साहित्यनिर्मीतीच्या दर्जात्मक पातळ्या व रसग्रहण

Submitted by बेफ़िकीर on 4 August, 2011 - 11:49

काही तज्ञांशी केलेल्या चर्चा, काही वाचन व काही ठोकताळे यावर विसंबून लिहीलेला लेख!
===========================================================

साहित्यनिर्मीतीसमोर ज्या दर्जात्मक स्पर्धांच्या कठोर अटी मानल्या गेलेल्या आहेत त्या:

१. मूळ निर्मीती - उपयुक्तता (यात ज्ञानवर्धक, मनोरंजक, स्फुर्तीदायक इत्यादी बाबी), समकालीन संस्कृती व समाजाची पुरेशी जाणीव असल्याची चिन्हे व नावीन्यता (यात शैली, संदर्भ इत्यादी बाबी) समाविष्ट धरल्या जातात. यातून असे म्हणायचे असते की निर्मीती किमान कोणत्यातरी कारणास उपयुक्त ठरावी, सध्याच्या जगाशी तिची नाळ असावी व निर्मीतीची शैली व त्यातील उल्लेख यात नावीन्य असावे.

२. समीक्षा - समीक्षा ही मूळ निर्मीतीपेक्षा कठोर अट मानली गेली आहे. म्हणजे समीक्षेस पात्र होणारे लेखन करणे ही ती अट! समीक्षा केवळ अनाकलनीय लेखनाचा अर्थ सांगण्यासाठी नसून अनेक अव्यक्त (हिडन) मते, ती मते निर्माण होण्याची सामाजिक (व इतर) कारणे, कारणांची व्याप्ती व त्यातून समाजासाठी एक उपयुक्त संदेश देण्यात समीक्षा महत्वाचा हातभार लावते. अनेकदा साहित्यनिर्मीती ही मर्यादीत दृष्टिकोनातून होते. व्यापक दृष्टिकोनातून झालेली साहित्यनिर्मीती दुर्मिळ असते व ती 'सरल' करायची झाल्यास एका पुस्तकाच्या जागी पंधरा ग्रंथ लिहीत बसावे लागतील. याच ठिकाणी समीक्षा काम करते. त्याचमुळे एकाच मूळ निर्मीतीच्या अनेकांनी समीक्षा केलेल्याही आढळतात. मूळ निर्मीतीने मूळ निर्मीती असण्याच्या अटी पार केल्यानंतर जर ती समीक्षेसही पात्र होत असली तर ती अतिशय श्रेष्ठ निर्मीती समजली जावी.

३. सौंदर्यशास्त्र - समीक्षेला स्वतःचे स्वयंभू अस्तित्व मात्र नाही. समीक्षेचे अधिपत्य सौंदर्यशास्त्राकडे आहे. थोडक्यात, सौंदर्यशास्त्र हे समीक्षेचे मालक असून तेच ठरवते की समीक्षेने काय करावे. मानवी जीवनात सुंदर व सुंदर नसलेल्या अशा अनेक बाबी ठळकपणे दिसतातच. जसे, हिंसा वाईट आहे. जन्माला घालणे सुंदर! झाडे तोडणे वाईट, रोप लावणे सुंदर! श्रावण सुंदर आहे, ग्रीष्म नाही. कुटुंबात प्रेम वाटणे सुंदर तर भाऊबंदकी किंवा वृद्धांना आधार न देणे वाईट! हे सौंदर्यशास्त्र आपल्या सर्वांना बहुतेकदा 'संस्कार व शिक्षण' यातून कळत असल्याने त्यात आपल्याला नवे काही वाटत नाही. पण हेच सौंदर्यशास्त्र समीक्षेला मार्गदर्शन करते की मूळ निर्मीतीला कोणत्या निकषांवर तपासायला हवे. सौंदर्यशास्त्र हे समाजाच्या जिवंतपणाचे व बहरलेपणाचे लक्षण असते व ते बदलणे जवळपास अशक्यच! जी मूळ साहित्य निर्मीती सौंदर्यशास्त्रानुसार पूर्ण मान्य होते ती समीक्षेच्याही पुढच्या पातळीला पोचते.

४. तत्वज्ञान - मात्र सौंदर्यशास्त्र निर्माण होण्यामागे तत्वज्ञानाचा हात आहे. तत्वज्ञान एका माणसाने किंवा प्रदेशाने किंवा पिढीने निर्माण केलेले नसून एकाचवेळेस जगात लाखो तत्ववेत्ते हयात असतात व त्यांच्या प्रभावानुसार ते घडत राहते. या अफाट विश्वास सृष्टीचे, मानवी अस्तित्वाचे कारण काय, भूमिका काय, जीवन कसे जगले जायला हवे, सध्या कसे जगले जात आहे, समानता कशी येईल इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधत राहणे या क्रियेतून तत्वज्ञान तयार होते असे मानतात. हे तत्वज्ञानच सौंदर्यशास्त्राला 'सुंदरता' म्हणजे काय याची 'सूचना' देते. निसर्गाने सगळीच माणसे हिटलर केली असती तर सृष्टी (मानवी) कदाचित संपलीही असती. आणि त्या लयाला जात असलेल्या मानवी अस्तित्वाचे सौंदर्यशास्त्र 'नष्ट करणे' याच निकषावर निर्माण झाले असते. मात्र गांधीही झाले, तुकारामही झाले, वास्वानीही झाले तसेच ओसामाही झाले आणि हिटलरही! तत्वज्ञान 'चांगुलपणा व माणसाची भूमिका' ठरवते व सर्व साहित्यनिर्मीती इतकेच नाही तर संपूर्ण कलाक्षेत्र, आणि इतकेच नाही तर सर्व राजकीय धोरणेही रिस्पेक्टिव्ह प्रभावशाली तत्वज्ञानानुसारच योग्य / अयोग्य ठरतात. तत्वज्ञानाच्या पातळीला आपल्याकडील संतांचे काव्य पोचलेले आहे. म्हणूनच ते श्रेष्ठ मानले गेलेले आहे. या पातळीला मूळ निर्मीती पोचल्यास समीक्षा व सौंदर्यशास्त्र 'एवढेसे तोंड' करून बसतात.

५. अध्यात्म - मानवी इतिहासात या पलीकडील काहीही ज्ञात नाही. किंवा, जे ज्ञात नाही त्याचमुळे ही सर्वात वरची पातळी निर्माण झालेली आहे. ही सर्वोच्च पातळी मानली जाते. 'का व कसे' या प्रश्नांची कोट्यावधीवेळा सरबत्ती करूनही जेव्हा उत्तरे मिळणे थांबते तेव्हा श्रद्धा जन्माला येते. एका अशा शक्तीबाबतची श्रद्धा, जी शक्तीही दिसत नाही. त्याच शक्तिने पाठवले आहे व तिच्याचकदे पुन्हा जायचे आहे ही साधारण समजूत यात धरली जाते. (प्रांत, धर्म, पंथ यानुसार काही तपशील बदलू शकतात). मानवाचीच नाही तर एकंदर सजीवांची असहाय्यता व अगतिकता व त्यामुळे निर्माण झालेली 'अदृष्य शक्तीवरील' श्रद्धा हा अध्यात्माचा पाया असून असे मानले जाते की या पातळीचा विचार मध्यवर्ती असलेली (खरे तर कोणतीही) साहित्यनिर्मीती ही सर्वश्रेष्ठ आहे. येथे तत्वज्ञानालाही हस्तक्षेपाचा अधिकार नाही. (बहुतांशी, या पातळीला 'काव्य'च निर्माण होते असेही मानतात).

रसग्रहण -

रसग्रहणाला या सर्व पातळ्यांपैकी फक्त सौंदर्यशास्त्रीय पातळीशी घेणेदेणे असावे असे म्हणतात. रस या शब्दातूनच गोडव्याची अनुभुती व्हावी. तेव्हा निर्मीतीमधील गोडवा, काव्य (काव्य या शब्दाचा येथे अर्थ कविता असा नाहीच) , रसरशीतपणा 'एक्स्ट्रॅक्ट' करून वाचकाला कळवणे हे रसग्रहणाचे काम आहे. तसेच, 'रस' निष्पन्न होत नसल्याचे सांगणेही! मात्र रसग्रहण हे मूळ निर्मीतीबाबत असूनही मूळ निर्मीतीपेक्षा चवीला मधुर असावे ही किमान अट मानली जाते. रसग्रहण करताना मूळ निर्मीतीची निवड हा निकष नसला तरीही सौंदर्यशास्त्राच्या निकषांनुसार निर्मीतीची निवड व्हावी यात गैर नाही. म्हणजे आगलावी पुस्तके, अमानवी व्यक्तीकरण असलेली पुस्तके, सौंदर्याशी (मानवी जीवनाच्या) कोणत्याही प्रकारे 'जाणीवपुर्वक' फारकत घेतलेली पुस्तके यात समाविष्ट होऊ नयेत अशी अपेक्षा मानली जाते. रसग्रहणाचे काम समीक्षा नसल्याने (आणि केवळ रसग्रहण असल्याने) आपोआपच 'मूळ निर्मीतीची निवड' समीक्षेपेक्षा मर्यादीत होतेच.

