बांधले मी बांधले

Submitted by kaustubh004 on 7 August, 2011 - 03:17

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले

उन्हाचे पाटांव नेसले टाकले
वाऱ्याचे पैंजण घातले फेकले
डोळ्यांत काजळ, केवडा - अत्तर
... लावले - पुसले

हर्षाचे हिंदोळे सोडले बांधले
मयूर मनाचे रुसले हासले
हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे,
... हासले - नाचले

दिसला - लपला चकोर मनाचा
फुलला - ढळला बहर चंद्राचा
लामण सूर्याचा, श्रावण नेत्राचा
विझले ... तेवले.

- इंदिरा संत (भास्कर चंदावरकर, आशा भोसले)

कवितेचा (माझ्या मते) सर्वोत्कृष्ट आणि दुर्मिळ फॉर्म. उथळ अलंकारांपासून कित्येक योजने दूर शांत तेज समूर्त व्हावं, तशी ही कविता. (हे वर्णन खुद्द इंदिराबाईंचं वाटतं हा काही योगायोग नव्हे.)

या कवितेचे घटक स्वतंत्रपणे तपासू पाहणे म्हणजे एखाद्या शिल्पकृतीचा हात उपटून त्याचे सौंदर्य निरखण्यासारखाच प्रकार होय.

ही कविता या कवितेशी एकरूप होऊनच अनुभवावी लागते. कवितेच्या प्रत्येक ओळीसरशी जे भाव मनात उमटतात, जी चित्रे मनात उलगडत जातात ती अनुभवत जावीत - या चित्रांचा कवितेतील शब्दांशी प्रत्यक्ष संबंध वाटला नाही तरीही. आणि या कवितेच्या प्रत्येक ओळीबरोबर ही चित्रे अधिकाधिक गडद होत जातात, मनातले भाव अधिकाधिक उत्कट होत जातात. मन कवितेच्या स्वरावर झंकारु लागतं.

..... इतर काही ....

मोगरा फुलला ( संत ज्ञानेश्वर)

फुले माझी अळूमाळू वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना (आरती प्रभू)

अंधारी रात्र सागर किनारा, एकटाच मी पडलेला वारा, कुणां न दिसता अस्तां जाणारा असाच एक अनोळखी तारा (अनिल)

संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा (ग्रेस)

भिंत खचली, कलथून खांब गेला, जुनी पडकी उध्वस्त धर्मशाला (बालकवी)

आली तुझी आठवण, वीज गेली चमकून, लकाकून प्रतिबिंबे, गेली जळीं डोकावून (शंकर वैद्य)

....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

>>बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
मला हे नेहेमी चंद्राचे असावे असे वाटायचे,
इंद्राचे तोरणचा काय अर्थ असावा ?