ऒंगळवाणे गांव

Submitted by rkjumle on 4 September, 2011 - 10:18

असं म्हणतात की, दुरुन डोंगर साजरं दिसते. मी जेव्हा माझ्या गांवाजवळील बरडावर जावून माझे गांव पाहत होतो, तेव्हा ते चिमुकलं गांव खरोखर सुंदर दिसत होतं. पण जेव्हा गांवात पाय ठेवत होतो, तेव्हा त्याचा चेहरा वेगळाच दिसायचा. ते म्हणजे ओंगळवाणे रुप!
गांवातलं ते ओंगळवाणे दृष्य पाहून मला किळस येत असे.
माझंच गांव काय कोणतंही खेडेगांव वसवण्यासाठी कोणतंही नियोजन केलेलं नसते. जेथे जागा मिळेल तेथे घर. नाहीतर खाताचा उकीरडा किंवा खड्डा दिसते. खेड्यातील घरांची, रस्त्यांची रचना मुळातच निटनेटकी व पध्दतशीर कधीच नसते. नाल्या गटारं काढलेले नसतात. गांवची ग्रामपंचायत खेड्यातील रचनेबाबत तेवढी संवेदनशील आणि जागृत नसते. कोणी कुठेही जागा दिसेल तेथे घर बांधाव व वाटेल तेथे खाताचा खड्डा खोदावा, त्याचं सोयरसुतक कुणाला नसते.
माझ्या गांवात बैलगाडीचे दोन रस्ते…एक पांढरीकडून यवतमाळला जाणारा व दुसरा लभान तांड्याकडून येऊन पहिल्या रस्त्याला मिळणारा होता. हे रस्ते खाबुडखुबड, दगड, गोट्याचे, माती-गागर्‍याचे, पावसाच्या पाण्याने चिरा पडलेले तर गाडीच्या लोखंडी येटाने घासून घासून खोलगट झालेले, कधी कधी बैलगाडीला लहान-मोठ्या उटा लागत. तेव्हा बैलांना गाडी ओढतांना खूप तान पडत असे.
पायरस्ता तर बोळी-बोळीतून जाणारा. पाणी, चिखल असला की मध्येमध्ये दगडं ठेवलेले असायचे. मग त्या दगडावर पाय ठेवत, कसरत करत, त्या रस्त्याने जावे लागे. कधी कधी दोन घराच्या मध्ये पायवाट असायची. तर कुठे कुपाट्याच्या बाजूने रस्ता असायचा. तेव्हा त्या कुपाटाचा किंवा घराचा आधार घेत घेत रस्ता पार करावे लागत असे.
रात्रीला कुठे जायचं काम पडलं की अंधारात अंदाजा अंदाजाने पाय टाकत जावे लागत असे. नाहीतर पायाला हमखास दगडाची ठेच लागायची. दुर्दैवाने ठेच लागली की तिव्र कळा येऊन जीव तळमळत असे. विंचू सापाची भिती तर डोक्यावर सतत टांगलेली राहायची.
गांवाची अवस्था पाहाल तर अत्यंत भकास, बकाल वाटेल असं राहत असे. गावात विज नाही, नळयोजना नाही, रस्ते नहीत, नाल्या नाहीत, कोणाकडे घरघुती संडास नाहीत, सिमेंट कॉंक्रिटचे घरे नाहीत. शहरासारख्या कोणत्याही सुविधा नाहीत.
खेड्यातही राहणारे माणसंच असतात. त्यांनाही मन, भावना व बुध्दी असते. चारचौघांसारखा त्यांनाही सुखाच्या कल्पना असतात. पण किमान जीवन जगण्याच्या गरजा ते पुर्ण करु शकत नाहीत. जगण्याची कसरत करतांना त्यांचा अवघा जीव अदमुसा होत असे.
जिकडे तिकडे कचरा पसरलेला. पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात मातीचा गागरा…. जिकडे तिकडे शेणाचा व खाताचा कुबट वास. गांवाची अशी बकाल अवस्था पाहून मन कासाविस झाल्याशिवाय राहत नसे. कधी लोकं रोगराईला बळी पडतील काही सांगता येत नव्हतं..
पावसाळ्यात जिकडे तिकडे गवत-काडी उगवलेले. रात्र झाली की गांव अंधारात गुडूप होवून जात असे. जिकडे तिकडे किर्र अंधार पसरुन जायचा. एखादी विज कडकडत, प्रकाशझोत टाकत, आकाशाला चिरत जमिनीला भिडत असे. दुसरी विज चमकेपर्यंत किर्र अंधार होवून जात असे.
गांवातून बाहेर किंवा बाहेरुन गांवात यायचं म्हणजे पांदनीने यावे लागत असे. याच पांदनीने लेंडीचे पाणी वाहत जात असे. रिमझीम पावसात याच पांदनीत किंवा आजुबाजूला कोणी परसाकडे केली की त्या लेंडीच्या पाण्यात ती घाण इतस्तत: पसरुन जात असे. त्यावर पाय पडला की फसकन ते घाण मिश्रीत पाणी अंगावर उडायचं. असं तो किळसवाणा प्रकार हा नेहमीचाच असायचा.
