रसग्रहण स्पर्धा - 'मनश्री' - सुमेध वडावाला (रिसबूड)

Submitted by ऋयाम on 28 August, 2011 - 15:16

एखाद्या घरामधे बाळाचा जन्म म्हणजे केवढी चैतन्यदायी घटना असते!! मुलांमुळे घर फुलतं. घरातल्यांना, शेजार्‍यापाजार्‍यांनादेखिल त्यांचा लळा लागतो. त्यांच्यातला निरागसपणा अनुभवून आपणही लहान होऊन जातो. काहीबाही कारणांनी दुरावलेली नाती, दुखर्‍या आठवणी, सारंकाही विसरून नात्यातला आनंद नव्याने अनुभवावासा वाटून जातो! पण हीच 'फुलं' कधी आजारी पडली, की मग मात्र सगळ्यांचा नूर पालटतो. आजारपणामुळं अशक्त, मलूल झालेल्या त्या जीवांना असं एका जागी स्थिर बसून राहिलेलं पाहवत नाही. 'कधी एकदा त्यांना बरं वाटेल आणि परत पूर्वीगत धावू लागतील, खेळू लागतील ' हेच सर्वांच्या मनात असतं..

'मनश्री' बाळाचा जन्म झाला तोच आजारपण घेऊन. आईच्या पोटात असताना आठव्या महिन्यात, घाईघाईत
'सिझेरिअन' करून ह्या बाळाला आपल्या जगात आणावं लागलं. गळ्याभोवती नाळ अडकल्याने जिवाला मोठाच धोका निर्माण झाला होता. जीव जन्माला आला खरा, पण कुठल्याही सर्वसाधारण बाळाबरोबर निसर्गतःच येणारा आनंद आणि चैतन्य घेऊन जन्माला येण्याचं भाग्य , ह्या बाळाच्या नशिबी नव्हतंच कदाचित. मनश्रीच्या जन्मापासुनच तिचा प्रवास 'असाधारण' असा सुरु झाला होता. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर ती जगाला 'पहाणार' होती, बरेवाईट अनुभव घेणार होती. भविष्य बघणार्‍या एका परिचितांनी तिचा जन्म झाल्या झाल्या सांगितलं होतं, "सुरुवातीला फार जपावे लागेल, पण तुमची मुलगी मोठी झाली, की फार नाव कमावेल! तेव्हा आता काळजी करू नका, फक्त तिची काळजी घ्या!!!" ; आपल्या बाळाकडे बघणार्‍या सोमण कुटुंबाला त्यावर विश्वास बसणं नक्कीच सोपं नव्हतं !!!

'सुमेध वडावाला(रिसबुड)' यांनी लिहीलेल्या 'मनश्री' या पुस्तकात आपल्याला 'मनश्री उदय सोमण' भेटते. 'बालश्री' ह्या 'पद्मश्री'च्या तोडीच्या राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्काराची मानकरी ठरलेली ही मुलगी! आपल्या पोटी 'दृष्टीमंद' मुलीच्या जन्माचा धक्का बसणे तसे स्वाभाविकच खरे, पण तरीही खंबीर होऊन सोमण कुटुंबियांनी घेतलेली तिची काळजी, तिचं संगोपन; मनश्रीच्या जन्मापासून सदैव मदतीला उभ्या ठाकलेल्या डॉ. चारू सरय्या, आणि आयष्यभराची सोबती 'नॅब' अर्थात 'नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईण्ड्स' या सर्वांचं योगदान विस्मयकारक आणि कौतुकास्पदच आहे.

'प्रिमॅच्युअर बर्थ' म्हणताच मनश्रीच्या आईवडिलांच्या मनात विविध शंका दाटून आल्या होत्या. मनश्रीची मोठी बहिण 'यशश्री'; तिच्या जन्मावेळची गोष्ट दोघांना आठवली. यशश्रीच्या बरोबरीने एक जुळं बाळ जन्माला आलं होतं, जे जन्मतःच मृत होतं. नशीबाचीच बाब होती, की 'यशश्री' वैद्यकियदृष्ट्या उत्तम होती, कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. जुळ्या बाळाबद्दलची वेगळी गोष्ट म्हणजे ते 'मंगोल' होतं. त्याच्या बुद्धीबद्दलही गुंतागुंत असू शकली असती. "असं जगत यातना भोगण्यापेक्षा सुटला तो जीव! '' असा विचार करण्यावाचून सोमण कुटुंबियांना काहीच पर्याय नव्हता.

