साहित्यनिर्मीतीच्या दर्जात्मक पातळ्या व रसग्रहण

Submitted by बेफ़िकीर on 4 August, 2011 - 11:49

काही तज्ञांशी केलेल्या चर्चा, काही वाचन व काही ठोकताळे यावर विसंबून लिहीलेला लेख!
===========================================================

साहित्यनिर्मीतीसमोर ज्या दर्जात्मक स्पर्धांच्या कठोर अटी मानल्या गेलेल्या आहेत त्या:

१. मूळ निर्मीती - उपयुक्तता (यात ज्ञानवर्धक, मनोरंजक, स्फुर्तीदायक इत्यादी बाबी), समकालीन संस्कृती व समाजाची पुरेशी जाणीव असल्याची चिन्हे व नावीन्यता (यात शैली, संदर्भ इत्यादी बाबी) समाविष्ट धरल्या जातात. यातून असे म्हणायचे असते की निर्मीती किमान कोणत्यातरी कारणास उपयुक्त ठरावी, सध्याच्या जगाशी तिची नाळ असावी व निर्मीतीची शैली व त्यातील उल्लेख यात नावीन्य असावे.

२. समीक्षा - समीक्षा ही मूळ निर्मीतीपेक्षा कठोर अट मानली गेली आहे. म्हणजे समीक्षेस पात्र होणारे लेखन करणे ही ती अट! समीक्षा केवळ अनाकलनीय लेखनाचा अर्थ सांगण्यासाठी नसून अनेक अव्यक्त (हिडन) मते, ती मते निर्माण होण्याची सामाजिक (व इतर) कारणे, कारणांची व्याप्ती व त्यातून समाजासाठी एक उपयुक्त संदेश देण्यात समीक्षा महत्वाचा हातभार लावते. अनेकदा साहित्यनिर्मीती ही मर्यादीत दृष्टिकोनातून होते. व्यापक दृष्टिकोनातून झालेली साहित्यनिर्मीती दुर्मिळ असते व ती 'सरल' करायची झाल्यास एका पुस्तकाच्या जागी पंधरा ग्रंथ लिहीत बसावे लागतील. याच ठिकाणी समीक्षा काम करते. त्याचमुळे एकाच मूळ निर्मीतीच्या अनेकांनी समीक्षा केलेल्याही आढळतात. मूळ निर्मीतीने मूळ निर्मीती असण्याच्या अटी पार केल्यानंतर जर ती समीक्षेसही पात्र होत असली तर ती अतिशय श्रेष्ठ निर्मीती समजली जावी.

३. सौंदर्यशास्त्र - समीक्षेला स्वतःचे स्वयंभू अस्तित्व मात्र नाही. समीक्षेचे अधिपत्य सौंदर्यशास्त्राकडे आहे. थोडक्यात, सौंदर्यशास्त्र हे समीक्षेचे मालक असून तेच ठरवते की समीक्षेने काय करावे. मानवी जीवनात सुंदर व सुंदर नसलेल्या अशा अनेक बाबी ठळकपणे दिसतातच. जसे, हिंसा वाईट आहे. जन्माला घालणे सुंदर! झाडे तोडणे वाईट, रोप लावणे सुंदर! श्रावण सुंदर आहे, ग्रीष्म नाही. कुटुंबात प्रेम वाटणे सुंदर तर भाऊबंदकी किंवा वृद्धांना आधार न देणे वाईट! हे सौंदर्यशास्त्र आपल्या सर्वांना बहुतेकदा 'संस्कार व शिक्षण' यातून कळत असल्याने त्यात आपल्याला नवे काही वाटत नाही. पण हेच सौंदर्यशास्त्र समीक्षेला मार्गदर्शन करते की मूळ निर्मीतीला कोणत्या निकषांवर तपासायला हवे. सौंदर्यशास्त्र हे समाजाच्या जिवंतपणाचे व बहरलेपणाचे लक्षण असते व ते बदलणे जवळपास अशक्यच! जी मूळ साहित्य निर्मीती सौंदर्यशास्त्रानुसार पूर्ण मान्य होते ती समीक्षेच्याही पुढच्या पातळीला पोचते.