पाऊस असो की नसो माणसं एकवेळ परसाकडे हातात चिंपट, टमरेल घेऊन शेताच्या धुर्‍यावर जातील किंवा गांवाजवळून वाहणार्‍या लवणावर जातील, पण गांवातील बाया-पोरींना मात्र त्या पांदनीच्या आजुबाजूलाच परसाकडे बसावं लागत असे. कोणी माणूस-पोरगा रस्त्याने येतांना दिसला की लाजेने मान खाली घालून तो व्यक्ती दृष्टीआड होईपर्यंत उभे राहावे लागत असे. इतकी नामूष्की त्या बायांच्या वाट्याला येत असायचं. असा हा प्रकार पाहून फार ओशाळल्या सारखं व्हायचं.
चिलटं डोळ्यापुढे येऊन गुणगुणायला सुरुवात करीत. कधी कधी ते डोळ्यात घुसायलाही मागेपूढे पाहत नसत. तसेच डासही कानाजवळ येऊन गुंग ऽ गुंग ऽऽ असा आवाज करीत असत तर दुसरीकडे कडाकड चावा घेत असत.
ठिकठीकाणी साचलेले पाण्याचे डोबरे, सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही, जागोजागी पडलेले गुराढोरांच शेण, खताचा उकंडा, मनुष्य-प्राण्याच्या शौचाची घाण, कचरा, गवत यामुळे चिल्ट-डासाची झपाट्याने पैदास होत होती.
आमच्या खेड्यात नाल्या बांधलेल्या नसल्यामुळे नहाणीचे पाणी वाहून जायला जागा राहत नव्हती, तर ते पाणी बाहेर खड्डा करुन मोरी काढत असत. तेथेच ते पाणी मुरत असे. खड्डा पुर्ण भरला की उरलेले पाणी रस्त्यावरुन वाहत जात असे. मोरीत साचलेल्या पाण्यात अळ्या तुरुतूरु चालतांना दिसायच्या. ते पाहून किळस येत असे.
ग्रामपंचायतीकडे नाल्या किवा रस्ते बांधण्यासाठी किंवा कोणत्याही सुधारणा करण्यासाठी पैसे राहत नसत. कारण तेवढं घरकरापासून उत्पन्न मिळत नसे. एखाद्या योजनेचा प्रस्ताव सरकारकडे पाठवायचा तर पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त लोकवर्गणी जमा करावी लागत असे. लोकांच्या गरिबीमुळे ऎवढे पैसे उभारणे शक्य होत नसे.
घरामध्ये लहान मुले घरात फिरुन आईने चुरुन दिलेला घास खात असत. त्याचे कण जागोजागी विखरुन पडलेलं असत. लहान मुलं घरात ‘शी’ करतात. त्यावर राखड टाकून खपरेलाने खरडून खरडून काढल्यावर ती जागा सारवेपर्यंत माश्यांचा घोगाट तेथे सुरु राहायचा. गंभिर आजाराने किंवा अंगात तापाने फनफनलेला किंवा बाळंत बाईला तर बाहेर परसाकडे जाणे अशक्य होत असे. अशा वेळेस घरातल्या, आंगणातल्या किंवा कोठ्य़ातल्या एका कोपर्‍यात व्यवस्था करीत असत. पाळलेले कुत्रे, मांजरी, कोबड्या व त्यांची पिल्ले यांची अस्वच्छता. अशा अनेक कारणामुळे डास, माश्या व जंतूचा प्रसार व्ह्यायला काही वेळ लागत नाही.
आमच्या खेड्यात पिण्याचे पाणी तर अत्यंत दुषीत राहत होते. आमच्या मोहल्यात एक सार्वजनिक विहिर ज्ञानेश्वरच्या घराजवळ व दुसरी खाजगी विहिर चिरकुट्याच्या घराच्या आवारात होती. लभानपूर्‍यात दुसरी एक विहिर होती. पावसाळ्यात ह्या विहिरी पुर्ण भरुन जायच्या. हातानेही पाणी काढता येईल असं… हे पाणी गढूळ राहत असे.
दादा गांवचा सरपंच असल्यामुळे पंचायत समितीकडून पोटॅशियम परमंगनेटचे मिळालेले पुडे माझ्याच घरी असायचे. त्यावेळी ते जंतु मारण्यासाठी विहिरीच्या पाण्यात टाकत असे. पाणी लाल लाल होवून जायचे व पिण्यास कडवट लागे. त्यामुळे काही लोकं कुरकूर करीत असत. कधी कधी काही बाया विहिरीच्या बाजुलाच कपडे धूत असत. पाणी भरतांना भोवतालचं सांडलेले पाणी पुन्हा झिरपत विहिरीत जात असे.
उन्हाळ्यात तर पाण्याचा आणखीच त्रास होता. जवळपासच्या विहिरी कोरड्याठक पडायच्या. उन्हातान्हात पायपीट करुन दुरुन डोक्यावर गुंडाने, चरविने पाणी आणावे लागत असे. पाण्याच्या ओझ्याने मान मोडून गेल्यासारखी वाटायची तर पायामध्ये गोळे आल्यासारखे वाटायचे. विहिरीत उतरुन डोबर्‍यात जमलेलं घोट घोट पाणी बालटीत टाकावे लागे. घरातले चाटले-बुटले भरुन ठेवावे लागत असे. रात्रीला विहिरीत झर्‍याचं पाणी जमत असे. तेव्हा रात्रीला पाणी भरण्यासाठी लोकांना जागावे लागत असे.
त्यावर्षी दादाने वाल्ह्याचे शेतातील आंबे विकत घेतले होते. त्याच्या शेतात दोन विहिरी होत्या. एक त्याची स्वत:ची होती. या विहिरीवर बौध्द मोहल्ल्यातील लोकांना पाणी भरायला मनाई होती. त्यामुळे फक्त बंजारी लोकं या विहिरीवर पाणी भरायचे. दुसरी विहिर पेवंडी आंब्याजवळ ग्रामपंचायतने खोदली होती. या विहिरीवर बौध्द मोहल्ल्यातील लोक पाणी भरत होते.
त्याच्या विहिरीजवळ आंब्याचे चार-पांच झाडं होते. बंजारी लोकं या विहिरीवर रात्रीला पण पाणी भरायला येत होते. नाल्याच्या पलिकडे सुखदेवच्या वावरात आणखी एक विहिर होती. लोकं त्या विहिरीवर पाणी भरायला वाल्ह्याच्या विहिरीजवळून जायचे.
रात्रीला लोकं आंबे तोडतील म्हणून मला धास्ती वाटत होती. म्हणून मी धनपालच्या सोबत एक शक्कल लढवली होती. कोणी पाणी भरायला येत असतांना दिसले की आम्ही त्या सुमसाम अर्ध्या रात्रीच्या अंधारात झाडावर चढून हुऽ हुऽऽ असा आवाज काढत फांद्या खलंखलं हालवित होतो. त्यावेळी पाणी भरणारे लोकं भुताटकीच्या भितीने काही वेळ घाबरुन गेल्यासारखे वाटत होते. परंतु आम्ही रात्रभर थोडेच झाडावर थांबून हा प्रयोग करु शकत होतो? त्यामुळे लोकांच रात्रीला पाणी भरणे काही थांबलेल नव्हतं. त्यांची पण मजबूरी होती. कारण दिवसा शेतीवाडीचे काम करणारे लोकं दिवसा पाणी भरायला वेळ देवू शकत नव्हते. म्हणून ते बिचारे... रात्रीला मजबुरीने पाणी भरत होते.
बरबड्याच्या एका उघड्या देवविहिरीला भरपूर पाणी असायचे. ही विहिर नाल्याजवळ असल्यामुळे त्याला भरपूर झर्‍याचा ओलावा होता. ही विहिर म्हणजे एखाद्या मोठ्या डोबर्‍यासारखीच होती. पाणी भरता भरता बरेच पाणी त्याच्या काठावर सांडत असे. ते पायाने घाण झालेले पाणी परत त्यात जावून पडत असे. असे माती आणि घान मिश्रीत पाणी गांवच्या लोकांना नाईलाजाने प्यावे लागत असे. काही शेतकरी बैलगाडीने ड्राम भरून पाणी आणत असत.
पोवार पाटलाच्या कोठ्याजवळ केशवच्या वावरात धुर्‍याजवळ एक विहिरा होता. तेथे भरपुर पाणी असायचं. हा विहिरा चार-पांच वावरं दूर होत. तेथे पण मी आई किंवा वहिनी सोबत पाणी भरायला, कधी कधी भर उन्हात पण जात होतो.
मी दादाला कधी कधी उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी नहाणीतल्या उघड्या नांदीतलं पाणी पितांना पाहिले होते. मी त्याला म्हटले होते की, ‘दादा हे नांदीतलं पाणी पित नको जाऊ… त्याने रोग होतात.’ तर तो मला म्हणायचा की, ‘मला काही होत नाही. काही काळजी करु नको…’ आरोग्याबाबत इतकी बेफिकीरी परिस्थितीच्या रेट्यामुळे त्यांच्यात येत असावी, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.
अशा या अस्वच्छतेमुळे व पाण्यावाटे कॉलरा, मधूरा म्हणजे टायफाईड, मलेरीया हगवन इत्यादी अनेक आजाराचा सतत प्रादुर्भव होत असे. त्यामुळे खेड्यातील लोकं मोठ्या प्रमाणात रोगराईला बळी पडत असत.
खाजगी दवाखाण्यात जायची सोय नाही. ऎवढा पैसा खर्च करण्याची त्यांची कुवत नाही. फारच पाणी गळ्यापर्यंत आले तरच नाईलाज म्हणून खाजगी दवाखाण्यात जातील. पण डॉक्टरचं व औषधी-पाण्याचं बिल पाहून त्याच्या पोटात भितीचा गोळा उभा राहतो. हप्‍त्याभराची मजूरी त्यांना द्यावे लागते. मग आता खावे काय अशी चिंता पडून जाते.
सरकारी दवाखाण्यात जावे तर तिन कोस जाणे व तिन कोस येणे. गेलंही तरी तेथे चांगल्या प्रकारे व्यवस्था होईल याचा काही भरोसा देता येत नाही. तेथील कर्मचारी रोग्यांना हिडीस-फिडीस करतात असा आलेला पुर्वीचा अनुभव! कोणतीही बिमारी असो सर्वांनाच सोबत आणलेल्या शिशीमध्ये पिण्यासाठी भरुन दिलेले लाल पाणी व पांढर्‍या गोळ्या, तेही तिन दिवसांसाठी! बिमारी नाही बसली तर पुन्हा मजूरी पाडून सरकारी दवाखाण्यात जाणे, नाही परवडत त्यांना! खेडूत लोकांना जास्त दिवस मजूरी किंवा शेतीचे कामे पडू नये म्हणून झटपट इलाज पाहिजे असते. म्हणून ते डॉक्टरांना म्हणतात, ‘साहेब सुई टोचा. ऊद्या सकाळी मला कामावर जाता आले पाहिजे.’ पण डॉक्टरांच्या अभ्यासात सर्वानांच सुई टोचणे बसत नसेल तर त्यांनी तरी काय करावं ?
अशा सर्व अडचणीपासून दूर राहण्यासाठी गांवातील लोकं झाडपाला किंवा गावठी ईलाज यालाच जास्त पसंद करीत असत. अंधश्रध्दाळू लोक साधुबुवाच्या फुक-फाकीला व मंत्र-तंत्रालाही बळी पडत.
मुलांच्या पण शिक्षणाची अशीच आबाळ होत होती. एकच मास्तर, पहिली पासून ते चवथी पर्यंत शिकवित होता. एकाच खोलीत चारही वर्ग भरत होते. तो यवतमाळवरुन जाणे-येणे करायचा. आमच्याच आवारातील कोठ्यात शाळा होती. नंतर माझ्या घराच्या बाहेर रस्त्याजवळ केशव पाटलाच्या वाड्याला लागून माती कुडाची व वर टिना असलेली एक लांब खोली असलेली शाळा बांधली होती. मग त्यात ती शाळा भरत होती.
असं या आमच्या गांवाचं अवकाळी रुप पाहून मन विषष्ण होत असे. तरीहे हे गांव कसंही असो, त्याचेशी मात्र अतुट असं नातं निर्मान झालं होतं. गांवातील जवळीकीच्या नात्यातून मला भावनीक उब मिळत असे. लहानपणापासून अनेक आठवणी या गांवात साठवलेल्या होत्या. या गांवात नात्यागोत्याचे, दाट ओळखीचे, जिवाभावाचे माणसं राहत होते. म्हणूनच या गांवावर खूप प्रेम बसलं होतं.
एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की खेड्यात झाडून सारेच लोकं मागासलेल्या जातीचे राहतात, हेच खेड्यातील लोकांच खरं दुखणं आहे. हेच लोकं शहरातील लोकांना आयतं अन्न पुरवितात पण स्वत: मात्र मुंग्या-माकोड्यासारखे जीवन जगून मरमर काबाडकष्ट करुन मरतात बिच्चारे… परिस्थितीने गांजल्यामुळे लोकांची हक्काची जाणीव बोथट झाली होती.
दुसरं असं की एकही उच्चवर्णीय व्यक्ती शेतमजूरीच्या कामावर जातांना दिसत नाही. म्हणूनच खेड्यांचा विकास व दारिद्रय निर्मुलनाला कोणतेही सरकार कां प्राध्यान्य देत नाही याचा उलगडा होतो. खेड्यापाड्यात जर उच्चवर्णीय समाज राहीला असता व तो जर असा दारिद्रय आणि दु:खात खितपत पडलेला दिसला असता न् तर खेड्यातल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने निश्चितच प्रयत्‍न केल्याचे चित्र दिसले असते. कारण ती त्यांची गरज असती ना ?

