भगवान बुध्द - नव्या प्रकाशाच्या शोधात

Submitted by rkjumle on 22 August, 2011 - 01:08

सिध्दार्थ गौतम वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर आठ वर्षाने एक अशी घटना घडली की, त्यामुळे सिध्दार्थ गौतमाच्या जीवनाला कलाटनी मिळाली. शाक्यांच्या राज्याला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपआपल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. त्यावर्षी त्यांच्या मध्ये फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या.

शाक्याच्या सेनापतीने कोलियांच्या विरुध्द युध्द पुकारण्याचा ठराव शाक्य संघामध्ये मांडला. सिध्दार्थाने या ठरावाला विरोध केला. सिध्दार्थ म्हणाले, “युध्दाने कोणतेही प्रश्‍न सुटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसर्‍या युध्दाची बिजे रोवली जातील. जो दुसर्‍याची हत्त्या करतो, त्याला त्याची हत्त्या करणारा भेटतो. जो दुसर्‍याला जिंकतो, त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्‍याला लुबाडतो, त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. हा प्रश्‍न दोन्हिही बाजूचे प्रतिनिधी निवडुन सामोपचाराने मिटवावे ” परंतू सिध्दार्थाने मांडलेल्या या सुचनेचा काहिही उपयोग झाला नाही. सिध्दार्थाने सैन्य भरतीच्या निर्णयाला सुध्दा विरोध केला. या विरोधामुळे सिध्दार्थाला शाक्य संघाच्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार होते. त्याचे तीन स्वरुप होते. एक सैन्यात दाखल होऊन युध्दात सामील होणे, दुसरे देहान्तशासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे व तिसरे आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढऊन घेऊन, त्यांच्या मालमत्तेची जप्‍ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला आणि तिसरा पर्याय न स्विकारता त्यांनी परिवर्ज्या घेऊन देशत्याग करायाचे ठरविले.

सिध्दार्थ त्याची आई-गौतमी, वडील-शुध्दोधन व पत्‍नी-यशोधरा यांना भेटायला महालात गेले. आई-वडील अत्यंत दु:खमग्न झाले होते. यशोधराने मात्र धैर्याने व उदात्त मनाने अनुमती देऊन सिध्दार्थाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. यशोधरा म्हणाली, “ ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जेवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे.”

मानवजातीच्या कल्याणाचा ध्यास घेऊन सिध्दार्थाने राजगृह सोडला. राजगृह सोडण्याचे व परिव्रजा घेण्याचे हेच एक कारण होते. ज्याची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये केला आहे. मृत देह, आजारी आणि जराजर्जर झालेला व्यक्‍ती पाहून सिध्दार्थाने परिव्रजा घेतली, असे पारंपारिक व हास्यास्पद असे उत्तर दिले जातात. हे उत्तर विश्वासार्ह नाही व बुध्दीलाही पटण्यासारखे नाही. कारण सिध्दार्थाने आपल्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी परिव्रजा ग्रहण केली. परिव्रजा घेण्याचे हेच जर कारण असते तर ही तीन दृश्ये त्यांना कधी दिसली नाहीत कां ? ह्या शेकडयांनी घडणार्‍या नेहमीच्या घटना आहेत, आणि त्या तत्पूर्वी सिध्दार्थाच्या नजरेस न येणे असंभव आहे, असे या ग्रंथाच्या ‘परिचय’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे.

सिध्दार्थाला कोलीय आणि शाक्य यांच्यातील युध्द संघर्षामुळे घर सोडावे लागले होते. परंतू त्यानंतर शाक्यांनी कोलियांसोबत शांततेने वाटाघाटी करुन हा प्रश्‍न सोडवावा म्हणून मिरवणुका व निदर्शने करुन मोठी चळवळ केली. परिनामत: कोलीय आणि शाक्य यांच्यात समेट होऊन युध्द संपल्याचे सिध्दार्थाला त्यांचे सोबत असलेल्या पाच परिव्राजकाने सांगितले. ते पाच परिव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक होते. त्यांनी सिध्दार्थाला सुचना केली की, ‘आता यापुढे परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर राहावे. तरिही सिध्दार्थ घरी परत गेले नाहीत. कारण त्यांनी खोलवर विचार केला की, युध्द समस्या ही मूलत: कलहसमस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्‍त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आला आहे असे नव्हे: तर क्षत्रिय आणि ब्राम्हण यांच्यात, कुटुंब-प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावाबहिणीत आणि सहकार्‍यांत देखील चालू आहे. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त जरी असला तरी वर्गा-वर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरुपाचा असतो. हा संघर्ष़च जगातील सर्व दु:खाचे मूळ होय. म्हणून या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर शोधून काढले पाहिजे असे सिध्दार्थाने ठरविले होते.