आठव्याच महिन्यात जन्माला आलेल्या मनश्रीच्या प्रकृतीमधे मात्र दुर्दैवाने बरीच गुंतागुंत होती. वजन तर कमी होतंच, पण वरचा ओठ दुभंगलेला दिसत होता. डोळेदेखिल सर्वसामान्यतः असावेत तितके 'भरीव' वाटत नव्हते.
तातडीनं तपासणी करणं गरजेचं होतं. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि प्राथमिक अंदाज निघाला, "बाळाचे दोनही डोळे 'दृष्टीदोषाचे बळी' आहेत... " आपलं बाळ आपल्याला बघू द्यायला टाळाटाळ करणार्‍या हॉस्पिटल कर्मचार्‍यांचा आणि खुद्द 'उदय'चा 'अनिता ' ला प्रचंड राग आला होता. "उदय, आपलं मुल मतिमंद आहे ना रे?" व्यवसायाने 'मानसोपचारतज्ञ' असलेल्या 'अनिता', भूतकाळात गुदरलेल्या प्रसंगांना आठवून मनाची तयारी करत होत्या. बाळाला जन्म देणारी जरी आई असली, तरी असा प्रसंग गुदरल्यावर बापाला होणार्‍या वेदनाही 'शब्दातीत'च म्हणाव्या लागतील.

पण सुरुवातीच्या झटक्यानंतर आईवडिल लगेचच मोठे झाले.
"माझ्या मुलीला 'दृष्टीचे' वरदान लाभले नसेल, 'पण इतर कुठल्याही बाबतीत ती कुठेही कमी नाहीये' आणि म्हणूनच मी तिला सर्वसामान्य मुले जातात तशाच शाळेत घालणार, शिकवून मोठ्ठं बनवणार ! " ही अनिता यांची 'प्रतिज्ञा', मनश्रीच्या आयुष्याची पहिली पायरी ठरली.

एखाद्याचा सुस्थितित असलेल्या घरात अथवा परिस्थिती तितकीशी बरी नसलेल्या घरात होणारा जन्म आणि नंतरची जडणघडण यांचा त्याच्या आयुष्यावर पडसाद उमटतो, पण समाजाला सामोरे जाताना प्रत्येकजण एकटाच असतो. अशा वेळी आपली बुद्धी आणि संस्कार यांच्यावरच सारी मदार असते. मनश्रीच्या आयुष्यात आलेले असे प्रसंग आणि तिने त्या-त्या वेळी आपल्या बुद्धीची-हजरजबाबीपणाची चुणुक आश्चर्यकारक वाटते.
साक्षात राष्ट्रपतींच्या हस्ते 'बालश्री' स्विकारल्यावर त्यांनी तिला प्रश्न केला, "बेटा, दिल्ली वापस कब आओगे?" यावर मनश्रीचं उत्तर होतं, "आऊंगी, 'पद्मश्री' पुरस्कार लेने के लिए!"
मनश्रीच्या आत्मविश्वासावर राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कमालिचे खुश झाल्याचा आणि स्वतःहून तिच्याबरोबर फोटो काढून घेण्याचा उल्लेख आपल्याला सारं काही सांगून जातो..

'बालश्री विजेती' होईपर्यंतचा प्रवास मनश्रीसाठी सोपा कधीच नव्हता. जगण्यासाठीचा संघर्ष, हा 'प्रिमॅच्युअर बर्थ' च्या रुपाने जन्माच्या आधीपासूनच सुरु झाला होता. आईच्या पोटात दोन महिन्यांची असताना तिच्या डोळ्यांना संसर्ग होऊन त्यांची वाढ खुंटलेली. प्रिमॅच्युअर असल्याने शरिरही नाजुक. मुलं थोडंथोडं बोलू लागतात, रांगू लागतात. यातली बोलण्याची क्रिया चालू झाली, पण दृष्टीदोषामुळे 'रांगणे' होणारच नव्हते. "हवी असलेली गोष्ट समोर दिसते, पण तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद पायात नसल्याने होणारी क्रिया म्हणजे 'रांगणे'!" पण ज्याला ती वस्तुच दिसणार नाही, ते बाळ रांगेल कसे? पण मग हळूहळू पायात आलेली ताकद, आणि हाक मारल्यावर तिचा मिळणारा प्रतिसाद पाहून आईवडिल आणि डॉक्टरांना तिच्या बुद्धिची जाणीव झाली. आणि आईकडून तिचं शिक्षण सुरु झालं. 'छोट्या छोट्या गोष्टी तर मुलं बघून-बघूनच शिकतात'! पण ही साधी गोष्ट शक्य नसल्याचे ध्यानात आले म्हणजे हे शिक्षण किती कठिण असावे याचा अंदाज बांधता येईल. सगळ्या गोष्टी पहाण्यासाठी डोळ्यांऐवजी 'हात' आणि 'कान' यांचा वापर सुरु झाला.