रसग्रहणाने केलेली टीकाही सौम्य, मधुर असावी. (अर्थात, योग्य निवड झाल्यानंतरच ही अपेक्षा पूर्ण होऊ शकेल.)

वाट्टेल त्या पुस्तकाचे रसग्रहण होऊ शकत नाही का या मतावर 'मग समीक्षक काय करणार' हे प्रतीमत तयार आहेच.

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

हा वरचा लेख बेफींचे मत असेल त त्यावर अजुन दळण्यात स्वरस्य नाही. परंतु ह्यात कुण्या अभ्यासकाचि मते आहेत असे सुचित करणारी ऑळ दिसलि तो/ते अभ्यासक कोण व वर्च्या लेखात त्यचि मते कुठलि हे दुध आणि पाणि वेगळे निदर्शीत केल्यास उत्तम. तसे न केल्यास (नकळत ?) एक प्रकारची विचार चोरीच केली आहे असे म्हणावे लागेल ...

अशोक... अत्यंत सुंदर पोस्ट..:)
बेफिकीर यांच्या पोस्टमधील काही मुद्दे पटले..:)
सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत संयत आणी दर्जेदार च्यर्च्या चालु आहे... Happy

झक्की, प्रतिसाद द्यायला उशीर झाला, सॉरी!

<<<<मराठी लेखनात मराठीच वापरावे हे महत्वाचे आहे का हा प्रश्न पडला.?>>>>

याबाबत मला तरी काही माहीत नाही. पण बहुधा असणार! जाणकार सांगतील. पण एकंदर स्थलांतरे, प्रवास व समाजातील विविध घटकांचे वाढीव प्रमाणावर एकमेकांत मिसळणे, तसेच माध्यमे इत्यादी, यावरून 'समजा परभाषिक शब्द आले' तर बिघडू नये असेही एखादे मत असेल! Happy

============================================================

छाया देसाई - आपला प्रतिसाद मला फार आवडला. Happy सहमतही आहेच.

============================================================

योग,

<<<<मूळ निर्मीतीची पातळी हाच एकूणात वाचकाच्या अनुभवसंपन्नतेवर अवलंबून असते तिथे क्र १ ते ५ पैकी तुम्ही कुठल्या पातळीवर असता याला अधिक महत्व असेल.>>>>

आपले हे मत पटले पण ते वाचकाच्या दृष्टिकोनातून आहे ना? Happy म्हणजे, लेखक किंवा लेखनाचा दर्जा यासंदर्भात 'वाचक त्यावेळेस कोणत्या पातळीला असतो' ही फारच फ्लुईड व डायनॅमिक कसोटी ठरेल ना? किंवा कसोटीच नसेल बहुधा! (म्हणजे दरोडेखोर व सज्जन या दोघांनी ज्ञानेश्वरी वाचणे व त्यांची भिन्न मते तयार होणे अशा पातळीवर लेखनाचा दर्जा ठरवणे हे अनियमीत प्रकारचे मापन होईल ना?) Happy

===========================================================

केदार - मला आपले म्हणणे पटले. Happy (म्हणजे समीक्षेचे काम कोणते यासंदर्भातले) Happy

===========================================================

पेशवा:

<<<<हा वरचा लेख बेफींचे मत असेल त त्यावर अजुन दळण्यात स्वरस्य नाही. परंतु ह्यात कुण्या अभ्यासकाचि मते आहेत असे सुचित करणारी ऑळ दिसलि तो/ते अभ्यासक कोण व वर्च्या लेखात त्यचि मते कुठलि हे दुध आणि पाणि वेगळे निदर्शीत केल्यास उत्तम. तसे न केल्यास (नकळत ?) एक प्रकारची विचार चोरीच केली आहे असे म्हणावे लागेल ...>>>>

मी 'विचार-चोरी' केली असे मला वाटत नाही. कारण मी स्पष्ट लिहीले आहे की ही काही तज्ञांची मते आहेत. तरीही, समजा ती मला पटली आहेत व म्हणून आता 'माझी स्वतःची' आहेत व 'चोरलेलीच' आहेत असे ठरवल्यास आपल्याला त्यात स्वारस्य नाही असे आपण म्हणत आहात. पण तरी सर्वांनाच बहुधा वाचायला आवडेल की आपली मते काय आहेत. कृपया गृहीत धरा की या संपूर्ण धाग्याशी माझा काहीही संबंध नाही आणि आपण जसे उत्तर मांडले असतेत तसे कृपया मोकळेपणाने मांडा. त्यातून आम्हाला फायदाच होईल. यात कोणताही उपरोधही नाहीच. वाट पाहात आहे. Happy

====================================================

झक्की,

<<<<मूळ निर्मिती, सौंदर्य, तत्वज्ञान, अध्यात्म समीक्षापात्रता, रसग्रहणपात्रता' या सगळ्या बोजड शब्दांना काही इंग्रजी किंवा उर्दू नावे दिल्यास जास्त इझीली लेजिबल होईल नि जास्त समजेल. धन्यवाद.)>>>>

Happy

===================================================

-'बेफिकीर'!

अशोकराव, खूप आवडला आपला प्रतिसाद! यथाशक्ती मते मांडतो. Happy

====================================================

<<<<'समीक्षे' ला सर्वप्रथम लेखकाने नजरेसमोर आणणे त्याच्याही आणि समाजाच्याही दृष्टीने हितकारक असते.>>>>

बहुधा माझ्या मूळ लेखातून तसा विचार प्रकट होत असावा. पण तो हेतू नव्हता. (आता मीच अडकलो की काय) Happy मला असे म्हणायचे होते की समीक्षेस पात्र झालेले लेखन हे 'निव्वळ लेखन' या पातळीपेक्षा वरच्या दर्जाचे लेखन मानले जाते. पण हेही वाटते की मुळ लेखन करताना 'दर्जात्मक पातळ्यांचा' विचार केला जाऊ शकत नाही व करणे (कदाचित) अयोग्यही असावे. आपले मत समजावे.

===================================================

<<<<याचा अर्थ असा नव्हे की, त्याला फक्त 'रंजनमूल्य' असलेले साहित्यच अपेक्षित आहे. >>>>

सहमत आहेच. पण एक विचारायचे होते. 'रंजकतेबद्दल' प्रत्येकाची मते सापेक्ष असणार हे गृहीत धरूनही 'एक अ‍ॅबसोल्यूट रंजकता' (सहज सुचलेले उदाहरण चॅप्लीन) अस्तित्वात नसेल का? (रंजकत म्हणजे 'हासवू शकण्याही पात्रता' असे मला नक्कीच म्हणायचे नाही आहे, पण निदान भाषेची शैली किमान खिळवून ठेवणारी असावी व लेखन कंटाळून बाजूला ठेवायला लावणारी नसावी इतपत अपेक्षा ठेवणे गैर आहे का असे विचारायचे आहे. ) Happy

किंवा, असे म्हणावेसे वाटले की - पॅकेजिंगला मार्केटमध्ये महत्व आहे ना? पॅकेजिंगचा दर्जा आतील गोष्टीचा दर्जा 'किमान सुचवतो तरी' ही बाब डोळेझाक करण्याची असेल का?
================================================

<<<<श्री.बेफिकीर यानी 'तत्वज्ञाना' ला इथे लेखनमाहात्म्यात का आणले याचा नक्की बोध मला त्या गटाबद्दल त्यानी जे लिहिले त्यावरून तरी झाला नाही. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे इतकेच म्हणू शकेन की कोणत्याही प्रकारच्या साहित्यकृतीमध्ये लेखक त्याचे स्वतःचे असे 'तत्वज्ञान' प्रकट करीतच असतो. किंबहुना 'बाय डीफॉल्ट' तत्वज्ञान हे लेखकच नव्हे तर चित्रकलेमध्ये चित्रकार आविष्कारीत करीत असत, तिथेही त्याचे स्वतःचे असे तत्वज्ञान असतेच. त्यासाठी तर त्यांचा अट्टाहास असतो. रेग्यांनी 'सावित्री' मध्ये वा मर्ढेकरांनी 'पिपात मेल्या उंदीरा' ला घेऊन कोणते तत्वज्ञान अधोरेखीत केले आहे हे सांगण्याची त्यांची जबाबदारी नव्हती, ते काम वाचक+समीक्षक करतातच.>>>>

पूर्ण सहमत! ज्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या मते 'लेखनातील तत्वज्ञान' याबाबत तो मुद्दा नव्हता तर 'जीवनात सुंदर कशाला म्हणायचे आणि कशाला नाही म्हणायचे' हे ठरवण्याची पात्रता असलेल्या व पिढ्यानपिढ्यात निर्माण झालेल्या विचारवंतांच्या विचारांमधील एका 'किमान साधर्म्याच्या' प्रणालीनुसार ठरते व कदाचित त्यामुले तो निकष मानला जावा असे त्यांचे मत असावे. आपण कृपया यावर अधिक लिहावेत ही विनंती!
=====================================================

<<<<मलाच काय पण खुद्द धागाकर्त्यालाही ही बाब मान्य असेलच की उत्तम वाङ्मयकृतीचे लक्षण असे की प्रत्येक आस्वादात ती वाचकाला समृद्ध करीत जाते व स्वतःही समृद्ध होत जाते.>>>>

मी हे 'हिंदू'च्या मायबोलीवरील रसग्रहणापासून अनेकांना विचारत आहे पण कुणी उत्तर दिले नाही. कृपया आपण तरी द्यावेत. वाचकाला समृद्ध करत स्वतःही समृद्ध होणे म्हणजे प्रत्यक्षात काय अशी माझी शंका आहे व ती प्रामाणिक शंका आहे. हे मला माहीत नाही म्हणून विचारत आहे व कुतुहल असे आहे की वरील पातळ्यांपैकी कोणत्याच पातळीत ते अ‍ॅड्रेस होत नसेल काय! Happy

=======================================================

<<<<असो. खूप चांगला आणि विस्तृत सकस चर्चेस वाव देणारा हा विषय असल्याने त्या अनुषंगाने जितके जास्त प्रतिसाद येतील तितका याचा आनंद घेता येईल.>>>> सर्वोत्कृष्ट (आत्तापर्यंतचा) प्रतिसाद आपलाच असल्याने व त्यात्न शिकायला मिळत असल्याने आपण अधिकाधिक लिहावेत अशी विनंती! Happy

-'बेफिकीर'!

