एक आहे भारती

Submitted by इंद्रायणी on 25 August, 2011 - 13:27

श्री गणेश

एक आहे भारती....
एक आहे भारती... खरंतर भार”थी”!

फक्त दीड वर्षांची. आईच्या मायेला पारखी झालेली. आता सुब्रमण्यच्या मायेत वाढणारी. तिच्या वयाच्या इतरांप्रमाणे तिलाही चालायचं असेल, धावायचं असेल, मस्ती करायची असेल, खोड्या काढायच्या असतील...

पण ती चार महिनांची असताना तिला संधीवाताचा आजार जडला आणि चालणं धावणं तर दूरच पण तिला जागचं हलताही येईनासं झालं. मग सुब्रमण्यमनं तिच्यासाठी उबदार घर तयार केलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण इतकं गोंडस बाळ एका जागी पडून राहीलेलं त्यांना पहावेना. खूप उपचार केले पण गुण येईना. भारथीनंही उठावं, खेळावं असं त्यांना फार वाटे.

होता होता वर्ष सरलं आणि एक दिवस वैद्य मोहनन वैद्यार यांच्याशी सुब्रमण्यमची भेट झाली. मोहनननी भारथीची कथा ऐकली. तिच्यावर उपचार करणं हे त्यांना त्यांच्या आजवरच्या अनुभावाला आलेलं आव्हान वाटलं. त्यांनी ते स्वीकारलं आणि भारथीवर उपचार करायला सुरुवात केली. भारथीही त्यांच्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत होती. हळू हळू तिनं पाय हलवायला सुरुवात केली. कुशीवर वळायला लागली. तिचं खाणंपिणंही सुधारलं. महीनाभरानं ती गुडघ्यावर उभी रहायला लागली. रांगल्यासारखी पुढे सरकायला लागली. पाच सहा महीने उलटले. सुब्रमण्यमच्या सेवेला आणि वैद्यबुवांच्या जिद्दीला यश आलं आणि एक दिवस....
भारथी स्वतःच्या पायांवर उभी राहीली!

ही गोष्ट आहे, केरळ मधल्या हत्तींच्या अनाथालयातल्या, हत्तीच्या एका आजारी पिल्लाची आणि त्याच्यावर स्वतःच्या अपत्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या माहूत सुब्रमण्यम आणि वैद्य मोहनन या दोन माणसांची!

केरळ मधल्या नद्या मोठमोठया. केरळच्या धुवांधार पावसाळ्यात दुथडी भरुन वहाणाऱ्या. या दिवसात जेव्हा हत्तींची कुटुंबं जंगलाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायला नदी ओलांडत असतात, तेव्हा बरेचदा कळपातली छोटी पिल्लं नदीच्या जोरदार प्रवाहामुळे कळपापासून लांब वहात जातात आणि हरवतात. कधी कधी त्यांच्या बरोबरचे मोठे हत्ती जीव गमावतात आणि मग त्यांची पिल्लं पोरकी होतात. मग गावकरी आणि आसपासची माणसं अशी हरवलेली, घाबरलेली, बरेचदा जखमी अवस्थेतली पिल्लं कोडनाडच्या या एलिफंट क्रॉल मधे आणून सोडतात.