ह्या शिक्षणासाठी डॉ. चारू सरय्या यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. "तिला ठरवून जगाची ओळख करून द्या. तु जे जे जेवतेस ते किचनमधे शिवजावे लागते म्हणजे काय, ते तिला समजावून देता देता तुम्ही तिला स्वयंपाकघरातल्या मोठ्या भांड्यांची ओळख-आकार समजावून द्या." सोमण कुटुंबियांनी हे अमलात आणलं.
पुढे भातुकलीमधील भांडी तिचा खेळ बनली. विविध भाज्या-फळे आकार तसेच वासावरून समजु येऊ लागली. दरम्यान, एकदा सांगितलेली गोष्ट हिच्या चांगली लक्षात राहते असं अनिता यांना लक्षात आलं होतं, ज्यामुळे त्यांना मनश्रीच्या आयुष्याबाबत एक आशेचा किरण दिसू लागला होता..

शाळेत घालण्याची वेळ आली, तेव्हा 'नॅब' पाठिशी असल्याने त्यांना मोठीच मदत मिळाली. पण तरीही मनश्रीला इंग्रजी शाळेत शिक्षण देण्याची त्यांची मनिषा मात्र अपूरी राहिली. प्रवेश न देण्याची कारणंही दृष्टीहीनांबद्दलच्या माहितीचा अभाव अर्थात ignorance! अशा वेळी मदतीचा हात पुढे आला, तो 'सुविद्या प्रसारक मंडळाच्या - सुविद्यालय ' ह्या मराठी माध्यमाच्या शाळेकडून. "आपल्या शाळेला एक बुद्धिमान विद्यार्थिनी मिळाली आहे, जी पुढे जाऊन आपल्या शाळेचे नाव देशभरात मोठे करेल" असे समजायची सोय असती, तर कुठल्या शाळेने तिला प्रवेश नाकारला असता? पण इथेच 'सुविद्यालय' चे मोठेपण दिसून येते. शिक्षणसंस्थेचा मूळ पाया न विसरणार्‍या अशा शाळांचे कौतुक करावे तितके कमीच म्हणावे लागेल. सुविद्यालय मधिल शिक्षिकांच्या, सहाध्यायी अर्थात विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मनश्रीचा अभ्यास सुरु झाला.

इथपासून पुढची सारी वर्षं मनश्रीने केलेला प्रवास लहानांनाच नव्हे, तर मोठ्यांनाही बरंच काही शिकवुन जातो. शाळेत गेल्यानंतर 'आपण इतरांपेक्षा थोडेसे वेगळे आहोत' याची जाणीव आणि त्याची विचारपूर्वक स्विकृती दिसेल तर त्याच्याच जोडीने काही मोठ्या माणसांच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील वागणूकीमुळे मनातल्या मनात झालेला संघर्षदेखिल पहायला मिळेल. आयुष्यभराची सोबती अर्थात 'पांढरी काठी' ह्या अपरिहार्यतेचा स्विकार करताना होणारी तगमग आणि त्यावर फुंकर घालणारे समदु:खी जनांचे अनुभव 'पाहिल्यावर' मनश्रीमधे येत गेलेली प्रगल्भताही दिसेल. 'पांढरी काठी' म्हणजे वैगुण्य नव्हे, तर आयुष्याची सोबतीण हा विचारच इथे महत्त्वाचा वाटतो. नेहेमी आई किंवा वडिलांसोबत सगळीकडे ये-जा करणार्‍या मनश्रीला 'पांढर्‍या काठी'ची ओळख झाली तेव्हा ती भांबावून गेली पण लगेच सावरलीही. स्वावलंबी होऊन जगण्यासाठीची एक महत्त्वाची सोबतीण ह्या काठीच्या रुपाने मिळाली होती.