>>म्हणजे दरोडेखोर व सज्जन या दोघांनी ज्ञानेश्वरी वाचणे व त्यांची भिन्न मते तयार होणे अशा पातळीवर लेखनाचा दर्जा ठरवणे हे अनियमीत प्रकारचे मापन होईल ना?

बेफिकीर,
अर्थातच! सज्जन माणूस त्यातील आशय काही प्रमाणात अ‍ॅप्रिशियेट करू शकेल.. दरोडेखोर करू शकण्याची शक्यता कमी आहे (सज्जन सुशिक्षीत, दरोडेखोर अशिक्षीत असे आपण दोघांनी ईथे गृहीत धरले आहे..). पण त्याने मूळ ज्ञानेश्वरीचा दर्जा बदलत नाही- बदलते ते वाचकाच्या पातळीवर त्या निर्मीतीचे अपिल, त्यातील आशयाचे त्याच्या व्यावहारीक, अध्यात्मिक अनुभूतीशी जुळलेले संधान, ज्यापूढे ते ईतर वाचकांपर्यंत समीक्षा, रसग्रहण रूपाने पोचवण्याची त्याची कुवत.
तेव्हा निश्चीतच यात डायनामिक व फ्लुयिडीटी आहे. त्याला एखाद्या स्थायी फ्रेम मध्ये बंदीस्त करून ती फ्रेम सर्वांसाठी आखून देणे हे मूळ साहित्य व वाचक दोघांच्याही सक्षम व सुलभ होण्याच्या प्रक्रीयेत अडथळा ठरू शकते. रसग्रहण आवडले तरी मूळ पुस्तक आवडले नाही असे होवू शकते. कारण रसग्रहण अशा फ्रेम मध्ये बंदिस्त असल्याने त्या फ्रेम पुरते त्याचा आस्वाद असतो. त्या फ्रेम च्या पलिकडे मूळ साहित्यात काय आहे (चांगले किंवा वाईट) याची उत्सुकता रसग्रहणातून निर्माण झाली तर तर ते रसग्रहण सर्वार्थाने परीपूर्ण आहे असे म्हणावे लागेल.
थोडक्यात रसग्रहण ही त्या साहित्याची एक स्थायी फ्रेम असेल तर मूळ साहित्य लिहीतानाची व वाचतानाची प्रक्रीया अर्थातच डायनामिक, फ्लुईड असणार आहे.
या ऊलट निर्मीतीच्या निव्वळ ऊर्मीच्या पलिकडे जावून जेव्हा एखादा निर्माता एका शून्यावस्थेत पोचतो, ज्यावेळी तो स्वतःच्या शोधातून एका स्थायी पातळीवर पोचलेला असतो (ठेहेराव!) त्यावेळी झालेली निर्मिती ही कुठल्याही व्यावहारीक वा लाक्षणिक कसोट्यांना पार करून एका स्थायी पातळीवर पोचलेली असते. ज्याचे आकलन, विश्लेषण, वा रसग्रहण करताना वाचकालाही त्या स्थायी भावाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
असो.

मी 'विचार-चोरी' केली असे मला वाटत नाही. कारण मी स्पष्ट लिहीले आहे की ही काही तज्ञांची मते आहेत. >>

तेच कुठल्या तद्यांचि कुठली मते आहेत ह्याचा संदर्भ त्या लेखात दिल्यास उत्तम होइल

तरीही, समजा ती मला पटली आहेत व म्हणून आता 'माझी स्वतःची' आहेत व 'चोरलेलीच' आहेत असे ठरवल्यास आपल्याला त्यात स्वारस्य नाही असे आपण म्हणत आहात.>>

दुस्र्याचि मते मते पटल्याने ती स्वतःची होत नाहीत. व स्वतःची म्हणुन खपवणे गैर आहे ईतकेच. पुन्हा आप्लै मते ऐकण्यात वर त्यावर चर्चा करण्यास स्वारस्य नाही असे मी म्हटले पुन्हा माझा प्रतिसाद नीट वाचावात ही अपेक्षा.

पण आपण ज्या पुस्तकांच्या आधारे हा लेखन प्रपंच केला आहे त्या पुस्तकांचे संदर्भ देण्यास इतकी कुचराई का?

मामींनी लिहिलं आहे तेच विचारायचे आहे :
<<साहित्यनिर्मीतीसमोर ज्या दर्जात्मक स्पर्धांच्या कठोर अटी मानल्या गेलेल्या आहेत त्या:>>>> या वाक्याचा अर्थ काय?
शीर्षकात दर्जात्मक पातळ्या असा प्रयोग दिसतोय. म्हणजे इथे चुकून पातळ्यांऐवजी स्पर्धा लिहिले गेले आहे का?

अलीकडेच के रं शिरवाडकर यांचे 'साहित्यवेध' हे पुस्तक वाचनात आले. त्यात त्यांनी कला आणि समीक्षेतील विविध विचारप्रवाहांचा परिचय करून दिला आहे. वेळेअभावी ते पूर्ण वाचता आले नाही. पण जेवढे वाचले त्यातूनच हे लिहित आहे.
१) << मूळ निर्मीती - उपयुक्तता (यात ज्ञानवर्धक, मनोरंजक, स्फुर्तीदायक इत्यादी बाबी), समकालीन संस्कृती व समाजाची पुरेशी जाणीव असल्याची चिन्हे व नावीन्यता (यात शैली, संदर्भ इत्यादी बाबी) समाविष्ट धरल्या जातात>> हा मुद्दा कलावाद्यांना अजिबात मान्य होणार नाही. त्यांच्यामते `कला ही एक स्वतंत्र स्वयंभू एन्टिटी असून कलेला जीवनविषयक प्रयोजन नाही. कला हे अंतिम उद्दिष्ट असल्यने तिचा साधन म्हणून उपयोग होऊ शकत नाही. तिचे मोल तिच्या बाहेर असलेल्या प्रबोध , क्रांती, समाजसुधारणा इ.उद्दिष्टांत असू शकत नाही.'
अर्थात साहित्याच्या बाबतीत त्याचा जीवनाशी काहीही संबंध नसणे ही बाब कठीण असल्याने साहित्य ही एक अपुरी कला आहे, असेही काहींचे म्हणणे आहे.
२) `कलेचे एकमेव उद्दिष्ट केवळ सौंदर्यविष्कार असल्याने समीक्षेचे एकमेव कार्य कलेतील सौंदर्याचा आस्वाद घेणे आणि त्याचा प्रत्यय रसिकांना देणे हे ठरते.'
३) प्रस्तुत लेखात लेखात मांडलेली सौंदर्याची संकल्पना सत्यम शिवम सुंदरम यासारखी वाटली तरी मूल्ये (values) म्हणजेच सौंदर्य असा अर्थ त्यातून निघतो.वर म्हटल्याप्रमाणे कलावाद्यांच्या मते कलेचे मूल्यमापन कलाबाह्य बाबींवर ठरत नसल्याने तिथे मूल्यव्यवस्थेचे मानदंड लावले जाऊ नयेत. कलावाद्यांच्या आणि रूपवाद्यांच्या (आशयापेक्षा रूपाला, अभिव्यक्तीला महत्त्व देणार्‍या) मते कलेतील 'सौंदर्यभावना म्हणजे जीमध्ये अर्थपूर्ण रूप significant form मध्ये आहे ती. अशे सौंदर्यभावना कशाचेही साधन असत नाही, तिचे साध्य आस्वादातच असते.'
<<समीक्षेचे अधिपत्य सौंदर्यशास्त्राकडे आहे. थोडक्यात, सौंदर्यशास्त्र हे समीक्षेचे मालक असून तेच ठरवते की समीक्षेने काय करावे.
सौंदर्यशास्त्र हे समाजाच्या जिवंतपणाचे व बहरलेपणाचे लक्षण असते व ते बदलणे जवळपास अशक्यच>>>> ही स्पष्ट विधाने आहेत. ती सर्वमान्य आहेत का? की प्रस्तुत लेखकाचे स्वत:चे मत आहे ? की लेखनात आरंभी लिहिलेल्या कुणा जाणकारांचे मत आहे?
बहरलेपणा= समृद्धी असा अर्थ घेतला तर अभावातून जगणार्‍यांनी केलेली निर्मिती ही सौंदर्यपूर्ण असू शकणार नाही असे म्हणायचे का?
एखाद्या वस्तूमुळे शुद्ध निरपेक्ष आनंद मिळतो तेव्हा त्या वस्तूला सुंदर म्हणावे.
म्हणजे ताजमहाल सुंदर आहे, पण कुणा शोषिताचे आत्मकथन हे सुंदर नसल्याने ते कलात्मक नाही असे होईल का? सौंदर्य याचा कलेच्या संदर्भात एक अर्थ अर्थपूर्ण असाही (खरे तर असाच अर्थ असायला हवा.). कलाकाराच्या अनुभूतीतला भाव अभिव्यक्तीतून कसे व्यक्त होतात यात कलाकृतीचे सौंदर्य जोखले जायल हवे.

