ती

Submitted by तायड्या on 30 July, 2011 - 05:42

शब्द चित्र
ती

ती सावळी कटकुळी
सकाळी लवकर उठते
चूल पेटवते सर्वांना उठवते
सर्वांचे आंतरात्मे शांत करते
कोयती घेऊन बाहेर पडते
जंगलात जाऊन फाटी फोडते
मोळी बंधून घरी आणते
तेव्हा कुठे दुसर्‍या दिवशीची चूल पेटते

आता आलाय गॅस पण तो आहे महाग
घरधनी म्हणतो जरा काटकसरीने वाग
मग काय फक्त चहा दूध गॅसवर
बाकी सगळ चूलीवर

परसांत लावते केळ वेल घोसाळी गवारी
म्हणते प्रकृतीला गावरान भाजीच बरी
तोटक्या कमाईला हातभार लावते घरकाम करून
पण त्यातही सफेड काळ्या मांजराला घेतेच गोंजारून

सांजेला आता लाईटात झरझर चालतो हात
पण कान डोळे असतात मुलांच्या परवाच्यात
म्हणते कानाडोळा अभ्यासांत चालणार नाही
अन स्वतःत हरवून मुलांचे भविष्य पाही

उन्हाळ्यात फाटी शिवाराचा राप
पेरणीला वाफा तयार साफ
तरारले आवण तिच्या डोळ्यात दिसते
अन लावणीला सगळ कुटुंब बसते

खत बेणणी करून पीक उभे रहाते
पण चोरा पाखराण्पासून राखण कोण करते
दुपारच्या वेळात जाऊन बसते मग शेतात
हातातली गोफण चालत असते सुसाट

एवढ्या सगळ्यातही ती उपासतापास करते
नटून सजून नथ घालून वडाला फेरे घालते
गणपती बसवते गौरी सजवते
दारीच्या पालखीची पूजा ही करते

होता होता पीक हाताशी येते
कापणी करून दारात ढिगारते
मग काय मळा कांडा सुरु होते
सफेद लाल सोन्यान कोठार भरते

मग सुरु पुढल्या वर्षीची तयारी
ही ची ही रीतच न्यारी
आजारपणाला सवड नाही
आणि ते परवडणारे ही नाही

वाटेत भेटली तर साद देतेच काही
काय ताई? बर्‍या आहात ना बाई?

कोण ही ? कुठची ही?
कोंकण ची घाटावरची कि विदर्भातली ?

का ही आहे आपल्या सर्वांत दडलेली ती ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: