आंबोली सुंदर नाही - अस्मिता

Submitted by बेफ़िकीर on 26 August, 2011 - 06:32

आंबोली सुंदर आहे हा एक गैरसमज आहे. पन्नास वर्षाच्या 'आत्ताच कार्य संपवून आले कार्यालयातून' अशा अवतारात असणार्‍या महिलेच्या केसातील सुकलेल्या गजर्‍यासारखे आंबोली पर्यटकांना खेचते ते केवळ तिथल्या पावसामुळे! बाकी एरवी कमाल उकाडा, व्यावसायिकतेचा भरून राहिलेला अभाव आणि इथे का आलात असा प्रश्न चेहर्‍यावर ठेवून वावरणारी स्थानिक माणसे!

सुंदर आंबोली नव्हते.

सकाळी जमलो तेव्हा सहाचा ग्रूप होता आणि अ‍ॅक्च्युअली गाड्या रस्त्याला लागल्या तेव्हा दहाचा! ही चार टाळकी मधेच अ‍ॅड करण्यात शैल्याचे वादातीत कौशल्य होते. तो कोणालाही केव्हाही फोन करून काहीही विचारणारा माणूस होता, म्हणजे आहे.

"परवा सकाळी परत यायचं"

"मग पावसात तुला काय मोड येतात का?"

"चार तास लागतात पोचायला"

"मग धवललाही घेऊन चल"

असे काय वाट्टेल ते सांगून तो माणसाला घराबाहेर काढू शकतो. तो आला की मी निघणार हे माझ्या बायकोला कळायला लागून दशके लोटली. शैल्या बाहेरख्याली माणूस नाही आहे. जो घरात राहू शकत असूनही बाहेर राहतो तो बाहेरख्याली! शैल्या बाहेरच असतो. तो घरख्याली वगैरे असावा.

त्याचं कुटुंब छान आहे. पत्नी नोकरी करते, दोन मुले! ही दोन मुले निर्माण करण्यापुरता तो घरी असणार या आमच्या बॅचलर्स शंकेला त्याने 'हनीमूनचा दुसरा उपयोग काय' असे उत्तर दिले होते.

पण आंबोली काही सुंदर नाही.

चार नवीन टाळक्यांना कुठे कसे बसवायचे याचा विचार करण्यात मोजून बारा मिनिटे गेली. गाड्या दोनच होत्या. आणि दोन गाड्यात कमाल दहा माणसे बसू शकतात म्हणून शैल्याने आणखीन चारच जणांना नम्र विनंती केली होती हे त्याचे आम्हावरचे उपकार! मेधा आणि गावंडे दुसर्‍या गाडीत बसले. कुलकर्णी (अमित कुलकर्णी) माझ्या गाडीत बसला.

आणि मग जलतरंगच्या सगळ्या 'बोल्सवरून' वादकाने एकदम काडी फिरवावी तशा आवाजातले हासणे ऐकू आले.

"सॉरी हं, माझं अचानक ठरलं, हो चालेल... इथे बसते"

आंबोली सुंदर निघण्याची शक्यता मावळली.

नॉर्मली गाडीचा ड्रायव्हर 'मागून येणारी वाहने दिसावीत' अशा अ‍ॅन्गलला रिअर व्ह्यू मिरर अ‍ॅडज्स्ट करतो.

मी 'पुढे काय नशिबात येणार आहे' हे दिसावे या अ‍ॅन्गलला अ‍ॅडज्स्ट केला.

आरसे हालतात तशी माणसे अ‍ॅडजस्ट करता येत असती तर??

सहलीला निघतानाचा उत्साह परतताना असला तर सहल चांगली झाली असे म्हणतात असे एक वाक्य वाचले होते. कुणीतरी अर्ध्या तासाने पचकलेच.

"ए गाणी लावा की?"

गाणी??? एक्काही गाण्यात मेलडी नव्हती. कोणी ती सीडी आणली होती काय माहीत? 'तेरे' हाच शब्द गायक अगणीत प्रकारे म्हणत होता. मुळात सगळी गाणी मला सारखीच वाटली. प्रत्येक गाणे निर्माण करण्यामागचा उद्देश स्पष्ट होत होता. ऐकणारा विशीतला असावा आणि त्याने बेभान होऊन नाचावे केवळ!

हे होईस्तोवर दहा पाच वेळा आरश्यातून पाहून झाले होते माझे! आणि मी काठावर पास होत होतो. कारण तीन ते चार वेळा तिनेही पाहिले होते.

आपलं एक आहे! जे आहे ते आहे! लपवून कोणता सन्मान मिळणार आहे? की मनात न आणून स्वर्ग??

हमको मालूम है जन्नतकी हकीकत लेकिन, दिलको खुष रखनेको गालिब ये खयाल अच्छा है!

हं! तर आपलं एक आहे. जे आहे ते आहे. कुणाला कुणात काय आवडावं त्यावर आपण कधी टीकाही करत नाही आणि कधी त्याची स्तुतीही! आपण फक्त आपलं बोलतो. मला व्यक्तीश: स्त्रीचे केस लांब असल्यास, बोलण्याचा आणि हासण्याचा आवाज मुलायम असल्यास, डोळ्यात जादू असल्यास आणि हासण्यात दिलखुलासपणा असल्यास नॉर्मली समवयीन व नॉर्मल शरीरयष्टीची स्त्री आवडते. एक शरीरयष्टी सोडल्यास बाकी सर्व घटक आरश्यात दिसत होते. आवडत होतेच. आवडणे हा गुन्हा नाही. आवड व्यक्त करणे हा गुन्हा नाही. आवड व्यक्त केल्याचे आवडले जाणे हा गुन्हा नाही. आवडले गेल्याचे कळवले जाणे हा गुन्हा नाही. गुन्हा एकच आहे. हे सगळे गुप्तपणे करणे आणि उघडपणे न केल्याच्या शिक्षा न भोगणे!

"अगं हा कविता करतो"

जलतरंग! ती पुन्हा हासली. तेव्हा मला दिसले. कॉन्व्हेन्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांप्रमाणे शिस्तीत असलेले दात होते तिचे!

"कविता म्हणा की मग?"

बोंबला! भोपळा दिसतोय! कविता 'म्हणत' नाहीत तर 'ऐकवतात'!

"मी कविता म्हंटली तर सगळ्यांना आंबोलीला जाण्याचा पश्चात्ताप होईल व खापर माझ्या माथी फुटेल"

माझी नेहमीची साळसूद वाक्ये!

तुमच्या मनाला कधी गुदगुल्या झाल्यात का मनाला??

"आवडेल उलट... म्हणा की?"

आयला हा 'म्हणे' काही जात नाही.

"शैल्या गेला कुठल्याकुठे"

एक जण पचकला. पब्लिक मधेच 'गे' असल्यासारखे का वागते समजत नाही. आता शैल्याची गाडी, शासनाचा रस्ता, सगळ्यांची इच्छा म्हणून सहल आणि अ‍ॅक्सीलरेटर अधिक न दाबण्याची माझी आरशातली कारणे! शैल्या जाणारच की कुठल्याकुठे! पण त्या पचकण्यामुळे विषयच वेगळे निघाले. हल्लीचे रस्ते, शैल्याच्या नवीन गाडीची कंडिशन, आम्ही इकडे इकडे गेलेलो होतो तिकडे काय सुंदर रस्ते आहेत, ए तू स्पीड वाढव की रे, नेहमी कसा उधळल्यासारखा चालवतोस' इत्यादी!

कविता बोंबललीच!

पण आरश्यातून एक मात्र समजत होते.... की...

आंबोली काही इतके सुंदर नसणार!

मराठीत न्याहारीला ब्रेकफास्ट म्हणायला लागले तेव्हापासून आंबोलीसारख्या ठिकाणांनाही साले नाही ते महत्व प्राप्त झाले.

मिसळ!

सातत्याने जलतरंग मी नॉर्मली ऐकू शकत नाही. पण जलतरंगांचा आभास कितीही वेळ ऐकू शकतो.

"ए बिडी पेटव"

एकाच्या आज्ञेमुळे मी व्यसनी असल्याचे उघड झाल्यावर आता शैल्याच्या गाडीत जलतरंग ऐकू येणार असे वाटू लागले.

तर कसले काय!

"आशू... परवा दादाला म्हणाले किती स्मोक करतोस तर म्हणे तूही कर की??" - जलतरंग

"ई.. मग??"

"माहीत नाही.. कसं वाटतं ते"

मैत्रिणीबरोबर जलतरंग बोलले. संधीचे सोने करणार नाही तो मी कसला??

