अव्यक्त

Submitted by सा.ज. on 3 July, 2011 - 23:26

आपण समोरा-समोर आल्यावरही,
मी हसुन बोलत नाही...
याचा अर्थ असा होत नाही की,
तुला बघुन मला आनंद होत नाही...

तु मला कित्ती कित्ती आवडतोस,
हे तुला कळु नये म्हणुन घातलेला तो मुखवटा असतो...
तो मुखवटाही इतका जाड असतो की,
तुलाच काय आजुबाजुच्या कोणालाच कळत नाही

तुला कळु नये म्हणुन काय करावं लागतं..
ते माझं मलाच माहित,
तुला जाणवतही नाही,
आणि मला सोसवतही नाही...

तुझ्या विचारानेही मी कित्ती भारावुन जाते,
ते फक्त माझ्या डेस्कटॉपच्या मॉनिटरलाच माहित...
कारण तुझ्या साध्याश्या फॉरवर्ड मेलनेही
होणारा हर्ष त्यानेच तर पाहिलाय...

तुला मेल करण्यासाठी कारणं शोधताना,
किती यातायात होते,
आणि कारण सापडल्यावर किती छान वाटतं..
मेल टाइप करताना तर ..
तुझ्या समोर बसुन बोलल्याचाच भास होतो मला..
हे फक्त माझ्या डेस्कटॉपच्या मॉनिटरलाच माहित...

मेल सेन्ड करतानाची धाकधुक,
सेन्ड केल्याकेल्या रिफ्रेश ची आवर्तनं..
तुझा रिप्लाय येइपर्यंतची तगमग..
आणि रिप्लाय आल्यावर तो वाचेपर्यंत कासावीस होणारी मी..
हे फक्त माझ्या डेस्कटॉपच्या मॉनिटरलाच माहित...

तु समोर असताना घातलेला मुखवटा मात्र,
तु पाठवलेले मेल्स वाचताना,
तुला मेल्स करताना, तुझ्याशी चॅटिंग करताना..
माझ्याही नकळत कसा गळुन पडायचा..
ते फक्त माझ्या डेस्कटॉपच्या मॉनिटरलाच माहित...

तुला माझ्या बद्दल नक्की काय वाटतं,
हे मात्र कधीच कळलं नाही..
तुझ्या मेल्स मधुन आत्मीयता जाणवायची,
पण इतर कुठल्या भावना असतील,
अशी पुसटशीही शंका घ्यायची म्हणुनही यायला काहीच वाव नव्हता

हे सगळं तुला कळावं
असं खूप वाटतं रे...
पण बंधनं झुगारुन देण्याची हिंमत नाहिये...
आणि तसही
तुझ्या डेस्कटॉपच्या मॉनिटरचं काय म्हणनं आहे
हे मला कुठं माहित आहे...

कधी कधी वाटायचं,
हे मॉनिटर्स जर एकमेकांशी चॅटिंग करत असते,
तर कित्ती बरं झालं असतं..
म्हणजे मेल्समधुन आलेल्या शब्दांना,
त्यांनी भावना चिटकवल्या असत्या..

पण नकोच असलं स्वप्नरंजन..
कुणी सांगावं,
अगदीच त्रासिक भावनाही पोहोचल्या असत्या आणि
मग माझं मेल्स करणं, वाचणं यातला आनंदच संपला असता..
त्यापेक्षा अज्ञानातच सुख मानावं, हे बरं..

त्यामुळे वाट पाहणं वगैरे वगैरे
हे असच चालु राहणार...
काही दिवसांनी मलाही कदाचीत काही वाटणार नाही,
आणि मॉनिटरही तोपर्यंत बदलेला असेल..
तुझा तर प्रश्नच येत नाही...

सगळ्याची साक्ष असलेला तो मात्र,
कुठेतरी धुळ खात पडला असेल..
माझ्या मनातल्या आपल्या नात्यासारखाच,
अव्यक्त.....

गुलमोहर: 

आवडली.
>>>तुला जाणवतही नाही,
आणि मला सोसवतही नाही...<<< आणि मॉनिटरची कल्पना आवडली Happy पण नको बाई (कवितेतल्या मुलीला म्हणतेय ) इतकी गप्पा अन अव्यक्त राहू, नको इतकी व्हर्च्युअली फक्त व्यक्त होऊ, बोल एकदा, त्याच्याशीच खळखळून Wink

Happy

> तुझ्या विचारानेही मी कित्ती भारावुन जाते,
> ते फक्त माझ्या डेस्कटॉपच्या मॉनिटरलाच माहित...

माझ्या डेस्कटॉपचे नाव अव्यक्त आहे, त्यादृष्टीने विचार केला तर जरा जास्तच काँप्लीकेटेड प्रकार होईल.

वाह !
सगळ्याची साक्ष असलेला तो मात्र,
कुठेतरी धुळ खात पडला असेल..
माझ्या मनातल्या आपल्या नात्यासारखाच,
अव्यक्त.....

मस्त लिहिलंय.

कधी कधी वाटायचं,
हे मॉनिटर्स जर एकमेकांशी चॅटिंग करत असते,
तर कित्ती बरं झालं असतं..
म्हणजे मेल्समधुन आलेल्या शब्दांना,
त्यांनी भावना चिटकवल्या असत्या..>>> वेगळीच कल्पना आहे! एकदम क्लास!!!! Happy

अवलला अनुमोदन!!!!<<<पण नको बाई (कवितेतल्या मुलीला म्हणतेय ) इतकी गप्पा अन अव्यक्त राहू, नको इतकी व्हर्च्युअली फक्त व्यक्त होऊ, बोल एकदा, त्याच्याशीच खळखळून>>> Happy

सगळ्यांना धन्यवाद Happy

(कवितेतल्या मुलीला म्हणतेय ) >>> अवल Happy

माझ्या डेस्कटॉपचे नाव अव्यक्त आहे, त्यादृष्टीने विचार केला तर जरा जास्तच काँप्लीकेटेड प्रकार होईल.>>> aschig तुमचा विचार विस्ताराने वाचायला आवडेल Happy मी तरी कॉम्प्लिकेटेड प्रकाराची कल्पनाही करु शकत नाहिये... Wink

मेल सेन्ड करतानाची धाकधुक,
सेन्ड केल्याकेल्या रिफ्रेश ची आवर्तनं..
तुझा रिप्लाय येइपर्यंतची तगमग..
आणि रिप्लाय आल्यावर तो वाचेपर्यंत कासावीस होणारी मी..
हे फक्त माझ्या डेस्कटॉपच्या मॉनिटरलाच माहित...

आवडल...खूप खूप आवडल..!

.