खजुराचे लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 August, 2011 - 14:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो सिडलेस खजुर किंवा आख्या खजुराच्या बिया काढून
दिड ते दोन वाट्या सुक्या खोबर्‍याचा किस.
५० ग्रॅम बदाम
२ छोटे चमचे खसखस
३ चमचे तुप

क्रमवार पाककृती: 

खजुराचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या.

बदाम कापुन घ्या. खसखस निवडून घ्या.

खोबर्‍याचा किस मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या.

आता भांड्यात तुप घालुन ते गरम झाले की खसखस घाला. मग त्यावर बाकिचे सगळे साहित्य म्हणजे खजुर, बदाम आणि भाजलेल खोबर घाला.

आता हे सगळ मिश्रण ५ ते ७ मिनिटे म्हणजे चांगले गरम होईपर्यंत मिडीयम गॅसवर ठेवा. जास्त शिजवण्याची गरज नाही.

भांडे खाली उतरवा व लाडू वळा. झाले लगेच तय्यार पौष्टीक, लज्जतदार, सोप्पे खजुराचे लाडू.

वाढणी/प्रमाण: 
एका वेळी एक.
अधिक टिपा: 

ह्याच साहित्याच्या खजुराच्या वड्या व रोलही करु शकता.

हे लाडू करायला अगदी सोप्पे असतात. थंड गरम कसेही वळता येतात. खजुराच्या मऊपणामुळे ते पटकन वळतात.

तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकु शकता.

बाळींतिणिंसाठी पौष्टीक.

माहितीचा स्रोत: 
वहिनी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, भांड्यात तुप घालून ते गरम झालं की.... >> इथे तूप किती घेणं अपेक्षित आहे? आणि अजून एक बावळट प्रश्न साजूक तूप घ्यायचय ना? आणि गोडव्यासाठी अजून गुळ किंवा साखर अजिबात अ‍ॅड करायची नाहीये? Uhoh

बाकी वळलेले लाडू सुरेख दिसतायत बरं का. Happy एकदम तोंपासु Happy

मस्त दिसत आहेत Happy केले पाहिजेत या हिवाळ्यात. दक्ष्स, अर्थात सा.तू. च घ्यायचं. ३ चमचे लिहीलय वर Happy ह्याचं अन गोडाचे जागू उत्तर देईलच, पण माझ्या मते गोड काही लागणार नाही, खजुराचे पुरेसे गोड होईल. Happy

धन्स जागुतै... Happy

परवाच एकाने २किलो खजुर दिला आहे.... (तो ओमानला गेला होता, मीच मागवला होता १ किलो तरी तो १किलोची २ पाकीटे घेउन आला :स्मित:)

आणि बाकी जिन्नस भरपुर आहेत.....

प्रयत्न करतो...:अओ:

ते लाडु मशीनीत तयार होउन आल्या सारखे वाटत आहेत्...आणि आकारही प्रमाणित आहे..... Happy

गोडव्यासाठी अजून गुळ किंवा साखर अजिबात अ‍ॅड करायची नाहीये?>> नाही कारण खजूरच मुळात फार गोड असतो. जागुतै सांगतीलच. सोपे आहेत करायला. मी भाजके खोबरे खाउन चूप बसणार. Happy

मस्त आणि सोपे लाडू Happy

अमा, तू भाजकं खोबरं खा, वर २-३ खजूर, १ बदाम, चिमूटभर खसखस खा आणि नंतर चूप बस Proud

दिनेशदा, अनु, आश, लाजो, वत्सला धन्यवाद.

आशुतोष नक्की. त्यातले सहा किलोचे लाडू मला Lol

दक्षिणा अग मुळात खजुर खुप गोड असतो. त्याला वेगळे गोड घालण्याची गरजच नाही. मी साजूकतुपच वापरले आहे. ३ चमचे तुप मी वर लिहीले आहे.

ज्यांना खोबरे खायचे नाहीये (हाय कोलेस्टरॉलवाले, हार्ट पेशन्ट इ) त्यांच्यासाठी अजून एक पद्धत-
दोन चमचे तूपावर खजूर परतून घ्यायचा. हार्ट पेशन्टना बाकी सुकामेवा देऊ नये, पण अक्रोड चालतो (डो. च्या सल्ल्यानुसार). तोही परतून घ्यायचा तूप न घालताच. आणि खोबर्‍याऐवजी अगदी कमी, चमचाभर तूपावर कणीक खमंग परतायची. खोबरं/ कणीक हे लाडू बांधायलाच लागतात, मूळ चव खजूराची लागतेच.
बारिक केलेल्या खजूराचे लाडू वळले जात नसतील, तर खजूर कोमट झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्यायचा.
अतिरिक्त साखर लागत नाही. खजूर खूप गोड असतो.
झटपट आणि पौष्टिक लाडू होतात खरंच. आणि पाकाबिकाचीही भानगड नाही Happy

बेहद्द आवडती पाककृती आहे माझी.

पण तरीही, ही प्रकाशचित्रे आणि डिशभर लाडू पाहून उडी मारणे अनिवार्यच झाले.

जागूताई,

उत्तरोत्तर जास्तीत जास्त आरोग्यकारक, पर्यायी पदार्थांच्या उत्तमोत्तम पाककृती, सादर करण्याखातर, मायबोलीने तुम्हाला "आरोग्यकारक सुगरण" असा किताब द्यावा अशी मी शिफारस करत आहे!

मस्त!

पौर्णीमा नविन रेसिपी दिल्याबद्दल धन्स.

चिउ, साधना, अरुंधती, नंदीनी धन्यवाद.

लाजो मस्त.

गोळेजी धन्स. तुमचा आशिर्वाद हवा आहे.

मस्त फोटो लाडुंचा Happy

मिळुन येण्यासाठी खोबर्‍या ऐवजी थोडासा डिंक तळुन बारीक करुन घातला तरी चालते.

मस्त दिसतायत.

या लाडवांवरून एक भजन आठवलं ... अर्ज कीजीये ....

खजुराचे वळते लाडू, सुगरण जागू बाई, सुगरण जागू
(म्हणे) लाडक्या या नणंदेसाठी काय काय रांधू Proud

आरती अग हे लाडू अगदी सहज मिळून येतात. खजुर गरम केला की तो नरम पडतो आणि भराभर लाडू वळतात.

मामे Lol

खजूर गार झाल्यावर कडक होत नाही का?? कारण एकदा तसे झाल्याचा अनुभव आहे.. आणि तसे होऊ द्यायचे नसेल तर काय करावे लागेल..

हिम्स, तूपाचे प्रमाण जास्त झाले असणार. खजूर घालायच्या आधी तूप जास्त गरम झाले तरी खजूर कडक होइल. (असे आपले मला वाटते :फिदी:)

सोप्पे आणि पौष्टिक लाडू आहेत.

हिमस्कुल खजुर थंड झाले तरी त्याचा मऊपणा थोड्याच प्रमाणात कमी होतो. ते वळता येतात तसेही. जर नसतील वळता येत तर परत थोडे गरम करत परतवायचे. पहिल्या वेळेलाही गरम करताना जास्त शिजवायचे नाहीत. गरम होउन नरम पडण्या पर्यंतच तापवायचे.

सिंडरेला म्हणते तशीही शक्यता असेल.

अमी Happy

खजुराचे वळते लाडू, सुगरण जागू बाई, सुगरण जागू
(म्हणे) लाडक्या या नणंदेसाठी काय काय रांधू >>वा वा मामी क्या बात हे!

जागुताई,परवा हे लाडु केले होते,१५-२० लोकांचं गटग होतं.एकदम हीट! धन्यवाद!

Pages