४. तत्वज्ञान - मात्र सौंदर्यशास्त्र निर्माण होण्यामागे तत्वज्ञानाचा हात आहे. तत्वज्ञान एका माणसाने किंवा प्रदेशाने किंवा पिढीने निर्माण केलेले नसून एकाचवेळेस जगात लाखो तत्ववेत्ते हयात असतात व त्यांच्या प्रभावानुसार ते घडत राहते. या अफाट विश्वास सृष्टीचे, मानवी अस्तित्वाचे कारण काय, भूमिका काय, जीवन कसे जगले जायला हवे, सध्या कसे जगले जात आहे, समानता कशी येईल इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधत राहणे या क्रियेतून तत्वज्ञान तयार होते असे मानतात. हे तत्वज्ञानच सौंदर्यशास्त्राला 'सुंदरता' म्हणजे काय याची 'सूचना' देते. निसर्गाने सगळीच माणसे हिटलर केली असती तर सृष्टी (मानवी) कदाचित संपलीही असती. आणि त्या लयाला जात असलेल्या मानवी अस्तित्वाचे सौंदर्यशास्त्र 'नष्ट करणे' याच निकषावर निर्माण झाले असते. मात्र गांधीही झाले, तुकारामही झाले, वास्वानीही झाले तसेच ओसामाही झाले आणि हिटलरही! तत्वज्ञान 'चांगुलपणा व माणसाची भूमिका' ठरवते व सर्व साहित्यनिर्मीती इतकेच नाही तर संपूर्ण कलाक्षेत्र, आणि इतकेच नाही तर सर्व राजकीय धोरणेही रिस्पेक्टिव्ह प्रभावशाली तत्वज्ञानानुसारच योग्य / अयोग्य ठरतात. तत्वज्ञानाच्या पातळीला आपल्याकडील संतांचे काव्य पोचलेले आहे. म्हणूनच ते श्रेष्ठ मानले गेलेले आहे. या पातळीला मूळ निर्मीती पोचल्यास समीक्षा व सौंदर्यशास्त्र 'एवढेसे तोंड' करून बसतात.

५. अध्यात्म - मानवी इतिहासात या पलीकडील काहीही ज्ञात नाही. किंवा, जे ज्ञात नाही त्याचमुळे ही सर्वात वरची पातळी निर्माण झालेली आहे. ही सर्वोच्च पातळी मानली जाते. 'का व कसे' या प्रश्नांची कोट्यावधीवेळा सरबत्ती करूनही जेव्हा उत्तरे मिळणे थांबते तेव्हा श्रद्धा जन्माला येते. एका अशा शक्तीबाबतची श्रद्धा, जी शक्तीही दिसत नाही. त्याच शक्तिने पाठवले आहे व तिच्याचकदे पुन्हा जायचे आहे ही साधारण समजूत यात धरली जाते. (प्रांत, धर्म, पंथ यानुसार काही तपशील बदलू शकतात). मानवाचीच नाही तर एकंदर सजीवांची असहाय्यता व अगतिकता व त्यामुळे निर्माण झालेली 'अदृष्य शक्तीवरील' श्रद्धा हा अध्यात्माचा पाया असून असे मानले जाते की या पातळीचा विचार मध्यवर्ती असलेली (खरे तर कोणतीही) साहित्यनिर्मीती ही सर्वश्रेष्ठ आहे. येथे तत्वज्ञानालाही हस्तक्षेपाचा अधिकार नाही. (बहुतांशी, या पातळीला 'काव्य'च निर्माण होते असेही मानतात).

रसग्रहण -

रसग्रहणाला या सर्व पातळ्यांपैकी फक्त सौंदर्यशास्त्रीय पातळीशी घेणेदेणे असावे असे म्हणतात. रस या शब्दातूनच गोडव्याची अनुभुती व्हावी. तेव्हा निर्मीतीमधील गोडवा, काव्य (काव्य या शब्दाचा येथे अर्थ कविता असा नाहीच) , रसरशीतपणा 'एक्स्ट्रॅक्ट' करून वाचकाला कळवणे हे रसग्रहणाचे काम आहे. तसेच, 'रस' निष्पन्न होत नसल्याचे सांगणेही! मात्र रसग्रहण हे मूळ निर्मीतीबाबत असूनही मूळ निर्मीतीपेक्षा चवीला मधुर असावे ही किमान अट मानली जाते. रसग्रहण करताना मूळ निर्मीतीची निवड हा निकष नसला तरीही सौंदर्यशास्त्राच्या निकषांनुसार निर्मीतीची निवड व्हावी यात गैर नाही. म्हणजे आगलावी पुस्तके, अमानवी व्यक्तीकरण असलेली पुस्तके, सौंदर्याशी (मानवी जीवनाच्या) कोणत्याही प्रकारे 'जाणीवपुर्वक' फारकत घेतलेली पुस्तके यात समाविष्ट होऊ नयेत अशी अपेक्षा मानली जाते. रसग्रहणाचे काम समीक्षा नसल्याने (आणि केवळ रसग्रहण असल्याने) आपोआपच 'मूळ निर्मीतीची निवड' समीक्षेपेक्षा मर्यादीत होतेच.

रसग्रहणाने केलेली टीकाही सौम्य, मधुर असावी. (अर्थात, योग्य निवड झाल्यानंतरच ही अपेक्षा पूर्ण होऊ शकेल.)

वाट्टेल त्या पुस्तकाचे रसग्रहण होऊ शकत नाही का या मतावर 'मग समीक्षक काय करणार' हे प्रतीमत तयार आहेच.