१६ जुलै २००६ या दिवशी भारतीला या केंद्रात दाखल केलं गेलं. दिवस पावसाचे होते. नीलांबूर गावच्या कोरापुझा नदीला पूर आला होता. हत्तींचं एक कुटुंब ही नदी ओलांडत असताना, एक पिलू त्यांच्यापासून वहात वहात दूर गेलं. खडकांमधे ठेचकाळत काटेरी झुडुपात अडकलं. स्थानिक रहिवाशांनी त्याला वाचवलं आणि एलिफंट क्रॉल मधे आणून सोडलं. तीच ही भारथी! तिच्या सगळ्या अंगावर जखमा होत्या. हालचाल करण्याचं त्राणच नव्हतं. वैद्यकीय उपचारांनी जखमा बऱ्या झाल्या पण तिची तब्ब्येत मात्र खालावत गेली. हळू हळू तिच्या उजव्या पायात वेदना सुरु झाल्या, ताप यायला लागला. अंगावर सूज यायला लागली आणि संधीवाताच्या आजारानं भारतीनं अंथरुण धरलं. जुलै २००७ पर्यंत तिच्यावर उपचार चालू होते. मग वैद्यांनी सांगितलं कि आता उपचारांचा उपयोग नाही. पण एक दिवस सुब्रमण्यमना वैद्य मोहनन भेटले. त्यांनी भारथीची कथा ऐकली आणि माणसांना मसाज करणारे हे वैद्य हत्तीवर उपचार करायला तयार झाले. भारथीवर नीट लक्ष ठेवता यावं म्हणून ते कोडनाडला मुक्काम ठोकूनच राहीले. पोटात औषध देण्याबरोबरच ते तिला सकाळ संध्याकाळ अगदी माणसांना करतात तसा मसाज करायचे. माणसांचा मसाज आणि हत्तींचा मसाज यात त्यांच्या वजनाइतकाच फरक आहे. पण मोहनन ही मेहनत प्रेमानं करायचे. सुब्रमण्यम कडून बाटलीतून आनंदानं खीर आणि दूध पिणारी भारथी, औषध घेताना मात्र अगदी लहान मुलासारखी वागायची. अजीबात तोंड उघडायची नाही. मग सुब्रमण्यम तिच्या अंगावरुन हात फिरवायचे, तिला समजावायचे. तिला ते किती कळायचं माहीत नाही पण थोड्या वेळानं ती मुकाट्यानं औषध प्यायची. तिला पाजली जाणारी सगळी पेयं उकळून, कोमट करुन मगच तिला पाजली जायची. सुब्रमण्यम हे तिथले प्रमुख माहूत! संपूर्ण दिवस ते भारतीच्या सेवेत असायचे. अपत्यहीन असलेले सुब्रमण्यम, स्वतःच्या मुलीसारखी तिची काळजी घ्यायचे.

एका मोठ्या शेडमधे त्यांनी भारथीसाठी नारळाच्या झावळ्या रचून प्रशस्त अंथरुण तयार केलं. तिला आरामात टेकता यावं म्हणून भुसा भरलेली दोन मोठी पोती, उशीसारखी ठेवली. भारती तिच्या सोयीप्रमाणं उशांची जागा बदलायची. एक रिकामं पोतंही ठेवलं होतं तिथं. गरम तेलानं अर्धा तास मसाज केल्यावर आणि शेकल्यावर भारथीला उकडायला लागायचं. मग ती हे पोतं सोंडेत धरून डोक्यावर पंख्यासारखं गोल गोल फिरवायची आणि वारा घ्यायची. इतर हत्ती आणि पर्यटकांपासून तिला दूर ठेवलं होतं. पण फार दिवस तिला असं वेगळं रहाण्याची, अंथरुण आणि उशांची गरज लागणार नाही असा विश्वास तिथल्या राजू, कॄष्णकुमार आणि इतर माहूतांना वाटायचा.

कोची पासून ५८ कि.मी.वर पेरीयार नदीच्या काठावर कोडनाड नावाचं एक छोटंसं सुंदर गाव आहे. या गावात हत्तींचं अनाथालय आहे. केरळ मधल्या नद्या मोठमोठया. केरळच्या धुवांधार पावसाळ्यात दुथडी भरुन वहाणाऱ्या. या दिवसात जेव्हा हत्तींची कुटुंबं जंगलाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायला नदी ओलांडत असतात, तेव्हा बरेचदा कळपातली छोटी पिल्लं नदीच्या जोरदार प्रवाहामुळे कळपापासून लांब वहात जातात आणि हरवतात. कधी कधी त्यांच्या बरोबरचे मोठे हत्ती जीव गमावतात आणि मग त्यांची पिल्लं पोरकी होतात. मग गावकरी आणि आसपासची माणसं अशी हरवलेली, घाबरलेली, बरेचदा जखमी अवस्थेतली पिल्लं कोडनाडच्या या एलिफंट क्रॉल मधे आणून सोडतात. वनखात्यातर्फे इथे हत्तींना ओंडके उचलण्याचं, अवजड सामान हलवण्याचं, संकटात सापडलेल्या इतर हत्तींना वाचवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हे सगळे हत्ती कोणत्या ना कोणत्या संकटात सापडून, जखमी अनाथ होऊन इथे आलेत. त्यांचं खाणंपिणं, औषधोपचार इथे कसोशीनं सांभाळले जातात.