मनश्रीच्या बाबतीत शाळेतल्या परीक्षांच्या वेळी अपरिहार्यपणे गरजेचे पडत, ते म्हणजे 'लेखनिक'! त्यात 'लेखनिक हा मनश्रीच्या इयत्तेच्या खालचा असावा, जेणेकरुन तो मनश्रीच्या चुकीच्या उत्तरांना दुरुस्त करू शकणार नाही" , अशी अट. इतक्या वर्षात चांगले लेखनिक तर मिळालेच, परंतु कुत्सित मनोवृत्तीच्या लोकांनीही आपली जागा दाखवून दिली. 'बेनिफिट ऑफ डाऊट' ही गोष्ट 'निगेटीव्ह' अर्थाने वापरली जाण्याची वेळ, कोणताही अपराध नसतानाही तिला स्विकारावी लागली. दृष्टीहीन असल्यामुळे सुरुवातीपासूनच निराशावादी दृष्टीकोन ठेवून वागणारे पुष्कळ भेटले, परंतु मनश्रीमधल्या संवेदनशील व्यक्तीने वेळोवेळी त्यांना जिंकून घेतल्याचे दाखले पुस्तकात वाचायला मिळतात.

'बालश्री'च्या निमित्ताने झालेल्या नव्या ओळखी, नवी नाती आणि त्या नव्या नातेवाईकांचा आधार मनश्री आणि अनिता यांच्या लेखी मोठाच आहे. ह्या नातेवाईकांमधे 'गाण्यासाठी बालश्री' मिळवलेल्या 'प्रसाद घाडी'ची कथादेखिल तितकीच विस्मयकारक आणि प्रेरणादायक आहे. बालश्री बद्दल एकूणच सर्व माहिती देणार्‍या तसेच वेळोवेळी प्रोत्साहन देणार्‍या घाडी कुटूंबियांमुळे मनश्रीला झालेली मदत हे नि:स्वार्थी मैत्रीचे उत्तम उदाहरण वाटते.

मनश्रीच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीबद्दल वाचताना तिची आईवडिलांवरची श्रद्धा आणि प्रयत्नांवरचा विश्वास हे मनश्रीचे दोन महत्त्वाचे गुण लक्षात येतील. जोडीला तल्लख आणि चौकस बुद्धी, उत्तम स्मरणशक्ती. संगिताची जाण. लहानपणापासून 'शालेय स्नेहसंमेलनात' नाटकात भाग घेणं आणि सांगेल त्या भूमिका करणं असे गुण तिच्यात होतेच, जे योग्य मार्गदर्शनामुळे प्रगल्भ होत गेले. शि़क्षणाच्या वेळी सर्वच शिक्षकांनी तिचे खुल्या मनाने स्वागत केले होते, असेही नाही. तिच्यातल्या विविध गुणांचा परिचय झाल्यानंतरच कित्येकांनी तिला स्विकारले होते. प्रत्यक्ष परिक्षेवेळी तसेच 'बालश्री'च्या वेळीही "तू बाहेर थांब, मी करते.." असं तिचं आईला सांगणं असे. अशा प्रसंगांनी तिच्यातला आत्मविश्वास दिसून येतो.

एखाद्या घरामधे बाळाचा जन्म म्हणजे प्रचंड चैतन्यदायी घटना असते! हा आनंद बहुतांश घरांच्या नशिबी असतोच, पण मनश्रीच्या बाबतीत, जन्मानंतर लगेचच हे चैतन्य मिळणं सोमण कुटुंबियांच्या नशिबी नव्हतं.
सोमण कुटुंबाचा आनंद आणि चैतन्य, हे मनश्रीच्या आणि तिच्या आईच्या कष्टप्रद वाटचालीवर कमावलेले असल्याने, जन्मवेळी निर्माण होणार्‍या चैतन्य/आनंदापेक्षा मनश्रीच्या प्रयत्नांची किंमत जन्मावेळच्या अर्थात नैसर्गिकपणे मिळालेल्य चैतन्यापेक्षा अधिक म्हणावी लागेल.

'सुमेध वडावाला' यांच्या लेखनशैलीबद्दल नमुद न करता 'मनश्री' पुस्तकाची ओळख पूर्ण होणार नाही. ह्या प्रेरणादायी सत्यकथेबद्दल लिहीताना कित्येक संदर्भ तपासावे लागले असतील. बर्‍यावाईट आठवणी प्रसिद्ध करताना कोणाला दुखावण्याची भावना न ठेवता, सत्य ते लिहीण्याची वृत्ती विशेष वाटते, अर्थात ह्यामधे सोमण कुटुंबियांची परिपक्वता आणि चांगली वृत्तीदेखिल दिसून येते. सर्वसामान्य वाचकाला कुठेही क्लिष्ट वाटणार नाही अशा पद्धतीने हे सर्व मांडणे नक्कीच सोपे नसावे.

"गाण्याची विशेष आवड असलेल्या मनश्रीला 'संगित शिक्षिका' व्हायचे आहे. 'मनश्रीचा' हा जग पाहण्याचा आणि ते जिंकण्याचा प्रवास आपल्या प्रत्येकाला आपापल्या आयुष्याच्या छोट्या मोठ्या लढायांमधे जिंकण्यास नक्की स्फुर्ती देईल अशी आशा वाटते. "

पुस्तक : "मनश्री"
लेखक : सुमेध वडावाला (रिसबुड)
संपादक : सुजाता देशमुख
प्रकाशक : दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन प्रा. लि.
किंमत : २००/-
आवृत्ती पहिली : जून २००८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलं आहेस ऋयाम.
वडावालांचे वेगळेच पुस्तक आहे, शिवाय, तूही ह्या लेखनासाठी वेगळी शैली वापरली आहेस. मस्त!

ह्या प्रेरणादायी सत्यकथेबद्दल लिहीताना कित्येक संदर्भ तपासावे लागले असतील. बर्‍यावाईट आठवणी प्रसिद्ध करताना कोणाला दुखावण्याची भावना न ठेवता, सत्य ते लिहीण्याची वृत्ती विशेष वाटते, अर्थात ह्यामधे सोमण कुटुंबियांची परिपक्वता आणि चांगली वृत्तीदेखिल दिसून येते. >>

मस्त! Happy

वा ऋयामा,
काय छान पुस्तक परिचय करुन दिलास..... उत्कंठा खूप वाढलीये....जरुर वाचणार हे पुस्तक.

ऋयाम, पुस्तक-परिचय आवडला.

आपल्याला निरोगी बाळ लाभणं ही किती चांगली गोष्ट असते.

सुमेध वडावाला रीसबुडांचं वेगळ्या शैलीतलं लिखाण वाचायला मिळेल या पुस्तकातून.

मस्त लिहिलं आहेस ऋयाम.
स्पर्धेच्या निमित्ताने तुझीही निराळी शैली वाचायला मिळाली, बरं वाटलं. Happy

छान लिहिलयस ऋयामा Happy
मला वाटतं, एखादं पुस्तक आपल्याला आवडलं की त्याबद्दल भरभरून लिहिलं जातच असावं आपसूक.

गजा.. खरचं.

आईचं ऑपरेशन झालं होतं तेंव्हा केईएमला बायकांच्या (न्युरो) विभागात एक ८ वर्षाची मुलगी होती. तिला ट्युमरने मेंदूत असा काही त्रास दिला होता की तिच्या हातापायांच्या हालचाली बंद झाल्या होत्या, म्हणजे हातापायात दोष नाही पण ते हलवता येणार नाहीत.. ८ वर्षाच फुलपाखरू एका ठिकाणी स्थानबद्ध, कदाचित कायमचं Sad तरीही ती बबडी हसत खेळत होती.. आणि तिची आई मुलगी वाचली म्हणून आनंदात होती. आपल्याला जे मिळालं आहे, त्याची जाणिव होते अश्या माणसांना भेटलं की!

परिचय चांगला आहे.

वडावाला आवडते लेखक आहेत. सुंदर परिचय. 'प्रसाद घाडी' बद्दल पण वाचले जालावर. खरच प्रेरणादायक आहे.