उ. अमीर हुसेन खाँ (आठवणींचा डोह)

Submitted by kaustubh004 on 7 August, 2011 - 04:08

...

" श्री. ब्रिजनारायण हे त्यांच्या 'सूर सिंगार संसद' या संस्थेतर्फे दरवर्षी एक मोठी संगीत-सभा मुंबईत आयोजित करत असत. भारतातील अनेक नामवंत कलावंत या सभेत सहभागी होत असत. एकदा त्यांनी, (उ. अमीर हुसेन) खाँसाहेबांचे तबलावादन ठेवले. तारीख, वेळ व पाचशे रुपये मानधन पक्के झाले. निरनिराळ्या वृत्तपत्रांत तसेच जाहिरात-फलकांवर उस्ताद अमीर हुसेन खाँच्या तबलावादनाची जाहिरात झळकली. खाँसाहेबांचा कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी आठ वाजता बिर्ला मातुश्री सभागृहात होता. शनिवारी मला अर्धा दिवसच काम असल्यामुळे मी (ले. अरविंद मुळगांवकर) नेहमीप्रमाणे दुपारी अडीच वाजताच खाँसाहेबांच्या घरी पोहोचलो. खाँसाहेबांचा असा रिवाज होता की, कुठल्याही कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेच्या तासभर आधीच पोहोचायचे. त्यानुसार त्यांची कडक इस्त्रीच्या रेशमी कुडत्याला सोन्याची बटणे लावणे, धोतर, जॅकेट काढून ठेवणे, खसच्या उंची कनौजी अत्तराचा फाया लावणे अशी तयारी चालू होती. त्यांनी मला तबल्याचा जोड, हातोडी, पावडर वगैरे गोष्टी बॅगेत भरून ठेवण्यास सांगितले. इतके होईपर्यंत चार वाजले. इतक्यात श्री. ब्रिजनारायण घाईघाईने घामाघूम अवस्थेत खाँसाहेबांच्या खोलीत आले. म्हणाले, "खाँसाहेब, मै बहोत जल्दी में हूँ, मेरी एक बात अगर आप मानेंगे तो बडी इनायत होगी |" खांसाहेब म्हणाले, "जी बताइयेगा |". ब्रिजनारायण: "क्या हुआ है, के, बनारस के पंडित सामता प्रसादजी बम्बई आये हुए है और कल ही वापस बनारस जा रहे है | मेरे बिनतीपर उन्होंने आज की संगीत सभा में बजाने के लिए हाँ कर दी है | तो आप आज के बदले अगर कल बजायेंगे तो मैं आपका बड़ा एहसानमंद रहूंगा | " खाँसाहेब एक मिनिटभर स्तब्ध राहिले. त्यांच्या मनात उफाळलेला संताप त्यांनी मोठ्या संयमाने चेहऱ्यावर प्रकट होऊ दिला नाही. ते म्हणाले, "ब्रिजनारायणजी मैं आपकी बहोत इज्जत करता हूँ | आप एक अच्छे वकील होते हुए भी संगीत की इतनी सेवा कर रहे हैं | अल्लाह आपको खूष रखे | देखिये, आपने सभी अखबारोंमे मेरे तबलेका इश्तेहार दिया हैं | यह बच्चा मेरा शागीर्द हैं, यह प्रोग्राम के लिए दूर से आया हैं, और कईं शागीर्द दूर दूर से आयेंगे और मायूस होकर वापस चले जायेंगे | इस कॉन्फरन्समें मैं नहीं बजाऊंगा | " ब्रिजनारायणजींनी खाँसाहेबांची अनेकवेळा दुसरे दिवशी वाजविण्याविषयी मनधरणी केली. परंतु खाँसाहेब आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. खाँसाहेबांचा आजचा तबला ऐकायला मिळणार नाही म्हणून मी ही मनातल्या मनात खट्टू झालो होतो. पण नंतर एक गंमतच झाली. ब्रिजनारायण उतरत आहेत तोच खाँसाहेबांचा एक गरीब विद्यार्थी यशवंत तावडे आला. यशवंत एका गिरणीत काम करायचा. तो चाचरत चाचरतच खाँसाहेबांना म्हणाला, "माझी मुलगी एका मोठ्या दुखण्यातून वाचली. मी सत्यनारायणाला नवस केला होता. तो फेडण्यासाठी आज घरी पूजा केलीय. माझी इच्छा होती की, तुम्ही येऊन थोडा वेळ आपल्या तबलावादनाचा प्रसाद द्यावा." खाँसाहेबांनी त्यांच्या नेहमीच्या मिष्किल नजरेने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, "अरविंद बेटा, आज तो बजानाही था |" त्यानंतर आम्ही आरामात टॅक्सी करून चिंचपोकळी पुलाजवळच्या एका चाळीत आलो. यशवंतने चाळीतील एका मित्राच्या घरी बसण्याची व्यवस्था केली होती. चहा वगैरे सांगण्यासाठी यशवंताची धावपळ चालली होती. खाँसाहेब म्हणाले, "यशवंत बेटा, पूजा कहाँ? कहाँ बाँधी हैं?" यशवंत म्हणाला, "बाबा, वो तो मेरे कमरे में हैं. ऊपर |" खाँसाहेब म्हणाले, "तो हम यहाँ क्या कर रहे हैं?" - चलो ऊपर जाते हैं |" मग आम्ही वर गेलो. खाँसाहेबांनी हातपाय धुऊन सत्यनारायणाला फुलं - दक्षिणा वाहिली आणि नमस्कार करून कपाळाला बुक्का लावला, तीर्थ-प्रसाद घेतला आणि म्हणाले, "अब बोलो, तुम्हारा क्या हुक्म हैं?" यशवंत ओशाळला!