काही महिन्यांच्या पिल्लांपासून ते अगदी मोठ्या हत्तींपर्यंत वेगवेगळ्या वयांचे हत्ती इथे पहायला मिळतात. त्यांच्या साठी लाकडाचे खूप मोठे पिंजरे आहेत. पण या पिंजऱ्यात ते फार कमी वेळ असतात. या हत्तींचं खाणंपिणं, औषधं अगदी वेळेवर दिली जातात. छोट्या हत्तींचे फक्त लाडच होतात. मोठे हत्ती मात्र ओंडके उचलण्यासारखी कामं करतात. एका हत्तीला एक माहूत असं समीकरण आहे.

तिथल्या माहूतांशी बोलताना आम्हाला एक गंमत कळली. हत्तींना म्हणे स्वप्नं पडतात. कधी कधी तर ते रात्री झोपेत ओरडतातही. मग तिथेच वस्तीला असणारे माहूत धावत त्यांच्या जवळ जातात. त्यांच्याशी बोलतात. त्यांना शांत करतात. रोज सकाळी या हत्तींना पेरीयार मधे आंघोळीला नेलं जातं. आपापल्या हत्तीला नारळाच्या करवंटीनं घासून रगडून लख्ख केलं जातं. त्यांची ही गोपीचंदी थाटाची तासभर चालणारी आंघोळ पहायला पर्यटकही येतात आणि हत्तींना आंघोळ घालण्याचा भन्नाट अनुभवही घेतात. परत येताना रस्त्यात लागणाऱ्या देवळात सगळे माहूत स्वतः बरोबरच हत्तींनाही चंदनाचे टिळे लावतात.

आमच्याशी मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलताना कॄष्णकुमार म्हणाला होता, “We love our guests and we love our pets” आजारी भारथीची प्रेमानं केली जाणारी देखभाल आणि इतर हत्तींची बडदास्त पाहून कॄष्णकुमारच्या विधानाचा दुसरा भाग आधीच पटला होता. पण नंतर त्यानं अतिशय आग्रहानं केळीच्या पानावर भात, मीनकरी आणि टापिओकाची भाजी अशी फक्कड मेजवानी देऊन आपल्या विधानाचा आधीचा भागही सिद्ध केला.

केरळची सुंदर पण अप्रसिद्ध ठिकाणं पहाताना कोडनाडचा शोध लागला, तिथे भारथी आणि तिचे प्रेमळ सुब्रमण्यम बाबा भेटले आणि कायमचे मनात घर करुन बसले. गोंडस भारथी बरोबरच, अतिशय खोडकर पार्वथी, फक्त एक वर्षाचा छोटुकला अश्वथी, शांत स्वभावाची सुनीथा, कामसू नीलकंदन आणि त्यांना मायेनं सांभाळणारे, परिस्थीतीनं अत्यंत गरीब पण मनानं तेवढेच श्रीमंत माहूत यांनी केरळची वेगळीच ओळख करुन दिली.

तिथून परतल्यावर काही महिन्यांनी भारथी आणि परिवाराची चौकशी करण्यासाठी फोन केला तव्हा कळलं कि वनखात्यानं अधिक चांगल्या उपचारांसाठी भारथीला थिरुवाअनंतपुरमच्या मोठ्या प्राणीसंग्रहालयात नेलंय. आता ती ६ वर्षांची झाली असेल. कदाचित छान बरी झाली असेल पण भारथीला तिथे पाठवताना सुब्रमण्यमची अवस्था काय झाली असेल? कदाचित लाडक्या लेकीला सासरी पाठवणाऱ्या बापासारखीच, नाही का?
indrayanic@yahoo.com

माणूस आणि प्राण्यामधले हे अनोखे ॠणानुबंध मला अनुभवता आले ते केरळमधल्या पेरीयार इथल्या रेंजरवूड रिसॉर्ट्सचे व्यवस्थापक श्री. सतीशकुमार यांच्यामुळे. कोडनाड बद्दल किंवा केरळ मधल्या इतर विशिष्ट ठिकाणांची माहीती हवी असेल तर त्यांच्याशी नक्की संपर्क साधा.
त्यांचा दूरध्वनी क्रमांक- ०९४४७२८७९३४ / ०८१२९३२२००४
इ-मेल- manager@rangerwoodperiyar.com

गुलमोहर: