हा घास चिऊचा

Submitted by vandana.kembhavi on 28 August, 2011 - 20:10

नांदिवलीच्या घरात रहायला येणे हा आमच्या आयुष्यातला अगदी परमोच्च आनंदाचा क्षण होता.
आम्ही दोघांनी मिळून घेतलेले ते पहिले घर!
घराचा जास्तीत जास्त भाग पुर्व दिशेला, त्यामुळे घरात भरपूर उजेड. त्यात आजूबाजूला चिकटून ईमारती नसल्यामुळे त्या उजेडाला काहीच अडसर नव्हता. सकाळी सूर्य उगवला की घर सोनेरी रंगाने न्हाऊन जाई. एक कोपरा तर ईतका सोनेरी दिसे की मी त्या कोप-याचे नामकरण "सोनेरी कोपरा" असेच केले होते.
स्वयंपाकघराची खिडकी उघडली की उगवत्या सुर्याचे दर्शन होई. गावाबाहेर रहायला आल्याचे चीज झाल्यासारखे वाटे. आजूबाजूला पक्षांचा वावर होता. सकाळी त्यांच्या किलबिलाटाने जाग येइ. कित्येकदा पोपटांचे थवे येत, ईतक्या जवळून त्यांना कधी पाहिल्याचेच आठवत नव्हते. पिंज-यातला नाहीतर पक्षीसंग्रहातच त्यांना पाहिले होते.
स्वयंपाकघराच्या खिडकीमधे भरपूर चिमण्या येऊन बसायच्या. एक दिवस सहजच रात्रीची राहिलेली पोळी कुस्करून खिडकीत ठेवली आणि त्या चिमण्यांनी त्याचा चट्टामट्टा केला. मला खूप गंमत वाटली. मी ही मग नेमाने त्यांना पोळी ठेवू लागले आणि त्या येऊन ती खाऊ लागल्या. सकाळी उठून मी खिडकी उघडायचा अवकाश की त्या सगळ्या साळकाया माळकाया हजर व्हायच्या. त्यांना माझी अन मला त्यांची सवयच झाली म्हणाना. मी ओट्याशी असले की त्या बिनधास्त खिडकीत खुडबुडत बसायच्या, पोळी खाऊन संपली तरी तिथेच चिवचिवत बसायच्या. जणूकाही माझ्याशी गुजगोष्टीच करायच्या. मी ही त्यांच्याशी गप्पा मारू लागले. आमच्या घरात हा चेष्टेचा विषय झाला पण ना मला पर्वा होती ना त्या चिमण्यांना.....
पोळी करणा-या कुंदामावशी ओट्यापाशी असेपर्यंत त्या खिडकीपाशी येत नसत, पण त्या गेल्या अन मी आले की या हजर..एक दिवस रात्रीची पोळी राहिली नव्हती म्हणून ब्रेड कुस्करून ठेवला पण त्यांनी त्याला तोंड लावले नाही, मला अतिशय वाईट वाटले. मी मग तांदूळ ठेवले तर तेही त्यांनी खाल्ले नाहीत, शेवटी मी ताजी पोळी कुस्करली आणि ठेवली तेव्हा कुठे त्यांनी मनसोक्त खाल्ली आणि मी सुस्कारा सोडला. त्या उपाशी रहाणार ही कल्पनाच मला सहन झाली नाही, मग मात्र पोळ्या करतानाच "चिमण्यांसाठी पोळ्या" हे न सांगताही कुंदामावशींना माहित झाले.
मधे मी आजारी झाले, दोन महिने अंथरूणावर सक्तीची विश्रांती. कुंदामावशींना आठवणीने चिमण्यांची पोळी ठेवायला लावली पण त्यांना काय कळले माहित नाही, त्या पोळी न खाताच उडून गेल्या. दुस-या दिवशीही ती पोळी तशीच होती. मग मात्र मी उठून त्यांना पोळी घालू लागले आणि थोडावेळ ओट्याशी उभी राहू लागले, त्यांचे खाऊन झाले की मग विश्रांती...
एकदा सकाळी पोळी खाल्ली की मग त्या परत दुस-या दिवशीच परतत, किती वर्ष हे चाललं होत माहित नाही, त्या घरात आम्ही आठ वर्ष राहिलो, अगदी निघायच्या दिवशीही त्यांना पोळी घालून निघाले. मी आता उद्यापासून ईथे येणार नाही हे मी त्यांना सांगितले, त्यांना कळले असेल का? बहुदा कळले असेल....
गेली तीन वर्षे मी ईथे सिडनी मधे आहे, माझ्या चिमण्यांची आठवण आली नाही असा एकही दिवस जात नाही. ईथे चिमण्या जास्त दिसत नाहीत पण जेव्हा केव्हा दिसतात तेव्हा माझी पावलं त्यांच्यापाशी थबकतात, मनातल्या मनात मी त्यांच्याशी संवाद साधते अन मला माझ्या चिमण्यांशी बोलल्याचे समाधान मिळते.........

गुलमोहर: 

किती मधुर गोफ विणलात या जगावेगळ्या नात्याचा.......
वाचतानाही सुखावून गेला आतमधे.....
तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभवलात....

< कुंदामावशींना आठवणीने चिमण्यांची पोळी ठेवायला लावली पण त्यांना काय कळले माहित नाही, त्या पोळी न खाताच उडून गेल्या. ! > अनुमोदन. आमची शेरी (कुत्री) असच करायची. आम्हाला लताबाइन्च्या पोळ्या. अन हिच्या साठी आईनी केलेल्या.

चिमण्या म्हणाल्या असतीलः

"ए पोळ्यांनो, परत फिरा रे"

ही आपली अशक्त कोटी बरं का? दिवा घ्या!

या लेखाला झब्बू द्यायचा विचार चालला आहे.

'दिशाभूल करणारी शीर्षके' यात आपल्या लेखाचे शीर्षक अजून गेलेले दिसत नाही, आपले अभिनंदन! Happy

'हा वास चिऊचा' असे एखादी मांजर आपल्या पिल्लाला म्हणू शकत असेल अशी झब्बूची प्रेरणा आहे.
========================

लेखातील प्रामाणिक भावना फार आवडल्या. सुंदर आठवण व खरे तर काहीशी गलबलवून टाकणारीच! Happy

-'बेफिकीर'!