मोहन आपटे का उल्टा चष्मा..!!!

Submitted by A M I T on 9 August, 2011 - 08:09

"श्या..! हा काय चष्मा आहे? मी म्हणतोय, याला चष्मा तरी का म्हणावं? नुसत्याच सोड्याच्या बाटलीच्या तळाकडील जाडसर काचा फ्रेममध्ये फीट केलेल्या वाटताहेत?" असं म्हणून मोहनरावांनी तो चष्मा फरशीवर आपटला. चष्माच्या काचांचं तुकड्यांत रूपांतर झालं. दूकानात काम करणारी कामगार मंडळी भूत पाहील्यासारखी मोहनरावांकडे पाहत होती. त्यांनी चष्म्याच्या काचांना दिलेल्या उपमेला हसावं की, त्यांनी चष्मा फोडला म्हणून रडावं? या पेचात तेथील कामगार पडले. असा विक्षिप्त माणुस ते प्रथमच पाहत असावेत.

मोहन आपटे हे तसे विक्षिप्त आणि लहरी माणुस. त्यांच्यासमोर उणे-अधिक बोलण्याची किंवा त्यांच्याशी वाकडं वागण्याची छाती त्यांना पुरतं ओळखणार्‍या कुणातही नव्हती. अगदी शेजारीही त्यांना काहीसे वचकूनच असत. मग त्यांच्या पत्नी प्रभाताई तरी याला कशा अपवाद असतील! मोहनरावांकडून कधी एखाद्या प्रश्नाचं सरळ उत्तर मिळेल तर शपथ..! ह्या असल्या माणसाशी संसार करायला लावून देवाने आपल्यावर सुड उगवला आहे, ही प्रभाताईंची धारणा. तसं मोहनरावांनी त्यांना संसारात काही कमी पडू दिलं नाही. पण मोहनरावांकडून प्रेमाच्या दोन शब्दांसाठी मात्र प्रभाताई नेहमीच तरसल्या.

मोहनरावांनी दूकानात प्रवेश केल्यापासूनचा फोडलेला तो चौथा चष्मा होता. 'या वेगाने हा माणूस नापसंत चष्मे फोडत गेला तर... आपलं दूकानदेखील काचेचं आहे.' हे लक्षात येताच दूकानाच्या मालकाने स्वत: या प्रकरणात पुढाकार घेतला.
"अरे, ते काल नवीन आलेले चष्मे दाखवा ना साहेबांना." मालक दूकानात काम करणार्‍या एका कामगाराला म्हणाला.
त्या कामगाराने काल आलेले बरेच नवीन चष्मे बाहेर काढले. त्यातील एक चष्मा त्याने मोहनरावांपुढे धरला.
"घ्या साहेब. हा ट्राय करा." मालक.
चष्म्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून मोहनरावांनी तो चष्मा आपल्या डोळ्यांवर चढवला आणि क्षणमात्र त्यांना धक्का बसला. त्यांचा श्वासोच्छवास तीव्र झाला. त्यांच्या मेंदूला झिणझिण्या येऊ लागल्या. ते अगदी घामाघूम झाले. सारं दूकान आपल्याबोवती गरगर फीरतयं.. असं वाटत असतानाच अचानक भोवळ येवून ते फरशीवर पडले.
काही वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. पाणी प्यायल्यावर त्यांना थोडी हुशारी आली. ते बरेच सावरले.
"असं अचानक काय झालं आपल्याला?" नुकताच घडलेला हा भयानक प्रकार पाहून घाबरलेल्या मालकाने चौकशी केली.
"काही कळालं नाही." मोहनराव आपल्या चेहर्‍यावरील घाम पुशीत म्हणाले.
"मग घेताय ना हा चष्मा?"
"अं..! हो."
"साहेब, एक सांगू का? हा चष्मा केवळ तुमच्या डोळ्यांकरताच बनलाय." मालकातला विक्रेता जागा झाला.
"सध्या समाजाला चष्मा नव्हे, दृष्टीकोन बदलण्याची खरी गरज आहे." असं म्हणून मोहनरावांनी तब्बल तासभर 'समाज आणि दृष्टीकोन' या विषयांवर विनामुल्य व्याख्यान दिलं.
मघाचा चार चष्मे फोडणारा हाच का तो माणूस? अशी शंका यावी, इतका बदल अचानक या माणसात कसा काय झाला? या प्रश्नाने दूकानातील कामगार हैराण झाले.
एक नव्हे तर आपण फोडलेल्या चारही चष्म्यांचे पैसे चुकते करून मोहनराव दूकानातून बाहेर पडले.

*

दूसर्‍या दिवशी ऑफीसात जाण्यासाठी मोहनरावांनी लोकल पकडली. लोकलला नेहमीप्रमाणे तुडूंब गर्दी होती. काही वेळाने मोहनरावांना बर्‍यापैकी जाणवलं की, त्यांच्या डाव्या पायावर त्यांच्यापुढेच उभ्या असणार्‍या गृहस्थाने जोरात पाय ठेवला आहे.
"अहो, आता माझ्या उजव्या पायावरही तूमचा दूसरा पाय ठेवा. म्हणजे माझ्या डाव्या पायास तक्रारीचा मोका मिळणार नाही." मोहनराव डाव्या पायास होणार्‍या कळा सोसून त्या गृहस्थास म्हणाले.
गृहस्थाने आपले डोळे मोठ्ठाले करून एकवार मोहनरावांकडे पाहीले आणि...
त्याने आपला दूसरा पायही मोहनरावांच्या उजव्या पायावर ठेवला. त्यांना जे अभिप्रेत होतं त्याच्या बरोब्बर उलटं घडलं होतं. आता मात्र मोहनरावांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. तरीही दातांखाली ओठ दाबत कसेबसे त्यांनी ते सहन केले. एक चकार शब्दही ते त्या गृहस्थाला बोलले नाहीत.

पुढे आठवडाभर ते बेडवर पडून होते. प्रभाताईंनी अगदी मनापासून त्यांची सेवा केली. मोहनरावांच्या बोलण्यात कुत्सित शब्दांची जागा आता प्रेमळ शब्दांनी घेतली, म्हणून प्रभाताईही सुखावल्या होत्या.

"अहो आज किनई मी तुमच्यासाठी कोंबडीवडे बनवणार आहे." प्रभाताई वड्यांसाठी भिजवलेल्या कणीकात भरलेला हात तसाच घेवून माजघरात येत म्हणाल्या.
"कोंबडीवडे?" मोहनराव उडालेच. "म्हणजे त्या निष्पाप कोंबडीची हत्या करणार ना?"
"हो. म्हणजे कोंबडी कापणे, याला जर तुमच्या भाषेत हत्या म्हणत असतील तर तेच." प्रभाताई खाटीकाच्या आवेशात म्हणाल्या.
"हे राम..!" मोहनरावांनी क्षणभर आपले डोळे मिटले. "मी अहिंसेचा पुजारी आहे आणि मी जिवंत असेपर्यंत या घरातच काय, तर सबंध देशात हिंसा घडू देणार नाही." मोहनराव आपला चष्मा नीट करत म्हणाले.
प्रभाताई प्रचंड घाबरल्या. हरेक रविवारी मांसाहार करणारा हा माणूस आज चक्क अहिंसेची भाषा करतो, म्हणजे याचा अर्थ काय समजावा?
"अहो, आज सकाळीच इंग्लिश ढोसून आलात की काय?" प्रभाताईंच्या नाकाने आपली जागा बदलली.
"इंग्लिश. म्हणजे विदेशी..! आजपासून विदेशी बंद.. बंद... बंद..!" मुसलमानांत निकाहाच्या वेळी जसं 'कबूल' तीन वेळा म्हणतात, तसं मोहनरावांनी 'बंद'ची घोषणा तीन वेळा केली.
"अगं बाई..! खरचं..! म्हणजे आजपासून तूम्ही दारूला शिवणारही नाही? देवा, म्हणजे माझी भक्ती अखेर फळास आली तर..! ." प्रभाताईंचा उत्साह ओसंडत होता.
"आजपासून मी देशी पिऊन विदेशीवर बहिष्कार टाकणार..!" मोहनरावांनी उजवा हात समोर ठेवून प्रतिज्ञा केली.
"काय? म्हणजे मला आता इडीयट, रास्कल, ब्लडी फुल या इंग्लिश शिव्यांच्या ऐवजी कुल्टे, सटवे, चांडाळीनी या देशी शिव्या ऐकाव्या लागणार..!" एखाद्या हिंदी सिनेमात हिरॉईन आपल्या कानांवर हात ठेवून जसं 'नहीsssss' म्हणते, काहीसा तसाच अभिनय करून प्रभाताई म्हणाल्या.

दूसर्‍याच दिवशी प्रभाताईंनी ही घटना शेजारच्या शास्त्रीकाकांच्या कानी घातली.
"हम्म...!" शास्त्रीकाकांनी दिर्घ उसासा टाकला. "मला वाटतं त्यांनी महात्मा गांधींचं चरित्र वाचलं असावं."
"अहो, एक वर्तमानपत्र सोडलं तर त्यांनी कधी साधा चांदोबा हाती घेतला नाही. महात्मा गांधींच चरित्र तर दूरची गोष्ट..!" प्रभाताईंनी मोहनरावांची वाचीक पातळी चव्हाट्यावर आणली.
"नाही.. मग.... हां..!" शास्त्रीकाका एकदम काहीतरी आठवल्यासारखे म्हणाले. "आता समजलं..! काल केबलवर 'लगे रहो मुन्नाभाई' लागला होता. तो त्यांनी पाहीला असावा, आणि आता ते स्वत:ला संजय दत्त समजत असावेत."
"नाही ओ. माझ्या सिरीयल्स बघून संपतील तर त्यांच्या हाती रिमोट जाईल ना..!" प्रभाताईंनी शास्त्रीकाकांच्या तर्कातली हवाच काढली.
"मग काय झालं असावं?" आता मात्र शास्त्रीकाका गंभीर झाले. "महात्मा गांधींच्या भूतानं तर त्यांना पछाडलं नसावं? म्हणजे ही फक्त शक्यता आहे."
शास्त्रीकाका एवढं म्हणेपर्यंत इकडे प्रभाताईंनी डोळ्यांना पदर लावलादेखील.

काही दिवसांत मोहनरावांची कंबर आणि दंड उदंड रंगबिरंगी दोर्‍यांनी भरून गेली. कधी दूधातून तर कधी नुसत्याच पाण्यातून त्यांना कुठल्या कुठल्या बाबांनी मंतरलेली राख पाजण्यात येवू लागली. पण इतकं करूनही मोहनरावांच्या वर्तणूकीत काहीच फरक जाणवेना. उलट त्यांचे हे वेड दिवसागणिक वाढतच होते. प्रभाताई सगळे उपाय करून थकल्या होत्या. आता त्या गांधींच्या नावाने तळतळाट करू लागल्या होत्या. अगदी नोटांवरील गांधींचं चित्र पाहीलं तरी त्यांची प्रचंड चिडचिड होई.