"करताय का ट्राय??" - मी

"तू हिला अहोजाहो करतोस??" - शैल्या

" स्त्रीला एक विशिष्ट आदर द्यायलाच हवा"

"ई" - जलतरंग

"माणसाचे नांव कळेपर्यंत किंवा माणसाला नावच नाही याची खात्री होईपर्यंत मी अहोजाहोच करतो" - माझ्यातला लेखक बिखक टिखक!

"अस्मिता..... पेडणेकर"

आपलंच नांव सांगताना लाजण्याचे कारण काय असते यावर माझे संशोधन अजून पूरे झालेले नाही.

अस्मिताच्या खालच्या ओठाचा किस घेण्याव्यतिरिक्त काहीही उपयोग नसावा यावर माझे माझ्याशी एकमत झालेले होते.

"आत्ता नको, तिकडे गेल्यावर"

अस्मिता अफाट असावी.

दुसर्‍याला सांस्कृतीक धक्के द्यायला मला फार आवडते. कारण त्यामुळे आपण अनप्रेडिक्टेबल होतो. अनप्रेडिक्टेबल होणे व तसे इतरांना वाटणे हे माझे आयुष्यातील एकमेव ध्येय आहे. मी त्यासाठी खच्चून प्रयत्न करत असतो. खरे तर स्वभावातच ते असल्यामुळे खच्चून वगैरे कसले, साधे किरकोळही प्रयत्न करावे लागत नाहीत.

"इतक्या सुंदर मुलीला न्यायचे असेल तर कार हळूच चालेल, उगाच घाई करू नका"

शांतता, लफडे चालू आहे.

एवढासाच जन्म आहे पण
काय एकेक चालले आहे

एक जन्म आहे. जन्म म्हणजे काय? जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जितके क्षण मिळतात त्यापैकी जितक्या क्षणांवर फक्त आपले नियंत्रण असते त्या क्षणांच्या साठ्याला जन्म म्हणायचे. त्या साठ्यातील क्षण आपण कसे घालवतो यावर माणसामाणसात फरक पडतो.

मी आपले मजेत घालवतो.

मनोरंजन होणे ही माझी आयुष्याकडे असलेली एकमेव मागणी आहे. बोअर होता कामा नये! बाकी काही नाही. मग हसा, रडा, लढा नाहीतर हारा! पण रंजन व्हायला पाहिजे.

"म्हणताय का कविता?"

"अहो कविता ऐकवतात, म्हणत नाहीत"

"मग ऐकवा"

"अभ्यास अन तयारी , सारे उगीच आहे, जी जी निघेल इच्छा, ती वेगळीच आहे"

" वा वा"

"ओळीस दाद दे तू, गंधीत मोहराची, असलो कसा तरीही, मीही कवीच आहे"

"अरे वा"

"ईर्शाद बोलणारे, वा वा म्हणून गेले, गर्दी नवीन होती, घटना जुनीच आहे"

"काय?? ईश्राद??"

"ईर्शाद ईर्शाद... म्हणजे म्हणा"

"म्हणजे हिंदीत म्हणा म्हणतात अन मराठीत ऐकवा का?"

"उर्दू आहे ते उर्दू"

"ओके"

"चोरून पाहताना... "

येथे मी आरश्यात पाहिले. आत्तापर्यंत दाद देणारे वेगळेच होते. आता खरी दाद मला हवी होती.

"चोरून पाहताना चोरून पाहते ती"

"हं" - कुणीतरी एक तिसराच!

"मीही तसाच आहे, तीही तशीच आहे"

अपेक्षित तोच परिणाम! नजर पूर्णपणे गाडीच्या बाहेर वळवलेली, डोळ्यात गांभीर्य आणि 'गझलेकडे लक्ष कुणाचे आहे' हे भाव!

गंधीत मोहराची दाद मिळालेली होती.

"पुढे??"

"काहीतरीच तूही होतेस पावसाने, माझ्या मनात आता काहीतरीच आहे"

आंबोली खरच सुंदर नाही आहे.

कॉटेजेस बर्‍या होत्या. खिदळत आणि उधळत सगळे चहा पीत होते. आता सगळेच एकत्र असल्याने वाट्टेल ते विषय निघत होते. वाटेत माकड दिसले का? मग कुणीतरी म्हणणार सारखीच दिसतायत! मग आज ह्याने इतकी बोअर गाडी चालवली. वगैरे!

दरी काय पाहायची? म्हणजे, आंबोलीची दरी काय पाहायची? पण गेलो पाहायला.