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

सर्व वाचले नाही पण मूळ लिखाणात सौंदर्यवाद आणि सौंदर्यशास्त्र (इस्थेटिक्स) या दोन वेगळ्या संकल्पनांची गल्लत झालीये असे वाटले.

पाटणकरांचे 'सौंदर्यमिमांसा' हे पुस्तक जरूर वाचा. सौंदर्यवाद म्हणजे सौंदर्यशास्त्र नव्हे.
सौंदर्यवाद हे एकच ध्येय असू शकत नाही कलाकृतीचे, कधी कधी हे ध्येय अजिबातच नसते.

सौंदर्यवाद हे कलाकृतीचे एकमेव ध्येय असल्याचे मी वर म्हंटले असावे असे सध्या वाटत नाही. तरी लेख पुन्हा वाचून पाहतो. ते एकमेव ध्येय नाहीच. पण समीक्षेस पात्र लेखनाच्या वरचा दर्जा सौंदर्यशास्त्रीय लेखन इतपत म्हंटले असावे.

सौंदर्यशास्त्र आणि सौंदर्यवाद वेगळे प्रकरण आहे.<<< ह्याच्याशी सहमत आहे. पण हे एकच आहे असे माझ्या कोणत्या वाक्यावरून वाटत आहे ते लक्षात येत नाही आहे. तसे वाटण्याजोगे विधान दिसल्यास ते संपादीत करावे लागेल मला.

हिंसा वाईट आहे. जन्माला घालणे सुंदर! झाडे तोडणे वाईट, रोप लावणे सुंदर! श्रावण सुंदर आहे, ग्रीष्म नाही. कुटुंबात प्रेम वाटणे सुंदर तर भाऊबंदकी किंवा वृद्धांना आधार न देणे वाईट! हे सौंदर्यशास्त्र आपल्या सर्वांना बहुतेकदा 'संस्कार व शिक्षण' यातून कळत असल्याने त्यात आपल्याला नवे काही वाटत नाही. पण हेच सौंदर्यशास्त्र समीक्षेला मार्गदर्शन करते की मूळ निर्मीतीला कोणत्या निकषांवर तपासायला हवे. सौंदर्यशास्त्र हे समाजाच्या जिवंतपणाचे व बहरलेपणाचे लक्षण असते व ते बदलणे जवळपास अशक्यच! जी मूळ साहित्य निर्मीती सौंदर्यशास्त्रानुसार पूर्ण मान्य होते ती समीक्षेच्याही पुढच्या पातळीला पोचते. <<<
हे सर्व सौंदर्यवादी आहे.
सौंदर्यशास्त्रीय नाही. सौंदर्यशास्त्र कधीच इव्हॅल्युएटिव्ह स्टान्स घेत नाही.

सौंदर्यशास्त्र कधीच इव्हॅल्युएटिव्ह स्टान्स घेत नाही.<<<

हे विधान अधिक विस्तृत स्वरुपात समजावून सांगावेत.

माझ्यामते 'एकापेक्षा दुसरे सुंदर किंवा कुरुप' असेच असू शकते. अ‍ॅबसोल्यूट सुंदर असे काही असू शकत नाही. त्यामुळे इव्हॅल्युएटिव्ह स्टान्स घ्यावा लागणार. तोही केवळ सौंदर्यशास्त्रालाच नव्हे तर इतर अनेक इझम्सना, शास्त्रांना इत्यादी!

सौंदर्यवाद व सौंदर्यशास्त्र यांच्यात फरक आहे याच्याशी मी सहमती दाखवली त्याची पार्श्वभूमी अशी, की:

सौंदर्यशास्त्राने त्या त्या कालावधीत जनरेट केलेल्या निकषांनुसार लिहावे हा सौंदर्यवाद झाला. कुरुपही लिहिता येते व कुरूप लिहिण्याचा उद्देश असणेही शक्य असते. तो उद्देश सौंदर्यशास्त्र मानतो, पण सौंदर्यवाद नव्हे.

तुमचा विचार यापेक्षा वेगळा असावा असे एकंदर जाणवत आहे. तर तो काय विचार आहे, तेही लिहावेत.

आवडले असते ते समजावून सांगायला पण योग्य प्रकारे मी समजावून सांगू शकेनच असे नाही. यासाठी रा. भा. पाटणकरांचे 'सौंदर्यमिमांसा' हे पुस्तक खरंच वाचा.

इस्थेटिक्स कलाकृतीतील प्रत्येक गोष्टींची चर्चा करते. त्या त्या गोष्टीच्या तश्या तश्या असण्याबद्दल चर्चा करते. एखाद्या कलाकृतीत असलेले "सौंदर्य" गरजेचे की अनाठायी याचीही चर्चा असते.

अजून समजावता येत नाहीये (आपण शिकताना एखादी संकल्पना समजते आणि आपण शिकवताना ती योग्य प्रकारे समजावता येत नाही यातले जे अंतर आहे तेच इथे आहे).

Pages