*

"आपटे साहेब. तेवढं कंत्राट आम्हाला मिळवून द्या." कंत्राटदार आपल्या तोंडातील पान चघळत म्हणाला.
"हम्म.. पाहतोच. कोटेशन समोर आहेच माझ्या." मोहनराव फायलीतून डोके काढत म्हणाले.
"साहेब, कोटेशनचं एवढं काय घेऊन बसलात? ते फक्त कागदी घोडे." कंत्राटदार रंगलेलं थोबाड उचकटून हसत म्हणाला. "तुम्ही एक काम करा. हे ठेवून घ्या."
कंत्राटदाराने एक छोटा बॉक्स मोहनरावांसमोर ठेवला.
"काय आहे यात?"
"मिठाई आहे."
मोहनरावांनी तो बॉक्स उघडून पाहीला. ५०० रूपयांच्या नोटांचं एक पुडकं होतं त्यात.
"ही मिठाई आहे?" मोहनराव भडकले.
"मिठाई नाही? नसू द्या. मग मलई समजा. या गोष्टीला प्रत्येकजण वेगवेगळ्या नावानं ओळखतं. "
"हे पहा मिस्टर. मी लाच घेणारा अधिकारी नाही."
"ओह..! सॉरी. सॉरी. सॉरी. अहो किती मोठा अपराध घडला आमच्या हातून. आम्ही अगदीच विसरून गेलो होतो, तुम्हांला तर दोन बॉक्स मिठाई लागते, नाही का? एक डाव माफ करा आम्हाला." असं म्हणून कंत्राटदाराने आणखी एक बॉक्स मोहनरावांसमोर ठेवला.
"हे बॉक्स इथून उचला आणि फूटा एकदाचे. नाहीतर..."
"आपटे साहेब. एवढं रागवायचं काय काम? जातो आम्ही इथून. पण साहेब हे ठीक नाय केलतं. एवढं बोलण्याआधी निदान परिणामांचा विचार केला असतात... जाऊ दे. आता काय? म्हणतात ना .. 'आलीया भोगासी असावे सादर'..!" असं म्हणून कंत्राटदार बॉक्स घेऊन निघून गेलाही.
मोहनराव नुसतेच तिकडे पाहत राहीले बराच वेळ.

कशी कुणास ठाऊक पण या घटनेची मिडीयाला कुणकुण लागली आणि मोहनरावांच्या घरासमोर मिडीयाच्या गाड्यांचे जत्थे उभे लागले. मोहनरावांच्या मुलाखती जवळपास सर्वच न्युज चॅनल्सवर झळकू लागल्या. देशभरात या घटनेवर चर्चा झडू लागल्या. त्या कंत्राटदाराविरोधी जनतेच्या तीव्र प्रतिक्रीया उसळल्या. जो तो मोहनरावांबद्दल गौरवोद्गार काढू लागला. दोनच दिवसांत मोहनराव जनतेचे सच्चे 'हिरो' झाले होते.

पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण तिसर्‍याच दिवसापासून त्यांना फोनवरून स्थानिक गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येवू लागल्या. त्यांनी या गोष्टीचा धसका घेतला.

खरं म्हणजे त्यांनाही जाणवत होतंच, की आपल्या वर्तनात विलक्षण बदल होतो आहे. एक अदृश्य शक्ती आपल्या अस्तित्वाचाच नाश करू पाहतेय. मृत्यूचं सावट पसरल्यापासून ते तणावग्रस्त दिसू लागले. घरातून बाहेर पडावं की नाही? आपल्या खिडकीच्या आसपास कोण भटकतयं? हे विचार त्यांची भीती आणखीनच गडद करत होते. क्षणाक्षणाला त्यांची अस्वस्थता वाढत होती.

अखेर धीर करून एका सायंकाळी ते आपल्या घराबाहेर पडले. त्यांची पावले जवळच्याच चौपाटीकडे वळाली. तिथल्या एका भेळवाल्याकडून त्यांनी भेळ विकत घेतली. अस्ताकडे झुकलेल्या केशरी सुर्याकडे पाहत आणि आपल्या मृत्यूच्या भयावह कल्पनांचा विचार करतच त्यांनी भेळ संपवली.

हाती उरला फक्त तो भेळेचा कागद... अर्थात वर्तमानपत्राचा एक क्षुल्लक तुकडा.

सहजच त्यांनी एकवार त्या कागदावर नजर फिरवली आणि त्यातील एक बातमी वाचून त्यांना धक्काच बसला. त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. असंही कधी घडू शकतं? अशक्य..! केवळ अशक्य..! पण हे घडलयं, हे एक कटू सत्य आहे.

आता त्यांना सगळ्याच घटनांमागील संदर्भ कळाले होते.

ती धक्कादायक बातमी होती...

'महात्मा गांधींचा चष्मा चोरीला..!'

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

खुप छान.....सन्जय नार्वेकर आणि अरूण नलावडे यान्चा मूव्ही आठवला मला! नाव आठ्वत नाहीये आत्ता पण चष्मेबद्दूर क चष्मेबहादद्दर अस काहीतरी असाव.