'रसग्रहण : काव्यातील सौंदर्याचा भावनात्मक अनुभव म्हणजे रस.वास्तवाचे कल्पनाकृत प्रतिरूप म्हणजे रस. रसानुभव म्हणजे लौकिक भावानुभावाला अलौकिकाच्या पातळीवर नेणे, परंतु त्या प्रक्रियेत त्याचे लौकिक सार कायम ठेवणे.'
<<रसग्रहणाला या सर्व पातळ्यांपैकी फक्त सौंदर्यशास्त्रीय पातळीशी घेणेदेणे असावे असे म्हणतात. रस या शब्दातूनच गोडव्याची अनुभुती व्हावी. तेव्हा निर्मीतीमधील गोडवा, काव्य (काव्य या शब्दाचा येथे अर्थ कविता असा नाहीच) , रसरशीतपणा 'एक्स्ट्रॅक्ट' करून वाचकाला कळवणे हे रसग्रहणाचे काम आहे. तसेच, 'रस' निष्पन्न होत नसल्याचे सांगणेही! मात्र रसग्रहण हे मूळ निर्मीतीबाबत असूनही मूळ निर्मीतीपेक्षा चवीला मधुर असावे ही किमान अट मानली जाते.>> इथे नवरसांबद्दलच(शृंगार, वीर, बीभत्स, शांत,रौद्र, इ.) बोलले जात असेल तर गोड , मधुर ही विशेषणे अप्रस्तुत ठरतात.

अवतरणात आणि इटालिक टाइपात दिलेली विधाने मी वर म्हटलेल्या पुस्तकातून घेतली आहेत. त्यातील काही विधाने तिथेही अवतरणे म्हणून आलेली आहेत.

पेशवा,

<<<<पण आपण ज्या पुस्तकांच्या आधारे हा लेखन प्रपंच केला आहे त्या पुस्तकांचे संदर्भ देण्यास इतकी कुचराई का?>>>>

कुचराई अजिबातच नाही. फक्त मी प्रवासात होतो व पुस्तकांची नेमकी नांवे देण्यासाठी थांबलो होतो इतकेच. Happy

आत्ताही ती पुस्तके घरी आहेत व मी ऑफीसमध्ये! तरी द्यायचा प्रयत्न करतो. कदाचित काही गफलत असल्यास पुन्हा सुधारेन!

१. मराठी साहित्याचे व समीक्षेचे मापदंड

२. पस्तुरी

३. मीर - रामनाथ सुमन

४. डॉ अरुणा ढेरेंचे एक पुस्तक

५. मर्ढेकरांच्या काव्याच्या समीक्षेचे एक पुस्तक

या व्यतिरिक्त अनेक असे (मराठी व उर्दू परंतु देवनागरीतील) काव्यसंग्रह (साधारण ५० ते ६०) ज्यात त्या त्या कवीच्या कवितेची ब्रीफ समीक्षा व रसग्रहण आहे.

चर्चा:

डॉ द भि कुलकर्णी

डॉ सु प्र कुलकर्णी

श्री न म जोशी

श्री बशर नवाझ

डॉ राम पंडीत

व इतर काही ज्यांची नावे या यादीत समाविष्ट करणे त्यांनाही रुचू नये. Happy

==================================================

पेशवा,

<<<<दुस्र्याचि मते मते पटल्याने ती स्वतःची होत नाहीत. व स्वतःची म्हणुन खपवणे गैर आहे ईतकेच.>>>>

मी वरील लेखात माझी मते किंवा 'दुसर्‍याची मला पटलेली मते माझी म्हणून' खपवलेली नाहीत व तसा स्पष्ट उल्लेख पहिल्या विधानात केलेला आहे. Happy ही मते खपवून मला काही मिळणारही नाहीच आहे.

माझी आपल्याला विनंती इतकीच आहे की 'मी हा लेख लिहीला' हे घटकाभर दुर्लक्षित करून आपण आपली मते कृपया मांडावीत कारण ती अभ्यासनीय ठरतील. Happy

-'बेफिकीर'!

रच्याकने 'मा निषाद' हे आद्य काव्य एका पूर्वाश्रमीच्या दरोडेखोरानेच लिहिले.

<निर्मीतीच्या निव्वळ ऊर्मीच्या पलिकडे जावून जेव्हा एखादा निर्माता एका शून्यावस्थेत पोचतो, ज्यावेळी तो स्वतःच्या शोधातून एका स्थायी पातळीवर पोचलेला असतो (ठेहेराव!) त्यावेळी झालेली निर्मिती ही कुठल्याही व्यावहारीक वा लाक्षणिक कसोट्यांना पार करून एका स्थायी पातळीवर पोचलेली असते. ज्याचे आकलन, विश्लेषण, वा रसग्रहण करताना वाचकालाही त्या स्थायी भावाचा अनुभव असणे आवश्यक आह> यू सेड इट.
'यशस्वी निवेदन म्हणजे कवीची अनुभूती अणि वाचकाची अनुभूती ह्यांच्यातील अनुरूपता.'

<<<<पण त्याने मूळ ज्ञानेश्वरीचा दर्जा बदलत नाही->>>>

तेच योग, मीही तेच म्हणतोय. Happy आपला जो आधीचा मुद्दा होता, की वाचकाची पातळी असायला हवी, त्याबाबत मी ते लिहीले होते. Happy

=======================

<<<<या ऊलट निर्मीतीच्या निव्वळ ऊर्मीच्या पलिकडे जावून जेव्हा एखादा निर्माता एका शून्यावस्थेत पोचतो, ज्यावेळी तो स्वतःच्या शोधातून एका स्थायी पातळीवर पोचलेला असतो (ठेहेराव!) त्यावेळी झालेली निर्मिती ही कुठल्याही व्यावहारीक वा लाक्षणिक कसोट्यांना पार करून एका स्थायी पातळीवर पोचलेली असते. ज्याचे आकलन, विश्लेषण, वा रसग्रहण करताना वाचकालाही त्या स्थायी भावाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
असो.>>>>

सहमत आहे, हा उतारा आवडलाही व माझेही तेच मत आहे, मला एक लक्षात आले नाही की हे आपण माझ्या कोणत्या प्रतिसादावर उत्तर म्हणून लिहीलेत! Happy तसेच याबाबत एक माझे मतही नोंदवायची इच्छा आहे.

अशा निर्मीतीचे आकलन, विश्लेषण व रसग्रहण करताना वाचकालाही त्या स्थायी भावाचा अनुभव आहे या भागाशी मी असहमत असून मला असे वाटते की अशी निर्मीती आपोआपच अत्यंत श्रेष्ठ ठरते व वाचकाला आपोआपच ती श्रेष्ठ असल्याचे जाणवत राहते. त्यासाठी परचित्तप्रवेश किंवा तशी अनुभुती आवश्यक नसावी असे वाटते. उदाहरणः

गोंदवलेकर महाराजांच्या कीर्तनाचे जे पुस्तक आहे ते वाचताना माणसाच्या मनात भक्तीभाव किंवा श्रद्धा किंवा या दोन्हीची अनुभुती अजिबात नसतानाही एखादा गुंगून जाऊ शकतो. Happy काही चुकत असल्यास जाणकारांनी सुधारावे.

धन्यवाद!

बेफी यादि करता धन्यवाद. आता सवड मिळेल तशि कुठली मते कुठल्या पुस्तकतुन वा कुठल्या अभ्यासकचि इतका संदर्भ उपडेट करावा ही विनंती. पुनःश्च धन्यवाद.

<<<<कला ही एक स्वतंत्र स्वयंभू एन्टिटी असून कलेला जीवनविषयक प्रयोजन नाही. कला हे अंतिम उद्दिष्ट असल्यने तिचा साधन म्हणून उपयोग होऊ शकत नाही. तिचे मोल तिच्या बाहेर असलेल्या प्रबोध , क्रांती, समाजसुधारणा इ.उद्दिष्टांत असू शकत नाही.>>>>

फार आवडला हा विचार! पण भयंकरही वाटला. कारण मग तसे म्हंटले तर जीवन हाही एक कलेचाच भाग मानावा लागेल. म्हणजे सृष्टीची निर्मीती ही कुणाची तरी कला आहे असे! आणि खरे तर तेही दिलचस्पच वाटेल. पण वास्तव आयुष्यात तो दृष्टिकोन ठेवून वावरता येत नाही असा अनुभव बहुतेकांना येत असणार! आणि उलट म्हणायचे तर 'कला हा जीवनाचा एक भाग आहे' हा दृष्तिकोन अनेकांना पटणार!