गुलमोहर: 

हेच लोकं शहरातील लोकांना आयतं अन्न पुरवितात पण स्वत: मात्र मुंग्या-माकोड्यासारखे जीवन जगून मरमर काबाडकष्ट करुन मरतात बिच्चारे

अनुमोदन.

जिथे हिरवीगार शेती आहे तिथल्या लोकांना आपला गाव आवडतो. सहकार क्षेत्राच्या पट्ट्यातली गावं शहरांपेक्षाही सुरेख होत चालली आहेत. पण हा अपवाद नियम सिद्ध करण्यासाठीच आहे. बाकिचं वर्णन तंतोतंत खरं आहे.

पण हा अपवाद नियम सिद्ध करण्यासाठीच आहे. बाकिचं वर्णन तंतोतंत खरं आहे. >> अनुमोदन, हे दुर्देवाने खरं आहे.. Sad

गावाचे वर्णन फारच छान आले आहे.
आपले ब्लॉग वाचले उत्तम आणि तंतोतंत वर्णन आहे.
"परिस्थितीने गांजल्यामुळे लोकांची हक्काची जाणीव बोथट झाली होती."
आणि परिस्थितीशी लढा देण्याची आर्थिक ताकदही कमी पडते आहे.

"खेड्यापाड्यात जर उच्चवर्णीय समाज राहीला असता व तो जर असा दारिद्रय आणि दु:खात खितपत पडलेला दिसला असता न् तर खेड्यातल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने निश्चितच प्रयत्‍न केल्याचे चित्र दिसले असत""
हे एक मात्र मान्य नाही. कोकणात किती ठिकाणी अजुन रात्री वीज नाही. सांडपाणी व्यवस्था नाही.
सरकार फक्त पैसेवाल्या उद्योगपतींचे ऐकते. लवकरच कोकणात जी अधिक धरणे बांधणार आहेत तिथे कितिकांच्या जमिनी जाणार आहेत.

गांधिजीने सुशिक्षितांना सांगितले खेड्याकडे चला पण कोण ऐकतो मग तो सवर्ण असुदे वा शहरात शिकलेला बहुजन समाज.