त्यामुळे सिध्दार्थ नव्या प्रकाशाच्या शोधात निघाले. मार्गात त्यांनी भृगुॠषीचा आश्रम पाहिला. सिध्दार्थाने त्या तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या कठोर तपश्‍चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. अशा कठोर तपश्‍चर्या केल्याने स्वर्गप्राप्‍ती होते, दु:खमार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्‍ती होते व दु:ख हे पुण्याचे मुळ आहे असे त्या तपस्व्यांना वाटत होते. हे ऎकल्यावर गौतम म्हणाला, “अशा प्रकारचा आश्रम मी प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्‍चर्येचा नियमही मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्‍चर्या स्वर्गप्राप्‍तीसाठी आहे, तर ऎहिक जीवनातील दु:खाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वत: समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्‍न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे.”

भृगुॠषीचा आश्रम सोडून सिध्दार्थ आलारकालाम या मुनीकडे वैशालीला गेले. आलारकालाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिध्द होते. आलारकालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे सिध्दार्थाला वाटत होते. तेथे त्यांनी आलारकालामाला त्यांच्या सिध्दांताचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्‍त केली. आलारकालामांनी सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करुन सांगितली. तसेच त्यांनी ध्यानमार्गाचे तंत्र शिकविले. त्याच्या एकुण सात पायर्‍या होत्या. सिध्दार्थ त्या तंत्राचा रोज अभ्यास करायचा. सिध्दार्थांनी त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविले. जेवढे काही शिकण्यासारखे होते ते आलारकालामांनी सिध्दार्थाला शिकविले. आलारकालामांनी जे काही शिकविले त्यापेक्षा वरच्या पायरीचे शिक्षण घेण्याकरीता सिध्दार्थ उद्दक रामपुत्त नांवाच्या योग्याकडे गेले. तेथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च पायरीचे शिक्षण घेऊ लागले. काही थोडया काळातच उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी सिध्दार्थांने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताला जेवढे काही शिकण्यासारखे होते ते उद्दक रामपुत्तांनी सिध्दार्थाला शिकविले. आलारकालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिध्द होते. मगध देशातही अशाप्रकारे ध्यानमार्गसंपन्न योगी होते. त्यांची ध्यानमार्गाची प्रक्रिया श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. ही प्रक्रिया अत्यंत दु;खदायक होती. तरीही सिध्दार्थ ही प्रक्रिया आत्मसात करण्यात यशस्वी झाले. समाधीमार्गाचे अशाप्रकारचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

सिध्दार्थाने सांख्य तत्वज्ञान व समाधिमार्ग यांची कसोटी घेतली होती. परंतु वैराग्यमार्गाची कसोटी न घेता भृगुॠषीचा आश्रम सोडला होता. म्हणून या वैराग्यमार्गाची कसोटी सुध्दा घ्यावी म्हणजे स्वत: अनुभव घेऊन त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. म्हणून त्यांनी वैराग्यमार्गाचा अभ्यास करण्यासाठी उरुवेला येथे निरंजना नदीच्या काठी निर्जन आणि एकांत ठिकाण निश्चीत केले. कोलीय आणि शाक्य यांच्यात समेट होऊन युध्द संपल्याचे सिध्दार्थाला पाच परिव्राजकाने सांगितले होते ते सुध्दा याचठिकाणी वैराग्याचा अभ्यास करीत होते. वैराग्याच्या निरनिराळ्या पध्दतीचा अवलंब करुन ते इतक्या पराकोटीला गेले होते की, ते क्षणाक्षणाला यातना आणि वेदना घेऊनच जगत होते. अंगाचा थरकाप होईल इतक्या भयाण अरण्यात ते राहत होते. कडक थंडीत, कडक उन्हात, काळ्याकुट्‍ट आणि गुदमरवून टाकणार्‍या गर्द झाडीत राहत होते. जळलेल्या हाडाची ऊशी करुन स्मशानात झोपत होते. धान्याच्या एका दाण्यावर दिवसभर गुजराण करीत होते. तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश याचे स्वरुप इतके उग्र होते की, ते अत्यंत किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहचले होते. त्यांच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर साचून ते आपोआप पडत होते. त्यांचे पोट पाठीच्या कण्याला चिकटले होते. याचे कारण ते अत्यंत कमी खात होते. अशा प्रकारची त्यांची तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते. सहा वर्षेनंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले की, त्यांना हालचाल सुध्दा करता येत नव्हती. इतकी कठोर तपश्‍चर्या करुनही त्यांना नवीन प्रकाश दिसला नाही. ज्या प्रश्‍नावर त्याचे मन केन्द्रित झाले होते त्या ऎहिक दु:खाविषयीच्या प्रश्‍नाचा त्याला यत्‍किंचितही उलगडा झाला नव्हता. त्यांनी विचार केला की, ज्यांची शक्‍ती नष्ट झाली, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला, ज्याचे मन अशांत झाले त्याला नवा प्रकाश कसा प्राप्‍त होईल ? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्‍तीनेच मिळु शकते. म्हणून वैराग्यमार्गाची कसोटी सोडून त्यांनी सुजाताने दिलेले अन्न भक्षण केले. तपश्‍चर्या आणि आत्मक्लेश याचा त्याग केल्यामुळे त्यांचे सोबतचे पाच परिव्राजक रागाने त्यांना सोडून गेले.

सिध्दार्थ गौतम उरुवेला सोडून गयेला आले. तेथे पिंपळ्वृक्षाखाली ध्यानस्थ बसले. ज्ञान प्राप्‍तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असता त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी, चार आठवडे चिंतन केल्यावर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला; अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला.

गुलमोहर: 

श्री. जूमले साहेब.
एक विनंति आहे.
आपल्याकडे धार्मिक असा ग्रुप आहे. आपले लेखन त्या सदराखाली केले तर योग्य त्या सभासदांपर्यंत पोहोचेल, व त्यांचा प्रतिसादही मिळेल.

आपण लेख वाचला, त्याबद्द्ल धन्यवाद.
मुळात बुध्दांचे विचार आणि त्यांच्या शिकवणीला धर्म म्हटल्या जात नाही, तर धम्म म्हटल्या जाते. धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. बुध्द हे मोक्षदाता नव्हते तर मार्गदाता होते.म्हणून बुध्दांच्या संदर्भात लिहिलेल्या लेखाला धार्मिक न म्हणता वैचारीक म्हणता येईल.
मुंबई येथे गोराई बिचला सत्यनारायनजी गोयनका यांनी भव्य असा ग्लोबल पगोडा बांधला आहे. तेथे बुध्दाला ’अध्यात्मिक क्षेत्रातील महान वैज्ञानीक’ असे लिहिले आहे.
तसेच एक वैज्ञानीक अल्बर्ट आईंन्स्टाईन म्हणतात की, आधुनिक काळातील वैज्ञानीक आवश्यकताची पुर्तता फक्त बुध्दाचा धम्मच करु शकतो.
प्रसिध्द विचारवंत प्रोफेसर मॅक्स मुलर म्हणतात की, तथागत बुध्दांनी शिकवलेल्या सर्वच सदगुणांचे ते स्वत:च एक मुर्तीमंत उदाहरण होते. त्यांचे नितीशास्त्र परिपूर्ण होते, ज्याची माहिती यापूर्वी जगाला कधीच नव्हती.
आज जगाला युध्द हवे की बुध्द हवे अशी चर्चा चालू असते. म्हणून त्यांच्या विचाराचे व शिकवणूकीचे आकलन सर्वांनाच व्हावे याकरीता हा लेख लिहिण्याचा खटाटोप! धन्यवाद.

छान लेख. यावर आणखी लिहावे. विशेषतः बुद्ध धर्माचा पुढे प्रचार कसा झाला, चीन/जपान इथे पोचल्यानंतर त्यात फरक कसे होत गेले याविषयीही उत्सुकता आहे.
लेखासोबत संदर्भग्रंथही दिले तर दुधात साखर.