शब्द...

Submitted by सुप्रिया जाधव. on 11 August, 2011 - 01:02

*

भले शब्द होते, बुरे शब्द होते
कसा अर्थ लावू? खुजे शब्द होते !!

*

मधा घोळवूनी निघाले तरीही,
कडू कारल्यासम तुझे शब्द होते !!

*

कितीसे हवेसे, कितीसे नकोसे,
जिव्हारी खुपावे ’सुळे’ शब्द होते !!

*

कधी भावनांचा लपंडाव खासा,
कधी तप्तलाव्हा फ़ुटे!... शब्द होते !!

*

तुझ्या युक्तिवादा पुढे हारलेली,
कसा जाब मागू?... लुळे शब्द होते !!

*

लढाया जगाशी कधी शस्त्र झाले,
कधी ढाल माझी, मुके शब्द होते !!

*

-सुप्रिया (जोशी) जाधव

गुलमोहर: 

शब्द्,या आधी प्रकाशित केलेल्या कवितेच्या संपादनात जावून तुम्ही त्याच कवितेला ''मराठी गझल'' विभागात समाविष्ट करु शकता.

ओके...

माहीत नव्हते....
धन्यवाद सर.