"ए इथून सूर्यास्त मस्त दिसेल"

"ढग नसले तर"

काही इतर टुरिस्ट्स वगैरे! कणसं, दाणे!

क्षण जपता येत नाहीत हे आयुष्याने घातलेले महत्वाचे कोडे! आला म्हणेस्तोवर क्षण गेलेला असतो.

अगदी तसेच क्षण निर्माण करणे अशक्य! त्याहून चांगले किंवा त्याहून वाईट, असेच निर्माण करता येतात. कोणत्याही पर्यायात 'आधीच्या क्षणांची स्मृती' तशीच राहते आणि माणूस हेलावतोही!

मागे एकदा आअंबोलीला आलेलो असताना आम्ही तीन मित्र होतो. भयंकर मजा केलेली होती. आज तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि मैत्री नावाला राहिली होती. वाढदिवसाला विश करणे इतकीच!

मी एका दरीवर तरंगणार्‍या स्पॉटपाशी एकटाच उभा होतो. आजूबाजूचे उत्साहाने भारलेले आवाज कानांच्या पाळ्यांवर विरघळवून मनाने फक्त खालच्या दरीची खोली अनुभवत होतो.

लवंगेच्या धुराने छाती पोळली जाऊन हलकी होत होती व आत दडवलेल्या हृदयाला पतंगासारखे उडवायचा प्रयत्न करत होती. पहाड झाला चढून आता दरीत मारायची मुसंडी, हळूच मेला म्हणू नका, वाजवा नगारे, पिटा दवंडी!

एकाचवेळेस अनेक प्रकारच्या भावनांचा कल्लोळ! निसर्गरम्य ठिकाणाने प्रदान केलेली नजरसुखाची भेट, दरीच्या खोलीमुळे नेहमीप्रमाणेच आलेली रिकामेपणाची जाणीव, आजूबाजुच्या उत्साहामुळे होत असलेली कलकल, सर्वांपासून वेगळे झाल्यामुळे होऊ शकनार्‍या टीकेचा अंदाज आणि ...... अस्मिताच्या जलतरंगांमुळे व्यत्यय होत असल्याचा राग!

निसर्गाच्या भव्यतेमुळे मला नेहमीच क्षुद्रता आणि निरर्थकता जाणवू लागते. समुद्राच्या काठावर तासनतास बसण्याची क्षमता त्याचमुळे येते. डोंगराच्या शिखरावरही! आपण कोणीच नाही आहोत ही विलक्षण भावना फार आवडते. हवा छेडून जात असते. दरीतल्या झादांवर अनेक पक्षी असतात. खोल खोल दरी! मनापेक्षा कमीच खोल, पण तरी बर्‍यापैकी खोल!

उदासीच्या जाणिवेने आसमंत व्यापायला सुरुवात केली तेव्हा ढगांआड लपलेला सूर्य आता पृथ्वीआड लपू पाहात होता. भुरभुर पावसात मन ओले करण्याची क्षमता नव्हती. अंधार पडला की कॉटेजवर गप्पांना आणि खिदळण्याला जोर येणार होता. पण आत्ता निर्माण झालेली एकटेपणाची जाणीव तशीच राहण्याची भीती होती.

"किती मस्त दिसतंय ना"

अस्मिताच मस्त दिसत होती खरे तर! माझ्यायेथे येऊन अचानक असे म्हणाली तेव्हा! पण आत्ता मला तिच्याकडे पाहावत नव्हते. तिचे गोड दिसणे आणि मधुर हासणे आत्ता मला माझ्यापासून तोडून वेगळे करत होते. मला मी हवा होतो, स्वतःसाठी म्हणून! मी कुणाचा दुसर्‍याचा होणे मला मान्य नव्हते. पण औपचारिकता म्हणून मी "हं" म्हणालो.

"बघू?"

माझ्या बोटांमधून तिने गुडांग गरम घेऊन दोन झुरके मारले तेव्हाही मी दरीकडेच पाहात होतो. अस्मिता स्मोक करत आहे हे दृष्य माझ्या दृष्टीने आत्ता नगण्य होते.

पण तिच्या अस्तित्वाचे वाढते अतिक्रमण अ‍ॅकनॉलेज करावेच लागणार होते.

"स्ट्रॉन्ग आहे किती... कसा ओढतोस??"

अरे तुरे वर आली होती ती!

हासून मी म्हणालो...

"सोळा तरी होतात... "

तेच ते डोळे मोठे करणे, श्वासाचा आवाज, आश्चर्य व्यक्त करण्याचे बायकांचे कॉमन हावभाव!

"इट्स डेंजरस"

"हं"

दुसर्‍या दिवशी रात्री साडे आठ वाजता मी तिचा याच स्पॉटवर किस घेणार आहे हे मला किंवा तिलाही कोणी सांगितले असते तर तो वेडा ठरला असता.

शैल्या बिनडोक माणुस आहे.

म्हणे पहाटे पाचला एका स्पॉटला जायचे आहे. मी स्पष्टपणे सांगितले.

"आपल्याला जमणार नाही आणि झोपेतून उठवण्याचा जो प्रयत्न करेल तो लाथा खाईल"

ट्रिपला यायचं अन कष्ट कसले करायचे?? म्हणे पहाटे पाच!

सात वाजता उठून बाहेर एक ओसरीसारखे होते त्यावर बसून चहा पिऊन सहज उजवीकडे बघतोय तर ....

....

"हे बघ काय मिळालं"

पांढरा टीशर्ट आणि जीन्स! नुकतीच झोपेतून उठली आहे हे कळणार्‍या खुणा विखुरलेल्या केसांवर आणि आळसटलेल्या डोळ्यांवर! काल सम्ध्याकाळचा दरीपासचा अनुभव आत्ताच्या तिच्या या दर्शनाने मात्र पूर्णतः पुसला गेला.

"आयला, हे काय?? आणि मिळालं काय?? सोडून दे ते"

"थांब, खेळतीय मी"

बालिशच वाटली जरा! एका मांजराच्या पिल्लाशी, जे तिच्याहीपेक्षा काकणभर अधिकच गोंडस होतं, ती खेळत होती.

मलाही उद्योग नसल्याने मीही खेळायला सुरुवात केली.

"हे मिळालं कसं?"

"चार आहेत तिकडे"

"च्यायला, हम दो हमारे पांच"

जलतरंग! यावेळेस अगदी तोंडावर हात ठेवून, किंचित सलज्जबिलज्जपणे!

"मस्त हासतेस तू"

"हो का???.... आणखी???"

"आणखी काय?? हे पिल्लू बरं दिसतं"

"हं! म्हणूनच आणलंय ... तू काल असा एकटा का उभा होतास??"

"सगळे मिळून कसं उभं राहायचं??"

"प्लच.. म्हणजे असा एकीकडे एकटाच का उभा होतास??"

"काल कुठे माहीत होते??"

"काय??"

"की आज हे पिल्लू मिळेल आणि तू अशी हासशील??"

"ओह अच्छा म्हणजे मी हासत नव्हते म्हणून तिकडे जाऊन उभा राहिला होतास होय ??"

"अर्थात, पण तू गेली नाहीस??"

"बहुतेक गेलेली नसणार मी, नाहीतर इथे कशी असते?"

"पण का नाही गेलीस??"

"मी गेले असते तर मी कशी हासते ते कसे कळले असते??"

"अरे वा? मग हास की पुन्हा??"

"असं कसं हसू येईल??"

असं कसं हसू येईल म्हणताना ती खरच पुन्हा हासली. मळभ दूर केल्यासारखी!

"सिगारेट आवडली नाही ना??"

"मला फक्त वास आवडतो"

"ए.. पळालं ते.... धर धर... "

"जाऊदेत... चल फिरून यायचं??"

"चहा घेतलास का??"

"सहा वाजताच... "

"म्हणजे??? तू जागी झाली होतीस???"

"ते गेले तेव्हा?? "

"हं?? "

"म्हणजे काय?? मीच पहिली जागी झाले "

"मग... गेली कशी काय नाहीस??"

"असंच, थांबले... "

अबोल सकाळ तिने सुरू केली होती. तिचे बोलक्या संध्याकाळीत रुपांतर करायला हवे होते. तरच अर्थहीनतेला अर्थपूर्णतेचा मुखवटा लागला असता.

मूर्खासारखा तो अकरा वाजता यायला पाहिजे असलेला ग्रूप दोन वाजता आला. आम्ही दोघे फार तर एकमेकांबरोबर दोन तास घालवले आसतील. बाकी आपल्या आपल्या खोलीत टीव्ही आणि आराम!

मात्र एक धमाल झाली होती.

शैल्याचा बडवलेला बैल झालेला होता. यच्चयावत सातजण त्याला शाब्दिक बडवत होते. कोणीही काहीही बोलत होते. पहाटे पाचला उठवून त्याने पब्लिकला अशा ठिकाणी नेले होते जेथे वाहनच नव्हते. आणि पार डोंगर बिंगर उतरवला. खाली गेल्यावर खायला काहीही नाही. फक्त एक धबधबा! त्या धबधब्यात नाचून झाल्यावर लागल्या भूका! मग धबधब्याचेच पाणी प्यायले. मग पुन्हा म्हणे आता वर चढायचे. पब्लिक बोंबा मारायला लागले. तर शैल्याने मेंदूला आणखीन एक किक मारून दाखवली. म्हणे इथे जवळपास एखादे गाव असेल, काहीतरी खाऊ आणि मग वर जाऊ! गावातून एखादी एस टी ही मिळेल. पब्लिक भिजून अरण्य तुडवू लागले. आता शैल्याला शिव्या द्यायचीही ताकद कुणाच्यात नव्हती. अकरा वाजता एक बैलगाडी दिसली. बैलगाडीवाल्याने आठजणांना बसवून ऐंशी रुपये मागीतले तोवर बैल खाली बसले. ते बैल मुळातच म्हणे मरणासन्न होते. त्यात एवढे वजन भरल्यावर ते नम्रपणे खाली बसले. त्याचे बैलगाडीवाल्याने वेगळेच पैसे मागीतल्यावरून निराळे भांडण झाले आणि दिडशे रुपये त्याच्या खिशात टाकून पब्लिक पुन्हा चालू लागले. दिडशे रुपयांना जागून त्या बैलगडीवाल्याने एक वाट दाखवली जिच्यावरून तीन किलोमीटर गेल्यावर म्हणे एक गाव होते. ते तीनचे सहा झाले तरी गाव लागेना! नंतर कळले की मधे एक बकवास वाडी येऊन गेली तेच गाव होते म्हणे! कसेबसे सगळे दोन वाजता परतले आणि जेवणावर तुटून पडले. कपडे अंगावरच वाळलेले होते. दोन मुली आणि एक मुलगा यांना सर्दीने पछाडले. ते ब्लॅन्केट्स घेऊन निद्रिस्त झाले. इतरांनी अंगात जीव आल्यावर शैल्याला शब्दांनी फाशी दिले.

आंबोली सुंदर नाही हे सिद्ध झाले होते.

मात्र हे सगळे होत असताना मोजून चार गोष्टी आपोआपच घडल्या.

जलतरंग खूप वेळा छान वाजले. जलतरंग माझ्यासोबत खूप वेळा छान वाजले. संध्याकाळी कोणीही बाहेर पडू शकण्याइतके सामर्थ्य बाळगून नसल्यामुळे सगळे तिथेच बसणार हे ठरले... आणि...

.... संध्याकाळी आम्ही दोघेच बाहेर पडू शकत असल्यामुळे... आम्ही दोघेच बाहेरच पडणारच हेच ठरलेच!

ये शाम मस्तानी.. मदहोष किये जाये

हात!

अस्मिताचे हात म्हणजे नाजूकपणाची कमाल मर्यादा होती. आपण आपल्या हातात काही धरलेलेच नाही असे वाटण्याइतके नाजूक! अर्थात, काही विचित्र वाटा मुद्दाम शोधल्यामुळे तो प्रकार आपोआप घडला.

जे होते ते आपोआप होते व आपोआप होऊ द्यावे.

वाट्टेल ते विषय, मांजराच्या पिल्लापासून शैल्यावर सर्वांनी केलेली चढाई, राजकारणापासून सिनेमा, बॉयफ्रेन्ड्स, गर्लफ्रेन्ड, लग्न, तिचे न झालेले, माझे झालेले इत्यादी!

मग विषय संपले. म्हणजे शब्दांनी चितारण्यासारखे! स्पर्श तसाच बोलत होता. माझ्याकडून धिटाईची भाषा आणि तिच्याकडून स्वीकाराची! कित्येक मिनिटे एका स्पॉटला नुसते बसलो तेव्हा हात धरायची गरज उरलेली नसल्यामुळे कोणताच संवाद नव्हता तरीही एक संवाद होताच!

एकांताचा संवाद!