कलेला जीवनविषयक प्रयोजन नाही हे विधान मला भयंकर वाटले. (यात कृपया आपल्याला दोष देत नाही आहे याची खात्री बाळगावीत. आणि मुळ लेखकाला देण्याची तर पात्रताही नाही. पण जे वाटले ते आपले म्हणतोय). असे विचारावेसे वाटले की अशी कोणती कला म्हणता येईल जिला जीवनविषयक प्रयोजन नाही? मनुष्याचे आयुष्य हा कलेच्या निर्मीतीचा व अस्तित्वाचा पायाच नाही हे मान्य करणे अवघड जात आहे. कृपया अधिक लिहावेत. Happy

धन्यवाद!

<गोंदवलेकर महाराजांच्या कीर्तनाचे जे पुस्तक आहे ते वाचताना माणसाच्या मनात भक्तीभाव किंवा श्रद्धा किंवा या दोन्हीची अनुभुती अजिबात नसतानाही एखादा गुंगून जाऊ शकतो>
कलावाद्यांच्या मते वाचकाने आपले जीवन (आणि अर्थातच आपली मते) दूर सारून कलाकृतीला सामोरे जायला हवे. तरच त्याला त्या कलाकृतीचा योग्य आस्वाद घेता येईल.

<<<<बेफी यादि करता धन्यवाद. आता सवड मिळेल तशि कुठली मते कुठल्या पुस्तकतुन वा कुठल्या अभ्यासकचि इतका संदर्भ उपडेट करावा ही विनंती. पुनःश्च धन्यवाद.>>>>

हे मी करू शकेन! पण त्याला वेळही लागेल व मला त्याची आवश्यकता लक्षात येत नाही आहे. असो, बहुधा आपल्याला ठामपणे असे वाटत असावे की 'तज्ञांची मते' म्हणून मी माझी मते मांडत आहे. तसे असल्यास 'ते तसे नाही' इतकेच मी म्हणू शकेन, बाकी काही करू शकणार नाही. आपलेही आभार! Happy

<<<<कलावाद्यांच्या मते वाचकाने आपले जीवन (आणि अर्थातच आपली मते) दूर सारून कलाकृतीला सामोरे जायला हवे. तरच त्याला त्या कलाकृतीचा योग्य आस्वाद घेता येईल.>>>>

हे आपल्यालाही व्यक्तीशः पटले आहे का? Happy

कनोजी अत्तर कुपीतच ठेऊन त्याचा वास घेतला वा ती कुपी खाली पडून ते जाजमावर पसरले तरी अत्तराचा नैसर्गिक आनंद देण्याचा गुणधर्म उडून जात नाही, त्याच अनुषंगाने असे म्हणत आहे हा विषयच इतका सुंदर आहे की यावर अनुकूल असो वा प्रतिकुल असो दोन्ही मतांची शुभ्रता प्रत्येक प्रतिसादात पसरली आहे, आणि धागाकर्ते श्री.बेफिकीर ज्या संयत भाषेत दोन्ही प्रकारच्या मतांना सविस्तर खुलासे देत आहेत ते वाचून त्यानाही या विषयातील सौंदर्य अधिकाधिक आवडत चालले आहे असे प्रतीत होत आहे.

एक विशेष जाणवणारी बाब म्हणजे प्रतिसादक केवळ मूळ लेखाकडेच पाहत नसून अन्य वाचकही कशाप्रकारे आपली भूमिका मांडत आहे तेही गांभीर्याने पाहतात आणि प्रसंगी त्या प्रतिसादाला दादही देतात. त्याबद्दल मी इथेच सर्वश्री ज्ञानेश, ह.बा., केदार, राम प्रभृतींचे आभार मानतो.

श्री.बेफिकीर यानी दुसर्‍या सत्रात मांडलेल्या विचारांच्या/मताच्या अनुषंगाने माय टू सेंट्स ~
१. तुम्ही म्हणता तसे समीक्षेस पात्र झालेले लेखन हे 'निव्वळ लेखन' या पातळीपेक्षा वरच्या दर्जाचे लेखन मानले जात असेलही; पण तो काही एकमेव मानदंड असूच शकत नाहे....असूही नये. विजया राजाध्यक्षांनी 'मर्ढेकरां'च्या वर हजार पानावर जाईल इतकी समीक्षा लिहिली म्हणून (च) मर्ढेकरांचे लिखाण वरच्या दर्जाचे मानले जाईल अशी बिलकुल शक्यता नसते. काळाच्या पातळीवरच एखाद्याचे लेखन किती कसदार, लालित्यपूर्ण आणि टिकाऊ ठरते. खुद्द मर्ढेकरांना त्यांच्या उभ्या आयुष्यात तसा मान मिळाला होता याचा लसावि काढला तर अंती उत्तर शून्यच येते हे त्यांच्या आणि श्री.पुं.च्या पत्रव्यवहारावरूनही कळतेच. जी.ए.कुलकर्णी यानी ते धारवाडच्या कडेमनी कंपाउंडमध्ये असताना जो मान मिळत होता त्यापेक्षा कितीतरी पटीने मृत्युनंतर मिळत गेला. त्याला कारण त्यांच्या लेखनाच्या दर्जाविषयी समीक्षक त्या त्या काळात आणि त्यानंतर जे लिहित गेले त्याचे पडसाद पुढील पिढीच्या वाचकावर पडत गेले. ही प्रक्रिया अखंडपणे साहित्याच्या आणि भाषेच्या दृष्टीने अत्यावश्यक मानली पाहिजे. पॉप्युलरच्या भटकळ बंधूनी जी.एं.च्या हयातीत पुस्तकावर जितकी कमाई केली त्यापेक्षा {समीक्षकांच्या पुण्याईवर} आता किती करीत आहेत याचा लेखाजोखा काढला तर भटकळांनी 'वाहत्या गंगेत हात धुवून घेतले' असेच म्हटले पाहिजे. पण जाऊ दे, तो वेगळा विषय होईल.

होते असे की, तुम्ही जर रा.भा.पाटणकर, प्रभाकर पाध्ये, द.भि.कुळकर्णी सदृश्य समीक्षकांच्या समवेत प्रवासाला निघाला तर तुमच्या मूळ लेखातील 'दर्जात्मक' पातळ्याचे मीटर तुमच्या लिखाणाला लावणे 'ऑलमोस्ट कंपल्सरी' मानावेच लागेल कारण तुम्हाला तिथे पळवाट नाही. याचा अर्थ असाही नव्हे की त्या चौकडीसाठीच तुम्ही आपली लेखणी झिजवावी. पण ज्यावेळी माधव आचवल, म.द.हातकणंगलेकर वा गेला बाजार राम पटवर्धन यांच्यासारख्या साक्षेपी अभ्यासकांबरोबर असेल तर मग तुम्हाला ते सूर्यपातळीवरील रस्त्यावर नेण्यास मदत करतील यात दुमत नाही. सांगायचा थेटच मुद्दा असा की, लेखकाने त्या त्या लिखाणात दर्जाचे भान ठेऊन लिखाण करणे निव्वळ अपेक्षित नव्हे तर क्रमप्राप्त मानावे. नाही तर होते असे की 'धग' मध्ये जाणवलेले उद्धव शेळके पुढे भेटत नाहीत, तर 'टारफुला' नंतरचे शंकर पाटील ग्रामीण बाजाच्या तमाशा ढंगात गुरफटलेले तुम्ही पाहिले असालच. 'माणूस' चे मनोहर तल्हार असोत वा 'बलुतं' घेऊन आलेले दया पवार असोत....लिखाणाचा तो दर्जा आणि ती तळमळ पुढील कृतीत का आणू शकले नाहीत तर त्याला कारणही त्यांचे दर्जात्मक लिखाणाकडे झालेले दुर्लक्ष.

वाचकाला कुणीही 'टेकन फॉर ग्रांटेड' धरू नये वा ग्राम्य भाषेत म्हणतात तसे 'मूर्ख'ही समजू नये. लेखक कितीही महान असला तरी त्याला वाचकाच्या रक्ताच्या ठोक्यावरच तपासून घ्यावे लागते. पुस्तकांच्या संख्येवरही लेखकाचे महत्व किती आहे हे जोखू नये....फार फसवा आहे तो प्रयास....तसे असते तर सांप्रत महाराष्ट्र देशी चंद्रकांत काकोडकर आणि बाबुराव अर्नाळकर यांचेच साहित्य बी.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात दिसले असते. फडक्यांनी एकेकाळी कॉलेजकुमार आणि कन्यकाना वेड लावले होते, पण काळाच्या कसोटीवर उरले ते विश्राम बेडेकर आणि र.वा.दिघे ज्यांची साहित्यातील 'मालमत्ता' पाहावी तर हाताची बोटेही जादाची होतील.

या उदाहरणावरून 'दर्जा' किती महत्वाचा ठरतो, हे तुम्ही स्वतःच, बेफिकीर, एक उदयोन्मुख लेखक या भूमिकेतून ठरविल्यास ही 'टॉर्च' तुमच्या लेखनप्रवासाला खूप उपयुक्त ठरेल.

२. "'रंजकतेबद्दल' प्रत्येकाची मते सापेक्ष असणार हे गृहीत धरूनही 'एक अ‍ॅबसोल्यूट रंजकता' (सहज सुचलेले उदाहरण चॅप्लीन) अस्तित्वात नसेल का? "

~ का असू नये ? इसापनितीत 'रंजन' नाही का? का केवळ ती नीतिशास्त्राचे बेसुमार धडे देणारी जीर्ण किचकट कळकट आजीबाईची देवघरातील पोतडी आहे ? हेमिंग्वेने 'ओल्ड मॅन अँड सी' मध्ये जो झगडा चितारला आहे त्यालाही रंजनमूल्य आहेच त्याचप्रमाणे उलट असेही म्हणेन की डी.एच.लॉरेन्सच्या 'लेडी चॅटर्लीज लव्हर' मध्ये केवळ रंजनमूल्य आहे म्हणून ती कादंबरी गाजली असेही नसते. रंजकतेबद्दल समीक्षकांची कसलीही मते असोत त्यानी त्या घटकाला कधीही अव्हेरलेले नाही. अगदी रामायण महाभारताची लोकप्रियता असो वा होमरच्या एपिक्सची....त्या त्या घटनांना वा त्या घडविणार्‍या घटकाना आवश्यक ते रंजनमूल्य दिले म्हणूनच आज हजारो वर्षे झाली तरी त्यांची अवीट अशी गोडी टिकून आहे.

अजून पुढे लिहिता येईल या विषयाच्या अनुषंगाने. पण 'अंगापेक्षा बोंगा मोठा' नको या उक्तीनुसार लेखापेक्षा प्रतिसाद जादाचा वाटू नये म्हणून या क्षणी इथेच थांबतो.

अशोक पाटील

कलेला जीवनविषयक प्रयोजन नाही हे विधान मला भयंकर वाटले. >> या विधानापुरते ठाम अनुमोदन.

बाकी माझ्या मुद्द्यांना तुम्ही दिलेल्या उत्तरांत पुन्हा प्रतिउत्तरे देण्याचे प्रयोजन दिसत नाही. Proud मी ती पहिली पोस्ट अत्यंत सोप्या भाषेत लिहिली होती. पुन्हा विस्कटून सांगायची गरज नाही, असं वाटतं.

आता हा बाफ गेली ८-९ दशके घासून गुळगुळीत झालेल्या आणि आता कालबाह्य आणि हास्यास्पद ठरलेल्या कलावाद-जीवनवाद याकडे चालला आहे. याचा शेवट होणार नाही. झालाच तर पुंडलिक वरदे हारी विठ्ठल- इतकाच होईल.

काळ बदलतो, तसा समाज-संस्कृती बदलते म्हणून त्या त्या समाज-संस्कृतीतल्या साहित्य आणि समीक्षेचे मापदंडही बदलतात, हे कुणाला मान्य नाही काय? जुन्या ढुड्ढाचार्यी समीक्षकी भाषा नि तत्वज्ञान नि मापदंडांवर जरा नव्याने नीट विचार व्हायला नको का?

लेखकाने त्या त्या लिखाणात दर्जाचे भान ठेऊन लिखाण करणे निव्वळ अपेक्षित नव्हे तर क्रमप्राप्त मानावे... .. ... ....लिखाणाचा तो दर्जा आणि ती तळमळ पुढील कृतीत का आणू शकले नाहीत तर त्याला कारणही त्यांचे दर्जात्मक लिखाणाकडे झालेले दुर्लक्ष.
>>>
'धग', 'टारफुला', 'बलुतं' हे सारं अत्यंत वास्तव पातळीवर, त्या अनुभवांतुन गेल्यानंतरचं लिखाण होतं. म्हणूनच त्या त्या प्रदेशांत मुळं घट्ट रोवलेलं, मातीशी-अनुभवांशी अत्यंत प्रामाणिक, आतुन आलेलं आणि अस्सलझनक होतं. त्याला त्या त्या सिद्धहस्तांच्या 'शैली'ची जोड मिळाली, आणि ते सारं अफाट झालं. त्यासाठी खास वेगळ्या कलावाद-सौंदर्यवाद-रुपवाद-जीवनवाद वगैरेकडे लक्ष देण्याची गरज पडली नाही. ते आपोआपच 'सुंदर', 'कलात्मक', 'जगण्याशी इमान राखणारं-जीवनवादी' झालं.

दर्जात्मक लिखाणाकडे झालेले दुर्लक्ष- असं काही ठरवून वगैरे करता येत नाही. चला दर्जात्मकच लिहू या- असंही करता येत नाही.

<<मूळ निर्मीती - उपयुक्तता (यात ज्ञानवर्धक, मनोरंजक, स्फुर्तीदायक इत्यादी बाबी), समकालीन संस्कृती व समाजाची पुरेशी जाणीव असल्याची चिन्हे व नावीन्यता (यात शैली, संदर्भ इत्यादी बाबी) समाविष्ट धरल्या जातात. यातून असे म्हणायचे असते की निर्मीती किमान कोणत्यातरी कारणास उपयुक्त ठरावी, सध्याच्या जगाशी तिची नाळ असावी व निर्मीतीची शैली व त्यातील उल्लेख यात नावीन्य असावे. >> या विधानाच्या,(आणि फक्त तेवढ्याच) विशेषतः कलाकृतीच्या उपयुक्ततेच्या संबंधात मला कलेला जीवनविषयक प्रयोजन नाही, हे प्रतिपादन योग्य वाटते.
साहित्याचा पाया जीवनातच असला तर समकालीन संस्कृती, समाज इ.इ. आपसूक येतातच.
माझ्या कलाकृतीचा समाजाला या या गोष्टीसाठी उपयोग व्हावा म्हणून मी ती निर्माण करत आहे, असे नको. विशेषतः उपयुक्तता या शब्दाला प्रचंड आक्षेप. कलाकृती निरपेक्ष असायला हवी हे कलावाद्यांचे म्हणणे याबाबत तरी मला पटते.
गर्जा जयजयकार ही कविता वाचून स्फूर्तीदायक आहे याचा अर्थ स्फूर्ति देण्यासाठी गर्जा जयजयकार लिहिली असा होत नाही. तसंच कविता वाचून स्फुर्ती मिळाली म्हणजे स्फुर्ती मिळण्यासाठी ती कविता वाचली जावी असंही नाही.

मूळ लेखातले मुद्दा क्र. १ आणि २ व ३ हे काँट्रॅडिक्ट करतात असं वाटतं.

<<<<कलाकृती निरपेक्ष असायला हवी हे कलावाद्यांचे म्हणणे याबाबत तरी मला पटते.>>>>

मलाही हे पटले. पण मी (किंवा मूळ लेखातील मते ज्यांनी सांगीतली ते) असे म्हणत नाही की कलाकृती हेतूपुरस्पर विशिष्ट पद्धतीची केली जाते. जी मुळातच निर्माण झालेली कलाकृती आहे तिला 'त्या त्या निकषांवर' बघितले जाते असे म्हणायचे आहे. अर्थात, कलावाद्यांना तेही नकोच असणार! पण कलावादीही याच जगात जगतात व तेच अन्न खातात व तसाच उदरनिर्वाह करतात हे पाहिल्यावर 'कलेला जीवनापासून विभक्त' करण्याचा हा जाणीवपुर्वक प्रयत्न अस्वीकारार्ह वाटतो. कला ही मुळातच मानवी इंद्रियांना तोषवण्यासाठी किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी आहे हा विचार अमान्य का केला जातो आहे हे लक्षात आले नाही. जर मला जे म्हणायचे असेल ते म्हणताच येत नसेल तर पुन्हा एका उदाहरणाचा आधार घेतो व म्हणून पाहतो.

सिंघम चित्रपटः

१. एका प्रेक्षकाला आवडला. तर त्याला तो त्याच्या आयुष्यात त्याच्या निर्माण झालेल्या अभिरुचीप्रमाणे आवडतो.

२. एका प्रेक्षकाला नाही आवडला. तर तो त्याच्या आयुष्यात त्याह्या निर्माण झालेल्या अभिरुचीप्रमाणे नाही आवडत.

३. पण सिंघमच्या निर्मात्याने जर हे विधान केले की त्यची काही अपेक्षाच नव्हती (गृहीत धरले की त्याने तो प्रदर्शीतच केला नाही - तरीही) तर ते वावगे वाटते.

ज्ञानेश्वरांनी रचलेले काव्य त्यांनि नुसतेच तोंडपाठ केले असते व स्वतः गुणगुणले असते तर बिघडले नसते. पण ते त्यांनी लोकांना दिले.

आपली कला जीवन जगणार्‍यांना दिली जाते इतके तरी मान्य व्हावे.

म्हणजे समजा एकाने एक शिल्प तयार केले तर तो ते तयार करून दरीत टाकुन देणार नाही. अंधारात ठेवेल पण (त्याला स्वतःला राग येईपर्यंत) नष्ट करणार नाही.

उपयुक्तता - आपले मत पटतच आहे. पण 'उपयुक्तता' या दृष्टिकोनातून कलानिर्मीती व्हावी असे माझे म्हणणे नसून कलानिर्मीती झाल्यानंतर तिची उपयुक्तता हा एक निकष मानला जात असावा असे म्हणणे आहे. Happy

अधिक उणे लिहिल्यास दिलगीरी! Happy

चित्रपटाच्या निर्मात्याचा उद्देश त्याला जाणवलेली अनुभूती चित्रपटाच्या रूपात उतरवणे हा असायला हवा. प्रेक्षकाला आवडणे न आवडणे हा भाग अलाहिदा.

उपयुक्तता या शब्दात उगाच एक अर्थशास्त्रीय छटा आहे. कलाकृतीमुळे रसिकाला काहीतरी मिळणे असा त्याचा अर्थ मी घेतो. कलाकृतीचा आस्वाद घेण्यापूर्वी माझ्याकडे जे काही होते, त्यात कलाकृतीच्या आस्वादानंतर काही भर पडली का, या प्रश्नाचे उत्तर हो असायला हवे तर ती कलाकृती उपयुक्त असे का?
पण ही अत्यंत सापेक्ष गोष्ट आहे. मला जे उपयुक्त वाटेल ते दुसर्‍या कुणाला वाटणार नाही. मग त्याच्या दृष्टीने ते निव्वळ वेस्टेज का?

कलावाद्यांची भूमिका मला फक्त तुम्ही मांडलेल्या पहिल्या मुद्द्यासदर्भात योग्य वाटली. त्यातले(कलावादातले) बाकीचे पैलू आज अगदी इररेलेव्हन्ट वाटतात.
वाचकाच्या दृष्टीने पाहिले तर एखाद्या साहित्यकृतीला मोकळ्या मनाने सामोरे जावे असा त्याचा अर्थ मला घ्यावासा वाटतो.

>>त्यासाठी परचित्तप्रवेश किंवा तशी अनुभुती आवश्यक नसावी असे वाटते. उदाहरणः
बेफिकीर,
तुम्ही माझे विधान बहुदा नीट वाचले नाही.. तशा प्रकारच्या निर्मीतीच्या "रसग्रहणासाठी" आधी वाचकाचा तसा अनुभव हा प्रीरेक्विसीट आहे असे मी म्हटलय.
असो.

गोंदवलेकर महाराजांच्या कीर्तनाचे जे पुस्तक आहे ते वाचताना माणसाच्या मनात भक्तीभाव किंवा श्रद्धा किंवा या दोन्हीची अनुभुती अजिबात नसतानाही एखादा गुंगून जाऊ शकतो. काही चुकत असल्यास जाणकारांनी सुधारावे.
>>ऊ.दा. गैरलागू आहे. कारण निव्वळ वाचून गुंगून जाणे हे त्या पुस्तकातील भक्तीभावाचे महात्म्य प्रस्थापित करते. वाचक लगेच तोच भाव रसग्रहणातून पोचवू शकेल याची शाश्वती नसते.
आता दारूच्या केवळ वासानेच ज्यांना झिंगल्या सारखे होते ते अट्टल दारुडे बनत नाहीत, पण काही काळ झिंग देणार्‍या त्या वासाचे महत्व लक्षात येते. "तो अगदी दारू प्याल्या सारखा बोलतो" या वाक्प्रचारात तो खरच दारू पिऊन बोलतोय असे नाही तर ते "लाक्षणिक" आर्थाने म्हटलेले आहे. The signs are there but the stage is not yet attained.. असे काहीसे. जसराज, भिमसेन ई. मंडळींना अनेक काळ ऐकून मग त्यातून कधितरी एखादी ऊच्च भावावस्था अनुभवास येत असली तर त्याचा अर्थ एव्हडाच होतो की मूळ निर्मीतीच्या मागचा जो कार्यकारण भाव व स्थायी अनुभव आहे जो "कायम" आहे त्या मुक्कामी श्रोता काही वेळ पोचलेला असतो. पण म्हणून जसराज वा भिमसेन यांच्या गायनाचे वा एखाद्या ध्वनिफीतीचे रसग्रहण देखिल तोच अनुभव देवू शकेल वा किमान शब्दात तो साकारू शकेल असे नाही.

थोडक्यात तुमच्या लेखातील मूळ मुद्दा की सहित्य निर्मीतीच्या पातळ्या आणि त्यांचा रसग्रहणाशी थेट व आडून संबंध या अनुशंगाने एव्हडेच मत मांडायचे होते की रसग्रहण ही त्या वेळेपुरतीची एक स्थायी फ्रेम धरली तर नेमकी ती फ्रेम हे "लक्षण" आहे का मूळ साहित्यकॄतीच्या "स्टेज" ला पोचलेली आहे हे कळायला देखिल वाचक कुठल्या फ्रेम मध्ये आहे हे विचारात घ्यावे लागते. अशा वेळी रसग्रहणाची कक्षा फक्त "सौंदर्यशास्त्र" पुरती मर्यादीत ठेवणे हे फारच संकुचित वाटते.

बाकी
>>मानवाचीच नाही तर एकंदर सजीवांची असहाय्यता व अगतिकता व त्यामुळे निर्माण झालेली 'अदृष्य शक्तीवरील' श्रद्धा हा अध्यात्माचा पाया असून असे मानले जाते की या पातळीचा विचार मध्यवर्ती असलेली (खरे तर कोणतीही) साहित्यनिर्मीती ही सर्वश्रेष्ठ आहे.

बाकी हे अजब विधान (कुणाचे आहे माहित नाही) मात्र "दारू प्यायल्या सारखा बरळतोय" या सदरात शोभेल. कारण ""असहाय्यता व अगतिकता व त्यामुळे निर्माण झालेली 'अदृष्य शक्तीवरील' श्रध्दा""" हा अध्यात्माचा नव्हे तर अंधश्रध्देचा पाया आहे Happy त्यावर पुन्हा कधितरी.

ओके. Happy

जुन्या ढुड्ढाचार्यी समीक्षकी भाषा नि तत्वज्ञान नि मापदंडांवर जरा नव्याने नीट विचार व्हायला नको का? >>>

(मायबोलीवरील समीक्षण हा निकष तू त्या वाक्यापुरता लावला नाहीस हे समजून मी उत्तर देत आहे )

होय, जरूर, काळाप्रमाणे सगळेच बदलते, तो बदल मान्य नसेल तर त्या जगण्याला अर्थ नाही. समीक्षकी भाषा म्हणजे टोन म्हणायचे आहे का? तो साहित्यात बदललेला दिसतोच. पण समीक्षक असले तरी ती माणसे असतात त्यामुळे भाषा बोचरी होऊ शकते. मराठीत कित्येक वाद मराठी पेपर मधून झालेले आहेत. ते वाद (एखाद्या विषयालाधरून) वाचण्यासारखे आजही आहेत. नॉन फिक्शन मध्ये मी कित्येक अशी उदाहरणे देऊ शकेल की ज्यात भाषा, टोन बद्लला गेला. (कारण मला नॉन फिक्शन समीक्षेमध्ये जास्त इन्ट्रेस्ट आहे)

नवे तत्त्वज्ञान म्हणजे काय? हे मला कळले नाही. थोडे विस्तृत सांगशील का?

उदा एखाद्या गझलेचे समीक्षण करायचे असेल तर वृत्त कुठले, मात्रा किती हे बघावे लागणारच, हा गाभा सोडून अजून नवीन काय उरते? तर ती समीक्षकी भाषा जी कालौघात बदलली असे मला वाटते.

ते आपोआपच 'सुंदर', 'कलात्मक', 'जगण्याशी इमान राखणारं-जीवनवादी' झालं. >>> सहमत.

हे आद्य काव्य एका पूर्वाश्रमीच्या दरोडेखोरानेच लिहिले.

अहो पूर्वाश्रमी दरोडेखोर असले तरी नंतर ध्यान, तपश्चर्या करून भरपूर ज्ञान प्राप्त केले. दरोडेखोरी सोडली.
इथे ज्ञान याचा अर्थ आजकालच्या व्याख्येप्रमाणे, जावा प्रोग्रॅमिंग असा नाही. मनन, चिंतन करून, बरोबर काय, चूक काय याबद्दल विचार करून मग त्याप्रमाणे आचरण करणे हा आहे. ते सगळे झाल्यावर मग दरोडेखोरीचे विचार मनात रहात नाहीत.
लहानपणी एकदा नापास होऊनहि, पुढे अभ्यास करून, वाईट मित्रांची संगत सोडून, चांगले शिक्षण घेऊन कथा कविता लिहीण्याइतके, साहित्याची समीक्षा करण्याइतके ज्ञान होतेच ना लोकांना?

"मनुष्याचे आयुष्य हा कलेच्या निर्मीतीचा व अस्तित्वाचा पायाच नाही हे मान्य करणे अवघड जात आहे."

~ सहमत आहे. आदीमानवाच्या अवस्थेतून बाहेर पडून मनुष्याला 'व्यक्ती' ची ओळख मिळाली त्यावेळेपासून आज तुम्हाआम्हाला अभिप्रेत असलेला 'जीवन अनुभव' घेण्यास त्याने सुरुवात केली. अनुभवपद्धतीच्या एकत्रित असण्यातून व घडण्यातून जीवनाची जी काही स्पंदने त्याने अनुभवली तीमधून खरेतर कलेची निर्मिती झाली आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनुभवाचे कधी गोड तरी कधी कडू घोट त्याने शब्दरूपानेच नव्हे तर संगीत, नृत्य, शिल्प आणि चित्राच्या रूपाने जतन केले आहेत. आयुष्यात आलेले अतर्क्य अनुभव मग प्रेरणारूपी असोत वा गुंतागुंतीचे असोत त्यामुळे एकप्रकारे मानवाच्या आयुष्याला समृद्धीच लाभली आहे, हे नाकारण्याचे कारण नाही.

फ्रॉईडने म्हटल्याप्रमाणे मानवी आयुष्यात क्षुल्लक असे काहीही नसते. त्याचा अनुभव आणि त्यातून निर्मित होत असलेली प्रत्येक क्रिया ही अर्थपूर्णच असते. 'लेखक' मग या क्रियेलाच यथामती शब्दरूप देऊन जे साहित्य निर्माण करतो ते आयुष्याच्या प्रत्येक सीमेवर त्याला लाभलेल्या अनुभवाची संपन्नता दर्शविते. माझ्यासारखा सामान्य वाचक त्या पानापानातून 'आपले' आयुष्य शोधित जातो आणि कुठल्यातरी आडवळणाच्या एखाद्या बुद्रुक वा खुर्द थांब्यावर त्याला सहप्रवासी म्हणून 'लेखक' भेटतो. तिथे मग त्या दोघांची नाळ जुळते. कलेच्या निर्मितीचे स्त्रोत आहे ते तुमच्यामाझ्यात म्हटले जाते ते या क्षणी.

"शेवटचे थेंब निथळून जाण्यासाठी भांडे पालथे घालावे तसे आपले आयुष्य आता पालथे घातले गेले आहे...."

- जी.ए.कुलकर्णी यांच्या 'राणी' कथेतील (निरर्थक झालेल्या) आयुष्याचे सार सांगणारे एक हृदयस्पर्शी आणि वाचकाला गलबलून टाकणारे एक वाक्य. आयुष्याची अखेर अशी होत असेल तर मग मी इतक्या वर्षात जे मिळविले त्याचे फलीत हेच असेल तर मग माझेच गणित कुठे तरी चुकले असणार....असे ज्यावेळी आपण म्हणू अन् जर ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करू तेव्हा कुणी सांगावे त्यातून कसल्याही अलंकारने नटली नसणारी पण सुजाण वाचकाला अंतर्मुख करून टाकणारी कलाकृती निर्माण होईल.

कलेच्या निर्मितीचा आणि अस्तित्वाचा पाया उभा राहतो तो अशा जळजळीत उदाहरणातून. मनुष्याचे आयुष्य हे सुरूवातीला एखादा आरसा पुसल्याप्रमाणे स्वच्छ, नितळ ताजे असते. वेळोवेळी त्यात उमटणारी प्रतिबिंबेच लेखक क्षमतेनुसार वाचकासमोर आणत असतो, नव्हे त्याला ते आणावेच लागते.

अशोक पाटील

{@ टण्या ~ प्रतिसादाबद्दल आपण व्यक्त केलेली भावना वाचली. धन्यवाद देतोच, पण तुम्हाला जे काही आवडले त्याचे मूळ कारण श्री.बेफिकीर यांचा लेख आहे, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो.)

विलंब झाल्याबद्दल दिलगीर!

योग,

<<<<थोडक्यात तुमच्या लेखातील मूळ मुद्दा की सहित्य निर्मीतीच्या पातळ्या आणि त्यांचा रसग्रहणाशी थेट व आडून संबंध या अनुशंगाने एव्हडेच मत मांडायचे होते की रसग्रहण ही त्या वेळेपुरतीची एक स्थायी फ्रेम धरली तर नेमकी ती फ्रेम हे "लक्षण" आहे का मूळ साहित्यकॄतीच्या "स्टेज" ला पोचलेली आहे हे कळायला देखिल वाचक कुठल्या फ्रेम मध्ये आहे हे विचारात घ्यावे लागते. अशा वेळी रसग्रहणाची कक्षा फक्त "सौंदर्यशास्त्र" पुरती मर्यादीत ठेवणे हे फारच संकुचित वाटते.>>>>

साहित्यकृतीच्या दर्जात्मक पातळ्यांचा खरे तर मी रसग्रहणाशी संबंध लावलेला नाही, मात्र शीर्षकामुळे व 'मी तसे स्पष्टपणे न म्हंटल्यामुळे' तसे वाटणे साहजिक आहे व क्षमस्व! मला साहित्याच्या दर्जात्मक पातळ्या हा एक विषय व रसग्रहण हा दुसरा विषय असे नोंदवायची इच्छा होती पण तसे बहुधा झाले नाही.

साहित्याच्य दर्जात्मक पातळ्यातील कोणती पातळी रसग्रहणाचा दृष्टिकोन रसग्रहण करणार्‍यास प्रदान करते इतपत संबंध निश्चीत आहे व ते मी स्पष्टपणे म्हंटले नाही याहीबाबत क्षमस्व!

माझ्यामते मूळ साहित्यकृती, समीक्षा (मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, साहित्यशास्त्रीय, उपयोजित अथवा शुद्ध समीक्षा) तसेच रसग्रहण या तीनही स्वतंत्र कलाकृती असतात व 'वाचकाची मानसिकता' गृहीत धरून त्या निर्माण होत नसाव्यात तर मानसिकता निर्माण करणे हा त्यांचा उद्देश असतो. किंबहुना, तोही उद्देश नसतो तर केवळ व्यक्तीकरण हा उद्देश मानला जात असतो / असावा. उदाहरणार्थ मला रसग्रहण करायचे असल्यास ते रसग्रहण कोण वाहणार आहे याच्याशी 'प्रत्यक्ष रसग्रहण नोंदवताना' मला देणेघेणे नसते / नसावे. एखाद्या कलाकृतीचे मी (म्हणजे कोणीही) केलेले रसग्रहण ही एक स्वतंत्र कलाकृती व्हावी इतपत उद्देश असू शकतो / शकावा.

==========================================================

<<<<""असहाय्यता व अगतिकता व त्यामुळे निर्माण झालेली 'अदृष्य शक्तीवरील' श्रध्दा""" हा अध्यात्माचा नव्हे तर अंधश्रध्देचा पाया आहे>>>>

मला तरी असे वाटते की अध्यात्माचा पाया काय असतो / असू शकेल हे एकदा तपासून घेणे आवश्यक ठरावे. मानवी जीवनाची गृहीत धरली गेलेली निरर्थकता ही प्रेरणा किंवा चालना ठरू शकते.

पुरला सिकंदराला खड्यात.... हात वरती
एक मृत्यु माणसाला शिकवे किती उपरती

जगज्जेत्यांचाही अंत ठराविक आहे याची जाण, कर्तृत्वाला नैसर्गीक मर्यादा आहेत याची जाण माणसाला अंधश्रद्ध बनवत नाहीत. माझ्यामते आपण 'असहाय्यता व अगतिकता' यांचे भौतिक अर्थ गृहीत धरले आहेत. येथे असहाय्यता यात असे म्हणायचे आहे की सर्व ऐंद्रीय क्षमतांचा शक्य तितका वापर करूनही प्रयत्नांना मर्यादा पडतात किंवा तृष्णेची भावना हर श्वासागणिक फोफावतच जाते व या सर्वामागे असलेली प्रेरना अद्भुत, अदृष्य व तरीही 'निश्चीत' अशि आहे याची जाणीव होते तेव्हा माणुस नतमस्तक होतो. मला 'असहाय्यता' ही अपंगत्व, अयशस्वी असल्यातून आलेली मनस्थिती किंवा तत्सम काही म्हणायचे नसून ही असहाय्यता मानवी जीवनाची असहाय्यता अभिप्रेत होती. तसेच अगतिकताही एकंदर मानवी जीवनाची अभिप्रेत होती.

फरक अधिक स्पष्ट व्हावा यासाठी हे उदाहरणः

एखाद्या ग्रामीण भागात सुनेने अतोनात छळ सहन करून शेवटी अंगात आल्याचा अभिनय करायला सुरुवात करणे ही भौतिक असहाय्यतेतून आलेली अंधश्रद्धा!

उदरनिर्वाहाचे उत्कृष्ट साधन असलेली कर्जाची सावकारी खते नदीन बुडवून विठ्ठलचरणी लीन होण्याची मानसिकता येते ही जीवनाच्या अनाकलनीयतेमुळे व गृहीत् धरलेल्या अर्थशून्यतेमुळे निर्माण झालेली अध्यात्मिक भावनेची प्रेरणा! या पातळीला निर्माण झालेली (केवळ साहित्यकृतीच नाही तर) प्रत्येक कलाकृती ही दयाभाव, त्याग, भौतिक मोहापासून हेतूपुरस्पर स्वतःला वंचित ठेवणारी व लीनतेची, नम्रतेची सर्वोच्च पातळी असणारी असते व त्यामुळे त्याहून अधिक श्रेष्ठ असे काही उरू शकत नाही असे म्हणायचे होते. Happy

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

कथालेखन, चर्चा आणि संवाद हा धागा फॉलो करताना वरील लेखाशी निगडीत असे काही मुद्दे निघाल्यामुळे हा लेख पुनर्प्रकाशित करत आहे.

-'बेफिकीर'!

Pages