द्विधा

Submitted by Aditiii on 29 July, 2011 - 03:22

तुझ्या मनाची उघडून कवाडे
येउदे आठवणींना आत थोडे
कधी उन श्रावणाचे
कधी वैशाख वणव्याचे
कधी थेंब पावसाचे
कधी पूर आसवांचे ................

शब्द अजूनही मनात रुंजी घालत होते. त्या धुंदीत खरं तर अजून थोडे रमायला आवडले असते पण घड्याळ परवानगी देत नव्हते. जड पायांनी उठून ती बाहेर आली. समीर उभाच होता गाडी काढून. ती गप्प पाहून त्यानेच बोलायला सुरुवात केली काय झालं गं? प्रयोग मस्त रंगला होता आज नाही? सगळेच खुश झाले. पुढचा प्रयोगही ठरला म्हणे. काहीतरी बोलायचा म्हणून तीनेही हो ला हो केले घरी पोहोचेपर्यंत आई ग्यालरीत उभीच होती. तसा उशीरही बराच झाला होता. पण नाटकाचे प्रयोग हे नेहेमीच उशिराचे आणि नंतर आवरून बाहेर पडायला अजून उशीर मग घरी पोहोचेपर्यंत बऱ्याचदा एक वाजून गेलेला असे. आई आधी काळजीने आणि आता वैतागाने उभी राही वाट बघत ती घरी आल्यावर जेवण वाढून मगच झोपायला जाई. आजही तसेच झाले.

अंथरुणावर पडल्यावर डोळे जड होत होते पण मन मिटत नव्हते. भविष्याचा विचार मनातून हटत नव्हता. काय करायचे पुढे? नाटक चालू ठेवायचे? मास्टर्स करायचे? दोन्ही एकदम जमेल? पैशांच काय? आई बाबा नकोच म्हणतात नाटक, त्यांच्या मध्यमवर्गीय मनाला पटत नाही अजून. ताई नोकरी करून शिकून रुळलेल्या वाटेनी गेली आता शिकवते मास्टर्सला. तिनी तिचे निर्णय घेतले सुदैवाने ते बरोबर ठरले आता ती छान आहे. मी काय करू? विचार करता करताच तिला झोप लागली.

जान्हवी, एका तशा गरीबच घरातील मुलगी. आई बाबांचे उत्पन्न तसे तुटपुंजेच. नशिबानी चांगली परिस्थिती असताना डोक्यावर एक छप्पर दिलेले. लहानपण तसे सुखाचे मात्र मौज मजा काही फारशी नशिबी आली नाही. मोठी बहिण, लहान भाऊ आणि ही मधली मुलगी. बुद्धिमता तशी छान मात्र प्रथम क्रमांक नाही रूप साधे पण सुन्दर. मान खाली घालून रुळलेली वाट चालताना अचानक समोर एक संधी आली तिला योगायोगानेच एका नाटकात काम करायची संधी मिळाली.

त्या घटनेने तिचा आयुष्य बदललं नाही तरी तिच्यात मात्र खूपच फरक पडला तिच्या वागण्या बोलण्यातून एक आत्मविश्वास जाणवायला लागला तिला स्वतःची दिशा मिळाली. ती खुश होती. मात्र तो आनंद फारच थोडे दिवस टिकला. तिच्या जाण्या येण्याच्या अनियमित वेळा, नाटकाचा विषय या सर्वांवरून घरात कुरबुरी चालू झाल्या मात्र तिची मनाची शांतता भंगली. ती घर आणि आवड या दोन टोकांमध्ये रेंगाळू लागली काय करावं?

पैशाची गरज तर ती ही नजरेआड करू शकत नव्हती आणि आता तरी ती नवीन असल्यामुळे तिला उत्पन्न काहीच नव्हतं आणि आई बाबांचा विरोध वाढत होता यातून कसं मार्ग काढू? या विचाराने डोकं शिणून गेला होतं. मात्र या ही परिस्थितीत तिचा नाटकामध्ये रंगून जाऊन काम करणं थांबलं नव्हतं. ती त्या वेळात स्वतःला विसरून त्या रंगमंचावर जणू दुसरीच कोणी म्हणून वावरू लागे. मुक्त स्वच्छंद, ज्या आयुष्याची तिनी केवळ स्वप्ने रंगवली होती, ती जणू ती प्रत्यक्षात जगात असे. मात्र प्रयोग संपताच सर्व काळज्या तिच्या हृदयावर परत विराजमान होत.

कधी कधी मन बंड करून उठे. का म्हणून प्रत्येक गोष्टीत मला तडजोड करायला लागते? पण या प्रश्नांचा उत्तर तिला कोणीच देऊ शकत नव्हतं. जबाबदारी स्वीकारावी का स्वार्थ जपावा या कात्रीत ती सापडली होती..............................

रुळलेल्या वाटेवर तिच्या पाउलखुणा मला अजून दिसतात!!!!!!!!!

गुलमोहर: 

चांगली मांडलीये द्विधा मनस्थिती........

अवांतर - त्या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत...छान आहेत.

रुळलेल्या वाटेवर तिच्या पाउलखुणा मला अजून दिसतात!!!!!!!!!>>>>> म्हणजे??? ती रुळलेल्या वाटेवरूनच गेली???? Sad

लेखन आवडले. मला माझ्या तरूणपणाची आठवण झाली. उत्साहाने नाटकास सुरवात केली. आणि आई करवादली तोंड रंगवून पोट भरत नाही बाळा. शिवाय नाटक सिनेमा वाल्याना मुली देत नाहीत कुणी.
आज सुखी आहे.पण नाटक पाहीलं की गळा भरून येतो.
असो. कविता नेम़क्या शब्दात बरंच काही सांगून जाते.
पु.ले.शु.

माफ करा पण अश्या प्रकारच्या खंतावण्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं.
तुमची एखाद्या क्षेत्राबद्दलची ओढ, निष्ठा तेवढी मोठी असेल तर ती तुम्हाला तिथे खेचतेच. आर्थिक असुरक्षितता, सगळ्यांचा विरोध पत्करून तुम्ही ते करता. ते सोपं नसतं. त्यासाठी हिंमत आणि कलाक्षेत्राची ओढ आणि मेहनतीची तयारी असं सगळं लागतं.
खंतावणार्‍यांपैकी एखादा अपवाद सोडल्यास बहुतेकांची आर्थिक असुरक्षितता आणि अनेकांचा विरोध इथे विकेट पडते. त्याला त्यागाचं गोंडस रूप देऊन मग स्वतःला कुरवाळत बसलं जातं. तर तो त्याग वा तडजोड असं काही नसतं. आपल्याला जे झेपतंय तो निर्णय आपण घेतलेला असतो. इतकंच...
कदाचित हार्श वाटेल हे पण ही वस्तुस्थिती आहे.

नीधप,
तुमचा म्हणणं खरं आहे. पण मला असं वाटतं, मुलांपेक्षा मुलींना बऱ्याचदा अशी तडजोड करायला लागते. सगळ्यांना नाही पण बऱ्याच जणांना. या बाबतीत अजूनही फारच थोड्या लोकांना सगळं सोडून फक्त आपल्या इच्छांचा पाठपुरावा करता येतो. कारण प्रत्येकाचा वेगळं मात्र बोच सारखीच असते, मग मुलगा असो व मुलगी!!!!

<<मुलांपेक्षा मुलींना बऱ्याचदा अशी तडजोड करायला लागते>>

तडजोडी दोघांनाही करायला लागतात. कारणे वेगळी असतील.
अर्थार्जनाची जबाबदारी सामान्यतः मुलावर येते. अशा वेळी आर्थिक सुरक्षितता नसेल अशा क्षेत्रात जायचे धाडस दाखवायला तसे पाठबळ लागते. (अनेक कलावंतांची चरित्रे वाचताना त्यांच्या पत्नीने संसाराची आर्थिक बाजू सांभाळल्यानेच त्यांना कलाक्षेत्रात काही करणे शक्य झाले हे नमूद केलेले दिसते).
सचिन तेंडुलकर एकुलता एक मुलगा असता तर तो आजचा सचिन असता का?

मुलींना जास्तकरून लग्नानंतर वाटा बंद होतात.