समोर तीच दरी पण दुसर्‍या स्पॉटपासून! निसर्गाची तीच भव्यता! दोघेच एकासोबत एक असण्याची अनामिक भावना! वयातील अंतराला कशानेतरी बुजवलेले! निर्लज्जपणाला निर्लज्ज व्हायची इच्छा आणि सलज्जपणालाही काहीसे तसेच!

एक ग्रूप आला तेथे! सहा जणांचे कुटुंब होते ते! डिस्टर्ब झाल्यासारखे वाटल्यावर आम्ही आपोआप उठलो आणि चालत चालत रस्त्याने निघालो. जवळपास साडे सात आठ वाजता अत्यंत मंद प्रकाश असलेल्या कालच्या स्पॉटवर पोचलो.

"चला... थांबले असतील सगळे"

"हं.... "

खोळंबा! सहेतूक!

दोन ते तीन मिनिटे तशीच!

आंबोली सुंदर नव्हते.

"काय झालं??.. जायचंय ना??"

"हं... "

पुन्हा तसेच बसून राहणे!

"अंधार झालाय"

"हं"

"चल ना?"

"थांब... थांबू"

"का?"

मी हात पुढे केला. जलतरंग आता अजिबात वाजत नव्हते. अस्मिताने हात हातात दिला. तिच्या खालच्या ओठाबद्दलचे माझे मत खरे ठरले.

अनुभवाची ऑथोरिटेटिव्ह मिठी आणि अननुभवाची निष्फळ ठरत जाणारी किंवा निष्फळच ठरावी म्हणून केलेली धडपड! आंबोली इतके सुंदर नव्हते. पाकातल्या चिरोट्यांसारखा तो किस बेकायदेशीर होता.

अबोल्याने आणि गार हवेने व्यापलेले वातावरण परतताना मनावर मणांचे वजन टाकत होते. उद्या सकाळी निघायचे होते. नंतर कदाचित संपर्क आला तरी असा क्षण येणार नव्हता. एकांत असला तरी बेकायदेशीरपणाला मुभा मिळणार नव्हती.

रात्रीच्या जेवणानंतर भेंड्या, कविता आणि गप्पा ठरलेल्या होत्या पण त्यात सहभागी होताना ओठांवर अपराधी हुरहुर आणि बेभान आक्रमकता तशीच राहणार होती.

पुण्यात परतल्यानंतर काही ना काही कारणाने संपर्क कमी कमी होत गेला. वर्षभराने तिचे लग्न ठरल्याचे समजले. चक्क बोलावणे होते. पण पुन्हा माझ्यातला तोच नपुंसक पुरुष म्हणवणारा माणुस जागा झाला.

तिला फेस करणे मला आता शक्य नव्हते.

आंबोलीसारखा अनुभव तिने नंतर कधीच घेऊ दिला नव्हता. पण मैत्री ठेवली होती.

मात्र मला नेहमी तेच आठवत होते.

परतताना रस्त्यावर चालताना तो अबोला असह्य होऊन शेवटी लांबवर कॉटेजेस दिसायला लागल्या तेव्हा अस्मिता म्हणाली होती...

"सुंदर आहे ना आंबोली???'

".... अंहं... आंबोली इतके सुंदर नाही आहे"

आणि अंधारातही ते मूक जलतरंग फक्त तिच्या ओठांवर ओलसर लाज देऊन गेल्याचे जाणवले होते.

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो

-'बेफिकीर'!

===============================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

गुलमोहर: 

>>आणि मग जलतरंगच्या सगळ्या 'बोल्सवरून' वादकाने एकदम काडी फिरवावी तशा आवाजातले हासणे ऐकू आले.

ज ब र द स्त !!

छान

Happy

दुसर्‍याला सांस्कृतीक धक्के द्यायला मला फार आवडते. कारण त्यामुळे आपण अनप्रेडिक्टेबल होतो
....:):)

आता शब्द सम्पलेत.......पण .नेहमी सारखेच...अतिशय मनाच्या जवळ जाणारे लिखाण आहे तुमचे...

Happy

aaj parat vaachali !!

jahabaharaa aahe !!

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो

>>> ahaahaa Happy

puDhachyaa kathaa lihaa ki befi ...kaahi dedicated fans vaaT pahaataahet Happy

आज परत वाचली .
.
.
हायला असं काहीतरी थ्रील हवं लाईफ मधे तर मजा आहे राव !!
एकदा आंबोलीला गेलंच पाहिजे ....

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो >>>> क्या बात है क्या बात है !!