' शिक्षकांना? हा लेख लिहताना नकळतपणे हा पैलू समोर आला आणि विस्मरणात गेलेल्या 'त्या' बाई आठवल्या. हा लेख खास 'त्या' बाईना..... तस्मै श्री गुरवे नमः|

गुलमोहर: