'या गंगेमधि गगन वितळले' - फुलोंकी घाटी, हेमकुंड (२)

Submitted by रैना on 21 August, 2011 - 08:53

http://www.maayboli.com/node/28141 भाग (१)

हृषिकेश ते पीपलकोटी
Landscape.JPG
हे खरे म्हणजे पीपलकोटी नंतरच्या रस्त्यावर कुठेतरी काढले आहे.

भल्या पहाटे उठून आवरले. पहाटे साडेचार ही उठण्याची वेळ आयुष्यात फारच कमी वेळा पाहिलीये. बोचकी बाहेर काढून रकसॅक पुन्हा भरणे हा 'सोहळा' होता आणि सगळ्यांच्या पिशव्यांचा कचकचचकचक आवाज.. परमेश्वरा!!!! जिथे पाहावे तिथे प्लॅस्टिकचे बोचके होतो खोलीत. तिघींचे सामान. आणि I swear की सामानाचा mass फुगला होता. Jack in the box सारखे ते कसेबसे कोंबून सॅकचे टोपडे बांधले, तो साहेब अर्ध्या लोकरीच्या जॅकेटात दिसले.
म्हणजे??????? "थंडी असणार काय रे? <आत्ताच तर कोंबले ना ते भयाण सामान. >
थंडी नाहीये. ते मावत नव्हते म्हणून अंगावर घातले. <अहाहा. काय बरं वाटलं ऐकून. ट्रेकर लोकांचे सामान पण अस्सेच वागते वावा!! >
माझेही सामान फुगले आहे.
बस मग आता त्याच्यावर! Lol
नाही तेवढी वेळ नाही आली अजून. कदाचित उद्या तसे करावे लागेल."

पहिले शैलजा साडेचारला, मग मी वीसेक मिनिटानंतर आणि मग काही वेळाने स्वाती. हा उठण्याचा आणि आवरण्याचा क्रम पुढे बहुतेक तसाच राहिला. निघताना स्वातीची पर्स राहिली खोलीत ती कर्मचार्‍यांनी आणून दिली. खरे सांगायचे तर आश्चर्य वाटले. खाली उतरलो तर एका मुलीच्या हातात 'Contemporary world poetry' पाहिले आणि दिल खुश हो गया. भिडस्तपणा उतू गेला, चाळायला मागू शकले नाही लगेच. एखादीच्या साडीकडे चोरून चोरून बारकाईने पाहावे तसे त्या पुस्तकाकडे पाहून घेतले दिवसभर. टपावर सामान बांधण्याचा कार्यक्रम आटपला आणि आपण इथून खरंच पुढे जाणार असल्याची खात्री पटली.

'गणपतीबाप्पा मोरया' च्या गजरात छोटी बस निघाली. गंगा दिसेल का रस्त्यात असा बावळट प्रश्न कोणीतरी विचारला आणि आमची सोय केली. (अशी सोय इतरांनी केलेली बरी असते) 'गंगाच गंगा दिसेल आता' असे उत्तर आले. मध्येच एक ओढाछाप काहीतरी गेले. 'ही गंगा आहे?' ला उत्तर 'नाही, अरे.. काहीतरी मान आहे की नाही गंगेला.. याला नाला म्हणतात! '
Suryaphule.JPG
आधी गाज ऐकू आली आणि मग गंगामैय्या दिसली, ती पुढे सगळीकडे दिसत राहिली. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी. समुद्राच्या गाजेला एक आवर्ती नाद वाटतो, सम गाठणार बघ आता.. असे वाटते. गंगेच्या गाजेसाठी समर्पक असे शब्द मला सापडत नाहीयेत. पण तालात न बसणारा नाद वाटला एकंदरीत. खळ.. खळाळ.. कुठे संथ, कुठे रौद्र, कधी झिरमिळ, कधी तुफान, कुठे अवखळ. गंगाकिनारे वगैरे overrated वाटायचे, तो माज क्षणात उतरला. यात नकळत झालेल्या हिंदू संस्काराचा पगडा किती आणि किती खरे ते माहीत नाही. (खंडेराव, I owe you one, but can you please let me look and not worry about it? ) डोळे दिपले म्हणण्यापेक्षा मन नक्कीच दिपले. पण म्हणूनच ते खरे नसावे का? याचे उत्तर माहीत नाही. केवळ काही दिवसात शोधणार काय डोंबल!

नजरेच्या टप्प्यात आवाका दिसत असूनही दिपवावे आणि लुभवावे ते नद्यांनी. त्यावरील झुल्यांनी आणि पुलांनी. दोन काठांना सांधणारे ते पूल सुद्धा कसे असावेत. कमानदार. त्या आकारांच्या वळणांवर, घाटांवर मन थबकून राहावे.
'झुले' तर दूरून असे भासले की जणू कृष्णाला याच झुल्यांवरून झोके दिले असावे कधी काळी. पलुस्करबुवांचे ' बढैय्या लावो, लावो री लावो, लावो री आज,सुघड घड पलना' आठवले.
Gangatat.JPG

मध्ये आम्ही गंगेकाठी एका ठिकाणी न्याहरीला थांबलो. (तिथे टॉयलेट या प्रकाराला सामोरे जावे लागले. कसे आहे ? यासाठी आलेले प्राचीचे उत्तर मला फार आवडले. 'ठिक आहे गं, अशा ठिकाणी जसे असणार तसेच आहे, पण अगदीच वाईट नाही.' That's the spirit. आणि ते स्पीरीट बाळगले नाही तर या देशात बाहेर पडायची सोय नाही. असो. तिथे आत कडीच नव्हती. गाणे म्हणावे का वगैरे वर विनोद झाले.)

अप्रतिम सुंदर ठिकाण आणि अप्रतिम सुंदर पनीर पराठा खाल्ला. लोण्याएवढे मऊ पनीर होते अक्षरश: आणि सोबत मिरमिरे दही. रसवंती तृप्त झाली.
दुसर्‍या एका ठिकाणी एका पायपातून पाणी येत होते आणि एक बाई कपडे धूत होत्या. डायवरांनी तिथे थांबवले म्हणून आम्हीही पाय मोकळे करून घेतले. ते पाणी क्रेझी होते. अक्षरश: गारेगार आणि गोड चवीचे. एक क्षण कपडेधुतलेलेच पाणी पुन्हा रिसायकल करून येते का काय असे वाटले खरे (दुष्टशंकासुरदॉटकॉम), पण साहेब म्हणाले 'पहाडांमध्ये एवढे कष्ट कोणी घेत नाही गं.. वरून कुठून तरी पाण्याचा स्त्रोत आहे तो सहजसाध्य म्हणून इथे आणलाय आवारात बस..'
पण मग हे पाणी कुठे जाते? पुन्हा कुठल्यातरी गंगेच्या प्रवाहात?पण मग ते तरी कोणीतरी पीत असेलच ना ?..
GarudGanga 2.JPG
माझ्या मानसचित्रात गंगा म्हणजे नुसते घाट (आणि अस्वच्छता) असेच असायचे आणि एक नुसती एक विशाल waterbody. हे तर घोर लाजिरवाणे अज्ञान ते समजले. देवप्रयागला अलकनंदा आणि भागीरथीचा संगम पाहिला. चक्क षोडशवर्षीय अलकनंदा आणि धीरगंभीर भागीरथी वेगवेगळ्या स्वभावाच्या दिसल्या (की भासल्या?), नंतर त्या आख्यायिका ऐकल्या. दृष्टिभ्रम असेल तर असो बापडा! भारावले हे कबूल करणे जड जात असले तरी सध्यापुरते ते खरे आहे. मुलीकडून (लहान मुलांकडून) हेच तर शिकायला मिळते, त्या क्षणापुरती ती भावना विलक्षण खरी असते. झेन तरी हेच आहे ना?
आता प्रश्न उरतो की एवढ्यातच कसे भारावलात? काय थिल्लरपणा आहे हा. तर ते एक असो.

तर..देवप्रयागी प्रचंड उकाडा, हिरवाई, पहाड, खाली अलकनंदा-भागीरथीबाईंचा संगम, लालनिळ्यापांढर्‍या रंगांच्या इमारती, मंदिर... याचे एक मानसचित्रं कायमचे स्मरणात राहील. इच्छा आकांक्षा मोह आसक्ती जिथे अर्पण करायचे त्या नदीला वलय प्राप्त झाले नसल्यासच नवल. पंचप्रयाग आणि गंगा circuit एकदा कधीतरी पूर्ण करणे, हे मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणार्‍या इच्छायादीत दोनचार स्थळांना ढुशा देऊन आपसूक जाऊन बसले. तिथून घरी फोन केला तर आमचे homebred (आगाऊ) श्रीकृष्ण म्हणाले 'गंगेच्याकाठी घर कशाला आठवतेस आणि? आणि फोन कितीवेळा करतेस, पहा ना व्यवस्थित, फोटो काढ नीट!!! जिथे आहेस तिथे एन्जॉय कर जा'.. झाले यांचे गीतासार सुरू. कप्पाळाला हात मारला. मी ही येवढी ढिम्म तर ही गत, आणि एखादी 'कपफोडलानाहीसना, गॅसपेटवलासकानीट' वाली मधुबाला असती तर कळले असते चांगले.
'मुलगी जेवली का? ' आणि 'माझी आठवण काढली का' या प्रश्नावर अनुक्रमे 'हो' आणि ' फारशी नाही' (फारशी नाही म्हणजे 'हो' की 'नाही. ' एकदा की दोनदा? ) असेच मोघम उत्तर आले, त्यामुळे अजूनच गंगादर्शन चढले असावे || गंगार्पणमस्तु ||
'या गंगेमधि गगन वितळेलेले' कधी पाहिलेत तुम्ही मर्ढेकर? तुमची बहुत याद आली मात्र.. तुमचे शुभाशुभाचे किनारे फिटले आमचे मात्र उफाळूनआले, आणि 'लोकगंगा' आयुष्यात कधी पाहायला मिळेल?

ठिकठिकाणी उतराखण्ड सरकार ' देवभूमि' में आपका स्वागत है हे फलकांद्वारे निदर्शनास आणून देत होते. हे बरंय! यांची ती देवभूमि, खाली God's own country आणि आम्ही आपले राकटदेशाकणखरदेशादगडांच्याही देशा!

बसमध्ये आम्ही भेंड्या खेळत होतो, हळूहळू सगळे खुलत गेले. त्यानंतर एकाही गाण्याची पुनरावृत्ती न करता पुढे काही दिवस प्रवासभऽर खेळत होतो. जी काय धम्माल आली. जुनी म्हणू नका, नवी म्हणू नका, अभिजात म्हणू नका, छपरी म्हणू नका.. हजारएक तरी गाणी घोळवली असतील ग्रुपमध्ये. कित्येक गाणी कित्येक वर्षांनंतर माणकांसारखी लखलखली. कुठल्या सांदीकोपर्‍यात पडून होती कोण जाणे. लोकांनी मनात शिव्या घातल्या का माहीत नाही. पण 'तुम्हा तो (प्रवासी) शंकर सुखकर हो' हे गाण्यांशिवाय शक्य होत नाही. प्राची आणि मी घसे फोडून घेतले अक्षरश:, मेमरीची हार्डडिस्क क्रॅश व्हायची वेळ आली शेवटी शेवटी. दोन प्राची, राहुल, मी अशा आम्हा चौघांची ती 'भूले बिसरे गीत'वाली टीम आणि विरुद्ध बाजूची ती 'ऑलटाईमग्रेटछपरी' गाण्यांची टीम. निशांत नावाच्या अतिशय गमत्या मुलाला तर साष्टांग दंडवत! त्याची छपरीगाणेरिकॉलकपॅसिटी केवळ अफाट होती. शैलजा आणि स्वातीने त्यांच्या टीमला चांगलाच टेकु दिला. साह्येबांनाही मानावे लागते. त्याच्या उत्साहालाच माझा सलाम. गंमत म्हणजे देवप्रयागी आम्ही थांबलो तेव्हा 'ने मजसी ने' सुरू होते आणि 'हा व्यर्थ भार विद्येचा' अशा समर्पक ओळीवर फिल्मी योगायोगाने स्थिरावलो. (त्या ओळीने जो काय जीव खाल्लाय पूर्ण प्रवासभर. ) 'ने मजसी ने' हे पिताजींचे प्राणांतिक आवडते, गेल्या कित्येक वर्षात व्यवस्थित बसून ऐकलेही नव्हते. का? तेही आठवत नाही.

Dagad.JPG
कोणाचे काय तर कोणाचे काय. प्रवासभर ह्या दगडाने वेड लावले. बर्‍याच जणांना विचारले, पण कोणाला नाव माहीत नव्हते. हा कुठला दगड? सँडस्टोनकी ल्युकोग्रॅनाईट? आपला पूर्ण प्रवास हा शिवालिक पर्वतरांगांमधून होतो. घरी आल्यावर पहिले काम केले ते हिमालयाबद्दल वाचले. (दगडांबाबत फार उजेड पडला असे नाही, पण भूगोल त्रिमित पाहून आल्यावर माहिती वाचायला मजा येते एकुणात. हा शाळकरी उत्साह, कोचरेकर मास्तर अ‍ॅटिट्युड वगैरे जे काय infradig असेल ते असो. )विकीवर सुद्धा सुरेख माहिती आहे. ती तरी कमीतकमी वाचायलाच हवी. ह्या दगडाचे काय ते नक्की समजत नाही, एकाच वेळेस रंगामुळे नाजूक आणि अवाढव्य आकारामुळे कणखर वाटतो आणि गंगेच्या पाण्याचा रंगही अगदी याच, याच रंगाचा वाटतो ठिकठिकाणी. लिंबूसरबताचा रंग. हा फोटो मला त्यासाठी आवडतो. ते सगळे रंग म्हणाले तर विसंगत, म्हणाले तर एकसंध. अवाढव्य दगडांवरून ती गवतांची हिरवीकंचपाती अशी काही जीवघेणी दिसतात, आणि ते निळंभोर आकाश तर अविश्वसनीय. असे वाटते की ते नक्की तिथेच असायला हवे ना? तसेच निळे?
मध्येच स्वातीने मला अर्धे डोंगर पाऊस झाल्यामुळे काळपट दिसत होते आणि अर्धे असे.. ते दाखवले. फार सुरेख होते ते दृश्य.

bayka.JPG
लँडस्लाईड (ढलन हा एक गोजिरवाणा हिंदी शब्द लिहिलेला सापडला, इथून पुढे तोच वापरूयात) मुळे रस्ते बंद झाले आणि आम्ही चमोलीमधील गौचरया ठिकाणी काही तास अडकलो. नशीबानेच केवळ जेवण झालेले होते आणि मग अडकलो. विस्तीर्ण कचरा असलेल्या सुरेख हिरव्याकंच मैदानांवर लोकांनी पथार्‍या पसरल्या. लीडरने साधा वैतागसुद्धा नोंदवला नाही. त्यामुळे कोणीच काही म्हणाले नाही. 'लँडस्लाईड होतच असतात इथे, फक्त आपल्याला लागतात की नाही एवढाच प्रश्न असतो'!! तो तेवढ्यात केसही कापून आला. आम्ही सगळ्यांनी काही तास जमेल तसे मनोरंजन करून घेतले. पत्ते खेळणे, फोटो काढणे, फिरून येणे, चांभारचौकशा करणे वगैरे. शैलजाने एका शाळेच्या दारवानाचे उत्कृष्ट फोटो काढले. त्याने लगेच आम्हाला बसायला म्हणून झोपडीतले ब्लँकेट देऊ केले. लाज वाटली अगदी. ते घेतले नाहीच अर्थात पण भरून आले जरा. आपण देऊ कधी कोणाला इतक्या सहजतेने?

तिथे फारच गोबर्‍या आकारांच्या मैनासदृश पक्ष्याचे घरटे दिसत होते. (SLR नसल्यामुळे फोटु काय येणार डोंबल). नक्की मैना होती असे नख्यांवरून वाटेना. घरी फोन करून विचारावे तर पुन्हा गीतासार कोण ऐकेल.. मुलगी झोपली असेल की नाही कोण जाणे..हापिसमध्ये काय आग लागली असेल?..दूरून शिखरे मधूनच दर्शन देऊन जात होती...
जेवायला थांबलो होतो तिथेही दहाएक पहाडी मैना (आपल्याकडे दिसतात त्याहुन बर्‍याच गोबर्‍या) एका भिंतीवर टेकल्या होत्या. जो काय नखरेल असतो ना हा पक्षी. त्यांचे पदलालित्य पाहुन घ्यावे नुसते आणि थव्यात उडतात तेव्हा पंखांच्या टोकांशी जे पांढरे एवढेस्से गोऽड फलकारते ना..रंगsymmetry फार सुरेख.

Purush.JPG
बसमध्ये येऊन डायवरांशी गप्पा कुटल्या. त्यांच्यामते ' आज तक मै कभी जोशीमठ सात बजेसे पहुच नही पाया. आज पहली बार पहुचने जा रहा था.. तो इधर अटक गये'.. रात में चलाना ठिक होगा क्या? 'क्यों नही? हम तो २ बजे भी जा चुके है'.. आधीच ते तसले रस्ते. ख त र ना क.. त्यात डायवरसाहेबांना प्रत्येक छोट्या गाडीवर 'पर्सनल- सी- खुन्नस'' होती. एखादीही छोटी गाडी याच्या समोर आली की बरोबर वळणांवर ओव्हरटेक करायची जबर्‍या हौस.. सहा इंचांवर खाई, आणि खाली गंगामाता.. हृदयगती वाढवत मार्गक्रमणा सुरू होती.
त्यात रात्री हे महाराज चालवणार म्हणजे काय तो आनंद वर्णावा! माझ्या डोस्क्यात आगीचे बंब घणघणू लागले !
शेजारी एका ट्रॅक्समध्ये बेवड्यांनी कर्कश्श गाणी लावलेली. डोक्यात गेली. आधीच हे रस्ते असे, शुद्धीत चालवणे सुद्धा कठिण आणि हे लोकं पिऊन चालवणार.
बसमध्ये दुर्गेश/अपूर्व/ शैलजा, मी, डायवरांचा छोटा भाचा गप्पा कुटत बसलो होतो. भाच्याची इथ्यंभूत माहिती काढुन झाली. निशांतने पत्ते विकत घेतले आणि आमच्यातला एक ग्रुप पत्ते कुटत बसला होता. समोर सर्व स्त्रीपुरूषांच्या पथार्‍या पसरलेल्या. तिकडे बाजूला डांबरांचे ड्रम आणि कुंपणाच्या तारा ठेवलेल्या त्याकडे साहेबांनी लक्ष वेधले. ती त्यांची आपत्कालीन व्यवस्था.. ढलन मध्ये रस्त्यांच्या डागडुजीसाठी. एवढेस्से गाव, पण तयारीचे कौतुक वाटले. उत्तराखण्ड सरकारचेही.

वाटेत उत्तराखण्ड सरकारच्या फलकप्रतिभेला बहर आलेला दिसला जागोजागी. 'ईश्वर को याद करो' (यावर आम्ही फारच विनोद केले. एकतर डायवरसाहेबांच्या कृपेने ईश्वर को बहुत याद किया थाच), 'चढने वाले वाहन को प्राथमिकता दिजीए' वगैरे साळसूद फलक लई वाचले. लिहीणार्‍याचे अर्धचंद्राशी कायतरी वाकडे होते.' हार्न', 'वार्न' वगैरे. नंतर स्वातीने आणि साहेबांनी लै भारी फलक सांगितले. ' pay attention to the curves'. राहुलने तेवढ्यात सॉलिड मारला 'लिहिणारा फाजील आहे'.
हे असले फलक डायवर सोडून पासिंजरच वाचत असत्यात, यावर सर्वांचे एकमत झाले. डायवरने फलक वाचण्यापुरते जरी डोळे वळवले तर कपाळमोक्ष निश्चित, असले ते चित्तथरारक रस्ते!

तर एकदाचा जायला ग्रीन सिग्नल मिळाला, तेवढ्यात ३ रमण्या कुठे गेल्या होत्या त्यांची शोधाशोध, माफक चिडचिड वगैरे झाली, सगळ्या वाहनांची चार तासांची गर्दी झाल्यामुळे तिथेही वाहतूक तुंबणार अशी भीती वाटत होती, पण फारशी नाही तुंबली. भयानक रस्त्यांवर, खतरनाक वळणांवर, अंधारात, चिखलात, दगडातून बस पुढे चालली होती, सोबतीला माउथ ऑर्गनचे सूर होते, काही विरळ गप्पा, स्वच्छ हवा आणि रातराणीचा गंध. 'भुतांच्या गोष्टी सांगा रे' ची टूम निशांतने काढली, पण चारदोन तुरळक कथांपलिकडे गाडी गेली नाही. बाहेर काही दिसत नव्हते ते एका परीने बरेच होते. पिपलकोटीला पोचलो. तिथे एक शॅक दिसत होती फक्त. 'या शेडमध्ये राहायचंय की काय' असे स्वातीने हताश स्वरात विचारले. तिला सर्वांनी बरेच पिडले. नाही नशीब, खोल्या होता खालती तळघरात.
टपावरून सामान निघाले. सुजयच्या बॅगेतून तिनेक लिटर पाणी निघाले. आणि एका मुलीच्या बॅगेतूनही. त्याने फारच स्पोर्टिंगली घेतले. कौतुक वाटले. शैलजाने दोरी दिली ती घेऊन खोलीत कपडे वाळत घातले. साधी कुरकूरही नाही. पोरीने मात्र.. असो. पोरींने अजून म्हणजे रात्री बाहेर कपडे वाळत घातले, ते अर्थातच सर्व भिजले सकाळपर्यंत.नंतर रामायण!
बाकीच्या सर्वांच्या सॅक कोरड्या होत्या ते नशीब!!
या वेळेसपर्यंत सतत प्रवासाचा तिसरा सलग दिवस होता. पोटात काहीतरी ढकलायचे म्हणून ढकलले होते, अंग थोडे दुखायला लागले होते, आणि थकवा, सतत हलत असण्याची, पुढे जातोय की मागे अशा हिंदोळ्यावरची ती खास प्रवासी भावना पसरून राहिली होती. गारढोण पाणी होते त्यामुळे अंघोळीची गोळी झिंदाबाद!

मुशोसाठी आभारः अरुंधती कुलकर्णी
http://www.maayboli.com/node/28514 - Part 3

गुलमोहर: 

Lol मस्त फोटो!
लिखाणाला रंग भरतो आहे! दोरी घेऊन जा हा आडोचा सल्ला. तिचे बरेच सल्ले कामी आले, बर्‍याचदा तिला दंडवत घातला मनातल्या मनात. Happy

तू दोरी दिल्यावर मी खरंच अवाक झाले होते पण शैलजा. आडो- आम्ही तुझे बरेच सल्ले शिरोधार्य मानले गं. Wink
कापुर हा बहुमोल सल्ला शर्मिलाचा.

हे बरंय! यांची ती देवभूमि, खाली God's own country आणि आम्ही आपले राकटदेशाकणखरदेशादगडांच्याही देशा! >>>> Lol

छान झालाय हा भाग पण.... Happy

मस्तच ... प्रत्यक्ष ठिकाणांबद्दल documentary नसलेले नि खरच "प्रवासा" बद्दल लिहिलेलेयस. अशीच फिरत राहा नि मुख्य म्हणजे लिहित राहा.

छान

सुंदर Happy
गंगेबद्दल असं काहीतरी वाटावं, किंबहुना गंगा नदीबद्दल 'गंगा नदी' म्हणून काहीतरी स्वचिंतन घडावं अशी माझीही इच्छा आहे. त्यासाठी अश्याच कुठल्यातरी ठिकाणी जावं लागेल. तीर्थक्षेत्री माझ्या हातून ते होणे नाही. (कारण मुळात तीर्थक्षेत्रच माझ्या हातून घडणे नाही.)

रैना, मस्तच!

पुर्वी आम्ही चार धाम प्रवास केला होता त्यातले ड्रायव्हर काकाही सॉल्लिड तरबेज होते .. रात्री कळायचं नाही पण सकाळी उठून बघितलं की धडकी भरायची की कसे काय अंधारात आलो ह्या रस्त्यावरून! Happy

टपावरचं सामान भिजणे! खरंच ज्या दोघांचेच भिजले ते कमनशिबी! मी असते तर पूर्ण गृप ची वक्रदृष्टी कायमची ओढवून घेतली असती! Happy

मस्त चालू आहे वर्णन!

अहाहा. सुंदर वर्णन! खुपच मस्त लिहिलं आहेस. गंगेबद्दलच्या भावनाही खासच!

तु लिहिलेयस म्हणुन त्या दगडांसाठी गुगलवर शोधल्यावर हे "SEDIMENTARY ROCKS" अशी माहिती मिळतेय. इथे आणि इथे

रैना, तुझ्या आधीच्याही लेखात कापराचा उल्लेख होता म्हणून. कापराचा काय उपयोग आहे? मला माहित नाही म्हणून विचारतेय.

आडो- अगं धाप लागली/ श्वासाचा त्रास होत असला की कापुर हुंगला की आराम पडतो, असे शर्मिलाने सांगीतले होते. त्याचा फार उपयोग झाला.

सशल- खरंच सकाळी ते रस्ते पाहिले ना की झीट येते. Lol

सावली- धन्यवाद. वाचते. सेडिमेंटरी तर असणारच ना. पण तो प्रकार झाला ना? दगडाचे नेमके नाव काय? की माझ्या बेसिक्स मध्ये लोचा आहे?

लोक्स- होसलाअफजाई के लिये शुक्रिया. कुठल्याही क्षणी बास आता, बोर होतय असे वाटले तर सांगा नक्की.

ललिता- सेमपिंच पण तीर्थक्षेत्रे कटाप करुन नुसते काठाकाठाने जाणे असे करता येईल, पण मग ते अर्धवट राहील. लडबडलेली तीर्थक्षेत्रे आणि पाण्याचे भारूड हे दोन्हीही खरे आहे. त्यात आख्यायिका बेमालूम सुरेख गोवल्या गेल्या आहेत. जे आहे ते त्रिमीत अनुभवायला हवे, तर कदाचित कधीतरी काहीतरी गोषवारा हाती लागेल की काय असे वाटले.
http://indiandiaspora.in/spiritual-journeys/char-dham-yatra-badrinath-ma...
हा ट्रॅक पहा. फार सुरेख आहे.

फोटू, वर्णन सगळे मस्तच. Happy
>>छपरीगाणेरिकॉलकपॅसिटी
अल्ताफ राजाचे 'हम तो ठहरे परदेसी' आठवले. Proud

वा ! काय मस्त लिहलंय ! आता माझ्या यादीत नसलेली (तीच ती "जीवन पूर्ण होण्यासाठी केलेली यादी") ही ठिकाणं घातलीत. ही ठिकाणं आधीच का घातली नाहीत असं वाटतय हे वाचून.

Pages