चाळीला लागून असलेल्या बोळात यशवंतने एक छोटे स्टेज केले होते व लोकांना बसण्यासाठी ताडपत्र्या आणि सतरंज्या अंथरल्या होत्या. मायक्रोफोन्स व स्पीकर्सची चांगली व्यवस्था केली होती. सुरुवातीला दशरथ पुजारींनी दोन-तीन भक्तिगीते आणि भावगीते म्हटली नंतर तेच खाँसाहेबांबरोबर लेहरा धरायला बसले. खाँसाहेबांनी खुषीत येऊन सुमारे दोन तास तबला वाजवला. रस्त्यातून जाणारे दोन सरदारजी हे काय चाललंय म्हणून कुतूहलाने ऐकायला उभे राहिले. इतक्यात खाँसाहेबांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. म्हणाले, "अरे भाई, सत श्री अकाल | जरा पंजाब दा चाला तो सुण्णो |" असे म्हणून त्यांनी दीपचंदी अंगातले पंजाबचे अनेक चाले ऐकवले. कार्यक्रम संपल्यावर यशवंत खाँसाहेबांना पैशाचं एक पाकीट देऊ लागला. खाँसाहेब म्हणाले, "बेटा, यह मेरी तरफ से तुम्हारी लाडली बच्ची के लिये |" तत्त्वनिष्ठा आणि कनवाळूपणा यांचा असा संगम क्वचितच एखाद्याच्या स्वभावात आढळतो."

...

पुस्तक - आठवणींचा डोह, लेखक - अरविंद मुळगांवकर.

आणि अनिश प्रधान यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेमधून -

... "पंडित मुळगांवकर यांच्यासारख्या अभ्यासू संगीततज्ज्ञांनी शांतपणे, सातत्याने केलेल्या निष्ठावान कामामुळेच हिंदुस्थानी संगीताची परंपरा पुढील आणि त्याहूनही नंतरच्या पिढीपर्यंत पोहोचेल. उ. अमीर हुसेन खाँ यांच्या कामाला जशी लोकांकडून म्हणावी तशी पावती मिळाली नाही, तसेच या तज्ज्ञांचेही झाले आहे. समाज अनेक वेळा तत्कालीन आणि नजरेत भरणाऱ्या अशा दिखाऊ गोष्टींना जरुरीपेक्षा अधिक महत्त्व देतो आणि दूरगामी परिणाम साधणाऱ्या मूलभूत महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या पिढीने ह्यावरून काय तो बोध घेतला पाहिजे. " ....

गुलमोहर: 

छान

कौस्तुभ,
हे तुम्ही पुस्तक परिचय अशा अर्थाने इथे दिलंय का ? तर वाचू आनंदे मधे हलवा हा धागा.
पुस्तकातल्या उतार्‍याव्यतिरिक्त पुस्तकाची थोडी माहिती , तुम्हाला काय आवडलं , का आवडलं इत्यादी लिहा
. शिवाय मूळ पुस्तकातला इतका दीर्घ भाग इथे टाकताना प्रकाशकांची परवानगी हवी, तशी तुम्ही घेतलीय का ?

पुस्तकातला एक विस्तृत भाग लेख या कॅटेगरीत टाकल्यास हे तुमचे स्वतःचे लेखन आहे असा वाचकांचा समज होईल. तसा तुमचा हेतू नसावा.