चाकरमानी ...

Submitted by झुलेलाल on 4 September, 2011 - 08:55

पावसान् भातां आडवी पडल्याचं ‘आये’नं मोबाईलवरून सांगतल्यापास्नं बाबल्याच्या जिवाची घालमेल सुरू होती. गादीखालची पिशवी काढून त्यानं ‘चुरंगटलेल्या’ नोटाची चवड मोजायला सुरवाती केली. शंभराच्या धा-बारा, पंन्नासाच्या साताठ, धा-इसाच्या धा-पंद्रा नोटा बघून त्याचा जीव भांडय़ात पडला. मालकाकडं ‘खाडय़ा’ची बात करून रातीलाच ‘कोकनकन्या’ पकडून गावाकडं पलायचं व्हतं. पायतानं घालून तो भायेर पडला. बाबल्यानं कायच खरेदी केली न्हवती. म्हैनाअखेरीस गनपती आल्यानं, पगाराचं पन वांदं व्हतं. ‘मोबाईल’चा ‘ब्यालन्स’ बी खतम झालीला. कार्ड ‘रिच्चॅज’ करायला दोनेकशे रुपय तरी लागनार व्हते. चाकरमान्यान् मुंबईवरनं काय आनलान, तं वाडीतले इचारनारच. म्हनूं तरी खरेदी करायलाच लागंल. बाबल्यानं हिसाब क्येला, आनि सगल्याच नोटा ‘जीन’च्या खिशात घ्येवन बाबल्या ‘टेशन’वर ठेपला. ‘तिकटी’साठी लईच लाईन लागल्याली. तिकटीला ‘कल्टी’ मारून त्यानं पलतपलत गाडी पकडलान, आनि त्यो सोताशीच चुकचुकला. ‘फसकलास’मधी चढल्याचं लक्षात आलं, आनि बाबल्या टराकला. ‘टीसी’नं पकडलान, तं खिशातलं सगलं पैसं त्येच्या खिशात, नायतर आपन ‘आतमदी’, या विचारानं बाबल्या कावराबावरा झाला. दादर आल्यावर गाडी थांबायच्या आधीच उडी मारून तो धावत भायेर आला. फुलबाजारात मरनाची गर्दी व्हती. गावाकडं ह्य़ेच्यापक्षी भारी, ताजी, रंगीत फुला ढिग्गान् मिलतील.. बाबल्या ‘रानडे रोड’वर आला. घराकडं पडवीतली चटई अगदीच ‘भोसकाटली’ व्हती. आयेनं मांगंच सांगतलं व्हतं, ‘चट्टय’ आन म्हनू.. रस्त्यावरच एका ठिकानी खिशातली एक नोट कमी करून बाबल्यान् ‘नायलान’ची चटई घेतली, आनि डेकोरेशनचं सामान बगत बाबल्या हिंडू लागला. थरमाकोलचं ‘मक्कर’, ‘इलेकट्रिक’च्या लायटिगच्या ‘माला’, चकमकीत झिरमिल्या, सेलवरला ‘फंका’, चकचकीत चादर.. बाबल्यान् खरेदी संपवलान, तवा रात झाली व्हती, आनि खिसा बी खाली झाला व्हता.. आता सामान घेव्नच मालकाकडं जायाचं, म्हजी आपन गनपतीसाटी गावाकडं चाललोय, ह्य़ं सांगायची येल पडनारच न्हाय, हे बाबल्याला ठावं होतं. भायेर पडताना मालकाला सांगून त्यानं धा दिवसांचा खाडा मागून घेतला. मालकानं पन, ‘व्हय’ म्हनूं सांगितल्यानं खुशीतच सामान घेवंन् तो डायरेक ‘छशिट’ला ग्येला. रातीची ‘कोकनकन्या’ पकडायची व्हती. ‘रिजवेशन’ न्हवतंच. कोकनी चाकरमान्याला कश्या पायजे ‘रिजवेशन’.. कोकन रेल्वे म्हजी आपलीच गाडी.. तो फलाटावर आला आनि ‘लाऊस्पीकर’चा आवाज कानात घुमला. ‘कोकनकन्या उद्या सकाली सुटंल’.. मंग बाबल्या सरल ‘बॉम्बे सेंट्रल’ला आला. खच्चून भरलेल्या एका‘यस्टी’च्या दरवाजातून बाबल्या आत घुसला, आनि ‘पावठनी’वरच त्यानं बसकन मारली.
... आत्ता सांजच्याला, बाबल्या गावाला पोचला, तवा लई भूक लागली व्हती. आयशीनं बाबल्यासाठी चुलीवर भात टाकलान्.. कुलथाच्या पिठीचा वास घरभर पसरला, आनि बाबल्यानं नाक भरून हवा छातीत खेचली. गावाकडंच्या त्या वासानं बाबल्याचे दोन दिवसांचे हाल ‘पलून’ ग्येले व्हते!..

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=179694:...

गुलमोहर: