लवगुरू काळू

Submitted by देवनिनाद on 8 July, 2011 - 01:04

काळूबाळू हे तसे जुळे बंधू. तब्बल ४० वर्ष तमाशातील आपल्या खुमासदार वगनाट्याने अवघ्या महाराष्ट्राला या दोघांनी वेड लावलं ... तमाशा कलावंत काळू तथा लहू खाडे आज आपल्यात नाहीत, आपले भाऊ बाळू यांना जोडीदार म्हणून साथ देणारे काळू यांनी आपल्यातून कायमची एक्झीट घेतली, बाळू यांचा विनोद एकपात्री करून गेले ... तमाशासम्राट काळू यांना मायबोलीकरांकडून भावपुर्ण श्रध्दांजली ...

काळू - (फोनवर बोलत) आता तुमी चुकीचं दाबलं म्हटल्यावं हेच होणार साहेब. एकावेळी एक दाबायचं ... एकदम दोन दाबायचं हावरेपणा का केला तुम्ही .... हे म्हणजे चुकायचं तुम्ही आणि फाशी जायचं आम्ही असं झालं. ठेवा फोन, पुढच्यावेळी काय दाबायचं ते ठरवा आणि इचार करून दाबा.

बाळू - काळू, सकाळ सकाळ देवाचं मंत्र म्हणावेत, मोठ्या माणसाच्या पाया पडावं, काय हे सकाळ सकाळ दाबायच्या गोष्टी करतोस, .. वंगाळ लेकाचा ... रात्री काय खाल्लं, आणि काय केलं

काळू - झालं आसलं तूझं ओकून तर आता तोडाचं झेरॉक्स मशीन बंद ठेव .... मी वंगाळ बोलत नव्हतं जे तू एकलं त्याचं वंगाळ करून तूच तूझ्या डोक्यात भरलयसं.

बाळू - अरे मग हे एक दाबा दोन दाबा ... हे काय आहे

काळू - ते मी माझ्या नव्या धंद्याचं बोलत होतो.

बाळू - शी !! काळू लेका हे कुठला धंदा दाबा दाबीचा

काळू - बाळू तुझा सेक्स मला कळला लेकाचा ... आपण इंग्रजी फॉर्म भरताना सेक्स लिहीताना मेल असेल तर एम लिहितो आणि फिमेल आसलं तर एफ लिहीतो तू ए लिहित असणार लेका

बाळू - ए म्हंजी ...

काळू - ए म्हणजे अ‍ॅनिमल .. लेका माणूस आहेस तर माणसावानी बोल, हे काय काय उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. अरे मी लव अ‍ॅन्ड मॅरेज ब्युरो सुरु केलाय ... त्यो बी मोबाईलवरून

बाळू - मोबाईल वरुन मॅरेज ब्युरो .. जरा विस्कटून सांग.

काळू - म्हणजे मी लवगुरु होनार लवगुरु आबूराव ... लोकांना प्रेमाचे सल्ले देऊन, खरं प्रेम करणार्‍या लोकांची लग्न लावून देनार. तशी सिस्टीम मी माझ्या मोबाईलवर शेट केलीया.

बाळू - म्हणजे ?

काळू - म्हणजे समजा मला कुणी डायल केल.

बाळू - आयला काळू तुला डायल करायचं .. म्हणजे तू काय मोबाईलसारखी बटनं बसवली का काय ?

काळू - बाळू लेका, त्वांड आहे का २४ तास चालू पाण्याचा नळ. जरा दोन मिनिट शांत उभा राहा

बाळू - दोन मिनिटं शांत राहून कुणाला श्रध्दांजली द्यायचेय.

काळू - तू तर उठसुठ पंच मारुन बतावणीच करुन राहीला. लेका ऐक की ... मला कुणी फोन केला की समोरच्या रेकॉर्डींग ऐकायला मिळणार ... नमस्कार लवगुरू आबुराव लव आणि मॅरेज सेंटरवर आपलं स्वागत. योग्य प्रियकर हवा असेल तर १ दाबा, प्रेयसीसाठी २ दाबा, ३ नवीन जोडीदारासाठी ४ दाबा, साखरपुड्यासाठी ५ दाबा, हॉल आणि लग्न तयारीसाठी ६ दाबा, सत्यनारायण पुजा, पाच पर्तावन साठी ७ दाबा, देवदर्शन साठी ८ दाबा, हनीमुनसाठी ९ दाबा आणि इतर माहीतीसाठी १० दाबा.

बाळू - आबुराव, लेका काय झ्याक सिस्टम काढलेस. फर्मास चालेल लेका.

काळू - खरं बोलतोस.

बाळू - तर काय, मी तुला डायल करु का ? म्हणजे तुला गिर्‍हाईकाचं मत कळेल.

काळू - आयला ही लय बेस्ट आयडीया हाय ... फिरव नंबर

बाळू - (डायल करतो आणि रेकॉर्डींग ऐकतो...) काळू लेका मी १० दाबतो. म्हणजे मला अधिक माहीती मिळेल. दाबला.

काळू - नमस्कार मी लवगुरू काळू बोलतोय, बोला मी आपली काय मदत करू शकतो.

बाळू - नमस्कार मी छमछमनगरहून बाळूराव बोलतोय. मला लग्न करायचं आहे.

काळू - काळजी करून नका आमी तुमचं लग्न लावून देतो

बाळू - पण माझं १ लग्न झालयं, दुसरं करायचं असेल तर काय दाबायचं

काळू - सोप्प आहे, काय नाव म्हटलं तुम्ही तुमचं ... हां बाळू... तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर आधी पहिल्या बायकोचा गळा दाबा. काय लेका माझ्या धंद्याची चेष्टा करतो ...

बाळू - तसं नव्हं काळू लेका, काय काय गिर्‍हाईक असतात येड(....) येडे ...

काळू - ते बी खरचं हाय.

बाळू - आता दुसरा फोन करतो. (गाण्याच्या चालीत) हॅलो मी बाळूराव बोलतोय.

काळू - बोला ...

बाळू - (गाणं म्हणत) काय बोलू बरं, तु बोलल्यावर ... जीव माझा फुलावानी फुलतोय.

काळू - हे काय ...

बाळू - चुकलं ते बोला म्हटल्यावर गाणं आठवलं ... परत डायल करतो ... हां हॅलो मी बोलतोय..

काळू - मी कोण ? अमिताभ ..

बाळू - नाही त्याचा सावत्र चुलत आणि सख्खा आतेभाऊ बोलतोय. काळू लवगुरु आपणच का.

काळू - बोला.

बाळू - काय आहे. गेल्याच आठवड्यात माझं लग्न झालं. आणि आठवड्याभरातच माझं आणि माझ्या बायकोचं भांडान झालयं ती माहेरी गेलेय.

काळू - बोला.

बाळू - तर बायको रागावून माहेरी गेल्यामुळे, माझा हनीमून तसाच राहीलाय. तर समजा मी ९ नंबर दाबला तर हनीमूनसाठी मला एखादी बायको मिळेल का ?

काळू - च्या मायला बाळू. हे माझं लव अ‍ॅन्ड मॅरेज सेंटर म्हंजी तुम्हाला काय बिग बाजार वाटला का. हे नाही तर ते घ्यायला. आलं लक्षात बाळू लेका ... माझा हा नवा धंदा तुझ्या डोळ्यात खुपतोय.

बाळू - तसं नाही रं काळू . काय आहे आता असतात एकेक गिर्‍हाईक .. तिसरा फोन करू का ?

काळू - जाळून टाक तुझा तो फोन. सकाळपास्नं मीच भेटलो काय तुला. चल हो बाजूला.

बाळू - बरं मी काय म्हणतो काळू तुझ्या ह्या सिस्टीममध्ये ... ११ नंबर टाकता येईल.

काळू - ११ नंबर ... तो कशाला

बाळू - काय आहे आज काल बायकांना दु:ख काय कमी आहे. बायको ही उपभोगाची वस्तू आहे असं समजून बरेच पुरुष लग्न करतात आणि मग बायकांना कधीही घटस्फोट देतात. अशा बायकांना मी स्वतः आधार देईन. मग काळू उद्या तुमी तुमच्या बायकोला जरी घटस्फोट दिलात तरी घाबरू नका, मी तिला बी सांबाळीन.

(एवढं ऐकल्यावर काळू पायताण काढून बाळूच्या मागे लागतो)

- देवनिनाद

गुलमोहर: 
शब्दखुणा: